आशुतोष पोतदार

आठवणं आणि विसरणं
विसरणं आणि आठवणं

back

आपण दुकानाच्या शोधात बाहेर पडलेले असतो. चालत राहातो, चालत राहातो. पण, दुकान सापडत नाही. दुकानाचं नाव आठवत राहातं, दुकानाचा मालक आठवत राहातो. तिथं काम करणा-या मुलाकडे बघून आपण वैतागून, मनातल्या मनात, बोललेलो असतो की किती छोटी मुलं काम करतात. शेजारच्या दुकानातल्या काचेच्या पलिकडची स्त्री-पुरूषांची अंतर्वर्स्त्रे डोळ्याभवती फिरत असतात. अंतर्वस्त्रांच्या पलिकडून सजवलेली गणपतीची मूर्ती आपल्याकडे डोकावत असते. सगळं सगळं आठवतं पण दुकान का विसरतोय आपण. गर्दीच्या रस्त्यावर पुढे मागे करत राहातो. कर्कश्य आवाज करत वहाने जात राहातात. दोन एक माणसांना विचारायचे म्हणून पुढे सरकतो तर ती माणसे मोबाईल वर बोलत राहातात. एक दोन माणसे गाडी स्टॅंडवर लावत असतात. दिसलेली तीन-चार माणसे मोबाईलवर टाईप करत असतात. एक स्त्री-पुरूष जोडपं गुलुगुलू बोलत असतं. दोन पुरुष खांद्यावर हात टाकून एकमेकाला खेटून उभे राहिलेले असतात. दोघी जणी सेल्फी काढत असतात. कुणाला विचारायचं असा विचार करत उभे असता. तेवढ्यात, तुम्ही लावलेली टू-व्हिलर नो-पार्कींगच्या ठिकाणी लावली असेल काय या विचाराने मन अस्वस्थ होते. आपण दुकान शोधण्याऐवजी पार्कींगकडे जाऊन गाडी योग्य ठिकाणी लावलीय काय ते पाहू म्हणून जातो. पण, तोवर दुकानाचा आतापता विसरलेला असतो.

आठवणं असतं कारण विसरणं असतं, विसरणं असतं कारण आठवणं असतं. एकाच नाण्याच्या दोन बाजू. असं नसेल तर, तर सगळं डल्ल, डल्ल कॉम्प्युटर सारखं जो स्वतःची अशी काही निर्मिती करु शकत नाही. नित्शे लिहितो “विसरण्याशिवाय जगणंच अशक्य”. विसरण्याच्या जेवढ्या नाना त-हा, आठवणं तेवढंच वैविध्यपूर्ण. आठवणी एखाद्या व्यक्तीच्या असतात, त्या रमणीय आठवणी असतात वा बोचणा-या, मनाशी जपून ठेवाव्या अशा हळव्या असतील तर कधी नकोत या आठवणी असं म्हणून त्यापासून आपण पळून जात असू. आपापल्या परीने माणूस आपापल्या आठवणींचं बरं-वाईट, रंगवणं-पुसणं वगैरे करतच असतो. वेगवेगळ्या कारणाने ‘आपले’ वाटणारे मानवी गट घेऊन आपल्या ‘सर्वांच्या’ आठवणीही आपण आळवत असतो. रंग, वस्तू, चव, एकत्र व्यतित केलेले क्षण, सांगितलेल्या अन् ऐकलेल्या गोष्टी यातून ‘आपल्या’, ‘सामायिक’ आठवणीही आपण जपत असतो.

अमेरिकेतील पब्लिक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस (पी. बी. एस.)च्या डिस्कवरिंग सायकॉलॉजी या मानसशास्त्रातील विविध अभ्यास-शाखांची ओळख करुन देणा-या डॉक्युमेंटरी मालिकेतील नववा भाग ‘विसरणे आणि आठवणे’ या विषयावर आहे. विख्यात मानसशास्त्रज्ञ फिलिप झिम्बार्डो यांनी दिग्दर्शित केलेली ही फिल्म १९९० मधे निर्माण झाली. या फिल्ममधे माणसाच्या मनात वेगवेगळ्या पातळ्यांवर विसरणं आणि आठवणं कसं घडत असतं याचे सविस्तर विवेचन केले आहे. वस्तू, भाषा, विचार, माहिती, आकार, तंत्र, चेहरे, घटना, वास, हालचाली, कृती बोध आणि अबोध मनात खोलवर साठवून ठेवलेल्या असतात. एखादी आठवण, अगदी साधी असली तरी आपण सहज विसरतो. काही आठवणी आपण हव्या तेंव्हा समोर आणतो. तर, काही इतक्या खोलवर असतात की विसरता विसरत नाहीत. असं का होतं याबद्दलचं संशोधन मानसशास्त्रज्ञ, मानवी मेंदूचे अभ्यासक जगभरात करत असतात.

विसरणं आणि आठवणं यात नवनिर्मितीची बीजं असतात. भूतकाळ वा गतकाळची मोजदाद आठवण्यातून होत नसते किंवा तो काही आरसा नसतो हुबेहूब गतकाळ दाखवणारा. आठवणींच्या गाळणीतून कधी तोडून मोडून कधी चुकीचा काळ आपल्यापर्यंत घरंगळत येत असतो. घरगंळत येऊन कंपने करत थांबलेला क्षण-काळ आपण गतकाळाची गोष्ट म्हणून घडवतो, बांधतो, मांडतो, सांगतो. आपली आठवण भूतकाळाची एक आवृत्ती असते. आठवणी सिध्द करण्यासाठी आणि त्यातून आपली गोष्ट घडवण्याचे पुरावे, नाना तऱ्हेचे दस्तैवज, वस्तू, गोष्टी, कथनं, गाणी, चित्रं, असं बरच काही छान असतं पण ते अविश्वसनीय ठरु शकतं. एखाद्या गोष्टीची ठरलेली दिशा बदलून घटना कल्पून त्याचं होत्याचं नव्हतं करण्याची ताकद ‘आठवणी’ मधे असते.

मिलान कुंदेराच्या बुक ऑफ लाफ्टर अॅण्ड फरगेटिंग या कादंबरीतील सुरुवातीच्या भागातील एक तुकडा आठवतो. कादंबरीचे निवेदन स्वतः लेखकच करतात.

“फेब्रुवारी १९४८, जुन्या टाऊन स्क्वेअरला माससाठी जमलेल्या हजारो नागरिकांसमोर जोरकस भाषण द्यायला कम्युनिस्ट नेता क्लेमंट गोट्टवाल्डने प्रागमधल्या बरोक महालाच्या बाल्कनीवर पाऊल ठेवले. गोट्टवाल्डच्या जवळ क्लेमेंटिस उभा होता, तर बाजूला त्याचे इतर साथी. बर्फ पडत होता, थंडी होती आणि गोट्टवाल्डच्या डोक्यावर काही नव्हते. त्याच्याविषयी तळमळ वाटून, ताबडतोब, क्लेमेंटिसने स्वतःच्या डोक्यावरची फरची हॅट काढून गोट्टवाल्डच्या डोक्यावर ठेवली. बाल्कनीमधे आपल्या साथींबरोबर उभे राहून हजारो लोकांना संबोधित करणाऱ्या फर कॅपमधल्या गोट्टवाल्डच्या फोटोच्या हजारो प्रती प्रचार-विभागाने छापल्या. त्या बाल्कनीत कम्युनिस्ट बोहेमियाचा इतिहास घडला. प्रत्येक मुलाला पोस्टरवर बघितलेला, म्युझियम आणि शालेय पुस्तकात छापलेला तो फोटो माहिती झाला. चार वर्षानंतर, क्लेमेंटिसवर देशद्रोहाचा खटला भरला आणि फासावर लटकवले गेले. प्रचार-विभागाने ताबडतोब त्याला इतिहासातून गायब केले आणि अर्थातच, त्याचे सगळे फोटोही. तेंव्हापासून, एकटा गोट्टवाल्ड त्या बाल्कनीत येतो. जिथे क्लेमेंटिस उभा राहिला तिथे पॅलेसची रिकामी भिंत असते. क्लेमेंटिसच्या उरल्या वस्तू काहीच नाहीत. फक्त, गोट्टवाल्डच्या डोक्यावरली फरची हॅट.”
(४-५, बुक ऑफ लाफ्टर अॅण्ड फरगेटिंग, मिलन कुंदेरा)

क्लेमेंटिसच्या हॅटसारख्या कलाकृती आणि कथनं असतात. हॅट गायब होती तसं साहित्य, नाटक , कथन गायब होतं. कधी, होतं तर कधी केलं जातं. कधी ‘आठवणी’ म्हातारपणानं विसरल्या जातात तर कधी आणखी कशामुळं. बुक ऑफ लाफ्टर अॅण्ड फरगेटिंगच्या पुढच्या दृश्यात दिसेनाशी झालेली हॅट फक्त कथन नसते तर कथन करणारी सूत्रधारही असते. कथन मांडणारे सूत्रधार आणि त्यांची कथने आठवणींच्या प्रदेशातून कशी गायब होतात हा मानसशास्त्राबरोबरच, मानववंशशास्त्र आणि इतिहास-लेखन शास्त्राचाही भाग ठरतो. कथनांच्या आशेवर माणूस जगत असतो. कथन आठवणींना खणून काढू शकते. नसलेल्या हॅटच्या कथनात काही जणांना रुची असते. तर काहीजण, हॅटच्या ‘नसले’पणाला गांभीर्याने घेऊन हॅटच्या आठवणीचा वापर अंधाऱ्या कोपऱ्यांना उजळून टाकणारा दिवा म्हणून करतात. घडून गेलेल्या घटनांतून समाजाचा इतिहास समोर येतो. ‘समाज’ तिथल्या व्यक्तींचा कमी-अधिक सुसंघटीत संच असतो. तिथल्या एक वा अनेक व्यक्तींनी अनुभवलेला काळ इतिहासाला घडवत असतो. अशावेळी, जगून गेलेले लोक कसे जगले आणि त्यांचे भवतालाशी नाते काय आणि कसे विकसित झाले हे समजून घेण्यासाठी ‘आठवणी’ चा लोलक आपण समोर धरतो, खरंतर, तो लोलक कसा धरतो यावर आपल्या आठवण, गतकाळ, इतिहास आणि कथन यांचे नाते ठरत जाते.

आठवणी मग त्या एखाद्या व्यक्तीच्या असोत वा समाजाच्या ‘सामाईक’ असोत. काळ आणि इतिहासाचे रचणे असो. आठवणी हे सारं कसं बांधतात? समाज सामाईक आठवणी कशा घडवतो? त्या सामाईक, ‘आपल्या सर्वांच्या’ आठवणी आहेत हे कोण ठरवतं? कुणाच्या आठवणी इतिहासाला कसा आणि कोणता आकार देतात? स्व-ओळखीचे बांधकाम, संस्कृती-संकल्पना आणि व्यवहार, इतिहासविषयक भान मांडताना आठवणी काय भूमिका निभावतात याबद्दलचे आकलन मांडण्याचा प्रयत्न सजग मानवी समाज नेहमीच करत असतो.

‘आठवण’ या विषयाला समोर ठेवून निर्माण साकारलेली ‘हाकारा’ची पहिली आवृत्ती सादर करताना आम्हाला आनंद होत आहे.

‘हाकारा’च्या ‘पहिल्या हाके’ला लेखकांनी आणि कलाकारांनी भरघोस प्रतिसाद दिला. संकल्पना आणि व्यवहार म्हणून ‘आठवण’ हा विषय आपणा सर्वांना किती जवळचा वाटतो याचे प्रत्यंतर आम्हाला आले. भारत आणि भारताबाहेर कार्यरत असलेल्या आणि विविध कला व लेखन क्षेत्रातील साहित्य आम्हाला प्राप्त झाले. मानवी आयुष्यातील साध्या-साध्या भावणाऱ्या आठवणीं, जीवघेणं आजारपण, फाळणीच्या वेदना, गिरणी कामगारांचे जगणे, भारतातील दंगल आणि त्याचा मानवी जीवनावरचा खोल प्रभाव, बदलती जुनी-नवी शहरं, इतिहास आणि वर्तमानातील बदलते तिढे अशा विविध विषयांना स्पर्श करणारी दृश्य आणि लिखित मांडणी झालेली ‘हाकारा’ला महत्त्वाची वाटते. ‘आठवण’ अनुभव अमूर्त स्वरुपात असला तरी त्याचे मूर्त भौतिक रुप चिंतन सर्जनशील लेखक कलावंताला नेहमीच खुणावत आले आहे. भौतिक रुपाचा रंग, पोत त्याचबरोबर म्युझियम्स आणि ग्रंथालयातील अर्काइवल स्वरुपातून येणारे भान आकर्षित करणारे असते. हे भान दृश्य रुपातूनही ‘हाकारा’मधे आलेले आपल्याला दिसेल.

 

9 comments on “आठवणं आणि विसरणं
विसरणं आणि आठवणं

  1. bhalchandra

    Interesting wish Hakara the best dr kango. Forgetting bitterness and remembering pleasant memories is the needed for healthy life hence it is always said forget and forgive and live but is easier said than done .Many of our problems would be resolved if we learn to do that

    Reply
  2. Malavika Jha

    Ashutosh khup chan lihila aaahes….khup awadala….

    Reply
    • adminhakara

      Thanks Malavika.

      Reply
  3. अतुल पेठे

    आशुतोष, नुपूर,
    वाचायला आणि पहायलाही केवळ सुंदर ! उत्तम अनुभव. धन्यवाद.

    Reply
    • adminhakara

      अतुल, मनापासुन आभार. प्रतिक्रिया वाचून छान वाटले.

      Reply
  4. गिरीश पतके

    आशुतोष,
    आवर्जून पाठवलेला हाकाराचा अंक पाहिला.
    तुझे संपादकीय वाचले. चांगले लिहिले आहेस. इतर सगळे आत्ता वाचलेले नाही परंतु ” आठवण” ठेऊन नक्की वाचणार.
    धन्यवाद आणि शुभेच्छा !

    Reply
    • adminhakara

      गिरीश, मनापासुन धन्यवाद. सविस्तर प्रतिक्रिया वाचायला आवडेल.

      Reply
  5. महेंद्र वाळुंज

    आशुतोष दादा,
    हाकारा चा अंक पाहिला वाचला तू लिहिलेलं संपादकीय छान आहे.

    (आठवणी ओठांवर हसू आणतात
    आठवणी डोळ्यांत आसू आणतात

    कधी गर्दीत मनाला एकटं करतात
    तर कधी एकटं असताना मनात गर्दी करतात.)

    Reply
  6. स्वागत पाटणकर

    फारच सुरेख!! शब्द, भाषा आणि विषय !! सगळं सुंदर! शिवाय वेब डिझाईन एकदम साजेसं!!

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *