संतोष वसंत गुजर

back

.

अंगावर एकेक काटा उभा राहावा तसं काहीतरी..किंवा सूर्यातून एकेक किरण फुटावा ?..झाडाने वाऱ्याच्या सलगीने फांद्या नाचवाव्यात तसं..निळ्या-हिरव्या रंगांचा भडकलेला आगडोंब चमकून उसळावा अंगावर तसं..किंवा गार पडलेल्या प्रेताच्या पापण्या उघडल्या जाव्यात चट्कन तसं..असं काहीतरी..नक्की नाही सांगू शकत मी..नक्की काय वाटतं ते..हेच किंवा अजून काही वेगळंही असेल..अजून आठवलं तर अजून सांगेन..पण तुम्हीही पाह्यलाय ना त्याला ?..असेलच.

पिसारा फुलवताना त्याला पहाणं एक अनुभव असतो: सर्व पिसांचं मिळून एकच थोरलं जाळीदार पिंपळपान आणि त्यातून स्रवणारा सूर्यप्रकाश.

तो सूर्यप्रकाशही मी वहीत जपून ठेवतो.

 

मला तो आवडतो. खूप.

चिखलात कमळ उगवावं तसा उगवतो मोर माझ्या मनात.

मला आवडतो लहानपणापासून.

मला पाठ असलेली मोराची माहिती आणि महती ऐकवतो हवं तर:

 

मोर हा एक अत्यंत सुंदर पक्षी आहे! (हे तर तुम्हाला माहितीच आहे.)

त्याच्या मादीला लांडोर म्हणतात, जी अजिबात सुंदर नसते! (हे ही!)

प्राचीन काळापासून मोर हा लोकप्रिय पक्षी आहे. (मला ‘प्राचीन’ मधला चीन हल्ली खूप भावतो!)

मोर हा देवी सरस्वतीचे वाहन आहे. (मला स्पष्ट आठवतंय माझ्या शाळेच्या भिंतीवरही असंच चित्र काढलेलं आहे/होतं. कार्तिकेयही मोर वापरतो, पण तो आमच्याकडे इतका फेमस नाही.) आणि अर्थातच चित्रकारांचाही तो आवडता पक्षी आहे आणि..तेही मोराची चित्रं पुढून किंवा साईडनेच काढतात!! (मला चित्रं काढता येत नाहीत, मीही तशीच काढली असती.) कवींनीसुद्धा मोरावर खूप कविता लिहिल्या आहेत. (मला कविता लिहिता येत नाहीत आणि मला कवी/लेखक आवडतही नाहीत, शाळेपासूनच. का माहिती नाही पण काहीतरी रिजन असेलच.) मोराने त्याच्या सौंदर्याने आणि तोऱ्याने राजा-महाराजा, सम्राटांचे, बादशाहांचे आणि योद्ध्यांचे चित्त आकर्षित केलं आहे. तख्त आणि सिंहासनांवर स्वत:चं रूप प्रस्थापित केलंय. हिंदू पुराणांमध्ये बऱ्याच ठिकाणी मोराचा संदर्भ आढळतो. (मी पुराणे वाचली नाहीत कधी, पण अभिमान आहे, लहानपणापासून.) 

 

मोर साप, उंदीर, बेडूक, इत्यादि उपद्रवी प्राण्यांना खातो. आपल्या/शेतकऱ्यांच्या खूप उपयोगी पडतो. (काही लोक त्याला खातात. नॉनव्हेज खाणाऱ्यांवर बंदी कधी आणणार आहोत आपण? असल्या लोकांची नसबंदीच करायला हवी खरंतर!) मोर आपल्या बागांची, वनांची शोभा वाढवतो. कायदेशीररित्या मोर पाळायला परवानगी आहे. (मलाही कायदेशीररित्या मोर पाळायचाय, एकदा घराचं होऊ दे.)

 

मला त्याचा नाच खूप आवडतो. पाऊस सुरू झाला की च  मोर पिसारा फुलवून नाचतो, असं नाही, तो ‘मूड’ मध्ये आला की नाचतो हे ही मला माहितीय!  मी नाचणाऱ्या मोराचीही खूप चित्रे जमवली आहेत. (कारण मला चित्र काढता येत नाहीत, आधीच स्पष्ट केलंय.) त्याचा चमकदार गडद निळा हिरवा रंग, सापासारखी लवचिक मान, त्याचं तुरा मिरवत डौलदार चालणं, पिसारा फुलवून थुईथुई नाचणं आणि त्याच्या चेहऱ्यावरची ती घमेंड, आय लाईनरने भरलेल्या डोळ्यांतलं श्रीमंत सुख! मी एकदम सामान्य वाटतो त्याच्यासमोर. अगदीच सामान्य. चित्रातसुद्धा तो मला कॉँप्लेक्स देतो.

 

सामान्य माणूस सामान्य माणूस सामान्य माणूसअसं बोंबलण्याची गरज नाही.

सामान्य माणूस मजबूरी म्हणून सामान्य असतो.

 

त्याच्याकडेहीपैसा आणि सत्ता आले की त्याचंही सामान्यत्व झडून जाईल एखाद्या महारोग्याच्या चामड्यासारखं आणि त्यालाही चरबी यायला सुरुवात होईल गेंड्याच्या कातडीसकट. पण तसं सहज शक्य होतं नाही म्हणून तो रडत बसतो.

बरंय, माणसांच्या रडण्यातून मुलं जन्माला येत नाहीत..नाहीतर दर सेकंदाला एक मूल झालं असतं आणि ते कंट्रोल करण्यासाठी हसवणुकीचे प्रोग्राम करावे लागले असते..

भेंडी, मला त्ता कळलं की इतके कॉमेडी शोज् का सुरुयंत ते!

 

मला टॉन्ट कळतो!

आणि रूपक

 

.

त्याने आरश्यासमोर उभं राहून कपडे काढले..नागडा झाला.

स्वतःला संपूर्ण न्याहाळलं.. स्मित केलं.

“..my ASS is happy Today!..”  आणि बाहेर पडला.

 

मी म्हणालो (त्याला नागडा बघून): नंगे से तो खुदा भी डरता है!

तो म्हणाला (मला नाचताना बघून): जंगल में मोर नाचा किसने देखा?

मी म्हणालो (आजूबाजूला बघत): एकटा तू..

तो म्हणाला (तर मूर्ख वाटावा अशाप्रकारे हसत): माणूस कधी एकटा जन्माला येतो का?..मिनिमम दोन लोकांच्या समूहात त्याचा जन्म होतो..आई आणि बाप.. माणूस वाढत जातो तसे समूह वाढत जातात. आपलं ढुंगण आपलं रहात नाही.

मी म्हणालो: ढुंगण कुठं आलं मध्ये?

तो म्हणाला: मध्ये येत नाही, मध्येच असतं, मागच्या बाजूला. हे बघ. (तो वळला.)

तोच म्हणाला (पुन्हा थोडं थांबून): तुला माहित्ये एका पक्षाने त्यातल्या एका कार्यकर्त्याला त्याने पक्षापेक्षा वेगळा विचार केला म्हणून गोळ्या घातल्या.

मी म्हणालो: मला माहिती नाही. पण पक्ष कुठून आला मध्ये?

तो म्हणाला (माझ्या चेहऱ्याकडे बघत गंभीरपणे): तुला मोर खूप आवडतो ना?

 

तु ला   मो र   खू प   आ व ड तो   ना ?

खू प   आ व ड तो   ना   मो र   तु ला ?

 

माझा संपर्क तुटला.

 

.

सगळीकडे किम कार्दशीयनचं ढुंगण आहे !

मोठाले गांडगोळे पसरलेले..प्रसिद्धीच्या पूने भरलेल्या फोडांसारखे आणि बिलबिलीत कायम.

ती बसलीय आणि सर्व जग तिच्या ढुंगणाखाली आहे असं वाटतंय..हव्यासाने गुदमरतंय तिच्या गुद्द्वारापाशी.

 

कळत नाही काही मला. म्हणजे मी प्रयत्न करतो पण अचानक खूप काही चमकतं डोळ्यांसमोर, आंधळा होतो मी..हरवतो पटकन. (हरवायला वेळ नाही लागत, मला.)

 

ढुंगणांचे सेल्फी सुरूयत..बेल्फी सुरूयत..डी.पी. बदलतायत..स्टेटस अपडेट होतायत..जगाचं नेटवर्क ज्याम होतंय.

कि म   का र्द शी य न चं   ढुं ग ण ? ?  

त्याला हे नव्हतं म्हणायचं..नव्हतंच !

.

दुपार जायला तयार नव्हती, संध्याकाळ यायला तयार नव्हती अशा मध्यावर  

भर रस्त्यात ‘सांस्कृतिक फॅशन परेड’ पारंपरिक पद्धतीने सुरू होती:

र  स्त्या  व  रू  न    ए  क    मो  र    चा  ल  तो  य.

( आणि This is sponsored and co-partnered by..)

 

तुरा मिरवीत तोऱ्यात चालतोय..ऐकू येतायंत लोकप्रिय गाण्यांच्या चालीं..सूर घुमतायत आकाशात शंखध्वनींचे लाऊडस्पीकर्सचे..बंदुका-त्रिशूळं-तलवारी नाचतायत हवेत.

मोराची चाल प्रगतीच्या वेगाने बदलतेय..ती पहा..

एकेक शीर फुलावी, वासना मेंदूंत शिरावी तसं एकेक पीस उभं राहू लागलंय..लिंगाच्या ताठरतेनं.

अहाहा अहाहा..ते पहा..ते पहा..पिसारा हळूहळू फुलवतोय..पिसन् पिस खुलतंय!

संपूर्ण पिसारा फुलवून नाचायला लागलाय माझा मोर..भुरळ पडतेय सर्वांना. डोळ्यांचं पारणं फिटतंय..इतक्या जवळून मी कधीच नव्हतं पाहिलं त्याला..हजारो सुरसुऱ्या हातात एकत्र पेटवल्यासारखं वाटतंय, डोळे दिपूनच गेलेत!

जन्माचंच सार्थक होतंय जणू! वेगवेगळ्या रंगांची पिसं..वेगवेगळ्या चेहऱ्यांची पिसं..छान दिसतंय सगळं..भरलंय सगळं..सगळा आसमंत पिसांनी..आकाश त्याच्या पिसांतून पहा, कसं दिसतंय!?

इंद्रधनुच उगवलाय म्हणा ना!

वेडंपिसं व्हायला होतंय..छानचंय सगळं. फारच. मलाही वेड लागतंय..

मोर जणू स्वत:च एक पालखी झाला होता.

 

मोरोत्सव सुरूय.

 

मोर लाडात येतो..त्याचे लाड होताहेत.. त्याच्या अंगात येतं.. मी त्याचं अंग होतो.

त्याचे अजून लाड होताहेत!

तो जमीन आकाश एक करू पाहतो..तो जमिनीवरून झाडांवर, झाडांवरून स्ट्रीटलॅम्प्सवर, गच्च्यांवर उड्या मारतोय..लोकांच्या घरांत शिरतोय..कर्कश आवाजात गातोय..ट्रेनमध्ये घुसतोय, बसमध्ये शिरतोय..जणू दगडफेक, जाळपोळ नुस्ती! शेतात घुसून पिकं उचकटतोय..बागेत लांडोरींशी संभोग करतोय पिसाऱ्याच्या पसाऱ्याखाली.

त्याचं कौतुक होतंय..“शूट करा शूट करा, किती आकर्षक वाटतंय! व्वाह!! मोर हा जगातला सर्वांत सुंदर पक्षी!” 

 

तेव्हा तो आला कुठूनतरी पुन्हा मागून आणि म्हणाला,

“मोराला मागून पाहू..”

राष्ट्रीय पक्ष्याचा अपमान! राष्ट्रीय पक्ष्याचा अपमान!! राष्ट्रीय पक्ष्याचा अपमान!!!

एकच गोंधळ झाला. गोंधळ थांबेच ना!

गोंधळाची शाळा झाली.

त्याला शाळेतली कविता (पुस्तकातली) आठवली, गुणगुणू लागला-

“नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच..”

गोंधळ पुन्हा वाढत गेला: खिल्ली उडवली ! खिल्ली उडवली!! खिल्ली उडवली!!!

 

त्याला त्याची ‘शाळा’ आठवली.

त्याला त्याचं ‘शिक्षण’ आठवलं.

तो गुरूजी होऊन फळ्याजवळ गेला..फळा काळा काळा फळा..अंधाराने भरलेला.

 

आजचा सुविचार : खोटे बोलू नये.

फळ्यावर असं लिहिलेलं. पण हे कालचं आहे. गुरूजींनी डस्टर हातात घेतला आणि पुसायला गेले. कारण ‘आजचा सुविचार’च्या पुढे ते रोज एक नवीन सुविचार लिहायचे. कारण आजचा सुविचार हा कालचा झालेला असायचा आणि काल हा शिळा असतो त्याच्या सुविचारासकट.

आणि काळा फळा शिळ्या विचारांचा का असावा?

काय लिहावं? गुरूजींनी कितीतरी मिंटं विचारांमध्ये मन घोळवलं, मागे भरलेला वर्ग गुरूजींची घामाने भिजलेल्या पाठीवर चिकटलेल्या बनियानमध्ये तयार झालेली आकृती कशासारखी दिसतेय याचा विचार करत होता.

एकाला त्यात शाहरुख खान दिसला..एकाला शिवाजी तर एकाला बाजूच्या वर्गातल्या प्रणिताची काळी पाठ.

 

‘आजचा दिवस शून्य अपघाताचा’..बस आठवली.

‘Don’t drill, you may get electrocuted’..ट्रेनचा डब्बा आठवला.

‘Helmet  OR  Hell mate’..रोडचा सिग्नल आठवला.

हे सुविचार नाहीत..सूचना आहेत. सावधानतेचे इशारे.

 

गुरूजींना सुविचार सुचत नव्हता. (सावधानतेचे इशारे म्हणजेच सुविचार नव्हेत ना?!)

 

गुरूजींनी प्रश्नांतून सुविचार सुचतोय का हे पाह्यचं ठरवलं आणि वर्गाला विचारलं:

“सर्वांना रोज एकच स्वप्न पडणं, बोअरिंग आहे. सध्या साऱ्या जगाला एकच स्वप्न पडतंय, कोणतं?”

“फुलांनी बहरलेल्या बागेत भंगार उचलणारा भंगार गोळा करू शकेल?

किंवा भंगारवाडीत गेलेला एखादा फुलवेडा फुलं वेचू शकेल?”

“स्वातंत्र्य आणि वैयक्तिक/सार्वजनिक ठिकाणी चालू राहिलेला पाण्याचा नळ यात काय वाया जातं?”

“अंधार दिसतो, अंधारात दिसत नाही. प्रकाश दिसतो, प्रकाशात दिसतं?”

 

तेव्हा आधीच सुशिक्षित आणि सुसंस्कृत असलेल्या वर्गाने एक दीर्घ जांभई देत स्वतःच एक सुविचार लिहिला,

‘कुटुंब नियोजनाच्या’ सरकारी जाहिरातीसारखा एखादा: सुख हवं आणि निरोध ही.

 

वर्गाने एक निबंधही लिहिला, ‘मी निरोध झालो तर..’

वेगवेगळ्या चवीचे निरोध वाचले आणि ऐकले गेले..आणि मग गुरूजींना फुल्ल वेडा समजून शाळेतून हाकललं वर्गाने. हाकलताना वरचा वर्ग, खालचा वर्ग, उजवा आणि डावा वर्ग एकच झाले.

 

तो गुरूजींच्या रोलमधून बाहेर पडला. सुविचारांशिवायही जग चालू शकतं.

..बाहेर पडलं पाहिजे आतलं..नाहीतर विनाकारण सूज येईल..जाड होईन उगाच..विकृत होईन..कुजत जाईन आतून..बाहेर पडणं गरजेचंय..पण त्यासाठी आत पाहता आलं पाहिजे..आत कायंए ते कळलं पाहिजे..स्वच्छ शुद्ध होऊन.. for healthy relationship of mind and body.

 

मोर अधिक वाढला, अधिक संतापला, अजून मागे लागला.

त्याच्या मागे धावू लागला..तोही धावू लागला पण मजेत गात गात..पुन्हा तीच शाळेतली कविता जी फक्त पुस्तकात असते. “धावत होतो..धावत होतो..आठवते ना!..ओढ्याकाठी आपुल्या घरची गाय घेऊनि..धावत होतो..धावत होतो..” आणि आश्चर्यकारकरीत्या त्याला मध्येच गाय दिसली आणि त्याने फुकट एक सीन इमॅजीन केला:

 

त्या ला   गा यी ने   खा ल्लं य!

(तोपर्यंत मोरही एकाचवेळी तीन लांडोरींशी संभोग करण्यात मग्न झाला होता.)

 

..ओढ्याकाठीच कचराकुंडी होती..त्यातल्याच कुठेतरी कशाततरी म्हणजे कचऱ्यातच तो पडला होता.

त्याला खाऊन गाय तिथेच बसली..रवंथ केलं..मग मुतली.

थोड्यावेळाने जेव्हा शेण बाहेर आलं, त्याच्यासकट, तेव्हा त्याला ‘सत्य’ नव्याने दिसलं, उमगलं..?

त्याचं सत्य.

त्याच्यापुरतं सत्य.

त्याच्यासाठी सत्य.

तो शेअर करणार म्हणाला..

म्हणाला,

“ढुंगण सत्य, शौचातून बाहेर येणारंय..! शौच म्हणजे काय?..काय?..मला शुद्ध व्हायचंय!..मला रडू येतंय..मी दु:खी होतोय..मी शुद्ध होतोय..आतून-बाहेरून..शौच म्हणजे काय?..काय?..मला शुद्ध व्हायचंय! मी शौच करतोय..मला शोक होतोय..मी शुद्ध होतोय..मी नग्न होतोय..मी मग्न होतोय..मला शोक आवडतोय..मी आनंदीत होतोय..मला मग्नच असू दे..नग्नच असू दे..ह्या शोकात! शौच-मग्न-शोक.

परमसत्याचा साक्षात्कार.. ढुंगण!”

 

“तेहतीस कोटी देवीदेवतांनो मी प्रसन्नंय तुमच्यावर! बोला तुम्हाला काय हवंय? माझा बळी?

मी मांजरीला आडवा जाईन आता. मी कावळ्याला जाऊन शिवेन आता. मी मोराला भिडेन आता.

सीन फुकट नाही गेला!”

 

तुला गायीच्या पोटात असं काय दिसलं?  मी विचारलं.

मोर. तो न कळणाऱ्या भाषेत हसत म्हणाला.

 

.

त्याला अभिमान होता.

तो तसं सर्रास बोलत असे,

“मला चेहरा नाही, फक्त ढुंगण आहे.”

चेहरा का नाही? या प्रश्नावर त्याने सविस्तर उत्तर देणं सोडून दिलं होतं..म्हणजे यापूर्वी त्याने प्रयत्न केला होता..पण आता, नाहीच.

त्याच्या फेसबुक, व्हॉटसअॅपचे  डी.पी.. एवढंच काय त्याचा पासपोर्ट, त्याचं आधारकार्ड, त्याच्या पॅनकार्डवर चेहरा नव्हता..नाहीय. ढुंगण फक्त.

हे त्यानं कसं केलं होतं? कधी केलं होतं? इतकं सगळं..म्हणजे हे सगळंच..कसं शक्याय?

‘ळ’ ही त्याची सही होती.

मला तो नीटसा समजला नाही कधी..पण डोकं गरम व्हायचं त्याच्यामुळे! गांडू साला! वाटायचं हा वेडाय..की शहाणपणाचं सोंग घेतोय..?

 

‘मी शुद्ध आहे!’ इतकं म्हटलं की झालं?..होतं कुणी तसं?

अनेक जण त्याची खिल्ली उडवायचे. अनेकांना त्याचा तिटकारा यायचा..बायका मुली त्याला किळस आणि घाण म्हणून पाह्यचे! 

मी शुद्ध आहे!! पण नेमकं काय, हे सांगताना तो ढुंगण जमिनीवर टेकवायचा, त्याला खुर्ची, पलंग, गादी किंवा तसलं काहीही नको असायचं, म्हणायचा, “..फक्त जमीन हवीय मला, ढुंगणापुरती! ”

मी त्याला विचारलंही होतं की तू असा का आहेस?

त्याने उलट मला विचारलं की तू असा का नाहीस?

..आहेस – नाहीस मध्ये शांतता पसरली.

या शांततेला नोबेलवाले ग्राह्य धरणार नाहीत, नाहीच धरणार.

त्यांची शांतता वेगळी! आपली शांतता वेगळी!

“माझी शांतता केवळ खऱ्या ढुंगणाच्या प्रश्नांकित अस्तित्वामुळे निर्माण झालीय..

खऱ्या ढुंगणाला या जगात किंमतच काय? पण हवी, हवी ना?? “

पुन्हा मी विचारलं..“ ढुंगण खोटंही असतं?? ” 

 

हसला. मग तो टिपिकल बडबडू लागला, नाटकी वाटावं असं आणि इतकं:

तुकारामाला गांडेची लंगोटी द्यायची होती ..पण लोकांना ‘कासेच्या जॉकी’ मध्ये इंटरेस्टंय.

कुणाच्या ‘बुडाखाली’ किती अंधाराय हे नागराजला माहित्ये..खरंच?

‘खालचा अंधार’ शोधता आला पाहिजे, बुडता यायला पाहिजे बुडाखालच्या अंधारात..पुन्हा सुरकन काठावर यायला.

तो खालचा अंधार जो काळा नाही..जो आंधळं नाही करत..जो बोट धरून चालवतो कधी कधी..कधी चढतो आदिमपणे..समजला पाहिजे. 

या अफाट पसरलेल्या ढुंगणाला हवंय – अर्घ्यदान अप्रकाशित अंधाराचं, ते द्यावं लागेल.

तू किंवा कुणीही नसेल सोबत तरीही मी ते करेन! मी देईन.

 

त्याला लोकांनी (जवळचे लांबचे मित्र, मैत्रिणी, कलीग्स, नातेवाईक, शेजारीपाजारी, देशातले परदेशातले..वरचे खालचे, आतले बाहेरचे) सल्ले दिले:

 

आर यू सिरीयसली सिरीयस अबाउट धिस?

इट्स ओके..इट हॅपन्स..मलासुद्धा त्या गोष्टीचं आकर्षण आहे..पण सिक्रेट ठेव!

माझ्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत, नंबर देऊ..थांब मीच बोलते त्यांच्याशी!

वगैरे..

तुला तरी समजतंय का तू काय बोलतोयस, की मूर्ख बनवतोयस?”

 

हं.

 

त्याचा ‘हं’ निर्गुण निराकार होता.

त्याच्या ‘हं’ मध्ये अणुबॉम्ब होता.

त्याच्या ‘हं’ मध्ये शुध्द वेडेपणा होता.

तुम्हाला काय काय सांगू आणि कसं..मला समजत नाहीय!.. त्याच्या ढुंगणातून निघाणारा गू सुद्धा नाही होऊ शकलो मी, असंच वाटतंय आणि अनामिक भीती वाटतेय आज..ढुंगणाला गाठी पडल्यात माझ्या, इथे बायकोच्या घरी नरम गादीच्या पलंगावर पडूनसुद्धा!

 

माझा मोबाईलही खिशातून खाली आलाय..‘मी कोण त्याचा’, तुम्हाला सांगू? विश्वास उडेल तुमचा माणसांवरचा.

ढुंगण..त्याचं लॉजिक..त्याची तऱ्हा..

“अ ग्ली   B U T T   वे ग ळी  ढुंगणिका”..स्वतःच म्हणायचा आणि हसून समाधिस्थ व्हायचा.

“मला शौच करायचंय! ”

ऐंग?? मला कळायचं नाही, घाणेरडा वाटायचा एकदम, या मारून फेकला पाहिजे कुठेतरी, साला!!

 

नागडं काहीतरी शेअर केलं म्हणून ऑफिसने काढला त्याला.  नागडं एक पोस्ट केलं म्हणून सोशल साईटने ब्लॉक केला त्याला.

 

शब्दांपलीकडे जाऊन उकरायचा सगळं! सतत खोदकाम.

शब्दांचं सँडविच, शब्दांचा खिमा करायचा. शब्दांचंच शेण.

शब्द: भेन्चोद. 

“भेन्चोद काय मुलगीय..! ”

भेन्चोद म्हणजे चांगली..म्हणजे सुंदर..म्हणजे माल..म्हणजे तीक्ष्ण.. भेन्चोद म्हणजे आवडली!

 

तो तिला घेऊन बसला.

टिपिकल रात्र नव्हती..चंद्राने आकाशाला भोक पडायला अजून खूप अवकाश होता.

फॅन बंद होता..घाम येत होता..अर्थातच electricity नव्हती!

..डास कानांजवळ गुणगुणले, पाल पायाखालून सरकली.

फक्त किशोरीचं ‘अवघा रंग एक झाला’ सुरू होतं..मोबाईलवर.

 

ती त्याची गर्लफ्रेंड नव्हती..ती त्याची बायको नव्हती..ती दुसऱ्याचीही बायको किंवा गर्लफ्रेंड नव्हती.

तो क्षण खरा.

तो..किस करू लागला..दाबू लागला..बोलू लागला:

तुला हात लावताना..हे सर्व करताना मला लाज नाही वाटतंए.. पापही नाही वाटतंए..खूप मोकळं ..खूप स्वच्छ शुध्द..निखळ प्रेम जाणवतंय! मन आणि शरीर कितीतरी आत धुतलं जातंय..खूप हलकं वाटतंय..तरंगतोय मी..उडतोय मी.. ‘आज कल पांव जमीं पर नही रहते मेरे..’ या गाण्यातली रेखा झालोय मी!

 

दोघांनी छान केलं. भरपूर केलं.

सॉंकेटमध्ये प्लग फिट बसावा आणि बटण चालू होऊन करंट जनरेट व्हावा तसं झालं सगळं.

आपण सेक्स करू शकू संसार नाही, ती म्हणाली.

हं, तो.

त्याने तिच्या ढुंगणाचं चुंबन घेतलं..आणि निघाला तिच्या घरून.

 

केव्हा उमगलं असेल त्याला हे सर्व?

 

केव्हा येतो तो क्षण जेव्हा सुरुवात होते, जेव्हा मेंदूच्या पारदर्शी तावदानांना तडे जातात आणि चिराचिरांमध्ये प्रकाश भिनतो..चीर न् चीर तीक्ष्ण होऊन चमकते आणि कापत जाते तिच्यावरून फिरणारा प्रत्येक फसवा स्पर्श?

हे सगळं त्याचंय.. मी फक्त बोलतोय. मला तो छळतोय. नीच कुत्रा साला!

 

एकदा FIRST CLASS च्या डब्यात तो शिरला होता चुकून, तेव्हा?

..धावत पळत..अगदी धापा टाकत, दीर्घ श्वास घेत. अचानक हसू लागला आजूबाजूला बघून.

त्याचं लक्ष FIRST CLASS वर गेलं..

“जाऊ दे FIRST CLASS तर FIRST CLASS! पुढचं पुढे बघू पकडलं तर!”

मग त्याने ती अक्षरं मनातल्या मनात गिरवायला सुरुवात केली. आणि त्याला तेच दिसलं जे SECOND CLASS मध्ये दिसतं. कोणत्याही ‘CLASS’ मध्ये दिसतं..CL वर काट मारली आणि ASS चा फोटो काढला आणि शेअर केला..डीपी म्हणून ठेवला.

पुन्हा शिव्या खाल्ल्या ग्रुपवर, “गांड तेरी!”

 

त्याचा पत्ता एकच नव्हता, त्याचा पत्ताच नव्हता खरंतर!

Virtual estate खूप होती पण Real estate चा पत्ताच नव्हता.

“काय करायचाय पत्ता? ते महत्त्वाचं नाही. काय सांगून गेलेत पुण्यात्मे पुन्हा पुन्हा जन्मू?”

 

त्याने एकदा अमेरिकेला आणि रशियाला ढुंगण दाखवलं..आणि स्वतःच्या देशाला तर तो रोजच ढुंगण दाखवत असे.

पण ढुंगण ‘दाखवणे आणि पाहणे’ ही त्याच्या देशाची परंपरा आणि संस्कृती नाही.

 

इथे कुणालाचतेनकोय किंवातेनाहीचंय असं समज तू आणि ते सोडून बोलत जा.

छान लिहित जा..गोड बोलत जा..किंवा उगाच फालतूगिरी कर!

ऐकतील लोक, बघतील लोक, वाचतील तुझं..तुला मान मिळेल, सन्मान मिळेल..

 

असं त्याला जो तो पुन्हा पुन्हा समजवायचा, धमकी द्यायचा:

 

वर्तमानपत्रे तुला छापतील!

‘Talk show- Reality show’ वाले खुणावतील!

तुलाभाऊजीम्हणून हाक मारूनहोम मिनिस्टरवाले ओवाळतील!

कॉमेडी शोवाले बोलावतील. तुझ्यावर एपिसोड वाया घालवतील!

टुर्सवालेतुला फुकट जग दाखवतील..

तू लोकांच्या गळ्यांतला ताईत होशील. तू सोनं होशील. तू हिरा है सदा के लिये होशील, तू

यूट्युबवर सेन्सेशन होशील.. फेसबुकवर लोकं फॅन होतील..ट्विटरवर फॉलोवर्स मिळतील..सेलिब्रिटी होशील..देवच होशील लोकांचा!

 

तू का इतकं अश्लील लिहितोयस, बोलतोयस?

तू काय हे लोकांना नको ते दाखवत सुटलायस?

तुला आमच्या जगात जगायचंय की ढगात जायचंय??

तुला माहिती नाई लेखकाचं रक्त कोणत्या पक्ष्यांचंअसावं ते?

मोर हा राष्ट्रीय पक्षी आहेआणि तो पुढूनच बघायचा !!

 

हे सर्व ऐकून त्याला एकदम जोकच सुचला, त्याला सांगायचा होता पण मध्येच कुठूनतरी एक अंत्ययात्रा आली. नाचत भजन कीर्तन करत फुलाहारांनी सजलेली तिरडी पण रिकामी होती:

(मोर अजूनही संभोग करण्यात मग्नच आहे.)

 

“राम नाम सत्य है” 

“राम नाम सत्य है”

“राम नाम सत्य है”

राम नव्हता तेव्हा काय होतं? आय मिन, रामाअगोदर काय म्हणायचे लोक मेलेल्यांसाठी?

तेव्हाही लोक मरायचे. त्यांची तिरडी बांधली जायची. त्यांना खांद्यावर घेऊन पोचवायचे..जाळायचे.

व्हायचं का हे सर्व रामाअगोदरही? असेलच.

की नाही?

काय वाटतं तुला?

हे ‘बिफोर क्राईस्ट-आफ्टर क्राईस्ट ’ सारखंय? B.C. आणि A.D. सारखं?

क्राईस्ट कसा गेला (आणि कसा परतला) हेही माहितीय.

 

पण राम कसा गेला? ( शोधावं लागेल, शोधलंही आहे काही लोकांनी..पण मी माझं शोधेन.)

का गेला?? रामाच्या राज्यात रामराज्य होतं ना की नव्हतं? पत्नीचा विरह, विरहातून मुक्ती? मुक्तीसाठी समाधी, समाधीसाठी त्याग, त्यागासाठी देह..देह काय काय भोगतो..वनवासात रामाचे केस किती वाढले असतील ना, दाढीही आली असेल मोठी आणि तेव्हाही तो ‘सुंदर’च दिसत असेल, मला खात्रीय..बघ संपतच नाहीय हे, विचारांचं शेपूट, वाढतंचंय..लंकादहन सुरूय नुसतं!

 

काळ अमर आहे..आजही आहे..उद्याही असेल.. परवाही असेल..त्याला मरण नाही..

‘रामकृष्णही आले गेले..त्यांवाचुनी का जग हे अडले ’ ऐकलंयस गाणं?   

काळ कसा दिसतो? काळ काळा आहे का? सुखाचा काळा आणि दुःखाचा गोरा? सत्य गोरे आणि असत्य काळे?शुद्ध गोरे आणि अशुद्ध काळे? सुंदर गोरे आणि असुंदर काळे? काळे पाहूच नये का? असुंदर पाहूच नये का?

‘सावळा हा रंग तुझा पावसाळी नभापरी ’.. ढगांचं ढुंगण बघत बघत मोठा झालोय मी! असं तो म्हणाला आणि गाणं खट्कन बंद पडलं.

 

कृत्रिम ढग जमून आले. मोर नाचत नाचत आला.

अंत्ययात्रा मोरात एकरूप झाली. सामूहिक नृत्य गाणं सुरू झालं.

मोरानं त्याची हत्या केली आणि रिकामी तिरडी भरली त्याच्या तुकड्यांनी जशी फुलांनी परडी..

मोर जणू स्वतःच एक ताबूत झाला होता.

मोराने मारला त्याला..अंगावर नाचला त्याच्या, असंख्य चेहऱ्यांनी..पिसारा फुलवून चोचीत

मांस दडवून..रक्तात थयथयाट नुसता! चोचीला तलवारीची धार होती..असंख्य श्रीमंत सुखी डोळ्यांत रक्त उफाळलं होतं..शीरा तटतटून फुटत होत्या कारंज्यांप्रमाणे.

 

मी   ही    त्या   मो रा चं   ए क   पी स   झा लो   हो तो.

त्याच्या डोळ्यांत मी पाणी पाहिलं..माझ्यासाठी, त्याने ओळखलं मला?

मी चेहरा पूर्ण झाकून घेतला होता बायकोच्या ओढणीने, तरीसुद्धा?

(मी त्याला पाठवलाय..परमेश्वराचं ढुंगण बघायला.)

 

मला आठवतो, मला सतावतो.

एकदा, अचानक झोपेतून जाग यावी तसं भन्नाट हसत बोलत होता तो माझ्याशी:

मला एक वाईट आणि मजेशीर स्वप्न पडतंय सारखं सारखं की..

आपण सर्वजण एकसारखे दिसतोय..आपण सर्वजण एकसारखे वागतोय..

पण कुणालाच ढुंगण नाही!..मग मी घाबरून उठतो..आणि चाचपतो माझं, हातांना छान गोलगोल लागतं. मी खूप हसतो, मनाला बरं वाटतं. मग मी बसतो जमिनीवर मांडी घालून काही मिंटं शांत..आणि आनंदाने परत झोपतो.

 

.

दुपारची वेळंय, ड्रिलिंग सुरूय कुठंतरी..भोकं पडतायत..बरं वाटतंय..हलकं, सुसह्य होतंय उन्ह..

एक ड्रिलिंग मशिन आणूणच ठेवायला हवी कायमची. 

 

पडूनचंय मी.

पेपर हातात घेतलाय. त्यात किम कार्दशीयनचं मोरपिस गोंदलेलं ढुंगण छापून आलंय, नेहमीचं झालंय. फोटो नाकाजवळ नेला तिचा, बंद डोळ्यांनी हुंगू लागलो तिला बुडापासून, नाकपुड्या फुलारल्या..शरीराचं पिस न् पिस खुलू लागलं..इतक्यात ‘होळी रे होळी पुरणाची पोळी, साहेबाच्या बोच्यात बंदुकीची गोळी’ बोंबलत माझा सहा वर्षांचा मुलगा बेडजवळ आला..

त्याला उठून कानाखाली द्यावीशी वाटतेय..पण ढुंगणही सरकवता येत नाहीय..दरदरून ताप भरून आलाय. पेपराचा गोळा केला. खिडकीतून टाकला बाहेर. खिडकीतल्या ग्रीलला की कुंडीत मुलानं लावलेलं मोराचं पीस वाऱ्याने हलतंय..दिसतंय मला..

वाटलं ‘तो’ हाय करतोय..घामाघूम झालो..तो विचारतोय:

 

तुला मोराच्या पिसांत काय दिसतंय?

मीच दिसतोय. (मीच दिसेन नेहमी? मला ठार मारा ना कुणीतरी!!)

 

पेपराच्या मागच्या बाजूलापण त्याच्या देशातल्या न्यायाधीशाला नव्याने उमगलेलं सत्य होतं की मोर संभोग करत नाही. अश्रूंचीच मुलं होतात त्याच्या. म्हणजे  लांडोर आणि मोर एकत्र बसून रडतात, त्यांचे अश्रू एकमेकांत मिसळतात, असंही नाही..लांडोर मोराचे अश्रू पिते, गरोदर होते आणि वंश वाढतो..असं काहीतरी..म्हणजे मोर एकटाच रडतो!

एकटं रडणं हे ही सत्य सुंदर आहे..आणि त्यातूनही पुन्हा जन्म, अहाहा! पण रडण्यातून काय जन्मतं?

 

‘अश्रूंची झाली मुले!’ असंही म्हणता येईल मोराला, गर्वाने.

 

न कळणारा जोक आणि आयुष्य सेमच, साला हसायचं की नाई हेच कळत नाई!  

 

बाहेर पुन्हा कसलातरी गोंधळ सुरळीतपणे सुरू झालाय, मी लटपटत खिडकीजवळ उभा राहिलो:

र  स्त्या  व  रू  न    ए  क    मो  र    चा  ल  तो  य.

(..आणि This is sponsored and co-partnered by..)

 

रंगीबेरंगी कपडे..लांबलचक तोकडे..

चालत होते चेहरे..काय छोटे काय बडे

जरा सरळ.. खूप वाकडे..

चेहऱ्यावर मेकअप.. हातांमध्ये झेंडे..

आम्ही शहाणे तुम्ही वेडे.. तुम्ही वेडे..

ओरडत..

लचकत मुरडत..वाटत पेढे..

 

जल्लोष जुलूस जयघोष आणि फटाक्यांच्या आवाजानं वातावरण थरथरतंय, कानांतल्या पडद्याप्रमाणे.

मी खिडकीजवळंय, बायको किचनमध्ये आणि मुलगा रामाच्या फोटोला दाढी काढत बसलाय.

 

संतोष वसंत गुजर व्यवसायाने आर्किटेक्ट असून मुंबईस्थित लेखक आहेत.

One comment on “ळ: संतोष गुजर

  1. adminhakara

    संतोष,
    कथा वाचली. फारच आवडली.
    लिहीत राहा. मनापासून शुभेच्छा !!


    गिरीश पतके

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *