हिमांशू भूषण स्मार्त

गतकाळाचं तरल..

back

गतकाळ विरघळून एक तरल बनलंय. या तरलानं पावलं ओलावली, या तरलात कंठापर्यंत चालत जाऊन ते चेहर्‍यावर माखलं चहूबाजूंनी, तरी त्वचा कोरडी राहते. हे तरल अनाग्रही आहे. ते फक्त आहे. त्यात उतरताना आपण प्रक्षुब्ध असतो, व्याकुळ असतो, अधाशी असतो किंवा करुणेनं पाझरत असतो खडकासारखे. तरल मात्र अनाग्राही. ते तरल बनलं कारण सुदूर वर्तमानात होते तसे त्याच्या सामुग्रीला काटेकोर आकार राहीले नाहीत. वस्तू, माणसं, ऐवज वेगवेगळे आणि यांना भिन्नता देणारं, सुटं-सुटं ठेवणारं वर्तमान सरलं आणि त्या सगळ्याचं एकजीव सत्त्व झालं, त्याचं हे तरल. भवतालातल्या सगळ्या सामुग्रीच्या संबंधांचा रस वाहायचा, त्यानं सत्त्वाला द्रवरुप दिलं.  या तरलाच्या टोकावर आपण असतो आणि मागे त्याचा प्रदीर्घ प्रवाह. आपण थबकलो की तो आपल्याला वेढून घेतो, आपण चालायला लागलो की पुन्हा वाहायला लागतो. टोकाला आपण. आपण जी वस्त्र घातलेली असतात अंगावर, ती नाममात्र. उपरी. खरी वस्त्र असतात गतकाळाच्या तरलाची, त्या वस्त्रांवरून लाटा उठतायत.. ‘पासी त्वचेचिया पदराआड’ रक्त वाहतयं. मध्ये फक्त त्वचा आहे आणि तिच्या आतबाहेर दोन तरलं.

गतकाळाच्या तरलाला आपली पाठ का पण सारखी? का सारखा त्याचा अव्हेर केल्यासारखं ताठ, पुढं जात राहणं? का त्याची वस्त्रं उतरवून नवी वस्त्र चढवण्याची धडपड? ही भीती, आत्मवंचना का पलायन?  तरलात सहसा स्पष्ट दिसत नाही काही, सगळ्यांचं स्थायुत्व विरघळलेलं. पण कधीतरी पुसटसं दिसतं काहीतरी, जे पूर्ण विरघळलं नाही. किंवा एकदा विरघळलं आणि पार तरलाच्या तळातल्या पापुद्रयात विरून गेलं. तिथं हळूहळू पुन्हा आकारलं. आणि वरच्या थरावर दिसायला लागलं.

दोन डोळे दिसतात कधीकधी, बाकी शरीर विरघळून गेलंय. त्या  डोळ्यांमधल्या आर्जवाचा धाक वाटतो विलक्षण. धाक आणि आर्जव एकाच वेळी टाळणं शक्य आहे काय? तरलाला पाठ करून बेदरकार चालत राहणं शक्य आहे काय? ते डोळे मागून वहात येतायत. गतकाळाच्या तरलासारखेच ते अनाग्राही नाहीत, म्हणजे त्यांचं वाहत येणं अनाग्राही पण त्यांच्या आत, गाभ्यात आर्जव आणि धाक. हे सगळं असह्य होईल एका क्षणी आणि आपण तरलाचा सगळा लोंढा अंगावर घेऊन उभे असू. तरलाचा लोंढा आपल्याला वेढून उभा आणि आपण त्याला सामोरे. पायाखाली जमीन नाही आणि जिकडं पहावं तिकडं त्या तरलाचा डोह आहे. क्षितीज नाही पण अथांग पसरलेलं तरल. आपली फक्त मान वर आहे. काही अंतरांवर ते डोळे. ते अंगावर वहात आले नाहीत. त्यांनी अंतर राखलंय नीट. ज्या अंतरातून नीट जोखता येईल असं अंतर. आणि ते बघतायत एकटक. आपण संमोहित झाल्यासारखे त्यांच्यात बघतोय. दुसरं काही शिल्लकंच नाही बघण्यासारखं. आर्जव इतकं धारदार कसं असू शकतं? ते तर पाण्यासारखं असायला हवं ना? पण नाई, ते धारदार आहे विलक्षण. ते धारदार आहे पण निश्चल उभाय. काहीही चिरत जाण्याची इच्छा नसल्यासारखं. हे जास्तच भीषण आहे. अशानं हे डोळे आपला जन्मभर पाठलाग करतील. आपण वळलो की आपल्यापासून अंतर राखून; आर्जवाची धार तळपत उभे राहतील. म्हणून आता ढळायचं नाही. आता हे तडीला न्यायचं. सोक्षमोक्ष लावायचा. बघत रहायचं त्या डोळ्यांमधे.

“वीस वर्षं झाली की, आपण नीट भेटलो त्याला.”

म्हणजे आवाजही होता डोळ्यांसोबत. काहीसा घाईनं बोलणारा. बोलणं संपवून टाकल्यासारखा. डोळ्यातल्या आर्जवाला न शोभणारा. वीस वर्षांपूर्वी कुणाकुणाला नीट भेटलो आपण? आणि मग नंतर अजिबातच भेटलो नाही. किंवा भेटलो, पण ते नीट भेटणं नव्हतं.

“मला माहितीये, माझ्या डोळ्यांचा जाच टाळण्यासाठी मागे वळलास तू. तुझं सगळं थांबवून. आणि मुद्दाम नुस्त्या डोळ्यांनी पाठीमागं येत राहिले तुझ्या. एरवी इतकं खोल कशाला बघत राहिला असतास?”

पुन्हा तसंच बोलणं, संपवून टाकल्यासारखं. कुणाचेयत हे डोळे? या डोळ्यांमागचं शरीर कोणाचं असेल? आणि हा आवाज? डोळ्यातलं आर्जव किंचित झिरपून आवाजा हलकासा ओलाववलाय. पण अगदीच अस्फुट. बाकी नुस्ती घाई. एका अक्षरावरून दुसर्‍यावर घसरत जायचं. असं अख्खं आयुष्य काढायचं?

“नुस्ते डोळे कसे टिकले, बाकी सगळं विरूघळून? हाच प्रश्न पडलाय न तुला? आपलं भेटायचं बंद झाल्यावर मला नेहमी वाटायचं, तुझा पाठलाग करायला माझे डोळे टिकावेत फक्त. बाकी कशाचा उपयोग नाही.  बाकी सगळं कृश, सपाट, काटकुळं, काटक्यांनी तयार केल्यासारखं. आवाज हा असा, बोलणं निसरडं. डोळे तेवढे खरे, जिवंत. चेहरा सुधा खडबडीत, अरुंद, ओबडधोबड. तुला सगळं दिसायचं त्यावेळी..सगळ्याचा राग करायचास तू..तू फक्त डोळ्यांकडं नीट बघितलं नाहीस. बाकी सगळं दिसलं तुला. किरटं नाक, राठ भुवया..”

असं वाटलं की तरलाला उकळ्या फुटतायत. आवाज फुटलेले डोळे इतकं भीषण विरूप उभा करतायत, त्यांच्या मागच्या शरीराचं की त्या विरूपाच्या झळांनी तरल तापतंय. पण आवाज स्थिर आहे. विरूपाचं इतकं प्रछन्न वर्णन करताना तो विचलीत झालेला नाही. संताप नाई, त्रागा नाई. डोळ्यांमधलं आर्जवही ढळलेलं नाई. आणि असं गतकाळातनं वहात येऊन, तरलाच्या सत्त्वानं डोळे घडवून इतका विरूपाचा मारा कशासाठी? विरूपाचा राग करणं काही गुन्हा नाई. इतक्या विरूपात डोळे दुर्लक्षित होणं काही गुन्हा नाई. लखलखीत रूपांच्या आभेत दिपून गेल्यावर विरूपाला दूर सारणं घडणारंच की. रूपा-विरूपाच्या भेदातली वैय्यर्थता उमगूनसुद्धा आजही अनेकदा रूपाची आभा ओढून घेते..ते तर अजाणतं वय. आत्मसमर्थनाची अशी कारंजी फुटायला लागतात आतल्या आत..

अचानक तरल सरतं..सगळंच्या सगळं. कुठल्या कुठं वाहून जातं. मी दगडी जिन्याच्या खालच्या पायरीवर उभाय. उजव्या हाताला मोठा कोनाडा आहे. पांढर्‍या मातीचा गिलावा आहे भिंतीला आणि त्याच्यावर पांढर्‍या खडूनं लांब रेघोट्या ओढल्यात. खालच्या पायरीवरनं जिना चढायला सुरूवात केली की खडू भिंतीवर टेकवायचा तो वरच्या पायरीवर पोहचेपर्यंत काढायचा नाही. वरच्या दिशेनं जाणारी सरळ रेघ उठायची. पाचसहा मुला-मुलींच्या रेघा, एकमेकांत गुंतलेल्या. पुन्हापुन्हा ओढलेल्या. कोनाड्यात गणपती बसवला होता तेंव्हाची आराशीतली, क्रेपच्या कागदाची एक फीत राहून गेलीये. ती लोंबतीये. अगदीच वरच्या पायरीवर ते डोळे उभेयत आणि आता त्यांच्याबरोबरचं सगळं शरीर, ते डोळे धारण करणारं. गुडघ्यांपर्यंत; फिकट करड्या रंगाचा फ्रॉक, कसल्याशा फुलांची नक्षी फ्रॉकभर. दंडा-खांद्यावर बाह्यांचे फुगे. वेळ कुठलीये कुणास ठाऊक? पण जिना संपतो तिथला दरवाज्यातनं कॉफीचा वास येतोय आणि चपात्या भाजल्याचा.

आता सगळं कळलंय. डोळ्यांमागचं माणूस. जागा. काळ. आपल्या आयुष्यातल्या कुठल्या तुकड्यावर उभाय आपण आत्ता..सगळंच. आपल्या मागून वहात येणारे नुस्तेच डोळे, त्या डोळ्यातलं धारदार आर्जव, त्या आर्जवातला धाक, डोळ्यांमागच्या आवाजानं उभारलेलं; अंगावर काटा आणणारं विरूप या सगळ्यांच्या लोंढ्यातून आलो आपण…पण आता हा हलकासा; चिमणीच्या पिसासारखा दिलासा जाणवतोय तो कशाचा? चेहरा पण पार निवळला असणार आपला. कशाला सामोरं जायचंय हे माहीत नसूनही आपण इतके निश्चिंत कसे? आता नेहमीप्रमाणे जिना चढून जायचं, डावीकडच्या दारातनं घरात शिरायचं नाई. थेट समोरच्या चौकटीतनं पत्र्यावर जायचं आणि पत्र्याच्या भिंतीकडच्या टोकाला बसायचं. पत्र्यावर पाय सोडून. मागं सिमेंटचा कट्टा. जाडसर गिलाव्याचा. कट्‌ट्यावर, पत्र्याच्या डब्यातली आणि मातीच्या अर्धवट फुटक्या कुंड्यामधली झाडं. सदाफुली, कोरफड, अननसाचा गड्डा. सदाफुलीच्या कुंडीतनं लोंबणारी दगडी पाल्याची; लांब देठाची फुलं. आजूबाजूला, आकार-उकार नसलेली घरं…लाकडी गजांच्या, दारं नसलेल्या खिडक्या. बंगळुरी खापर्‍यांची, पन्हाळी खापर्‍यांची छपरं, पत्रे. कट्‌ट्याला टेकून बसलं की दिसणारा भलाथोरला उंबर.

भरभर जिना चढला, फरशीवर रेलून बसून कट्‌ट्याला पाठ टेकली आणि पाय पत्र्यावर सताड सोडून दिले. शेजारी कुणीतरी येऊन बसतं. मांडी घालून. या फरशीवर शेवटचं बसून पंचवीस वर्षं तरी झाली असतील. जास्तच. पण तिच्या दर्जांच्या फटीही स्पष्ट आठवतायत. दर्जांच्या फटीत ओळीनं वाढलेलं पावसाळी गवत आठवतय..

 “मी सक्तीनं ओढून आणलं तुला आणि रमलासच की तू इथं..”

म्हणजे रमायचं नाहीये का? काळाचं इतकं अंतर तोडून मागं आल्यावर काय करायचं असतं? इतकं अंतर तोडल्यानं आपला आवाज फुटत नाहीये, तो आपल्या वर्तमानात राहून गेलाय. इथं त्याचा उपयोग नाही. इथं फक्त ऐकायचं काम करायला लागणार.

“तू बोल्लास तरी मला ऐकू येणार नाई. कारण आपण बोलू शकू असं काही राहीलं नाई आता. कधीतरी माझ्या मागून तू आलास किंवा तुझे डोळे तर तुला बोलता येईल मी ऐकीन फक्त. पण तू कशाला येशील माझ्या मागं..!”

 हा  त्रासचाय की. मनात काहीतरी उसळेल, तर्क लढवावे वाटतील, युक्तीवाद करावे वाटतील..त्याचं काय करायचं? हे दुपारी रणरणत्या उन्हात तापल्यानं; तिन्हीसांजेपर्यंत उष्ण राहणारे पत्रे. भरड गिलावे, ओबडधोबड घरं, खडबडीत पायर्‍या, करकरत वाजणारे दरवाजे, दगडी चौकटी यांनी अन्नात मिसळून मोठं केलं आपल्याला. भविष्याचा रस्ता तुडवताना हे पोषण इंधनासारखं मंद जळत आलं. त्यानंतर हजारो-लाखो पेशी मरून गेल्या असतील, नव्या जन्मल्या असतील, त्वचेचे शेकडो पापुद्रे निघून गेले असतील. पण त्या पोषणाचं इंधन संपून गेलं नाही, त्यात नव्याची भर पडली. नव्या इंधनामध्ये जोम होता, रेटा देण्याची शक्ती होती. पण या आदीम इंधनाचा र्‍हास झाला नाही. आजही; हजारो पावलातलं, त्याच्या जिवावर पडलेलं पाऊल कुठलं हे अचूक कळतं. सक्तीनं खेचून आणूनही आपण रमलो ते आपल्या पोषणाच्या गाभ्यात परत आल्यामुळं.

भरड गिलावा पाठीला टोचतोय आणि एक काळा टपोरा भुंगा कोरफडीच्या कुंडीतनं घोंघावतोय. भुंगा उडतोय, त्याच्या उड्डाण मार्गाचं एक जाळं बनतंय. गोला-लंबगोलांचं. आडवे गोल, उभे गोल. आणि भुंग्याच्या उडण्यातनं उठणार्‍या आवाजाच्या आकृत्या त्या जाळ्याच्या रेषांवरून उमटत जातायत. भरड गिलाव्याच्या बोचणीची जाग आहे आणि भुंग्याच्या आवाजातली गुंगी आहे.. एक गाणं त्यात मिसळतंय..

                केतकीच्या बनी तिथे, नाचला गं मोर
                गहिवरला मेघ नभी सोडला गं धीर

तोच आवाज डोळ्यांमागचा. गाणं म्हणताना तो जास्तच अप्रिय वाटतोय. मितिहीन, स्वरांचं भान नसणारा. मध्येच चिरकणारा, गाण्याची हौस करणारा. एक गाणं संपून दुसरं गाणं..

                मानसीचा चित्रकार तो
                तुझे निरंतर चित्र काढतो

 मग गाणी संपवून वसंत ऋतूवरची कविता. गाण्यासारखीच रसहीन. ओढून आणल्यासारखी.

हे नियोजनबद्धाय सगळं. आधी, भूतकाळाच्या तरलातनं वहात आलेले, आर्जवी धाक असणारे डोळे, मग  विरूपाचा मारा जोरदार, मग ते सगळं साक्षात करणं जे गमावून आपण हजारो मैल लांब आलो. मग रसहीन गाणी आणि नीरस कविता. यातली तेव्हाची घरं, भिंती, जिने, खिडक्या, तेव्हाचं आपलं वय आणि या सगळ्यांना गोळा करून बसलेला काळ..हे तेवढं रमवतंय आपल्याला. बाकी सगळं क्लेष द्यायला रचल्यासारखं. आणि नुस्तं क्लेष देणं नाही, क्लेष देतानाही अत्यंत शांत असणं. सुडाच्या लखलखत्या भावनेचा लवलेश नाही. गळ्यातनं बोलणं बाहेर पडू पाहतंय सारखं, धडका देतंय पण आवाज फुटत नाही.

“ही भेट फार लांबणार नाही, कारण भूतकाळ फार काळ असा उभा करता येत नाही आपल्याभोवती. तो विरघळायला लागतो. आणि आज पाठीमागं वळलायसच तू तर आज संपवून टाकूया सगळं एकदाचं. माझे डोळे; तुझ्या मागं वाहण्यातनं मुक्त होतील कायमचे.”

इतकी पिळदार असाह्यता आपण याआधी अनुभवली नाई कधी. ही असाह्यता आणि क्लेष सोडून बाकी सगळं किती सुंदर आहे. मनोहर. रम्य. मंडईतनं येणारा हलकासा गलका आहे. उंबरामागं अंबाबाईचं शिखर दिसतंय, त्याचा पितळी कळस चमकतोय. शाळेचं छप्पर दिसतंय. सिमेंटच्या कट्‌ट्यावर उभारलं तर उजव्या हाताला जोतिबा-पन्हाळ्याचे डोंगरही दिसतील. जिना उतरून, वाड्याचे पॅसेज ओलांडून, बाहेरच्या दगडी चौकटीत उभारलं तर आपलं घर दिसेल. उजव्या बाजूला आजीची खिडकी. मोहिटीवरचे गुलाब, कॅक्टस. घरासमोरचा रस्ता. आपला बोळ एकाबाजूनं रंकाळ्याच्या दिशेनं निघालाय, दुसर्‍या बाजूनं महाद्वार रोडला, मधनं एक फाटा फुटून मंडईला. बोळात, शाळेतनं परतणार्‍या पोरापोरींचे तुरळक घोळके. विद्यापीठ, प्रायव्हेट, पद्माराजे, इंदुमतीचे. सगळ्या युनिफॉर्मस्‌चे रंग मिसळून रंगांची सुरेख गर्दी झालीये.

“किती सुंदर होतं न आपल्या लहानपणातलं सगळं. आपला बोळ. आपल्या शाळा. आपले रिकामे रस्ते. आपली घरं. आपले दिवसंच छान होते. सगळेच्या सगळे.”

आता ही ’गेले ते दिन गेले’ गायला लागते की काय? कारण आपण एकत्र खूपदा ऐकलंय ते गाणं.  

“आपण आवडीनं ऐकायचो न रे ते गाणं, हृद्यनाथचं, ’गेले ते दिन गेले’..सगळे छान दिवस निघून जाणार असतात, म्हणून असली गाणी आवडतात आपल्याला. आतून नीट माहीत असतं सगळं.”

ती गात नाही पण गाण्याचा विषय निघतोच. आणि खरचाय की. छानंच होतं सगळं. संथ उलगडणारे दिवस. शांत रात्री. माणसांच्या तर्‍हा नीट बघता यायच्या, समजून घेता यायच्या. माणसं नुस्ती निघून चाल्लीयेत अंगावरनं, असं व्हायचं नाई. भोगा-उपभोगाचं रसायनसुद्धा इतकं जहाल नव्हतं आजच्यासारखं. काळ्याकुट्ट-तुकतुकीत फरशांची माया पसरलेली असायची घरभर आणि पाठीला घट्ट जाणवणार्‍या भिंती असायच्या.

“मला आठवतंय सगळं स्पष्ट. तुमचं परसू, तिथले दगडांचे गराडे, परसातली भिंत..दोन माणसं मावतील एवढी. भिंतीच्या खबदाडातले किडके साप आणि फुगर्‍या शेपट्यांची मुंगसं. हे सगळं भवती मांडून खेळ चाल्लेले आपले. आपण कितीतरी वर्षं एकत्र वाढलो. शरीरा-मनाच्या सगळ्या उलथापालथी एकत्र घडल्या. वयानं बदलायचं ते सगळं बदललं माझ्या शरीरातलं, मनातलं. तुझ्याविषयीची ओढ बदलली. शरीर मात्र सदैव कृश राहीलं. किडकिडीत. निरोगी पण निःसत्त्व वाटणारं. कुरूप. तुझं सुद्धा फार वेगळं नव्हतं. पण माझ्यापेक्षा कितीतरी चांगलं. आणि शेवटी पुरूष तू. सुंदर-कुरूपाच्या निर्णयाचा अधिकार तुझ्या हातात. तुला कुरूप दूर सारावंसं वाटेल पण कुरूपाचा द्वेष करण्याइतका तू खुजा नाहीस, असं वाटायचं मला नेहमी. तू कुरूपापास्नं अंतर राखशील पण इतका पराकोटीचा द्वेष करणार नाहीस असं वाटायचं. पण हे वाटत असतानाच तुझ्या द्वेषाची मात्रा हळूहळू वाढताना बघत होते मी. द्वेष आणि द्वेषातनं उसळणारी तुच्छता. द्वेषाचा आणि तुच्छतेचा जोरदार मारा करायचास तू. एक सेकंदही ढळायचा नाहीस. हळूहळू आपल्या सगळ्या भेटी या मार्‍यानं भरून जायला लागल्या. एका बाजूला तू लिहायचास किती सुंदर. ठाव घेणारं. व्याकूळ करणारं. आणि दुसरीकडं किती आटोकाट द्वेष करायचास! पहिल्यांदा गांगरायला व्हायचं मला. त्रागा व्हायचा. रडायला यायचं. पण नंतरनंतर तुझ्या द्वेषाच्या वाढत्या प्रमाणात माझं स्वीकारणं वाढलं. स्वीकारणं आणि त्यागणं. द्वेषाचा मारा झेलायचा पण घट्ट उभं रहायचं. हळूहळू एकमेकांच्या दिनक्रमातनं नष्ट व्हायला लागलो आपण. आणि खरं सांगू तुझ्यापेक्षासुद्धा, तुझी आई मला दुरावली त्याचा जास्त त्रास व्हायचा मला. अजूनही होतो. तुझ्या द्वेषानं माझा भडका उडाला नाई, उलट माझी प्रतिकार शक्ती वाढली. माझ्या कुरूपतेवर मात करता आली मला तुझ्या द्वेषामुळं. तुझी तुच्छता जितकी जहरी झाली तितकं माझं स्वतःला आरशात बघणं लोभसवाणं झालं. पण काहीही झालं तरी मनाला खोडी असतातंच न रे. आपला द्वेष करणारी सगळीच माणसं काही झटकून नाई टाकता येत. आपण एकत्र वाढलोय म्हणून अजूनही आपली काही मुळं गुंतलीत एकमेकांत. कितीही ठरवलं तरी ती उखडून नाई काढता येणार. तुला, मला, कुणालाच. तुझ्यापासून स्वतंत्र झाले त्याला कितीतरी वर्षं झाली आता. पण आजही उत्सुकताय मला ती तू त्या द्वेषाचं आणि तुच्छतेचं काय केलयस? तुझ्या मागनं नुस्त्या डोळ्यांनी वहात येण्याचा खटाटोप त्यासाठी. एकदा याचा निकाल लागला की झालं. एक छोटासा काटा ठसठसतोय न तो सुद्धा निघेल मनातनं. मग एकमेकांच्या वर्तमानात आपण उपस्थित नसलो तरी काही बिघडणार नाई. सांग की, तू काय केलंस त्या द्वेषाचं-तुच्छतेचं?  आता जे बोलशील ते ऐकू येईल मला..बोल..”

दरदरून घाम आल्यासारखं झालंय आपल्याला. भय, व्याकुळता, आत्मपीडा, गतकाळातलं स्खलन आठवून हताश होणं..सगळ्यानं शरीर आणि मन भरून आलंय. आपण खरोखर काय केलं त्या द्वेषाचं आणि तुच्छतेचं? मगाशी वाटत होतं; बोलायची, स्वतःच्या समर्थनाची संधी मिळावी आणि आता काहीही सुचत नाहीये. आपण केलेला निकराचा द्वेष मात्र स्पष्ट आठवतोय. त्या द्वेषाच्या जहराचा तापही स्पष्ट जाणवतोय अंगावर. त्यावेळी या द्वेषाच्या अग्नीनं झळाळून गेल्यासारखं वाटायचं. एक काळंकभिन्न सुख हाताला लागल्यासारखं वाटायचं. ते सगळं साक्षात होतय आता आणि हळूहळू कंठातनं आवाज फुटतोय. आपला आवाज मात्र आजच्या वर्तमानातला..

“माझ्या द्वेषाचं-तुच्छतेचं देणं परत करायला आल्यासारखी आलीयेस तू आज. ते स्वीकारण्याइतपत शहाणपण आलंय मला आता. तितका मोठा झालोय मी. मला खरंच माहीत नाई मी तुझ्या द्वेषाचं आणि तुच्छतेचं काय केलं. तू लांब गेलीस, आपल्या घरांच्या दरवाजांच्या दिशा बदलल्या. आपण शरीरानं एकमेकांना दिसेनासे झालो, तशी सगळी अटीतटी ओसरलीच हळूहळू. आता वर्तमानात भेटलो तर कदाचित पापुद्रे झडल्यासारखे भेटू आपण. मी तुझ्या कुरूपतेचा द्वेष केला हे खरंचाय. ते नाकाराणार नाई मी. पण तितकंच नव्हतं त्यात. आपण अटळपणे एकत्र वाढलो, तू म्हणतीस तसं आपली मुळं गुंतून राहिलीत सदैव एकमेकांत, पण एक वेळ अशी आली की आपलं एकत्र वाढत राहणं औचित्त्यहीन झालं. अवकाशं विलगली. औचित्त्यहीन होऊनही एकत्र राहणं टळत नाही म्हणूनही त्रागा व्हायचा माझा. तू लावलेल्या झाडांवर-रोपट्यांवर प्रेम होतं माझं पण तुझं गाणं, हट्टानं सतार वाजवणं, कविता लिहिणं भीषण होतं. इतकं माझ्यासारखं होऊ बघणं त्रास द्यायचं मला, कीव यायची. आपल्या एकत्र असण्यातलं औचित्त्य संपलंय मग आपण एकसारखं कशाला असायला हवं? तुझी तू वेगळी वाढ, माझा मी वेगळा वाढीन..मुळं राहूदेत आपली गुंतलेली. आणि द्वेषा-तुच्छतेचं म्हणशील तर आज त्याचा पार निचरा झालाय. मी मुद्दामहून त्याचं काही केलं नाई..आपण लांब गेल्यानंतर काही काळानं त्या द्वेषाचा अपराधभाव मात्र यायचा उसळून..त्या द्वेषाचा डाग माझ्या भूतकाळावराय असं वाटायचं..अजूनही वाटतं. आता हे नीट कळ्ळंय की आपल्या द्वेषातून, तुच्छतेतून, मायेतून, रागातून, संतापातून, शरीराच्या संगातून, स्पर्शातून, प्रगाढ प्रेमातून, रूपाच्या अतीव आकर्षणातून, ओढीतून, गुंतण्यातून, अव्हेरातून..सगळ्या-सगळ्यातून अंशभर माणूस उरतंच. तिथं आपल्याला नाहीच पोहचता येत. तिथं आपण सगळेच निभ्रांत असतो. निर्विकल्प असतो. पण हे समजायला द्वेषही करायला लागतो आणि प्रेमही. द्वेष आणि प्रेम भोगावंही लागतं. त्याला तोंड द्यावं लागतं.” सगळं सांगून संपल्यासारखं शब्द थांबतात. आता संपणार हे सगळं. आपल्या अवतीभवती उभारलेलं सगळं विरून जाणार. त्याचं पुन्हा तरल होणार.

“संपलं माझं तुझ्या मागं वहात येण्याचं कारण. आता भेटलो तर वर्तमानात भेटू. त्या-त्या वेळचं शरीर-मन घेऊन.”

अचानक सगळं विरघळून जातं. पत्रा, सिमेंटचा कट्टा, घरं, औदुंबर, जिना, दरवाजे..पुन्हा चहूबाजूला तरल दाटतं गतकाळाचं. आता असं एकेक काहीतरी वर येत राहील आणि आपल्याला प्रश्न विचारत राहील. आपले कबुलीजबाब, एकेक करून गतकाळाच्या तरलातनं उद्भवतील आणि विरघळतील. माणसं, वस्तू, झाडं, ठिकाणं, दिवसाचे प्रहर..या सगळ्यांचं जे जे करत आलो आजवर त्याचा नीट अर्थ लावून दाखवायला लागेल. ही यात्राच की एकप्रकारची. दिनक्रम थांबवून केलेली. कष्टप्रद.

पुन्हा चालायला सुरूवात केल्यावर गतकाळाचं तरल मागून यायला लागतं. त्याचा उगम खूप मागं आहे. खूप मागं. आता त्याच्या अग्रावर चालताना अंगावरचा एक थर झडून गेल्यासारखं वाटतंय. एक पवित्रा गळून गेला. एक माणूस कोंडून ठेवलवतं ते मोकळं झालं. त्यानं आपलंही शरीर सैलावलं थोडं, मन सैलावलं. अजून कितीतरी पवित्रे ताठ उभेयत. अजून कितीतरी थर आहेत. आणि प्रत्येक वर्तमानाचा झपाट्यानं गतकाळ बनतोय. त्या गतकाळाचं तरल बनतंय.

छायाचित्र सौजन्य: परमीत कोहली. (CC: https://hiveminer.com/Tags/wada%2Cwindow)

हिमांशू भूषण स्मार्त मराठी नाटककार असून कविता, ललित गद्य आणि संशोधनात्मक लेखन करतात. ते ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ येथे अभ्यागत अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहेत.

 

3 comments on “गतकाळाचं तरल..: हिमांशू भूषण स्मार्त

  1. Vishal Pralhad Gaikwad

    About subscribe

    Reply
    • adminhakara

      We will add your email id to our mailing list. Thanks.

      Hakara Team.

      Reply
  2. Avantika kavathekar

    I would like to receive updates of new write ups on Hakara

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *