गणेश विसपुते

स्मृती आणि निर्वासन

०१

back

निर्वासनाच्या प्रारंभात स्मृतीची बीजं असतात. ती स्थलांतरांच्या पावलांनी चालत अनपेक्षित आणि अवांछित भूगोलात येऊन रुजतात. त्या बीजांची गुणसूत्रं पुढच्या पिढ्यांमध्ये अनायास संक्रमित होतात. ही गुणसूत्रं हरवलेल्या वारश्यांच्या गोष्टींमध्ये आपल्या आयत्या स्मृती ठेऊन देतात. हे आपसूक होतं की ते जतन करणं असतं हे सांगता येत नाही. पण त्या अडगळीत पडून असतात. जुन्या काळातल्या ब्लॅक अॅंड व्हाईट फिल्म्ससारख्या रोल होतात, तेव्हा तसाच आवाज नेपथ्यात चालू असतो. फिल्मही कमी-अधिक स्पीडवर, तुटत-जुळत, मध्येच म्यूट होत चालू राहाते. शिवाय ऑफस्क्रीनमध्ये लांबून आवाज येतात, त्यातले काही आपलेच वयाच्या सगळ्या टप्प्यांवर बदलत गेलेले, काही वर्तमानाच्या सरकत्या पडद्यावरचे.

औरंगाबादमधला रस्ता, १८८८

वारश्याच्या गोष्टींची स्मृती १ : यमुना

सेपिया रंगातले दोन-चार फोटो आहेत तिचे. त्यातला चेहरा ओळखीचा आहे. तिच्याकडून असंख्य गोष्टी ऐकल्या. खऱ्या-कल्पित. रात्री सळसळणाऱ्या पिंपळाच्या झाडाखाली झोपवायला म्हणून सांगितलेल्या. भूतांच्या-पठाणांच्या-रोहिल्यांच्या-पायी चालत दर कोस दर मुक्काम असा प्रवास करत केलेल्या स्थलांतराच्या.

फोटोतला चेहरा तरूण असेल तेव्हाची तिची गोष्ट आहे. तरुण विधवा. पंचविशीतली. निजामाच्या मराठवाड्यातलं एक लहानसं गाव. दहशतीच्या आणि पर्जन्याच्या छायेत असलेलं. नवरा नुकताच गेलेला. चतकोर शेती. नवरा होता तेव्हाही फार बरी परिस्थिती होती असं नव्हतं. थोडी फार कमाई झाली की तो बाजाराला जाई. थोडीबहुत खरेदी झाली की येतांना बाजारात विकायला आलेली हरणं घेऊन गावाच्या वाटेवर ती पुन्हा जंगलात सोडून देई. ही गोजिरवाणी हरणं मारून खायला नव्हेत तर जंगलात हुंदडायला जन्मली आहेत असं त्याला वाटे. संत होता. पण संत दुसऱ्या घरात परवडतो. पण हा गेलाच. मागे तरुण बायको. एक मुलगा वय वर्ष नऊ, एक मुलगी वय वर्ष सात. जवळचं फारसं कुणी नाही. घराबाहेर रझाकारीचा माहोल. हवेत थंडगार भय. चिडिचूप झालेल्या गावात रोहिल्यांच्या घोड्यांच्या टापांचे आवाज. कधी धान्य, कधी वसूली, कधी आणखी काही. गपगार पडलेल्या गावात चुकून कुणाची सून-तरणी मुलगी दिसली की घोडेस्वारांची तिरपी नज़र तहानेली होत असे. तशात मराठवाडा मुक्ती संग्रामाचं वारं वाहू लागलं आणि दहशतीचं चक्र आणखीच वेगानं फिरू लागलं. गावातली घरासमोरची सार्वजनिक विहिर होती तिच्यात प्रेतं तरंगू लागली.

एके दिवशी तिनं घरात होतं नव्हतं ते किडूक-मिडूक गोळा केलं, बोचकं बांधलं. दोन्ही पोरांना हाताशी घेतलं आणि कुठेही दूर जाऊ पण इथं नको असं म्हणून ती तडक निघाली. कुठं जाणार माहीत नव्हतं. शहर कुठं आहे असं विचारलं असेल कदाचित वाटेत कुणाला. पण ती चालत राहिली सतत तीन दिवस. एकशेवीस किलोमीटर. मुलांसोबत.

औरंगाबाद, १८५७

शहराच्या उत्तरेला दिल्ली दरवाजा आहे. त्या दरवाजानं ती शहरात पायी चालत आली. तेव्हा देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर होता. या काळात तिची जगण्याची घमासान लढाई चालू होती. विधवा. अशिक्षित, जवळ पैसा-अडका नाही. तिघांचे जीव तगवण्याची जबाबदारी शिरावर. मुलांना मोठं केलं, जमेल तसं शिकवलं. पडतील ती कामं केली. हिकमत आणि हिंमत होती. त्यावर ती टिकून राहिली. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांत माणिकचंद पहाडे यांचं नाव या इलाख्यात मोठं होतं. त्यांच्या घरी कामाला ही आणि मुलगा जात असत. मग मुलगा हळूहळू पत्रकं वाटणं, संदेश पोहोचवणं अशी कामं करू लागला. पोलीस येणार असं कळल्यावर घरातलं साहित्य-कागदपत्रं कुठे हलवायची असा प्रश्न पडला. तेव्हा ही पुढे झाली आणि जिन्याच्या फरशीच्या पायऱ्या पोखरून त्यात साहित्य आणि पत्रकं दडवली, वर फरशी लावून पुन्हा जिना होता तसा लिंपून दिला. पुढे मुलाला अटक झाली तेव्हा जेलरला जाऊन विनंत्या केल्या-पोर आहे सोडा, तेवढाच आधार आहे-वगैरे सांगून मुलाला परत आणलं आणि जगण्याच्या लढाईत सामील केलं.

असं म्हणतात, आफ्रिकेतल्या गुलामांना अमेरिका खंडात नेलं तेव्हा त्यांच्या अंगावर काहीही नव्हतं. जे काही त्यांनी जमवलं होतं, ते आपल्या देशाबरोबर मागे राहिलं होतं. पण अमेरिकेच्या किनाऱ्यावर पोचल्यावर त्यांनी पत्र्याचे मग, टमरेलं, बाटल्या काठ्या आणि हातात येईल त्या वस्तू वापरून आपलं संगीत पुन्हा जिवंत केलं. ते त्यांच्या रक्तात, मनात आणि कानात होतंच. त्यातून स्वतंत्र जॅझ सुरु झालं. यमुनेनं गावाकडून येताना काही आणलं नव्हतं. पण तिच्याकडे गोष्टींचे खजिने होते, गाणी होती, इरसाल म्हणी होत्या, ओव्या होत्या, कहाण्या होत्या. जिद्द होती. तिनं सुपाऱ्यांच्या बागांची कंत्राटं घेतली. ढोरं पाळली. नवाबांच्या जुन्या हवेल्या विकत घेतल्या आणि विकल्या. अक्षर ओळख नसतांना देवदर्शनाचं निमित्त करून उत्तर-दक्षिण भारत एकटीच फिरून आली.

जे काही तिच्याजवळचं संचित होतं ते तिनं आम्हाला आमच्या लहानपणात सोपवलं. आजी म्हणून तिच्याबद्दल अपार कृतज्ञता वाटत असतानाच माझं त्या जादुई क्षणाबद्दलचं आश्चर्य सरत नाही. तो क्षण-ज्या वेळी तिनं गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी माझ्या अस्तित्वाचाही संबंध नव्हता, पण तिच्यामुळे मी औरंगाबाद नावाच्या गावात जन्मलो.

वारश्याच्या गोष्टींची स्मृती २: मलिक अंबर

निर्वासन ही नियतीही असते. ज्या भूगोलाच्या पृष्ठभागावर पहिला श्वास घेतला जातो, जिथं रुजून वाढ होऊ लागते तिथून अचानक मुळं उपसून दुसरीकडे फेकलं जाणं ही निर्वासनातली अटळ नियती असते. एक नऊ वर्षांचं मूल-ज्याचं नाव अंबर चापू होतं, की अंबर जिनू होतं हे कळायला मार्ग नाही पण जग ज्याला नंतरच्या काळात मलिक अंबर नावानं ओळखू लागलं, त्याच्या कहाणीची सुरुवात अशी मुळं उपसून दूरवर फेकण्यातून झाली होती.

मलिक अंबर

हे पोर सोळाव्या शतकाच्या मध्यावर अबेसिनियातल्या हरार इथं जन्मलं. नऊ वर्षाचं हे हबशी मूल गरिबीनं गांजलेल्या आई-बापानं बगदादच्या गुलामांच्या बाजारात आणून मक्केच्या क़ाझी-उल-क़ुझतला विकलं. त्यानं नंतर ते पोर ख़्वाजा मिर बग़दादी उर्फ मीर क़ासिमला विकलं. मीर क़ासिमनं त्याला भारतात दख्खन भागात आणलं. तिथं आणून मुर्तुझा निझामाच्या दरबारातल्या मिरक डबीर नावाच्या सरदाराला विकलं. मिरक हा चंगेझ खान या नावानंही ओळखला जात होता. साधा सैनिक म्हणून मलिकनं सुरुवात केली. आणि हिकमतीनं स्वतःच्या बळावर मराठे, मुसलमान आणि हबश्यांना घेऊन स्वतःची पलटण उभी केली. ऐन मोक्याच्या वेळी निझामशाही वाचवली. त्याचं दरबारातलं स्थान उंचावलं. राजपुत्र मुराद त्याचा जावई झाला आणि जुन्नर, खडकी हे भाग त्याला वतन म्हणून मिळाले.

त्यातलं खडकी म्हणजे एकेकाळचं राजतडाग. बऱ्याच काळानंतर ते औरंगाबाद झालं.

तर या गावावर मलिक अंबरच्या खुणा या गावानं टिकवलेल्या स्मृती होत्या. गावाच्या स्मृती आमच्या लहानपणाच्या स्मृती झाल्या. मोजक्या काही इमारतींवर, मसज़िदींवर त्याच्या वास्तुशिल्पाच्या नजरेचा ठसा आहे. त्यानं हरसूलच्या तलावातून नहर काढून खापराच्या पाइपांमधून गावभर पिण्याचं पाणी कसं खेळवलं होतं त्याच्या गोष्टी आम्ही ऐकल्या, खुणा पाहिल्या. गावात कुठं काही खोदकाम झालं की खापराच्या नळ्यांचे अवशेष सापडत. अरे, ही नहरे अंबरीची खापरं म्हणून ती फेकली जायची. शेतसाऱ्याची एक न्याय्य पद्धत त्यानं लावून दिली आणि नंतर अनेक ठिकाणी ती अनुसरली गेली. त्याची नज़र उत्तम प्रशासकाची होती. मलिक अंबर हे त्यामुळे जवळचं नाव झालेलं होतं.

जहांगिर

आपल्या एखाद्या ओळखीच्या नावाचा कुठे संदर्भ निघाला की आपण कान टवकारतो. नंतर कुठे कुठे वाचतांना त्याच्याबद्दलचे अधिकचे तपशील मिळत गेले. ‘करारी रोमन चेहऱ्याचा काळा हबशी काफिर’ असं त्याचं एका डचानं वर्णन केलेलं होतं. तो जिवंत होता तोवर त्यानं मुघल सैन्याला त्याच्या लढाईच्या गनिमी पद्धतीनं जेरीस आणलं होतं. जहांगीर तर त्याला पाण्यात पाहात होता. त्याच्या आत्मचरित्रात अनेकदा मलिक अंबरचे उल्लेख येतात. “तो नीच घृणास्पद, काळा”, “काळ्या नशिबाचा” वगैरे अनेक शिव्यांनी जहांगीरनं त्याला गौरवलं आहे. मलिक अंबरचा पराभव करणं हे जहांगीरचं स्वप्न होतं, ते काही पूर्ण झालं नाही. पण त्याच्या दरबारातल्या प्रसिद्ध चित्रकारानं-अबुल हासननं एक चित्र काढलं.

एखाद्या जुन्या लपवून ठेवलेल्या तसबिरीसारखं हे चित्र विषादाच्या स्मृतीसारखं आठवत राहातं. त्यात जहांगीरला आवडावं असं बरंच काही होतं. एका भाल्याच्या टोकावर मलिक अंबरचं शीर खोचून ठेवलेलं आहे. दुसऱ्या बाजूला प्रचंड अशा माशाच्या पाठीवर बैल उभा आहे, आणि या बैलाच्या पाठीवर पृथ्वीगोल आहे. त्या पृथ्वीगोलावर उभा राहून जहांगीर धनुष्यबाणानं मलिक अंबरच्या शिराचा वेध घेत आहे हे ते चित्र. त्या शिरावर एक घुबड बसलेलं आहे जे जहांगीरचा बाण त्या शिराच्या तोंडातून आरपार जातांना खाली पडलं आहे. बाण आरपार जातांनाच इकडं उजवीकडे स्वर्गीय पक्षी जहांगीरच्या मुकुटाच्या दिशेनं झेपावताहेत. यात धर्म म्हणून बैलाचं हिंदू मिथक आहे, मत्स्य आहे, ख्रिश्चन बायबल कथाचित्रांमधून दिसतात, तसे स्वर्गातून अवतरणारे, जहांगीरसाठी शस्त्रं आणणारे लहानगे देवदूत आहेत. फारसीमध्ये या प्रसंगाचं गुणगान करणाऱ्या काही ओळी दिसत आहेत. यातला पृथ्वीगोलसुद्धा ईस्ट इंडिया कंपनीकडून भेट म्हणून मिळालेल्या एखाद्या ग्लोबवरून बेतला आहे की काय असं वाटतं. सर्वशक्तिमान, सगळ्या जगताचा अधिपती एका यःकश्चित, घृणास्पद दिसणाऱ्या काळ्या माणसाच्या शिराचा वेध घेत आहे अशी कल्पना जहांगीरला फारच सुखावून गेली असणार.

प्रत्यक्षात असं काही होऊ शकलं नाही. मलिक अंबर जिवंत असेपर्यंत जहांगीरचं दख्खन काबीज करायचं स्वप्न अधुरं राहिलं. मलिक अंबरही चांगला ऐंशी वर्षं जगला. त्याच्या पत्नीचं नाव करीमा. म्हैसमाळला जातांना खुल्ताबादच्या बाहेरून रस्ता जातो तिथं कड्यावर एक सरकारी गेस्ट हाऊस आहे. त्याच्या जवळ डोंगर पायथ्याशी तिची कबर आहे. मोडकी-तोडकी. जवळच मलिक अंबरच्या कबरीची मोठी आणि देखणी वास्तू आहे.

लहानपणी सायकल मारीत वेरूळला जाण्याच्या आठवणींत या परिसरात घालवलेल्या निवांत वेळेच्याही आठवणी आहेत. हाच परिसर जिथं इको पॉईंट असं अनधिकृत नाव असलेल्या एका ठिकाणी उभं राहून हाक मारली की प्रतिध्वनी ऐकू येतो. याच परिसरात कमाल अमरोहीच्या ‘पाकिज़ा’चं शेवटचं दृश्य चित्रित झाल्याच्या अमर स्मृती आहेत. मीनाकुमारी आणि राजकुमारच्या पात्रांनी उभी केलेली दुःखाची शिल्पं आहेत. ख़ुल्द म्हणजे स्वर्ग. म्हणून खुल्दाबाद. त्याचं दुसरं नाव रौज़ा. त्याचाही अर्थ तोच. म्हणूनच औरंगज़ेबालाही अखेरच्या काळात इथंच विसावावंसं वाटलं.

वारश्याच्या गोष्टींची स्मृती ३ :  गावभर भटकण्याच्या

स्मृती पडद्यांवर ब्लॅक अंड व्हाईट फिल्म्ससारख्या उलट सुलट दिसतात. पण त्यात स्मृतींच्या ऑफस्क्रीनमधून ध्वनीही उगवत येत जादुई काळात नेतात. जेव्हा पहाटे जात्याची घरघर आणि आईनं गावाकडून आणलेल्या-दळता-दळता गुंफलेल्या ओव्यांनी सुरुवात होई तेव्हा डोळ्यांवर अजून झोप असे. अगदी अंधार असतांनाच समोरच्या मस्जिदीतून अजान ऐकू येई. त्यातले स्वर वेगळ्या जगातले वाटत. मग शेजारच्या मंदिरातल्या आरत्या आणि घंटानाद सुरु होत असे. मग उठावंच लागे. एक काळ होता की सार्वजनिक वाहतुकीचं साधन टांगे होते. घोड्यांच्या टापांचे आवाज हे कानांच्या सवयीचे आवाज होते. हा काळही फार जुना नाही, आमच्या लहानपणीचा होता. अद्याप गावाची लय संथ नवाबीच होती. वासुदेव, फकीर, साधु-बैरागी हे लोक पोषाखांतल्या वैचित्र्यानं लक्षात राहिलेले आहेत. रमज़ानच्या काळात रात्री फकीर गात-गात उठवतः “मैं भी रक्खुंगा रोज़ा, मुझे भी जगाते जा…” तेव्हा कधी तरी रोज़ा पाळल्याची स्मृती आहे आणि खूप अनावर झालेली भूक लपवून ठेवल्याचीही.

औरंगाबाद

घराच्या गच्चीवर जाण्यासाठी एक चिंचोळा जिना होता. मुलांसाठी खेळतांना ती लपायची जागा असे. बरीचसी अडगळ तिथं पडलेली असे. जिन्याला पत्र्याचं छप्पर होतं. छपराच्या खाली असलेल्या लाकडी आधाराच्या सापटीत तिथं दोन तलवारी खोचलेल्या होत्या. हे आमचं गुपित होतं. लपायला तिथं गेलं की त्या आम्ही मित्रांना दाखवत असू. अठ्ठेचाळीच्या गदारोळात कधीतरी झालेल्या लुटालुटीत कुणाकडे जुने नवाबी पलंग दिसत, कुणाकडे मोठी घंघाळं आणि भांडी किवा काय. आमच्याकडे या तलवारी कशा आल्या माहीत नाही, पण त्या अडगळीत पडून होत्या हे खरं. त्या पाहिल्या की स्मृतीतल्या कल्पित-ऐकीव कथा बहरू लागत. त्यातल्या जुळतील अशा घटनांशी त्या मन जोडत राही.

स्मृती दहशतीच्या विराट सावल्यांच्यांही आहेत. कधी तरी गाय कापल्याची अफवा पसरली. अफवाच होती ती. कारण नंतर ते पेपरात आलं होतंच. पण हे धार्मिक दंगलीचं क्लासिक कारण काहात आलं आहेच. नंतरही वेगवेगळ्या कारणांवरून दंगे झाले. पाच वर्षांचा होतो तेव्हा धाकट्या बहिणीचा जन्म झाला. बाळंतिणीची त्या काळात असे तशी अर्धकाळोखी खोली होती. रस्त्यावरच्या पहिल्या मजल्यावर. नवाबाचा वाडा असलेलं हे घर. खिडकीला भोकं पडलेली होती. त्या भोकातून रस्त्यावरची दृश्यं दिसू शकायची. मोठ्यांचा डोळा चुकवून त्या भोकाला डोळा लावल्यावर दिसलं होतं, लोक हातातल्या काठ्या तलवारींनी बेभान होऊन कापाकापी करत सुटले आहेत. मरणान्तिक कोलाहल आहे. मग कधीतरी रस्त्यावर कवायत करत जाणारे हत्यारबंद सैनिक गेल्याचं आठवतं. संचारबंदीच्या काळात हवेत तणाव असे. खिडक्यांमधून समोरचे अलीभाई, जानीमियां हालहवाल विचारत. “कब ख़त्म होगा ये सब दादा?” असं वडिलांना विचारीत. समोर टोटीकी मस्ज़िद होती आणि शेजारी मंदिर. गावाचा हा उत्तरेकडचा जुना भाग. घरं लागून-लागून भिंतीला भिंत अशी असायची. कित्येकदा गच्चीवरच्या मुंडेरी ओलांडून या घरातून त्या घरी जाता येई. संचारबंदीच्या काळात एकमेकांच्या घरात दूध, अन्न असंच पोहोचवलं जात असे. संचारबंदीत मुलंही परस्परांच्या घरात जाऊन मग अशा रीतीनं निर्वेध संचार करू शकत. रात्री शेजारी-पाजारी गच्चीवर अंधारात एकत्र बसत. फारसं कुणी बोलत नसे. पण केवळ आपण एकत्र आहोत ही भावना त्यांना आधारासारखी वाटत असावी. असेच एकदा एक म्हातारे आजोबा भिंतीशी बसलेले होते. त्यांनी बहुधा स्वतःशीच म्हटलेलं एक वाक्य कायम स्मरणात आहे. पुटपुटल्यासारखे ते म्हणाले होते, “कोहरा घना हुआ है…सुबह होगी तो छंट भी जाएगा.” या वाक्याचा प्रतिध्वनी मला स्मृतीतल्या गॅलिलिओच्या वाक्यात दिसतो. ते वाक्य आहेः एपर सी द मूव्ह. हे वाक्यही गॅलिलिओनं काळोखात चालत असतांना स्वतःशी पुटपुटत म्हटलं होतं. त्याचा अर्थ आहे-पण फिरते ती पृथ्वीच.

गॅलिलिओच्या वाक्याची स्मृती अशी आहे की त्यानं सौरमंडलात सूर्य हा केंद्रस्थानी आहे हे सांगितलं होतं. याचा परिणाम असा झाला की सत्तर वर्षांच्या वृद्ध, दृष्टी अधू झालेल्या आणि आजारी गॅलिलिओला फ्लॉरेन्सहून रोमला हजर होण्याचा हुकूम झाला. त्यानं वैद्यकीय प्रमाणपत्र पाठवून सांगितलं की माझी तिथं येण्याची शारीरिक अवस्था नाहीये. पण मग त्याला साखळदंडांनी बांधून आणायचा हुकूम झाला. गॅलिलिओ स्वतःच मग तिथं पोहोचल्यावर त्याला तुरुंगात टाकलं गेलं आणि धमकी देऊन त्याच्याकडून माफीनामा लिहवून घेतला गेला. माफीनाम्यात त्यानं लिहिलं होतं, “मी, गॅलिलिओ गॅलिलि, ज्यानं हे सांगितलं की पृथ्वी या विश्वाचं केंद्र नसून सूर्य आहे हा माझा अपराध आहे. ईश्वर आणि पवित्र ग्रंथांच्या आशीर्वादानं माझा गुन्हा मी कबूल करतो आणि मी मांडलेल्या संशोधनाचा शपथपूर्वक केवळ त्यागच करीत नाही तर त्या संशोधनाचा आता तिरस्कार करतो.”

हे झाल्यावर चिंचोळ्या, काळोख्या कॉरिडॉरमधून साखळदंडांनी बांधलेला वृद्ध गॅलिलिओ एकटाच चाललेला आहे. तिथं चालतांना तो मंदस्वरात, स्वतःशीच पुटपुटत एक वाक्य म्हणतो, “एपर सी द मूव्ह.”

बिबी का मकबरा

उघड आहे की सत्यानं उजळलेल्या या वाक्याचा उजेड कुणालाही नंतर टाळता आला नाही. मला वाटतं, त्यादिवशी दंगलीच्या दहशतीत, रात्री गच्चीवर भिंतीला पाठ टेकून त्या म्हाताऱ्या चचाजाननी ते वाक्य उच्चारलं होतं, त्यालाही भविष्यात कधी ना कधी अर्थ मिळेल. पण लहानपणीच्या आठवणीतले रस्ते सहसा सुनसान असत. कधीतरी टांगे जात. उन्हाळ्यांच्या सुट्यांची वाट पाहाणं शाळेच्या काळात चालू असे आणि मग सुट्यांमध्ये पाय दुखेपर्यंत गावभर भटकणं. कधी पांडवलेण्या, कधी बिबीका मक़बरा. हिमायतबागेचं एक टोक हरसूल रस्त्यावर होतं तर दुसरं गव्हर्नमेंट कॉलेजच्या मागून सुरु होत होतं. तिथं फक्त पक्ष्यांचे आवाज. वाऱ्यांवर पानांची सळसळ. हातात पुस्तक घेऊन गेलं तर झाडाखालच्या गारेगार सावलीत अख्खी दुपार सुखात जाई.

तटबंदी होती. कधीकाळी असणार. फक्त खाणाखुणा उरल्या होत्या. पण बावन्न दरवाज्यांचा उल्लेख फक्त ऐकलेला. एकदा गावभर भटकून पाहिलं तर फक्त वीसेक दरवाजेच सापडले. पण तेवढेच पुरे होते. औरंगपुरा, करणपुरा, चेलिपुरा, रणमस्तपुरा. उत्तरेतून मुगलांबरोबर त्यांचे सरदार आले. त्यांच्या नावानं एकेक वस्ती वसली असणार. त्या लोकांबरोबर धोबी, न्हावी, सुतार, परदेशी, वेगवेगळ्या जाती, वेगवेगळे धर्म-कोण कोण आले असणार. वर्गातल्या मुलांची वैविध्यपूर्ण नावं ऐकल्यावर मजा वाटे. त्याचं कारण तीनशे वर्षांपूर्वी तयार झालेल्या या मेल्टिंग पॉटमध्ये होतं बहुधा. आपण ज्या भूभागावर असतो तिथल्या आधीच्या, न पाहिलेल्या खुणा आपण हरतऱ्हेनं शोधत असतोच. नंतर कधीतरी मला लाला दीनदयाळांनी एकोणिसाव्या शतकात काढलेली या गावाची छायाचित्रं पाहायला मिळाली. नेपियन आणि इतर ब्रिटिश छायाचित्रकारांची छायाचित्रंही. मग ती तेव्हाच्या गावातल्या ठिकाणांशी जुळवून पाहातांना इतिहास, स्मृती, वाताहत, वर्तमान हे सगळं परस्परात मिसळून जात होतं. तेव्हा औरंगाबादवरची एक कविता मालिका लिहिली होती. त्यात लहानपणी केवळ ऐकलेल्या काला चबूतरा या फाशीच्या शिक्षा दिल्या जाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणाबद्दल आणि गावातल्या मनात कोरलेल्या दृश्य वास्तूंबद्दलही लिहिलं होतं. या वास्तू सतत आसपास पाहातच मोठे होत गेलो होतो आम्ही.

आलमगीर मस्जिद

शाळेत एनसीसीत असतांना भल्या पहाटे उठून परेडला जावं लागे. ते मोठं ग्राऊंड स्कूल ऑफ आर्टजवळच्या मैदानावर होतं. स्कूल ऑफ आर्टची इमारत म्हणजे झेबुन्निसाचा महाल होता. तिच्याशेजारी होती आलमगीर मसज़िद. आणि मसज़िदीशेजारचं ग्राऊंड. तिथं परेड होई. वडांच्या रांगेतून वळणाच्या रस्त्यावरून ग्राउंडवर पोहोचलो की सकाळच्या उन्हांत पाठीमागे ती भव्य इमारत दिसे. लहानपणातल्या त्या दिवसांत ती भव्य वाटतच असणार. पण आपण लहान होतो आणि नेपथ्यात हे गाव होतं आणि तिथलं मैदान होतं, पार्श्वभूमीला झेबुन्निसाचा महाल होता आणि आलमगीरची मसज़िद होती आणि बाळकृष्ण महाराजांच्या-विठ्ठलाच्या मंदिरातली कीर्तनं होती आणि मसज़िदींमधून येणाऱ्या अजानीच्या सुरावटी होत्या या स्मृती पायाखाली जमिनीत खोलवर-खूप खोलवर मुळं पसरलेली असल्याचं समाधान देतात.

वारश्याच्या गोष्टींची स्मृती ४ : उसे ज़िंदगी क्यू ना भारी लगे…

गाव लहान होतं अजून. त्याची लय बिघडलेली नव्हती. मुशायरे होत. जाहीर होत. शहागंजमधल्या मसज़िदीसमोरच्या चमनमध्ये होत. तिथल्या रस्त्यावर. समज नव्हती पण हे काहीतरी आपलं जगणं उच्चतर करणारं आहे हे नक्की जाणवत असे. कडाक्याच्या थंडीत उघड्यावर उभं राहून मज़रुह, कैफी आज़मी, क़ाझी सलीम, साहिर लुधियानवी, बशर नवाज़, प्रेम धवन वगैरे लोकांची शायरी ऐकल्याचं मोठी भावंडं सांगत, तेव्हा पुढच्या मुशायऱ्यात ती मंडळी दिसतात का हे शोधत असू. एक मुशायरा असाच बीबी का मकबऱ्यात ऐकलेला आठवतो. फ्लड लाईट्स सोडलेले होते. सुगंध पसरलेला होता. बाहेरगावाहून आलेले शायर मीर आणि ग़ालिबचे दाखले देत होते. पान खाल्लेले ओठ, मोठ्ठे डोळे, गोरापान रंग असलेल्या शायरानं म्हटलेली ‘सब कहां लाला-ओ-ग़ुल में नुमायां हो गई। ख़ाक में क्या सूरतें होंगी की पिन्हा हो गई।।’ ही ग़ालिबची ओळ पहिल्यांदा तिथं ऐकली. ती इतकी पक्की स्मृतीत बसली की ग़ालिबचं काहीही वाचलं-ऐकलं की मकबऱ्याची त्या रात्रीची उजेडातली हिरवळ आणि तोच माहोल आठवतो. कारण माहीत नाही, पण गालिबच्या काव्याशी या दृकप्रतिमेचं असं निरंतर साहचर्य झालेलं आहे हे नक्की. शायरीचा चस्का असा लागता-लागता लागतोच. माहोल असा होता की सुफियाना परंपरेच्या खुणा गावाच्या अंगा-खांद्यावर अद्याप शिल्लक होत्या.

पानचक्की बादशाह मुसाफ़र दर्गा
छायाचित्रकार: लाला दीनदयाल

वलीसाहेबांचं नाव आदरानं घेताना बुजुर्गांकडून ऐकलं होतं. हे ही ऐकलं होतं की त्यांना ग़ालिबही गुरुस्थानी मानत होता. दखनी उर्दूचा आणि उर्दू ग़झ़लचा पाया त्यांनी घातल्याचं सांगितलं जातं. त्यांच्या ग़झलांमध्ये बरेच शब्द संस्कृत, मराठी आणि हिन्दी दिसतात. सुफी घराणं होतं. फकीर माणूस होता. हिंदू-मुसलमान हे फुलांसारखे हसतांना दिसले पाहिजे असं त्यांनी एका ठिकाणी म्हटलं आहे. कुणी त्यांना वली दखनी म्हणतं, कुणी वली औरंगाबादी तर कुणी वली गुजराती. या माणसाचा जन्म या गावात झाला. सतराव्या शतकाच्या मध्यावर. भटका माणूस होता. भटकत भटकत अमदाबादला गेला. पुढे मग तिथंच रमला.

आठवण आहे एका फिल्ममधल्या प्रसंगाची. आणि ती आठवण नेहमी शहारा आणते. नंदिता दासनं ही फिल्म केली होती. फिराक़. त्यात गुजरातमधल्या दंगलींनंतरच्या दिवसात अमदाबादमद्ये एकदा म्हातारा माणूस-नसिरुद्दीन शहा- रिक्षानं जात असतांना रुको, रुको असं म्हणत अचानक रिक्षा थांबवायला सांगतो. नेहमीच्या खुणा त्याला तिथं दिसत नाहीत. तो अस्वस्थ होत म्हणत राहातो, अरे भई, यहां तो वलीसाहबकी मज़ार थी. वलीसाहेबांची मज़ार पाडून त्यावर रातोरात डांबरी चकचकीत रस्ता बनवला गेला. ती मज़ार नष्ट करून बरंच काही नष्ट झालं. वलीची आठवण येते तेव्हा त्यांच्या ग़ज़ल काढून वाचतो.

वली मोहम्मद वली

इक़बाल बानूच्या आवाजातलं पन्नास-साठ वर्षांपूर्वीचं रेकॉर्डिंग ऐकतोः

जिसे इश्क़ का तीर कारी लगे

उसे ज़िंदगी क्यूं ना भारी लगे…

स्मृतींमध्ये स्नेहानं, पावित्र्यानं, सुफी प्रेमानं भिजवणाऱ्या या लोकांच्या खुणा पुसून टाकणाऱ्या या हवेत ज़िंदगी कधी कधी खरोखरी जडशीळ वाटू लागते.

आपली नाळ ज्या गावात गाडली गेली आहे त्या मातीत जन्मलेले हे लोक आठवतो आणि सुख होतं. सिराज औरंगाबादी तर सुफी फकीरच होता. ग्रेट कवी.

अगर कुछ होश हम रखते तो मस्ताने हुए होते
पहुँचते जा लब-ए-साक़ी कूँ पैमाने हुए होते
अबस इन शहरियों में वक़्त अपना हम किए ज़ाए
किसी मजनूँ की सोहबत बैठ दीवाने हुए होते…

एकशेवीस किलोमीटर चाललेली पावलं एक स्थलांतर होतं. दोन पिढ्यांआधी गावातून झालेलं निर्वासन होतं. काळा का गोरा कोण आपला पूर्वज? कोणत्या खंडातला? किती वांसिक फोडण्यांनी बनलं हे अस्तित्वाचं रसायन? पन्नास हजार वर्षांतलं? आपली पावलंही वळलीच की गावाबाहेर. दुसरीकडेच जाऊन मुक्काम केला. पण घरी जाण्याची ओढ सतत वाटत राहातेच. आजीनं हौसेनं विकत घेतलेला तो नवाबाचा जुना वाडा. त्यांच्या गल्ल्यांमध्ये खेळणारी मुलं. मोठी होत जाणारी. शाळेत जाणारी. वेगवेगळ्या भाषा सहज स्वीकारत बोलणारी. गावभर भटकून झाल्यावर घरी येण्याची ओढ लागलेली.

पण आता तर ते घर नाही. तो नवाबाचा वाडाही ज़मींदोज़ झालेला.

आणि स्मृतींची ही फिल्म रोल होत राहिलेली. निरंतर. मागे, कुठेतरी.

छायाचित्र सौजन्य: कोलंबिया युनिवर्सिटी, ब्रिटीश लायब्ररी आणि म्युझियम अॉफ फाईन आर्ट्स.

गणेश विसपुते मराठीमधे लिहिणारे कवी, भाषांतरकार, संपादक आणि चित्रकार आहेत. त्यांचे तीन कवितासंग्रह प्रकाशित झाले असून ओरहान पामुक, उदय प्रकाश आणि कृष्ण कुमार या लेखकांची त्यांची भाषांतरे मान्यता पावलेली आहेत. त्यांच्या कविता इंग्रजी आणि हिंदीमधे भाषांतरित झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *