सौमित्र

एका नटराजाची प्रार्थना

back

 

एका नटाची नटराजाची प्रार्थना ..

 

आसपास असू दे भारलेला 
नाटकाचं पहिलं वाचन ऐकण्या आधीच 

शरीराभोवती माझ्या अनोळखी 
सळसळू दे काही खळबळू दे 

का कोण कशासाठी कुठवर
अशा अनेक प्रश्नांसोबत वाचनात 

कंसानी साऱ्या घेऊ दे कवेत आपोआप 
शिरताना रिहर्सलच्या घनदाट अरण्यात
घड्याळाचे काटे अडकूदेत एकमेकात 

रिकाम्या खिशातली पोकळी 
विसरू दे घराचा चौकोन 
राहू दे सारं उभं ठेवण्यापल्याड अरण्यांच्या 

धावू दे शोधत मृगजळ तरी 
सापडू दे निदान एकतरी ठिकाण रोज नवं 

प्रयोगा आधी नेहेमीच 
ध्यानस्थ मिळू दे थिएटर 

गर्भागारात त्याच्या फिरता येऊ दे अपार 
जाणून घेता येऊ दे त्याचा गडद अंधार 

तडकलेले नसूदेत आरसे कधीच 
आहे तसाच चेहेरा दिसू दे 
चिकटू दे दाढी मिशी उगवल्यागत 

रिहर्सलचा काळ 
तप होऊन पाठीशी उभा राहू दे 

पहिल्या घंटे आधीच खूप 
एकाग्र होऊ देत केंद्रं सारी 

एकांत माझा प्रकाशमान होऊ दे 
प्रयोगात 
पात्रासकट गात्रं सारीं 

पहाटफूल होऊन उमलू देत 
स्पर्शाला फुटू दे पालवी 
नाकाला सुगंध दिसू दे 

जिभेला होउ दे  शब्द  
अर्थ लाळेत भिजून जाऊ देत 
ओलेचिंब होऊदेत पॉजेस सारे 

राहू देत ओमकार वाणीत आणि 
पाणी होऊन हालचाली साऱ्या सहज वाहू देत 
शंभराव्या प्रयोगाची मांड 

पाहिल्यातच बसू दे 
फुटू दे इंद्रधनुष्य तरी नवनवीन 
प्रयोगा प्रयोगी 

एकतरी क्षण जिवंत होऊ दे 
असू दे भान सतत जागं 
माझं मलाच विंगेतून पहाता येऊ दे 

घडता घडता शेवट सहज घडू दे 
पडदा नेहेमीच नेमका पडू दे 
दिपऊ नकोस डोळे अंधारातून प्रकाशात 

जगण्याच्या गदारोळात सहज मिसळता येंऊं दे 
रस्ता आणि पाय दोन्ही मला आवडू दे 
शेवटी माझा मला मी 
पुन्हा एकदा सापडू  दे .

 

***

 

पुस्तकांची माणसं पुस्तकांची माणसं 

पुस्तकांसारखीच वावरत असतात आसपास 

सबकॉन्शस मनातल्या अनेक गोष्टींसारखी

संदर्भांसारखी अनेक पुस्तकांतल्या 

 

अंडरलाईन करून ठेवलेली 

कधीही लागतील म्हणून 

 

वर्तमानातल्या त्या त्या काळात 

जशी असतात काही माणसं सतत समोर                                       

तशीच असतात 

नुकतीच घेतलेली काही पुस्तकं            

रोजच्या टेबलवर हारीनं मांडलेली 

 

सकाळी चहा घेतांना 

जेवतांना दुपारी रात्री 

झोपण्याआधी समोर असतात नसतात 

जशी राहून गेलेली कामं 

आठवतात विसरण्याच्या सीमेवर

पुस्तकांसारखीच वावरत असतात आसपास 

 

 ***

 

सायकिक ..

 

अचानक मध्यरात्री उत्तररात्री 

आपोआप जाग  येते हल्ली 

 

कुठल्याशा तंद्रीत मी 

पुस्तकांच्या  कपाटाशी जातो 

विनोदी चुटक्यांची 

किश्श्याची पुस्तकं शोधतो 

 

त्यातले विनोद वाचून 

गालातल्या गालात कधी सांभाळून 

कधी मोठ्ठ्याने हसत राहातो 

 

परवा माझ्या हसण्याने सारेच उठले 

घाबरून माझ्याकडे पाहात राहिले 

 

सायकिऍट्रिस्टकडे न्यावं म्हटलं 

तर दिवसा मी नॉर्मल दिसतो 

अधून मधून रात्री अपरात्री उठून बसतो 

खदाखदा हसतो 

पुन्हा झोपी जातो 

सकाळी पुन्हा प्रसंन्न 

प्रफुल्ल टवटवीत उठतो 

 

हे आता  नेहेमीचंच झालंय 

 

बाकी ?

 

तुम्ही कसे आहात ?

 

***

 

पुस्तकं..

 

मी गेल्यावर 

तूला वाटेल कि आपल्या बाबांनी 

वाचलियेत ही सारी पुस्तकं 

 

पण नाही

अर्धंही वाचता आलेलं नाहीय्

येणारही नाही हे ठाऊक होतं मला तरी 

मी जमवत गेलो होतो ही पुस्तकं

 

माझ्यासाठी माझ्या बापाने 

काहीच सोडलं नव्हतं मागे 

ही अक्षर ओळख सोडून फक्त

 

जिच्या मागे धावत मी 

पोहोचलो आहे इथवर 

तुला सांगण्या समजावण्यासाठी कि 

मलाही सोडता येणार नाही मागे 

काहींच स्थावर जंगम तुझ्यासाठी 

 

ही काही पुस्तकं आहे फक्त

जी तुला दाखवतील वाट चालवतील  थांबवतील कधी पळवतील 

निःस्तब्ध करतील

***

चित्र सौजन्य: अपूर्ब सलुई, ओवरलॅपिंग अॉफ मेमरी बिट्वीन टू स्पेसेस, २०१६

सौमित्र हे मराठीतून लिहिणारे पुरस्काप्राप्त कवी आहेत. आणि तरीही हा त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित झाला असून बाऊल हा दुसरा कविता संग्रह आता प्रकाशनाच्या मार्गावर आहे. लेखनाबरोबर सौमित्र मराठी आणि हिंदी नाटके आणि चित्रपटातून अभिनय करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *