प्राची देशपांडे

इतिहासकारांच्या नजरेतून स्मृती आणि आठवण

०१

back

गेल्या जानेवारी महिन्यात संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी नाटककार व कवी राम गणेश गडकरी यांचा पुण्यातल्या संभाजी उद्यानात उभारलेला पुतळा उखडून जवळच्या मुठा नदीत फेकून दिला. १९२२ साली लिहिलेल्या राजसंन्यास नाटकात गडकऱ्यांनी संभाजीराजे यांच्याबद्दल अपमानास्पद लिहिले होते, आणि म्हणून हे कृत्य केले असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. पुतळा काढला गेल्याचे समोर येताच सगळीकडून काहीशा अपेक्षित प्रतिक्रिया आल्या. कोणी ऐतिहासिक सत्य जपण्याचे धाडस केल्याबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले, तर कोणी वाढत्या असहिष्णुतेबद्दल आणि अरेरावीबद्दल राग व्यक्त केला. पुन्हा पुतळा तेथेच उभारण्याचा निर्धार जाहीर झाला. कोणी फेसबुकावर गडकऱ्यांबद्दल लांबलचक पोस्टी लिहून त्यांच्या लेखनाची कधी मराठीत तर कधी इंग्रजीत लोकांना ओळख करून दिली. राजसंन्यास नाटकातले काही परिच्छेद अचानक ‘वादग्रस्त’ ठरले आणि सोशल मीडियावर फिरू लागले. अनेकांनी हे कृत्य आताच का घडले, व याचा नेमका कोणत्या राजकीय गटाला कोणता फायदा-तोटा होणार, याचे गणित आखले. अर्थात, सगळे राजकीय पक्ष या घटनेचा फायदा करून घ्यायच्या प्रयत्नात होतेच.

या लेखात सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासात ‘मेमरी / स्मृती / आठवण’ या संकल्पनांच्या असलेल्या उपयुक्ततेवर विचार केला आहे. गडकरी पुतळा प्रकरणाने सुरुवात करण्याचे कारण एवढेच, की या ताज्या घटनेतून ऐतिहासिक बाबी वर्तमानात जिवंत ठेवण्याच्या प्रक्रियांची चाहूल लागते. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात आधुनिक इतिहासकल्पनेचा उदय झाला. पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या लेखकांनी जुन्या बखरी बाजूला सारून अस्सल कागदपत्रांच्या अाधारे शास्त्रशुद्ध इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला. इतिहासलेखनानंतर लागोलाग मराठी साहित्यात मराठेशाहीतील व्यक्ती व घटनांवर अनेक नाटकं व कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. गडकऱ्यांचे राजसंन्यास नाटक याच लेखनातील एक महत्त्वाचे उदाहरण. कलात्मक रचनांतून अस्सल साधनांतील त्रोटक माहितीचे कधी विचारपूर्वक विश्लेषण करत, तर कधी तिला तिखटमीठ लावत, लोप पावलेला हा गतकाल पुन्हा वाचक आणि प्रेक्षकांसमोर अाला. त्यातून मराठ्यांच्या ऐतिहासिक कार्याबद्दल एक ढोबळ सामूहिक समज, एक अभिमान तयार झाला, अाणि आधुनिक प्रादेशिक ‘मराठी’ अस्मिता दृढ झाली. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ याच प्रादेशिक अस्मितेची परिणती होती. नवीन महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यावर मराठाकालीनच नव्हे तर आधुनिक कालातही विविध क्षेत्रांत योगदान दिलेल्या मराठी व्यक्तींची स्मारके सार्वजनिक स्थळांमध्ये उभारली गेली; उदाहरणार्थ पुतळे, किंवा रस्त्यांना, इमारतींना वा प्रकल्पांना दिलेली नावे. १९६२ मध्ये गडकऱ्यांचा पुतळा संभाजी उद्यानात आचार्य अत्र्यांच्या हस्ते उभारणे याच व्यापक स्मरणोत्सवात मोडते. (उद्यानाला संभाजीराजांचे नाव कधी दिले गेले याबाबत माहिती मिळत नाही.)

पण पुतळ्याची तोडफोड, त्याच्यामागे असलेले ऐतिहासिक सत्यासत्याचे आरोप, आणि या सगळ्याचा अर्थ लावण्याकरिता नव्या पिढीला गडकरींची नव्याने करून द्यायला लागलेली ओळख पाहता, सार्वजनिक, सामूहिक स्मरणाचा हा खटाटोप ना एकमुखाने केलेला अाहे, ना फारसा यशस्वी, असाच निष्कर्ष असाच काढावा लागतो. एकूण, स्मारके आठवणी जिवंत ठेवण्याचे कार्य करू पाहतात, पण स्मारके असल्या-नसल्याने आठवणी जपल्या जातील अथवा नष्ट होतील याची काही खात्री नाही. पुतळ्यांच्या राजकारणाला लोक कंटाळले असले, तरी दिवंगत व्यक्तींचे सार्वजनिक स्मरण निरनिराळ्या, नव्यानव्या उपक्रमांतून सर्वत्र चालू असतेच: उदाहरणार्थ, सर्वत्र जयंती आणि पुण्यतिथी साजरे होताना दिसतात, स्मारकद्वार उभारले जातात, स्मारकस्पर्धा आयोजित केल्या जातात. जालीय संस्थळांवर, मुलाखतींत अाणि सिनेमा-नाटकांच्या नेपथ्यात ‘गोग्गोड’ स्मरणरंजनाला तर ऊत आला आहे. फेसबुकही जुन्या पोस्टींची अाठवण करून देते. एकूण, झपाट्याने बदलत चाललेल्या जगात गतकालाच्या आठवणींच्या फोडणीशिवाय काही चमचमीत लागेनासे झाले अाहे, पण त्याच्या लागोलागच त्यांचे रणांगणही होत चालले अाहे. इतिहासकारांमध्ये इतिहास, अाठवणी / स्मृतींवरच्या चर्चांचा अाढावा घेऊन, हा विरोधाभास समजून घेण्याचा येथे मी प्रयत्न केला अाहे.

स्मृती / आठवण / याद

स्मृती / स्मरण / आठवण म्हणजे नेमके काय? आपल्याला एखाद्या व्यक्तीची, ठिकाणाची, काळाची किंवा परंपरेची स्मृती असते. ठरावीक युगाचा स्मृतीसाठा असतो. विशिष्ट गंधामुळे अथवा गाण्याच्या चालीमुळे अचानक बालपणातले क्षण अाठवतात. काही गोष्टी सुप्त स्मरणात असतात. एखाद्याची स्मरणशक्ती तल्लख असते, दुसरा विसरभोळा असतो. दैनंदिन कामांसाठी आपण चिटोऱ्यावर यादी लिहितो, नाहीतर मोबाइलवरील रिमाइंडर्स त्याला आठवण करून देतात. कोणी नामस्मरण करते, कोणी कवितेचे पाठांतर, तर कोणी फॉर्म्युलांची घोकंपट्टी. कोणी डायरीत आठवणी लिहिते. लग्न झाल्यावरही जुन्या प्रियकराची आठवण येते. आजीचा एकही फोटो नसला, तरी तिने शिकवलेल्या सगळ्या रेसिपी हीच तिची आठवण असते! “तुमच्या आठवणी लिहून काढा की, एकेका गवय्यांचे कसले किस्से सांगता! त्या काळच्या धारवाडचे एक इतिहासच ठरेल असे पुस्तक!” असा सल्ला दिला जातो. मराठी चित्रपटसंगीतावर ‘स्मरणयात्रा’ नावाचा कार्यक्रम होतो.

याद, कैफियत, साक्ष हे शब्द स्मरणक्रियेशीच निगडित आहेत, पण “याद राख!” अशा धमक्या सोडल्या, तर त्यांचा वापर खास न्यायालयीन, प्रशासकीय संदर्भात व भाषेतच झालेला दिसतो. मध्यतुगात ‘याद’ ही वजनदार लोकांनी सरकारला केलेली याचिका होती; पुढच्या काळात मात्र क्रमवार लिहिलेली ‘यादी’च काय ती वापरात उरली. कैफियत हे मौखिक साक्षीचे (म्हणजे स्मरलेलेच) लिखित स्वरूप, पुढे ठरावीक दृष्टीकोनातून सांगितलेल्या ऐतिहासिक कथनात परिवर्तित झाले (उदा. भाऊसाहेबांची कैफियत). आठवण हा देशी, आणि स्मरण/स्मृती हे मार्गी शब्द. अनेकदा आठवणे, स्मरणे, स्मरण करणे, हे क्रियापद आदलून बदलून वापरले जातात. पण त्यांचा वापर व अर्थछटा पाहता, आठवण हा शब्द (आणि त्याची रूपे) दैनंदिन क्रियेसाठी, आणि सहज स्मरलेल्या गोष्टींसाठी; तर स्मरण आणि स्मृती हे तुलनेने काहीशा गोठवलेल्या,‘पक्क्या’ झालेल्या गोष्टींसाठी, असाही त्यांच्यात फरक करता येतो. आठवण शब्दाला तात्कालिकपणाचा, जवळिकीचा एक भाव आहे, जो कदाचित स्मरण, स्मृती या शब्दांना नाही. तसेच, आठवणीला वैयक्तिक, आणि स्मरण-स्मृतीला सामूहिक असे अर्थही आपसूक जोडले जातात. तू किंवा मी एखाद्याची आठवण काढतो किंवा एखादी घटना आपणा दोघां-तिघांना आठवते; पण सामूहिक पातळीवर आपण एखाद्या राजकीय व्यक्तीचे स्मारक उभारतो. अशा सामूहिक स्मरणातूनच एकीकडे परंपरा तयार होते, तर दुसरीकडे व्यापक इतिहासज्ञानही.

पण मग या सर्व संकल्पनांमध्ये नेमका फरक कसा करावा? अाठवणींच्या स्मृती कशा बनतात, व स्मृतींचे परंपरेत अथवा इतिहासात परिवर्तन नेमके कसे व कधी होते? एकूण, इतिहास-स्मृती-परंपरा, साक्ष-कैफियत-याद, विसर-आठवण-स्मरण या शब्दत्रयी गतकालाशी होत असलेले काहीसे निराळे (आणि काहीसे परस्परव्यापी) संपर्क दर्शवतात, अाणि त्यांची सहजपणे ठोस, कालातीत व्याख्या करणे कठीण ठरते. या संकल्पनांच्या संपर्कांमधील बारीक फरक, व त्यांचा दैनंदिन व्यवहार व सार्वजनिक क्षेत्रात, आणि वैयक्तिक आणि सामुहिक पातळीवर होणारा त्यांचा नेमका आविष्कार, हे ठरावीक काळातील सामाजिक सत्तासंबंध, दस्तावेजीकरणाच्या सांस्कृतिक पद्धती (म्हणजे गतकालाला जपण्यासाठी प्रचलित असलेली निराळी मौखिक, लिखित, छापील वा इलेक्ट्रॉनिक तंत्रे) आणि तत्कालीन भाषिक व्यवहार या सर्व बाबींवर आधारित असतात. पण या गुंतागुंतीमुळेच, इतिहास आणि अाठवण/स्मृती त्यांच्यात नेमका फरक करणे जितके कठीण असते, तितकेच ते गरजेचेही होऊन बसते.

गुंतागुंतीचा हा मुद्दा थोड्या तपशीलात मांडूया. गतकाल अगदीच अलीकडचा असला, तर त्याचे वैयक्तिक पातळीवर मौखिक स्मरण शक्य असते. पण आपण जसजसे त्याच्यापासून दूर जातो, तसतशी मौखिक स्रोतांना लिखित संहिता व भौतिक साधनांची जोड मिळते. एखादी घटना, एखादा काळ स्वत: अनुभवलेल्या पिढीतल्या माणसांच्या आठवणी मौखिक रित्या काही काळ जपल्या जातात, पण हळूहळू पुसट होत जातात, व विविध लिखित स्रोतांद्वारे जपल्या जातात. आत्मचरित्रे, जुनी वर्तमानपत्रे, सरकारी दस्तावेज, पत्रव्यवहार, फोटोंचे आल्बम, आणि सोशल मीडियांवरच्या नोंदी, अशा साधनांच्या आधारे चरित्रे, स्मारक ग्रंथ, पवाडे, आणि अर्थातच इतिहास रचले जातात. पण ‘गतकालाचे शास्त्रशुद्ध ज्ञान’ म्हणून इतिहासाची व्याख्या केली, तर खरोखर त्यात वैयक्तिक अथवा सामूहिक स्मरणांचे अचूक प्रतिबिंब असते का? इतिहास विजेत्यांनी रचलेला असतो हे विधान प्रसिद्ध आहे. दस्तावेजही ठरावीक गटांवरच अधिक प्रकाश टाकणारे असतात. वैयक्तिक, विवादी स्वर इतिहासाच्या तटस्थ कथनात क्वचितच ऐकू येतात. असे असता, इतिहासाला सामूहिक स्मरणाचा दर्जा देणे कितपत उचित ठरते?

उलट विचार करता, ‘अनुभवांची, जाणिवांची साठवण’ अशी अाठवण / स्मृतीची व्यापक व्याख्या केली; तर ही साठवण कितपत अस्सल व अचूक असते? फोटोंसाठी पोझ घेतली जाते, पत्रांत अाणि आत्मचरित्रांत बरेच काही गाळलेले असते, अगदी तत्काळ अनुभूतीदेखील आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांद्वारेच होत असते. उदाहरणार्थ, आपल्याच शहरात दोन राजकीय गटांमध्ये झालेल्या चकमकीची बातमी आपल्याला दुसऱ्या दिवशी पेपरातून कळते. वाहिन्या ज्या ठरावीक चित्रफिती किंवा लोकांच्या मुलाखती दाखवतात त्यावरून आपण काय झाले असावे ते ठरवतो. आठवण काढण्याच्या भाषेतच अनिश्चिततेचा, शंकेचा सूर असतो. “देवाशप्पथ, इथेच पिशवी ठेवून गेले होते ना मी?” “मला वाटतं, मी त्या घरात बारा, नाही, चौदा वर्षांची होईपर्यंत राहत होते.” “मी तिला १९९० का १९९२ साली भेटले असेन, आता नीट अाठवत नाही.”

वाढत्या वयाबरोबर हा शंकेचा सूरही वाढतो. याला वैद्यकीय तसेच मानसशास्त्रीय पैलू आहेत, पण स्मृती टिकण्या-न-टिकण्याचा प्रश्न समाजशास्त्रीय संदर्भातही महत्त्वाचा आहे. अपघात किंवा बॉम्बस्फोटाच्या साक्षींच्या बाबतीत अशा धक्कादायक घटनांचे स्मरण परिपूर्ण व विश्वसनीय आहे की नाही हे कसे ठरवायचे? एकाच घटनेचे साक्षीदार तिचे वर्णन किती निरनिराळ्या पद्धतीने करतात हा राशोमोन सिनेमाचा मार्मिक अाशय प्रसिद्ध अाहे. तात्पर्य, शास्त्रशुद्ध इतिहास असो वा वैयक्तिक आठवणी आणि स्मृती, गतकाल हा वर्तमानात केव्हाही जसाच्या तसा, निर्भेळ अवस्थेत उपलब्ध होत नाही; तो ‘मीडियेटेड’ असतो, म्हणजेच निरनिराळ्या सत्तासंबंध व सांस्कृतिक, तांत्रिक पद्धतींच्या मध्यस्तीतून, त्याला वर्तमानात ठराविक स्वरूप येते. म्हणूनच इतिहासकारांमध्ये इतिहास अाणि अाठवणी/स्मृती यांच्यातला फरक, अाणि अन्योन्य संबंध, या दोन्हींची चिकित्सा त्यांच्या सत्यासत्यापुरती मर्यादित न राहता, त्यांना विशिष्ट अाकार देणाऱ्या स्रोतांवर, अाणि सामाजिक-सांस्कृतिक वातावरणावर केंद्रित राहिल्या अाहेत. अाता या विविध चिकित्सा व चर्चांकडे वळूया.

सामूहिक स्मृती, अस्सल आठवणी

‘हिस्टरी’ आणि ‘मेमरी’ या युरोपीय संकल्पनांतील नेमके फरक कोणते, यावर पाश्चात्य इतिहासकार व विचारवंत यांच्यात एकमत नाही. दोन्हींमध्ये स्पष्ट फरक करणारा एक विचारप्रवाह गेल्या काही दशकांमध्ये प्रभावी ठरला अाहे. फ्रेंच लेखक पिएर नोरा यांच्या मते, गतकालाशी अस्सल, अतूट नाते असण्यालाच मेमरी म्हणता येते. सामूहिक पातळीवरचे हे नाते पुराणकथा व परंपरागत प्रथांमधून पिढ्यानपिढ्या जपले जात असे. पाश्चात्य संस्कृतीत आधुनिकतेच्या आगमनाने ते तुटले. त्याची उणीव भरून काढण्याकरिता इतिहासाची रचना झाली, पण जसजशी निरपेक्ष, शास्त्रशुद्ध इतिहासाने पकड घेतली, तसतसे हे अस्सल नाते फिके होत गेले. आधुनिकतेत अस्सल आठवणीचा लोप होतो, असा नोरा व त्याच्या समविचारी अभ्यासकांचा तर्क अाहे. ऐतिहासिक स्थळांमध्ये अस्सल आठवणींचा भास तेवढाच उरतो, आणि लोकांना त्या जिवंत नात्याची हुरहुर लागून राहते. आधुनिक राष्ट्रव्यवस्थेत स्मारके, सुट्ट्या, नामांतरे, वस्तुसंग्रहालये, उत्सव वगैरेंतून ही हुरहुर दूर करायचे प्रयत्न होत राहतात, पण ही ठरवून तयार केलेली मेमरी त्या अस्सल आठवणींची उणीव भरून काढण्यात कमी पडते. अस्सल आणि ठरवून रचलेल्या अशा दोन्ही गोष्टी ‘मेमरी’ या एकाच इंग्रजी संकल्पनेत येतात. त्यांचा मराठीत अस्सल आठवणी, आणि ठरवून रचलेल्या स्मृती असा फरक करता येईल.

एरिक हॉब्सबॉम व टेरेन्स रेंजर या इतिहासकारांनी संपादिलेल्या द इन्व्हेन्शन ऑफ ट्रडिशन (१९८३) या गाजलेल्या पुस्तकात अनेक लेखकांनी अस्सल अाणि कृत्रिम परंपरेत असाच काहीसा फरक नोंदवला होता. राष्ट्रवादी स्मृतीउत्सवांमध्ये दर्शवलेली तथाकथित परंपरा जुन्या काही प्रथांवर अाधारित असली, तरी अनेकदा अलीकडच्या काळातच आत्मसात केली असल्याचे विविध जागतिक उदाहरणांतून दाखवले होते. (उदाहरणार्थ : स्कॉटिश लोकांचे आदिम राष्ट्रचिन्ह मानल्या गेलेल्या ‘किल्ट’चे वास्तविक अाठराव्या शतकात लोकप्रिय झालेले असणे; आफ्रिकेत ठिकठिकाणी ‘टोळ्यांच्या आदिम प्रथा’ असल्याचे मानल्या गेलेल्या अनेक प्रथांचे खुद्द वसाहतकालातच सुरू झालेले असणे, वगैरे). नोरा व हॉब्सबॉम यांच्या ‘अस्सल विरुद्ध कृत्रिम’ अशा मांडणीचा विस्तार ‘कलेक्टिव्ह मेमरी’च्या चौकटीतून निरनिराळ्या देशांतील स्मृतिउत्सवांच्या चिकित्सेत झाला आहे (कोन्फिनो १९९७). स्मृतिसमारंभांद्वारे राष्ट्रीय मिथकांचा आणि वर्चस्ववादी दृष्टीकोनांचा प्रसार, अाणि त्यांच्या मुळाशी असलेले सत्तासंबंध, यांवर या चिकित्सक लेखनाचा एकूण भर राहिला आहे. अस्सल अाठवणी अाणि कृत्रिमपणे ठासवलेल्या स्मृतींमधला फरक स्पष्ट करण्याचा प्रयत्न या लेखनप्रवाहाच्या केंद्रस्थानी अाहे. अर्थात, हा फरक स्पष्ट करणे तितके सोपे नसते, कारण आधुनिक स्मृतिउत्सव जुन्या प्रथा व परंपरांनाच नवीन रूप देऊन तयार होत असतात. त्यांच्यातला अस्सलपणा नेमका कुठे संपतो आणि कृत्रिमपणा कुठे सुरू होतो, यावर संशोधकांमध्ये वाद होत असतात. तरी, वरवरच्या प्रदर्शनामागे खऱ्याखुऱ्या लोकजाणिवेचा शोध घेण्याचा, व असल्यास ती समोर आणण्याचा या लेखनप्रवाहाचा प्रयत्न राहिला अाहे.

अस्सल आठवणींवर असाच विश्वास अजून एका, निराळयाच, संशोधनप्रवाहात दिसतो. मानववंशशास्त्रज्ञांमध्ये मानवी संस्कृतीच्या उत्क्रांतीवर विसाव्या शतकात अनेक दृष्टीकोनांतून विचार झाला. या चर्चांना युरोपीय वसाहातवादी विचारांचा संदर्भ होता, व विविध मानवी संस्कृतींना प्रगतीच्या, अाणि उत्क्रांतीच्या जागतिक उतरंडीत बसवण्याचे यात अनेक प्रयत्न झाले. यांतर्गत, मौखिक आणि लिखित परंपरांच्या अाधारावर संस्कृतींची विभागणी करून, मौखिक परंपरांना प्राधान्य देणाऱ्या कमी प्रगत, अाणि लिखित-छापील तंत्रांना प्राधान्य देणाऱ्या तुलनेने अधिक प्रगत व उत्क्रांत, असा ढोबळ फरक अनेक शास्त्रज्ञांनी केला. अर्थातच या उतरंडीत युरोपीय संस्कृती सर्वात उत्क्रांत अाणि आफ्रिकी मौखिक संस्कृती सर्वात रानटी ठरल्या, व मौखिक-लिखित अशा दोन्हींना महत्त्व देणाऱ्या, पण छापखान्यांबद्दल अाधुनिक काळापर्यंत उदासीन राहिलेल्या भारतीय संस्कृतीला मध्ये कुठेतरी स्थान मिळाले. वर, लिखित-छापील संस्कृतींना इतिहासज्ञान असते, तर मौखिक संस्कृतींना फक्त अाठवणी असतात, इतिहासज्ञानाची क्षमता नसते, असाही तर्क मांडला. अशा मौखिक संस्कृतींची आधुनिकतेकडे, म्हणजेच लिखित-छापील संस्कृतीकडे वाटचाल होता होता त्यांच्या अाठवणींचे इतिहासात परिवर्तन होते, असे मत जॅक गूडीसारख्या मानववंशशास्त्रज्ञांनी मांडले (गूडी, १९७७).

एकूणच या सर्व दृष्टीकोनांत, इतिहास/आठवण, अभिजात/लोक, लिखित/मौखिक, पाश्चात्य/पाश्चात्येतर अशी अनेक ढोबळ समविचारी द्वंद्वे अभिप्रेत अाहेत. पण या द्वंद्वांमध्ये एक लक्षणीय विरोधाभासही अाहे. हे फरक एकीकडे युरोपीय साम्राज्यवादी वर्चस्वाचा विचारातून उद्भवले, अाणि इतिहासज्ञानावरून संस्कृतींची उतरंड उभारतात. पण दुसरीकडे त्यांच्यातून इतिहासाला फक्त कोरडी माहिती पुरवण्याची, अाणि अाठवणींना गतकालाला खऱ्या अर्थाने जिवंत ठेवण्याची क्षमता आहे, असा विश्वासही व्यक्त केला जातो. परिणामी, कमी प्रगत अथवा कच्ची म्हणून लेखली गेली असली तरी, आठवणीची बाजू ही या सर्व संशोधनप्रवाहातील इतिहासकारांसाठी हस्तिदंती मनोर्यातील तटस्थ, पण कोरड्या, इतिहासाला, तसेच पोकळ राष्ट्रीय मिथकांना, छेद देणारी, अस्सल लोकजाणीवेकडे नेणारी उजवी बाब ठरली आहे. इतिहास अाणि अाठवणींमधली ही अस्सलतेची अोढाताण अापल्याला सर्वत्र दिसते. दैनंदिन राजकीय-सामाजिक चर्चाविश्वात ऐतिहासिक प्रसंगांच्या सत्यासत्याबद्दलची, अथवा महत्त्वाबद्दलची चर्चा कधी इतिहासाच्या शास्त्रशुद्धतेला प्रमाण मानते, तर कधी वैयक्तिक अथवा सामूहिक अाठवणींच्या अनादी सच्चेपणाला. दोन्ही संकल्पनांना अापले वैशिष्ट्य स्पष्ट करण्याकरिता एकमेकांची नितांत गरज असते; ही अोढाताण सामाजिक जशी सत्तासंबंधांवर अाधारितही असते, तशीच त्यांना ठरावीक अाकारही देते.

भारतीय अभ्यासकांनी या सर्व युरोपीय चर्चांचा भारताच्या राष्ट्रवादी इतिहासलेखनाच्या चिकित्सेसाठी मार्मिक वापर केला आहे. सगळ्याच राष्ट्रवादी इतिहासाचे एक ठरावीक गौरवास्पद कथानक असते. समाजात वर्चस्व गाजवणाऱ्या गटांना, व त्यांच्या दृष्टीकोनाला त्यात प्राधान्य दिले जाते. रंजल्यागांजल्यांचा उल्लेख झालाच, तर तो राष्ट्राचे कालातीत गौरव शाबूत ठेवील याची काळजी घेऊनच होतो. निराळी, विरोधी मते दर्शवणाऱ्या घटनांना, गटांना व ऐतिहासिक दृष्टीकोनांना सहसा यात मानाचे स्थान नसते. हरलेल्या लढाया अथवा दुसऱ्या देशांचे व लोकांचे केलेले शोषण ठरवून गाळले जाते. भारतीय उपखंडातील अशा विविध, शोषित, परीघीय, विवादी दृष्टीकोनांचा अभ्यास ‘अाठवणीं’च्या चौकटीतून झाला आहे. उदाहरणार्थ, शैल मयाराम (२००४) यांनी मेवातच्या ‘मेओ’ समाजाच्या परंपरेचा घेतलेला शोध. स्वत:ला मुसलमान तसेच राजपूतही समजणारा हा समाज मुसलमान व हिंदू अशा दोन्ही धर्मांचे आचार-विचार स्वीकारतो. मध्ययुगापासून विसाव्या शतकापर्यंत मुघल, राजपूत व इंग्रज राज्यव्यवस्थांनी मेओंना बंडखोर, निरक्षर, मागासलेले लेखले; पण खुद्द त्यांच्या स्व-जाणिवेत हे दुर्गुण स्वायत्त, वीर व परंपराप्रेमी अशा सद्गुणांत परिवर्तित होतात. मेअो समाज आपली स्वतंत्र अस्मिता व परंपरा यांना एका विशिष्ट मौखिक संस्कृतीच्या माध्यमातून जपत आला आहे. फाळणीच्या वेळी भीषण हिंसेचे शिकार ठरलेले मेओ समाजातील लोक मोठ्या प्रमाणात पाकिस्तानात गेले, तरी आजही सीमेच्या अलीकडेच त्यांची संख्या जास्त आहे. हिंदू व मुसलमान समाजांच्या सतत व सर्वव्यापी संघर्षावर, आणि भारत-पाकिस्तान फाळणीच्या क्लाइमॅक्सवर बेतलेल्या दोन्ही राष्ट्रांच्या राष्ट्रवादी इतिहासांच्या दरीत मेओ समाजाचे लोक हरवून जात आहेत. त्यांच्या मौखिक परंपरेला मयाराम सामूहिक आठवणींच्या स्वरूपात अभ्यासतात. त्यांच्या पुस्तकाचे शीर्षक – अगेंस्ट हिस्टरी, अगेंस्ट स्टेट – हा दृष्टीकोन स्पष्ट करते.

या दृष्टीकोनातून व्यक्त होणाऱ्या मतांपैकी एक टोकाचे मत आशीष नंदी (१९९५) यांचे आहे. वर उल्लेखलेल्या द्वंद्वांपैकी पाश्चात्य / पाश्चात्येतर हे द्वंद्व नंदी यांनी स्वीकारले आणि इतिहास या संकल्पनेलाच पाश्चात्य साम्राज्यवादाचे मुख्य हत्यार ठरवले. जे जे एकोणीसाव्या शतकातील पाश्चात्य इतिहासलेखनाच्या रूढ चौकटीमध्ये बसले नाही ते ‘मिथ’, खोटारडे, बिनबुडाचे ठरवले गेले, आणि आधुनिक इतिहासलेखन (व त्याचा वसाहती शिक्षणप्रणालीतून करण्यात आलेला प्रसार) हेच पराजित वसाहतींच्या दीर्घकालीन स्मृती-आठवणींच्या नाशाचे कारण बनले, असा नंदींचा एकूण तर्क अाहे. नंदींच्या काहीशा तीव्र आणि सरसकट मांडणीत पाश्चात्य इतिहासाला दोषी ठरला, आणि वसाहतपूर्व प्रथा व परंपरांच्या चिकित्सेला फारसा वाव राहिला नाही. दुर्दैवाने याच चौकटीतून अनेकांनी वसाहतपूर्व भारताच्या एकूण संस्कृतीला स्मरणरंजनाच्या चष्म्यातून रंगवल्या अाहेत. उदाहरणार्थ, ‘अनेकवचनी भूतकाळा’च्या संकप्लनेवर बेतलेल्या हिंदू कादंबरीत भालचंद्र नेमाडे (२०१०) यांनी दैनंदिन जीवन अाणि भाषेत जपलेल्या दीर्घकालीन, वसाहतपूर्व कालातील सामूहिक स्मृती अत्यंत बारकाईने रेखाटल्या आहेत. पण त्या स्मृती भावनात्मक, स्मरणरंजनाच्या पातळीवरच अडकून राहतात. त्यांना राजकीय आणि सामाजिक सत्तासंबंधांची नसते, आणि म्हणून या स्मृती खऱ्या अर्थाने ‘अनेकवचनी’ ठरत नाहीत, हे मी वेगळ्या लेखात विस्तृतपणे मांडले अाहे (२०१५). पण मयारामप्रभृतींचा दृष्टीकोन अधिक गुंतागुंतीचा अाहे. वसाहती, किंवा राष्ट्रवादी इतिहासावर टीका करताना ते स्थानिक सत्तासंबंधांकडे दुर्लक्ष करत नाहीत; उलट त्यांचे बदलते रूप स्पष्ट करतात, हे लक्षात घ्यायला हवे.

जाखोर: आठवणींचे दायित्व

इथपर्यंत आपण दीर्घकालीन परंपरेतून तयार झालेल्या आठवणी/स्मृतींची चर्चा केली. पण या उलट, विशिष्ट, भयानक आणि आघातजन्य घटनांचा अनुभव घेतलेल्या लोकांच्या स्मृतींचा अभ्यास हा आठवणी/स्मृतींच्या चिकित्सक अभ्यासाचा निराळा, महत्त्वाचा प्रवाह आहे, त्याच्याकडे वळूया. इथेही आठवणी या मुख्य प्रवाहातील इतिहासापेक्षा जवळच्या, वैयक्तिक मानल्या गेल्या आहेत. नात्झी छळछावण्यांच्या इतिहासाला तेथून सुटका मिळालेल्या लोकांच्या आठवणींची जोड मिळाली आहे. निव्वळ आकडेवारीतून त्या छळाची कल्पना कधीच येणार नाही. ती या हाडामांसाच्या अनुभवांनी पुरवली आहे. अशा भयानक अनुभवांच्या आठवणींबद्दल मानसशास्त्रज्ञ व चेताभिषक (neurologists) यांचे संशोधनही प्रदीर्घ आहे – आघाताच्या आठवणी अंतर्मनात दडून राहणे, त्यांचे पोस्ट-ट्रॉमॅटिक डिसॉर्डरसारख्या मानसिक विकारांमध्ये परिवर्तन होणे, मानसिक चिकित्सा व उपचारातून अशा दडलेल्या आठवणी पुन्हा वर काढता येण्याची शक्यता, हे सगळेच त्यात आले.

स्मरणक्रियेतून उपचार आणि रोगमुक्तीच्या प्रयत्नांना धार्मिक संदर्भही आहेत. कॅथलिक विचारांत गैरकृत्याचा पश्चात्ताप त्या कृतीचा पुनरुच्चार करून मगच विसर्जन करण्याने होतो; मगच त्यातून मुक्ती (absolution / redemption) मिळते हा विचार प्रसिद्ध आहे. ज्यू समाजाच्या स्व-जाणिवेत जाखोर, अर्थात सामूहिक आठवण, ही हीब्रू संकल्पना केंद्रस्थानी आहे. (येरुशाल्मी, १९८२) विशिष्ट धर्म आणि समाज म्हणून दीर्घकाल अबाधित टिकून राहण्याकरिता पुरातनकालापासून ज्यू लोकांच्या स्थलांतराची व शोषणाची सामूहिक आठवण कर्मकांडातून जिवंत ठेवणे महत्त्वाचे राहिले आहे. नात्झी छळछावण्यांतून जिवंत बचाव झालेल्या ज्यू लोकांच्या थेरपीत या पारंपारिक धार्मिक विचाराचे आणि आधुनिक मानसचिकित्सेच्या पद्धतीशास्त्राचे विचित्र मिश्रण झाले आहे. या मिश्रणामुळे, एकीकडे नात्झी नरसंहाराच्या स्मृतीला लोकसंस्कृतीत एक विशिष्टता, पावित्र्य प्राप्त झाले आहे. इतिहासातील सर्व दडपशाहीच्या लाखो-करोडो बळींच्या यातनांचे ती प्रतीक बनली आहे. दुसरीकडे या भीषण पर्वाच्या स्मृतींचे हिडीस बाजारीकरण, खास करून अमेरिकेत, होताना दिसते, पण त्याची चिकित्सक टीका-चर्चा अवघड होऊन बसले आहे, अशी टीकाही काही ज्यू इतिहासकारांनी केली आहे (फ़िन्कलस्टीन, २०००; क्लाइन, २०००).

पण अशा वैयक्तिक आठवणींचा प्राथमिक साधने म्हणून नेमका कसा वापर करावा, त्यांची विश्वासार्हता कशी पडताळावी, याबाबत इतिहासकारांमध्ये वाद होत आले आहेत (फ्रीडलांडर १९९७-२०१४; लाकाप्रा १९९८). अन्य पुराव्यांअभावी अशा आठवणी कितपत व्यापक समजाव्यात, आणि प्रथमपुरुषी एकवचनी निवेदनाची सामूहिक घडण नेमकी कशी हेरावी, हे दोन्ही प्रश्न त्यात कळीचे आहेत. एकूण, मानसिक आणि सामूहिक अशा दोन टोकांमध्ये वैयक्तिक आठवणी / स्मृती हेलकावे खात असतात. उपखंडात, फाळणीच्या हिंसेत, आणि बांग्लादेश मुक्तिसंग्रामात अडकलेल्या स्त्रियांच्या वैयक्तिक आठवणी त्या काळच्या इतिहासात समाविष्ट करून घेण्याच्या आव्हानाबद्दल उर्वशी बुटालिया (२००५), नयनिका मुखर्जी (२०१५) व अन्य संशोधकांनी मार्मिक लेखन केले आहे. अन्य ऐतिहासिक साधने नसलेल्या वंचित गटांच्या दीर्घकालीन शोषणाच्या स्मृतींना वैयक्तिक आठवणींच्या माध्यमातून हाडामांसाचा जिवंतपणा देणे, हे गेल्या काही दशकांत मराठीतील प्रसिद्ध दलित अात्मचरित्रांनी अत्यंत प्रभावीपणे साधले अाहे.

गतकालाचे सादरीकरण

लेखात आतापर्यंत, इतिहास आणि आठवणी/स्मृती, तसेच मौखिक आणि लिखित, अभिजात आणि लोक, वैयक्तिक/मानसिक आणि सामूहिक अशा विविध द्वंद्वांचा आपण विचार केला. अशा कृत्रिम टोकांच्या मधली गढूळ, गुंतागुंतीच्या जागा अनेक लेखकांनी ‘सादरीकरण’ (performance) या संकल्पनेतून स्पष्ट करायचे प्रयत्न केले आहेत, त्यांचा लेखाच्या शेवटच्या सदरात थोडा विचार करूया. विशिष्ट स्थलकालात गतकालात गाडल्या गेलेल्या ठरावीक गोष्टी पुन्हा नेमक्या कधी, का व कशा वर आणल्या जातात – अर्थात, सामूहिक पातळीवर कशा सादर केल्या जातात – हे तपासणे सांस्कृतिक पद्धतींच्या अभ्यासासाठी कसे उपयुक्त ठरू शकते. स्मरणरंजन वा अस्मितेचे भडक राजकारण यांच्या पलीकडे जाऊन, दैनंदिन भौतिक संस्कृती, शिक्षणपद्धती, ऐंद्रीय व कलासंबंधी कल्पना, आणि व्यक्तींचा निरनिराळ्या समाजाताला वावर, अशा विविध पैलूंबद्दल सादरीकरणाच्या तपासातून बरेच काही हाती लागू शकते. उदाहरणार्थ, ख्रिस्चन नोवेत्झ्के यांचे हिस्टरी, भक्ती अँड पब्लिक मेमरी (२००९) हे पुस्तक संत नामदेवांभवती तयार झालेल्या सांस्कृतिक स्मृतीसाठ्याचा आणि सामाजिक एककाचा अत्यंत मार्मिक अभ्यास आहे. नोवेत्झके भक्तीलाच एका व्यापक स्मृतिप्रक्रियेच्या स्वरूपात पाहतात. संतांच्या गाथा आणि ग्रंथ ही लिखित सामग्री उपलब्ध असली तरी कीर्तन आणि हरिकथांसारख्या लोकाविष्कारांतूनच ठरावीक भक्तीपंथच नाही तर स्मृतीपंथही कसे तयार होतात, शतकानुशतके जपले जातात, हे नामदेवांच्या आद्य कीर्तनकार असलेल्या वारकरी पंथातील लोकस्मृतीला केंद्रस्थानी ठेवून ते तपासतात. इथे लिखित आणि मौखिक पद्धतींना जोडणारी संकल्पना कीर्तनाच्या सादरीकरणाची आहे. लिखित स्रोतांना आपण प्रथमदर्शनी मौखिक आठवणींपेक्षा टिकाऊ समजतो, पण तुलनेने क्षणिक वाटणाऱ्या कीर्तनाच्या सादरीकरणातूनच संतांच्या रचनांना स्थायीपणा लाभतो, आणि त्यांच्याभवती भक्तीचा एकक घडून येतो. वर चर्चिलेल्या गूडींसारख्या मानववंशशास्रज्ञांच्या लिखित-मौखिक टोकांऐवजी नोवेत्झके कीर्तनकारांची लिखित बाडे, आणि त्यांनी मुखोद्गत केलेल्या अभंगांना एकत्र आणून, हजारो क्षणिक किर्तनातून नामदेवाच्या स्मृतीला, आणि भक्तीसंप्रदायाला स्थायीपणा कसा तयार होतो, हे सिद्ध करतात.

स्मृती आणि सादरीकरणाच्या संदर्भात तमिळनाडूच्या इतिहासातली दोन अलीकडची निराळीच उदाहरणे पाहू या. भवानी रामन यांचे डॉक्युमेंट राज (२०१४) हे पुस्तक म्हणजे कंपनी सरकारने मद्रास इलाख्यात स्थापन केलेले आधुनिक प्रशासन, आणि रयतवारी पद्धती अंमलात आणताना स्थानिक कारकुनी पद्धती रद्दबातल ठरवून त्याजागी उभारलेल्या आधुनिक ‘कचेऱ्या‘ यांचा अभ्यास आहे. आठवणींशी याचा काय संबंध? रामन या अभ्यासात केवळ कचेरीचे काम किंवा अधिकाऱ्यांचे हक्क याच्याबद्दलचे तपशील नोंदवत नाहीत. प्रथम त्या इंग्रजपूर्व तमिळनाडूत स्थानिक असलेल्या कणकुपिळ्ळै (कुलकर्णी) यांच्या प्रचलित नोंदपद्धती रेखाटतात. या नोंदपद्धती बहुभाषिक, व बहुपेडी होत्या. तेथील कुलकर्णी पूर्ण लिखित नोंदी ठेवत नसत. वसुलीबद्दलची बहुतांश माहिती ते पाठ करून ठेवत. गावातील वंशावळी, दुष्काळाच्या आठवणी, शेतीबद्दलची माहिती, पिकाचे वाटेकरी, व गावातल्या तंट्यांची माहिती हे सर्व त्यांच्या स्मरणसाठ्यात असणे अपेक्षित होते. वर्षातून काही ठरावीक वेळेस, जिल्हाधिकाऱ्यांसमोर, हातातील ताडपत्रावर नोंदवलेल्या त्रोटक स्मृतिखुणा घेऊन, कुलकर्णी वसुलीची माहिती आपल्या स्मरणशक्तीच्या आधारे चक्क तोंडी सादर करत. (जाता जाता: नोवेत्झके हाच स्मृतीखुणाचा तर्क कीर्तनकाराच्या बाडांबद्दल मांडतात.)

गतकालाची माहिती वर्तमानात गरज पडेल तशी अधिकृतरीत्या रंगवून सांगणे हेही कुलकर्ण्यांचे कौशल्य होते. त्यांच्या सत्तास्थानाच्या जपणुकीसाठी ते आवश्यकही होते, कारण गावकऱ्यांच्या तंट्यांमध्ये कुलकर्ण्यांची ही अधिकृत स्मृती कळीची ठरत असे. जिल्हाधिकारी स्वत:च्या नोंदींशी व स्मरणसाठ्याशी ही माहिती पडताळून पाहत. त्यांच्या देवाणघेवाणीतून, आणि परस्परस्मृतींच्या चकमकींतून स्थानिक सत्तासंबंध पुन:प्रस्थापित होत, तसाच स्थानिक इतिहासही. ज्या जिल्ह्यांमध्ये मराठ्यांची सत्ता होती, तेथे या नोंदी कागदावर मराठी-मोडीत ठेवल्या जात, व ग्राम-कुलकर्णींच्या ताडपत्रीवरील तमिळ नोंदींपेक्षा त्या अधिक विस्तृत असत. साहजिकच, सादरीकरणात स्मरणसाठ्याचीच नाही, तर भाषेचीही देवाणघेवाण होत असे. तमिळ गावांतील तिन्नै (व्हरांड्यांमध्ये भरणाऱ्या) पाठशालांच्या गणितशिक्षणामध्ये स्मरणशक्तीवर दिलेल्या भराचा रामन बारीक अभ्यास करतात. स्मरणशक्तीच्या या कौशल्यामुळे ग्रामाधिकाऱ्यांना विविध मोजमापांची मनातल्या मनात रूपांतरे करता येत. पाण्याच्या योग्य वाटपासाठी पाटाची खोली व रुंदी ठरवणे (अर्थात वजनदार शेतकऱ्यांना जास्त पाणी जातेय की नाही याची खात्री करून घेणे!) किंवा पिकाचे वाटप ठरल्याप्रमाणे झाले आहे की नाही हे तपासणे अशा अनेक दैनंदिन व्यवहारांत स्मरणशक्तीचे हे कसब कुलकर्ण्यांच्या वापरात येत.

ब्रिटिश अधिकाऱ्यांना या विश्वाचे आकलन संशयाच्या चौकटीतून घडले. कुलकर्ण्यांच्या त्रोटक नोंदींना त्यांनी महत्त्वाची माहिती लपवण्याचे साधन मानले; व स्मरणशक्तीच्या कौशल्याला एकीकडून घोकंपट्टी, तर दुसरीकडून अविश्वसनीय मानले. मौखिक पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल आणून ब्रिटिशांनी तमिळनाडूत आधुनिक कागदपत्रांचे राज्य वसवले. यामुळे फक्त नोंदपद्धतीच बदलल्या इतकेच नाही. गणित शिक्षण तर बदललेच, पण अस्सलतेची परिमाणेही बदलली. सह्यांचे महत्त्व वाढले. जमीनहक्काचे प्रमाण म्हणून लेखी कागदांचे महत्त्वही वाढले, आणि त्याबरोबरच कागदी पुरावा नसल्याच्या निमित्ताने गरिबांच्या जमिनी हडप करून त्यांना भूमिहीन करण्याचे नवीन साधनही आले. याप्रमाणे रामन स्मरणशक्तीच्या साह्याने होणाऱ्या सादरीकरणाला केंद्रस्थानी ठेवून; तमिळ समाज, शिक्षणपद्धती व ग्रामीण वर्गीय-जातीय संबंधांत झालेले व्यापक परिवर्तन उलगडत जातात. स्मरण ही फक्त मानसिक क्रिया नसून, विशिष्ट राजकीय, आणि सामाजिक-सांस्कृतिक संदर्भात जोपासलेले ते एक महत्त्वाचे कसबही असते, हे स्पष्ट होते.

तमिळनाडूतल्या देवदासींच्या विश्वात घडलेल्या उलाढालीची कहाणी सांगणारे दावेश सोनेजीचे अनफिनिश्ड गेस्चर्स (२०१२) हे पुस्तक स्मरणशक्ती आणि सादरीकरण यांकडे निराळ्या दृष्टीने पाहते. ‘देवदासी‘ म्हटले की विशिष्ट देवाला वाहिलेल्या स्त्रिया, व धार्मिक प्रथेच्या नावाखाली चालणारा वेश्याव्यवसाय, हाच अर्थ गृहीत धरला जातो. १९व्या शतकापासून मद्रास येथील सुधारकांनी पारंपरिक देवदासी प्रथेत मूलभूत बदल व सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू केले. १९४७ साली मद्रास देवदासी कायद्याने स्त्रियांना देवाला वाहण्याची पद्धत आणि देवळातील नृत्य या दोन्ही गोष्टी बेकायदेशीर ठरवल्या. गरीब स्त्रियांची, कलेची, आणि व्यापक समाजाची एका झटक्यात सुटका करण्याचा या कायद्याचा उद्देश होता. तमिळनाडू व आंध्रप्रदेश येथील विविध देवदासी समाजातील स्त्रियांच्या मुलाखती घेऊन, खुद्द देवदासी स्त्रियांच्या दृष्टीकोनातून सोनेजी या कायद्याचे सामाजिक व नृत्याच्या सौंदर्यशास्त्रावर झालेला परिणाम तपासतात. देवदासी नृत्याची शृंगाररसपूर्ण कलाकृती ना व्हिक्टोरियन सभ्यतेचा चष्मा घातलेल्या सुधारकांना रुचली, ना नृत्यपद्धती बदलू पाहणाऱ्या रुक्मिणीदेवी अरुंडेल यांच्यासारख्या ब्राह्मण नृत्यांगनांना. हळूहळू अरुंडेल यांच्या नेतृत्वाखाली या कलाकृतीचे एका अभिजात, पण तुलनेने ’सोज्ज्वळ’ आणि भक्तिरसप्रधान अशा, ‘भरतनाट्यम‘ नृत्यशैलीत परिवर्तन झाले.

देवदासी प्रथांशी निगडित, पण देवळाबाहेरदेखील सादर होत असलेल्या नृत्यपद्धतींच्या विविधतेवर, आणि देवदासींना असलेल्या मालकी व इतर हक्कांवर सोनेजी या अभ्यासातून प्रकाश टाकतात. मुलाखतींतून देवदासींची स्व-जाणीव शोककथेच्या रूपात समोर येते. पण ही शोककथा आधुनिक भरतनाट्यमच्या विरोधातील निव्वळ एक पर्याय म्हणून उभी न राहता एखादी कलाकृती व तिचे भांडार (repertoire) नेमके कसे जपले जाते; त्यात स्मरणशक्तीचे, स्मृतीसाठ्याचे, व सादरीकरणाचे (performance) महत्त्व काय असते; भांडार आणि कलाकार यांच्यातील संबंध कसे असतात या प्रश्नांवर विचार करायला ती वाचकाला भाग पाडते. अनेकदा मुलाखतीत सामील झालेल्या नृत्यांगना कितीही म्हाताऱ्या झालेल्या असल्या, तरी आठवण सांगता सांगता उठून सोनेजींसमोर नाचायला लागतात, बोलणे विसरून जातात. त्यांच्या आठवणी भांडारातून जपल्याही जातात, व त्याच्या प्रत्यक्ष सादरीकरणातून जिवंतही होतात. आठवणीतल्या गाण्याचे बोल आणि चाल हे दोन्ही पाठ असूनही चालीवर प्रत्यक्ष गायल्यावरच ते व्यवस्थित आठवतात, तसेच हे आहे. देवदासींच्या आठवणी खऱ्या अर्थाने शारीर आहेत, नृत्यबद्ध आहेत हे पटते. वॉल्टर बेंयामिनने (१९३७) सुचवल्याप्रमाणे, काही क्षणांपुरताच का असेना, देवदासी प्रथा निवारणाच्या अधिकृत इतिहासाला छेद देऊन गतकाल नजरेसमोर चमकून जातो, साकार होतो. अशा पद्धतीने, सादरीकरणाच्या चौकटीतून पाहिले, तर आठवण/स्मृतीची चिकित्सा फक्त सत्यासत्यावर अवलंबून न राहाता, विविध अशा शासकीय, भक्तीपर आणि कलाप्रधान संदर्भातील बदलत्या कौशल्यांना आणि सांस्कृतिक पद्धतींना समजून घेण्याची साधन बनते. हेच सामाजिक-सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने मेमरी / आठवण /स्मृतींचे वर्तमानात खरे महत्त्व ठरावे.

उपसंहार

जुन्या ऐतिहासिक नाटकांच्या प्रस्तावना आणि जाहिराती यांमध्ये हरवलेला गतकाल ‘हुबेहूब‘ रंगभूमीवर अाणण्याचे दावे केलेले असत. तो गतकाल हुबेहूब रंगवता येईल असा विश्वास जसा बहुतांश नाटककारांना होता, तसाच तो पाहायला मिळेल असा विश्वास प्रेक्षकांनाही होता. नवशिक्षित, ब्राह्मणी, अभिजन वर्गात अाधुनिक युगात पदार्पण केल्याचा, ऐतिहासिक सत्याला हेरल्याचा उत्साह होता. अापली सांस्कृतिक किंवा वैचारिक चौकट हीच रास्त याबद्दल त्याला अात्मविश्वास होता, पण त्या चौकटीबाहेरच्या विचारविश्वांबद्दल तो अनभिज्ञ होता, हे ही तितकेच खरे. (चक्रवर्ती २००८) विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक सैद्धांतिक, राजकीय अाणि सामाजिक उलाढालींमुळे हा विश्वास ढासळला अाहे. इतिहासावरच्या तात्त्विक चर्चा अाणि सार्वजनिक, लोकशाही क्षेत्र या दोन्हींमध्ये पर्यायी विचार आणि वादग्रस्त स्मृती मूळ धरू पाहत अाहेत. याचा एक परिणाम म्हणजे ऐतिहासिक व्यक्तींच्या वा घटनांच्या प्रतिरूपणाचा प्रश्न – मग तो गडकऱ्यांचा पुतळा असो, किंवा अरबी समुद्रात शिवाजी महराजांचा; क्रमिक पुस्तकात ठरविक व्यक्तींचा समावेश अथवा गाळले जाणे असो; सिनेपडद्यावर बाजीराव आणि काशीबाईंचे चित्रण असो – हा सामूहिक अस्मितेचा प्रश्न होऊन बसला अाहे. ठरावीक व्यक्तीची सार्वजनिक स्मृती कशी जपली जावी, हे विशिष्ट समूहानेच ठरवावे, असा आग्रह सगळ्याच धार्मिक व जातीय समाजांत वाढला आहे. सार्वजनिक भाषेत स्मृती केवळ स्मृती राहिल्या नाहीत, त्या ‘पवित्र स्मृती‘ बनल्या आहेत. दुसरीकडे, इतिहास, अाठवणी आणि सादरीकरण यांच्यातल्या गुंतागुंतीच्या संबंधावर संशोधकांमध्ये सखोल व सकारात्मक चर्चा होत असली, तरी ही चर्चा कधी हिंसक प्रतिवादाच्या भीतीमुळे, तर कधी दुर्बोध लेखल्या गेल्यामुळे, हस्तिदंती मनोऱ्यातच राहिली आहे, अाणि सार्वजनिक चर्चाविश्वाहून अधिकच दुरावली अाहे.

पॉल रिकर या फ्रेंच विचारवंताचे एक निराळेच सकारात्मक मत आहे. एरवी इतिहास, सामूहिक स्मृती, आणि वैयक्तिक आठवणी या तिन्हींच्या सोबत विस्मरणाच्या शक्यतेची सावली सतत असते. या विस्मरणाच्या भीतीपोटी आठवणींचे चित्रण भडक, कर्कश होत असते. पण विस्मरणाकडे फक्त भीतीच्याच नजरेतून न पाहता सकारात्मक दृष्टीनेदेखील पाहता येईल का? आठवणींबरोबर विसरही ठरवून घडवून आणला जाऊ शकतो का? असे प्रश्न रिकर हिस्टरी, मेमरी अँड फर्गेटिंग (२००४) या पुस्तकात मांडतात. राष्ट्रवादी इतिहासात सुवर्णयुगाच्या स्मरणातून हरलेल्या लढायांना ठरवून गाळले जाणे आपण वर पाहिलेच आहे. (अाजकाल हल्दीघाटीच्या लढाईत अकबराविरुद्ध राणा प्रताप हरलाच नाही असा नवीन इतिहासच रचता येतो, ही गोष्ट अलाहिदा!) पण रिकर यांचे म्हणणे वेगळे आहे. ते विस्मरणाला माफीची जोड देऊन, देशीय आणि आंतरदेशीय पातळीवर काही ऐतिहासिक स्मृतींना रास्त मानून, तसे बुद्ध्याच ठरवून, मग इतर स्मृतींचा सामूहिक विसर पडण्याच्या शक्यतेतच अर्थपूर्ण नैतिक राजकारणाचा पाया आहे, असे सुचवतात. ठराविक घटनांच्या अधिकृत स्मरण-विस्मरणातून मुक्ती पावण्याच्या ख्रिस्चन धार्मिक संकल्पनांचा प्रभाव रिकर यांच्या मांडणीवर दिसतो.

हा कदाचित भाबडेपणा म्हणता येईल. दीर्घकालीन शोषणाच्या कटू स्मृतींवर वर्तमानातील जहाल आठवणींच्या आधारे मात करण्याच्या शक्यतेवर सोयीस्कर पडदा टाकणे असेदेखील म्हणता येईल. पण इतिहास व स्मृती, आणि स्मरण व विस्मरण, यांना एकाच चौकटीत आणून नीती, न्याय व समता यांच्या संदर्भात त्यांच्यामधल्या चांगल्या-वाईट शक्यता आणि मर्यादा शोधण्यातच रिकर यांच्या तर्काचे महत्त्व दडलेले आहे. शेवटी सर्वांप्रती चिकित्सक आणि प्रवाही वृत्ती जोपासल्याशिवाय ना इतिहास अर्थपूर्ण राहतो, ना स्मृती, हेच त्यांना स्पष्ट करायचे आहे. शेवट त्यांच्याच शब्दांत करू या:

व्यावसायिक (professional) इतिहासकारांना इतिहासाबद्दल सदैव अचंबा वाटत राहतो. आठवणींचा निष्ठावंत असण्याचा पवित्रा, आणि इतिहासाचा सत्याचा आग्रह, या दोन्हींमधल्या स्पर्धेत ते सदैव अडकलेले असतात. मग आपण इतिहासाला हताश असे संबोधावे का? मला माहीत नाही. पण मी इतिहासाला ‘बिचारा‘ असे म्हणणार नाही. इतिहासाला एक विशेष अधिकार मात्र द्यावाच लागेल. अस्सल आठवणींच्या परीघापलीकडे सामूहिक स्मृतींचा प्रसार करणे तर या अधिकारात आलेच, पण एखादा ठाम समाज आत्ममग्न होऊन आपल्या स्मृती कुरवाळत बसला, दुसऱ्या समाजांची दु:खे जाणून घेईनासा झाला, तर त्याच्या स्मृतीची चिकित्सा करणे व तिच्यात सुधारणा घडवून आणणे हेही आले. चिकित्सक इतिहासाचा मार्ग अवलंबला, तरच आठवणींना न्याय मिळण्याची शक्यता आहे. एरवी सुखद आठवणी जर न्याय्य नसतील, तर त्या कसल्या सुखद आठवणी? (पृ.५००)

 

प्राची देशपांडे या सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्सेस, कलकत्ता येथे इतिहास विषयाच्या सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी लिहिलेले क्रिएटीव पास्ट्स: हिस्टॉरिकल मेमरी अॅंड आयडेंटिटी इन वेस्टर्न इंडिया, १७००–१९६० हे पुस्तक इतिहास-लेखनशास्त्र अभ्यासात महत्त्वाचे मानले जाते.

(लेखातले विचार अाणि भाषा स्पष्ट करण्यासाठी तातडीने मदत केल्याबद्दल मेघना भुस्कुटेंचे मनापासून अाभार)

संदर्भ

देशपांडे प्राची (२०१५): “हिंदूची इतिहासकल्पना: एक चिकित्सा,” मुक्त शब्द, जून.

नेमाडे, भालचंद्र (२०१०) हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ, मुंबई : पॉप्युलर प्रकाशन

Benjamin, Walter (1937) “Theses on the Philosophy of history” in Illuminations, ed. with an introduction by Hannah Arendt, New York: Schoken Books, 1968, pp. 253-264.

Butalia, Urvashi (2000) The other side of silence: Voices from the partition of India. Durham: Duke University Press.

Chakrabarty, D. (2008). “The public life of history: an argument out of India.” Postcolonial Studies, 11(2), 169-190.

Confino, Alon (1997), “Collective memory and Cultural history: Problems of Method,” American Historical Review, 105, 2 (December 1997): pp 1386-1403.

Deshpande, Prachi (2015), “Hinduchi Itihaaskalpana: Ek Chikitsa”, Mukta Shabd, June.

Finkelstein, Norman G. (2000) “The Holocaust Industry.” Index on Censorship, 29(2), pp. 120-130.

Friedlander, Saul (1997-2014), Nazi Germany And The Jews: 3 Vols. London: Hachette UK.

Goody, Jack (1977), The Domestication of the Savage Mind, Cambridge: Cambridge University Press.

Hobsbawn, Eric & Terrence Ranger, ed. (1983) The Invention of Tradition, Cambridge: Cambridge University Press

Klein, Kerwin (2000) “On the emergence of memory in historical discourse,” Representations, 69, pp.127-150.

LaCapra, Dominick (1998). history and memory after Auschwitz, Ithaca: Cornell University Press.

Mayaram, Shail (2004) Against history, against state: Counterperspectives from the margins. New Delhi: Orient Blackswan.

Mookherjee, Nayanika (2015) The spectral wound: Sexual violence, public memories, and the Bangladesh war of 1971. Durham: Duke University Press.

Nandy, Ashis (1995) “History’s Forgotten Doubles”, History and Theory, May 1: pp 44-66.

Nora, Pierre (1989) ‘Between memory and history,’ Representations No. 26, Special Issue: memory and Counter-memory (Spring, 1989), pp. 7-24

Novetzke, Christian (2009) History, Bhakti, and Public memory: Namdev in Religious and Secular Traditions, Delhi: Permanent Black.

Raman, Bhavani (2014), Document Raj: Scribes and Writing in Early Colonial South India, Delhi: Permanent Black

Ricoeur, Paul (2004) History, Memory and Forgetting, translated by Kathleen Blamey and David Pellauer, Chicago: University of Chicago Press.

Soneji, Davesh. (2012). Unfinished Gestures: Devadasis, Memory, and Modernity in South India, Delhi: Permanent Black

Yerushalmi, Yosef (2011) Zakhor: Jewish History and Jewish Memory, Seattle: University of Washington Press.

One comment on “इतिहासकारांच्या नजरेतून स्मृती आणि आठवण

  1. Kiran Limaye

    आपण गडकरी पुतळ्याच्या संदर्भात चर्चा सुरु केलीत, पण त्यावर थेट काही भाष्य झाले नाही. अर्थात असे ठोस वाटणारे भाष्य इतिहासाच्या अभ्यासकाला शक्यच नाही, कारण ज्या माहितीच्या सहाय्याने विधाने करायची त्याबद्दल तो ठोस असूच शकणार नाही. हा लेखातील दोष वगैरे दाखवायचा प्रयत्न नाही, तर मी मला जे समजलं ते लिहितो आहे एवढंच. वाचण्यासाठी अनेक संदर्भ मिळालेत, धन्यवाद.
    मुळात ‘सामूहिक स्मृती’ , म्हणजे देशाची, समाजाची हेच राष्ट्रवादाच्या निर्मितीनंतर, राष्ट्र हीच राजकीय अस्तित्वाची प्राथमिक अवस्था बनल्यावर आलेली गोष्ट आहे असं म्हणता येईल का? त्यामुळे ज्यावेळी एखादा भूभाग आज आपण ज्याला ‘राष्ट्र’ म्हणतो त्या राजकीय अवस्थेत नव्हता त्याबद्दलच्या ज्या ‘सामूहिक स्मृती’ आपण बनवतो त्यांना मुळातच एका कृत्रिम चौकटीचा बांध नाही का? महाराष्ट्राची ‘सामूहिक स्मृती’ ही लढायांची (किमान तिचा एक मोठा भाग) आहे, ज्यांना आजच्या राजकीय व्याख्यांत काय अर्थ आहे? एका अर्थाने ह्या ‘निर्मित’ आठवणी आहेत. असो. लेखाबद्दल धन्यवाद.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *