नूपुर देसाई

सरमिसळीची रूपं



back

चित्रातली, कथा-कवितेची, गाण्याची अशी वेगळी रूपे कशी आकाराला येतात, याचा विचार करताना लक्षात येतं की संस्कृतींमधलं किंवा कलारूपांमधलं केवळ वेगळेपण म्हणून रूपांकडे न बघता हे वेगळेपण कशातून किंवा कशामुळे तयार झालं हे पाहाणं महत्त्वाचं ठरतं. मुळातच विशुद्ध अशी काही रूपं असतात का, रूपं कोणत्या प्रकारच्या देवाणघेवाणीतून तयार होतात, हे पाहाणं महत्त्वाचं ठरतं. बऱ्याचदा त्या देवाणघेवाणीतून आकाराला येणारं अवकाश हे संदिग्ध असू शकतं. या संदिग्ध वाटणाऱ्या, सरमिसळीच्या व्यवहारातून नवी रूपं साकारतात, मग ते साहित्य असो, भाषा असो किंवा चित्र, शिल्प आणि वास्तुकला. गेल्या काही वर्षांत इतिहासाची पुनर्मांडणी होत असताना कलेच्या क्षेत्रातही या ‘रूप-खेळा’चं नव्या पद्धतीनं आकलन आपल्याला करता येतं. एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे पर्स्पेक्टिव किंवा चित्रातल्या यथार्थदर्शानाची सुरुवात युरोपातल्या रनेसॉं काळात झाली अशी मांडणी कला इतिहासात नेहमीच केली जाते. ते काही अंशी खरं जरी असलं तरी चित्रातल्या यथार्थदर्शनाला कारणीभूत ठरलेले संदर्भ मात्र जरा वेगळे होते. नव्या दृष्टीकोनातून आणि अभ्यासातून याकडे पाहाताना कळत की इतिहासात वेगळंच काहीतरी घडलं होतं. म्हणजे अकराव्या शतकात इब्न अल हायथाम (किंवा अल हाजेन) या अरबी शास्त्रज्ञाने अरबी विज्ञान आणि गणिती संशोधनात मोठी प्रगती घडवून आणली. पिनहोल कॅमेऱ्याच्या प्रयोगातून त्याने दृष्टीपटलावर पडणाऱ्या प्रतिमेचा अभ्यास केला. ‘बुक अॉफ ऑप्टिक्स’ या ग्रंथातून दृश्यरूपातील बोध कसा होतो याची मांडणी केली. गणितज्ज्ञ असलेल्या अल हाजेन यांची ही अकराव्या शतकातली मांडणी भाषांतरामार्फत युरोपपर्यंत पोचली. अरबी प्रदेशामध्ये या तंत्राचा वापर करून गुंतागुंतीच्या पण अतिशय विलोभनीय अशा भौमितीय रचना इमारतीमध्ये वापरल्या गेल्या. पण मानवाकृतींचं चित्रण आणि त्यात या त्रिमितीय रचना मात्र इथे साकारल्या गेल्या नाहीत. यथार्थदर्शनाला सांस्कृतिक मान्यता नसल्यामुळे अरबीप्रदेशात चित्रात त्रिमितीय आकार दाखवणाऱ्या या तंत्राचा उदय झाला नसण्याची शक्यता आहे. पण त्या प्रांतातल्या भूमितीय रचनांच्या समीकरणांची मांडणी काही अभ्यासकांनी मध्ययुगात केली. ही मांडणी मुख्यतः ‘पाहाण्या’बाबत आणि अवकाशाचं नवं आकलन करून देणारी होती. लोरेन्झो घिबेर्ती सारख्या इटलीतील रनेसॉं काळातल्या कलाकारांनी या अभ्यास करून त्यातून द्विमितीय पृष्ठभागावर त्रिमितीय रचना आणि आकार रंगवण्याचं कसब मिळवलं. अरब विज्ञानातली मांडणी ही गणिती अवकाशाविषयीची आणि दृष्टीविषयीची होती. ती युरोपातल्या कलाकारांनी चित्र आणि शिल्पकलेकरिता लागू केली. या सायंटिफिक पर्स्पेक्टिवमुळे चित्राचं, चित्रातल्या आकारांचं, मानवी आकृतींचं रूप एकदम पालटलं. आजूबाजूच्या अवकाशाची जशीच्या तशी प्रतिमा तयार करण्याचं कौशल्य यामुळे चित्रकारांना प्राप्त झालं. भौमितीक आकार असो किंवा मानवाकृती, प्रत्येक संस्कृतीची स्वतःची अशी प्रतीकं असतात आणि ती निरनिराळ्या रूपात प्रकट होत असतात. ही प्रतिकात्मक रूपं एकत्र येऊन पर्स्पेक्टिवची निर्मिती झालेली दिसते.

वास्तुरचनांमध्ये ही देवाणघेवाण आणि त्यातून होणारी सरमिसळ अधिक ठोस स्वरूपात दिसून येते. भारताच्या संदर्भात पाहायचं झालं तर जोर-बांग्ला किंवा दो-चाला या बंगाल मधल्या वास्तुरचनांमध्ये छत आणि खिडक्यांची रचना १६व्या शतकात मुघलकालीन इमारतींमध्ये रचनेचा एक भाग म्हणून वापरले गेले आणि नंतर त्या रचनांचं एक वैशिष्ट्य बनलं. नंतरच्या कालखंडात म्हणजे वासाहतिक काळात उभारली गेलेली शहरं आणि तिथल्या इमारती यांच्या संदर्भात असं दिसतं की त्या केवळ सांस्कृतिक आणि आर्थिक वर्चस्ववादातून उभ्या केलेल्या जागा नव्हत्या. वसाहतवादाचा निरनिराळ्या भागातला अनुभव निरनिराळा होता. या काळात आलेल्या आधुनिकतेच्या अनुभवातून, आणि त्याबरोबरच्या त्या त्या भागातल्या सांस्कृतिक घटकांचा ओघ हा दोन्ही दिशांना जाणारा होता. जरी वासाहतीकरण झालेले भारतासारखे देश आणि युरोपीय वसाहतवादी देश यांच्यातल्या संस्कृतींमध्ये दरी असली आणि वर्चस्व संबंधावर आधारलेलं नातं असलं तरी तिथे एक प्रकारे त्या संस्कृतींमधल्या काही घटकांचा मिलाफ होताना दिसतो. या मिलाफातून नवी हायब्रिड रूपं तयार होत गेलेली दिसतात. ही नवी रूपं जुन्या रूप-व्यवस्थेला प्रश्न विचारणारी असतात, त्यांना उधळून लावणारी असू शकतात किंवा त्यांना अधिक वलयांकित करणारी असू शकतात. सांस्कृतिक घाट ठरवणारी, त्यांना नवे अन्वयार्थ देणाऱ्या या रूपातून नव्या शक्यता उभ्या राहातात. अशी रूपं ही प्रस्थापित, ठरावीक अशा सौंदर्यविचार किंवा कलारूपं यांच्यातून उलगडत जाणारी असतातच असं नाही. तर, त्यांना कवेत घेऊन त्यावर प्रक्रिया करून ही संकरित रूपं आपल्या आजूबाजूला उभी राहातात. ही रूपं तात्कालिक असू शकतात किंवा जास्त काळ टिकणारी पण असू शकतात. पण त्या त्या वेळी ती रूपं तिथल्या गरजांमधून जितकी येतात, तितकीच नवतेच्या, आधुनिकतेच्या कल्पना अंगिकारण्याच्या प्रेरणेतूनदेखील येतात. बांधकामाचं आधुनिक साहित्य आणि पारंपरिक रचना असं स्वरूप बऱ्याचदा पाहायला मिळतं किंवा पारंपरिक विटा, माती वापरून आधुनिक प्रकारच्या इमारतींच्या रचना उभारल्या जातात. यातूनच बंगाली पद्धतीच्या घरांच्या रचनांवरून ब्रिटीश काळात दुमजली बंगल्याची रचना आकाराला आली. स्थानिक रचनाकार, मेस्त्री यांनी वापरलेली तंत्रं, आधुनिक इंजिनिअर्सनी केलेले बदल आणि त्या त्या ठिकाणी उपलब्ध असलेलं बांधकाम साहित्य यातून या रचना घडत गेल्या आणि पसरत गेल्या. मुंबईच्या संदर्भात बघायचं झालं तर मुर्झबान सारख्या पीडब्ल्यूडीमध्ये काम करणाऱ्या इंजिनिअरनं शहराच्या नियोजनात मोलाची भूमिका निभावली. एकीकडे, भारतीय आणि युरोपियन वास्तुरचनाकार आणि इंजिनिअर्सच्या सहयोगातून तिथली शिल्परचना, इमारती आणि सार्वजनिक अवकाशाची निर्मिती झाली. दुसरीकडे, बांधकामात मुख्यतः स्थानिक कारागीरांचा सहभाग असल्यामुळं त्यांनी वेळोवेळी त्यात बदलही केले. या सगळ्यामुळे लोखंडी तुळईसारख्या गोष्टी ब्रिटीशांकडून आल्या असल्यातरी इथल्या मध्ययुगीन इमारतींच्या रचनातून घुमटाचा घाट या इमारतीच्या रचनेत वापरला गेला.

ही सांस्कृतिक देवाणघेवाण, रूपांच्या सरमिसळीतून नवी रूपं आकाराला येण्याची प्रक्रिया त्या त्या कालखंडाचं प्रतिनिधित्वही करताना दिसते. समकालीन कला समजून घेताना या प्रक्रियेनं नवीन वळण घेतलेलं दिसतं. समकालीन कलेत कलाकारांचे सांस्कृतिक संदर्भ तर उमटतातच पण त्यातून माध्यमांचा विचार केला जातो. कलेच्या इतिहासाकडे दृष्टीक्षेप टाकताना ही रूपं कशी अस्तित्वात आली, कशी घडत गेली, त्यांच्या जडणघडणीचा इतिहास काय आहे ते पाहाणं महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे या रूपांचे, माध्यमांचे नव्याने अन्वयार्थ लावणं हा समकालीन कलेचा महत्त्वाचा भाग आहे. अर्थातच, समकालीन कलेच्या व्याख्येत एक गोष्ट प्रामुख्याने विचारात घेतली जाते ती म्हणजे ही कलारूपं याच प्रकारच्या सरमिसळीतून उभी राहातात. सोशल मिडियामुळे, इंटरनेटमुळे वाढलेल्या संवादक्षेत्रातून याला नवा आकार मिळत जातोय. त्या त्या क्षेत्रांच्या विद्याशाखीय सीमा आणि परिकल्पना गळून पडतात, बदलत जातात. नव माध्यमं असतील किंवा परफॉर्मन्स आर्ट किंवा इन्स्टलेशन. या प्रकारांमध्ये अवकाश, कलाकार, शिल्प, वास्तु, चित्र, विडिओ अशी अनेक माध्यमांची सरमिसळ होत जातेय. यातून व्यामिश्र अशी चिन्ह व्यवस्था तयार होत जातेय. या कलाकृतींचे घाट, माध्यमं, साहित्य आणि प्रतिमांमधली चिन्हं ही अतिशय निरनिराळ्या भवतालातून, सामाजिक-सांस्कृतिक संदर्भातून एकत्र येतात.

कलाकारांच्या आणि लेखकांच्या याच ‘रूप-खेळा’चा आविष्कार ‘हाकारा’च्या सहाव्या आवृत्तीत मांडला आहे. परफॉर्मन्स, टेलिविजन आणि सिनेमातले तुकडे, डिजिटल मिडिया, संगीतातले प्रयोग यांच्या सरमिसळीतून डॅनियल झोर्बासची ‘अॅंट इन द लेग्ज’ ही पीएचडीसाठीची फिल्म तयार झाली आहे. बाजारीपणा आणि उपभोगवादी जगणं, सोशल मिडियातून सतत येऊन धडकणारे मीम आणि सेल्फी, जाहिरातींपासून पाककलांच्या टीव्ही शो सारख्या दृश्यमाध्यमातल्या कृती आणि या सगळ्यात माईंडफुलनेस सारख्या गोष्टींची वाढती लोकप्रियता यातून तयार होणाऱ्या प्रतिमांचं उपहासात्मक चित्रण ही फिल्म आपल्या समोर आणते. आपल्या जगण्यातला, मनातला, विचारातला गोंधळ हा मिश्रणातून मांडायचा प्रयत्न करताना त्यातली अॅब्सर्डिटी मात्र आपल्याला चक्रावून टाकते.

सचिन बोंडे यांच्या ‘द ब्लॅक मेटॅफर’ या मालिकेत विविध मिथकांमधून येणारी प्राण्यांची वर्णनं यांचा आजच्या काळातल्या राजकीय-आर्थिक परिस्थितीवर भाष्य करताना ते वापर करतात. जागतिक पातळीवरचं तेलाचं राजकारण या मुद्द्याभोवती त्यांची निर्मितीप्रक्रिया फिरत राहाते. हे करताना देशांचे झेंडे आणि तेलाचं नरसाळं यासारखे घाट त्यांच्या कलाकृतींचा अविभाज्य भाग बनतात. ते कधी एचिंगच्या माध्यामातून येतात तर कधी प्रत्यक्ष वस्तूरूपात दाखवले जातात. ‘इन अ ब्रॉड डेलाईट’ ही ओहिदा खंडकार यांची चित्रमालिका त्यांच्या स्वतःच्या अनुभवांचं कथन म्हणून उभी राहाते; बंगालमधल्या ग्रामीण भागातलं जगणं, तिथलं मुस्लिम स्त्री म्हणून मोठी होताना अालेले अनुभव या चित्रात उमटतं. मध्ययुगीन लघुचित्रांपासून इमारती, अरबी कॅलिग्राफी आणि अलीकडच्या काळातील पोस्टर्स, कॅलेंडर्सवरच्या राजस्थानी स्त्री प्रतिमा यांच्या मिश्रणातून ओहिदाची चित्रभाषा तयार होताना दिसते आहे. पर्शियन लघुचित्रांच्या माध्यमातून ती बुरख्याची प्रतिमा तिच्या सांस्कृतिक जाणिवांचं रूपक म्हणून ती वापरते, पण हे करताना त्यातल्या शोषणाच्या, हिंसेच्या आणि पुरूषी वर्चस्वाच्या अनुभवांना ओहिदा थेट भिडते.

प्रभाकर पाचपुते यांची कोळशाने भिंतीवर काढलेली रेखाचित्रं शेतजमिनीचं रूपांतर कोळशाच्या खाणीत किंवा मोठाल्या कारखान्यात होताना, तसंच, या बंद पडलेल्या खाण-जमिनीतून म्युजियम किंवा स्टेडियमसारख्या नव्या रचना उभारणीच्या शक्यता दाखवतात कोळशासारखं अपारंपरिक माध्यम वापरून प्रभाकर या चित्रांचा पट स्टॉप-मोशन अॅनिमेशन सारख्या नवमाध्यमातूनही आपल्यासमोर उलगडून दाखवतो. त्यातून येणाऱ्या सर्रिअल प्रतिमा, अवजारं, जनावरं आणि माणसं यातून तयार होणाऱ्या हायब्रिड प्रतिमा जागतिकीकरणानंतरची विखंडितता तर दाखवतातच पण शोषणाला सामोरं जातानाच्या प्रतिकाराची रूपंही आपल्यासमोर आणतात. दुसऱ्या बाजूला, अंशुमान चक्रवर्ती यांची ‘इस्माईल’ ही फिल्म नव्वदी नंतरचे कलकत्ता शहरातले बदल टिपताना स्थलांतराची, बदलत्या भवतालाची, कामगार वर्गातल्या माणसाच्या होणाऱ्या ससेहोलपटीची कथा सांगतात. हे करताना अंशुमान हातानी काढलेली चित्रं, रेखाचित्रं आणि सिनेमा या माध्यमांची सांगड घालतात.

शहर रचनांच्या किंवा संस्कृतीच्या पातळीवर असो वा दृश्यकलारूपांच्या असो किंवा भाषांतरप्रक्रियेच्या, हा रूप-खेळ ‘हाकारा’च्या पटलावर उभा करताना आम्हाला आनंद होत आहे. भवतालातून येणारे अनुभव, राजकीय – आर्थिक रचना, सांस्कृतिक व्यवहार यांच्या परस्परसंबंधातून कलेची रूपं कशी आपल्यासमोर येतात आणि त्यातला आशय हाही ही रूपं साकारण्यात काय भूमिका निभावत असतो, हे यात आपण पाहाणार आहोत. या रूपांचा आविष्कार हा कलाकाराच्या मनातून, विचारातून, कौशल्यातून होत असतोच, पण त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीतून, तिथल्या अविरत पण कळत नकळत चालणाऱ्या देवाणघेवाणीतूनही होत असतो. आशय, संदर्भ आणि सांस्कृतिक व्यवहार यातून तयारी होणारी ही रूपं यांना कलाकृतीची एकूण मांडणीचा भाग त्याकडे पाहाता येतं किंवा एखाद्या कलाकृतीतल्या आकार-उकारांना सुटंसुटं ‘रूप’ म्हणून पाहाता येतं. याबरोबरच, नव्या आकृती, आकार आणि घाट यांच्या समावेशातूनही ही नवी रूपं घडत जातात. हे घाट केवळ आजूबाजूच्या परिस्थितीला दिलेल्या प्रतिसादातून तयार होतात असं नाही तर आधी अस्तित्वात असलेल्या कलारूपांना नाकारत किंवा पुढे नेत ते घडत जातात. ही घडण्याची प्रक्रिया अविरत चालू राहाते.

संदर्भ:

हॅन्स बेल्टिंग, फ्लॉरेन्स अॅंड बगदाद: रनेसॉं आर्ट अॅंड अरब सायन्स, हार्वर्ड युनिवर्सिटी प्रेस, २०११

प्रीती चोप्रा, अ जॉईंट एंटरप्राइज, युनिवर्सिटी ऑफ मिनेसोटा प्रेस, २०११

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *