डॉ. दीपक बोरगावे

पाचोळयाचा गाभारा आणि इतर कविता

back

भाषांतरातील अन्वय

तुम्ही,

पानांबद्दल बोलता नेहमी

भाषांतरांच्या;

इथे मात्र,

शब्दांशी हुज्जत घालत,

झुंजत प्राणांशी,

उमटावी लागते रक्ताची एक ओळ;

युध्द कराया इथे ना सैन्य

ना सेनापती,

तरीही होतेच युध्द

झटत अवरोहाशी

नि आरोहनाशी;

असुरांच्या प्रदेशात भ्रमंती,

खाचखळग्यांच्या काठांवर वस्ती;

खूपदा,

असंगांशी संग करत,

चादर, रग इंम्पोर्ट करून,

डोळयांवर पांघरावे लागतात अज्ञाताचे मेघ,

वाक्यांअगोदरच्या अर्धविरामांशी;

पूर्णविरामाशेजारी असतो विषुववृत्तावरचा

एक मिथक सैनिक,

तो हसतो विक्राळ,

पिशाच्च्यांशी हस्तांदोलन करत;

खांद्यावरचे हलते बूड,

पानांची सळसळ,

हजारो किडयांच्या हालचाली,

चंद्राची सावली फिकट;

सूर्य पोचत नाही,

दोन शब्दांच्या मध्ये असण्यार्‍या घनदाट अदमासात;

हत्यारे विचित्र चिन्हांकित

आकलनाच्या भिंतीपलिकडच्या;

तुम्ही करता हिशोब संख्यांचा,

खेळांचा,

वाचकांच्या पिंगळा वेळांचा;

पण इथे मात्र,

जमतात लढाया

भाषांतरातीत अन्वयांच्या !

***

 

भाषेचे अंतर

शब्द व्हावेत आरसा

स्वच्छ दिसावेत पारदर्शी

माशांच्या पाण्यात खोदावे त्यांनी

तळ आकाशाचा

आरपार

बोगदा नाकारून

चढावा चढ उतरणीवरचा

खोल दरीत

फुटावे आरसे

त्यात न्याहाळावे आपण

भाषेचे अंतर !

***

 

कडुलिंब

खूप विधी असतात

लेको,

शब्दांपर्यंत पोचण्याचे;

अभिषेक असतो अनुभवांचा;

पोराच्या ओरडण्यातील

आकलनाच्या पलिकडची,

एक किंकाळी असते,

खोल पोचलेली,

रक्तपेशींच्या कपाळावर;

तुम्ही काठांवर बसून

डराव डराव करता,

तेव्हा कोंबडा अंडी घालतो,

नि कोंबडी ऐटीत तुरा हलवते;

तळयाच्या बाहेर असतो

एक मोठ्ठा अजगर,

त्याच्या तोंडात शिरून

त्यांने गिळलेल्या

आतील हजारो प्राण्यांशी

संवाद करावा लागतो, गडया

तेव्हा कुठे

शब्दांना अंकुर फुटतो !

बाबुरावला,

लिहता येत नाही

पण त्याचे

निःशब्द विधी;

पेटवतात चूल ढणाणा,

शेतातल्या कडुलिंबाची !

***

 

पाचोळयाचा गाभारा

शब्दांना वरवंट्याखाली घालून

चांगले रगडून घेतले त्यांने

नंतऱ

शब्दांच्या अर्थांना

त्याने दोरीवर तिथेच वाळत टाकले

खिशातली आगपेटी काढली़

पण

नाही़ नको

तो म्हणाला,

अर्थात स्वतःलाच

ओलेच होते शब्द अजून

चाचपून पाहिले त्याने

म्हणून अंमळ

जंगलात खोल पहात राहिला तो

त्याला जायचं होतं जंगलात

पाचोळ्याचा गाभारा शोधाया़

तराजूतले जंतू बघाया़

डोळयाच्या पट्टयांआड उगवणार्‍या

बुब्बुळातील निष्पर्ण झाडांची मशागत करायला

अजूनही तिथंच आहे तो

आगपेटी थंड

फॉस्फरसचे बंड

शब्द ओले

सूर्यप्रकाशही ओला

वरवंट्याखाली !

***

 

तुम्ही

कविता लिहिण्याचे

मांसल परीघ

कधीच संपून

हाडांचा पोकळ प्रवास

भयाण दिव्यांच्या अंधारातून;

तुम्ही,

नात्यांची मरगळ ओघळ,

रात्री श्वासांचे दरवाजे अर्धवट,

डोळयांत चघळत

शेतातील कोरडया पाटानंतर;

तुम्ही,

प्रदीर्घ अर्धशिशींचे उंट,

आजारी

प्रत्येक वाळवंटानंतर;

तुम्ही,

एक,

दोन,

तीन

अशा अनेक क्षितिजांची

युध्दं जिंकून,

हरत हरत

उभे घरात दारात,

पुढच्या कडाडाच्या इंतजारानंतर;

तुम्ही,

पेलत राहता कसेतरी

दहा माकडांचे ओझे

सतरा जिने चढत प्रत्येक पराजयनंतर;

तुम्ही,

डोळयांत अंगार घेऊन

उजेडाकडे,

किंबहुना, अंधाराचे दरवाजे घट्ट

नादुरूस्त

हरेक जुनूंनंतर;

तुम्ही,

हरत नाही

तुम्ही मरत नाही

तुम्ही जगत नाही

उजेडाच्य  दऱ्या उगवल्यानंतर;

तुम्ही,

सातव्या मजल्यावरून

अजान देता

आठव्या आकाशाचा अदमास घेत

घळीघळीतून संपल्यानंतर;

तुम्ही

ट्रॅफिकच्या अरूंद बोळात

सिग्नलच्या लाल दिव्याखाली,

हिरव्या दिव्यानंतर;

तुम्ही,

शेतापासून दूर

धुरांच्या धुक्यात

सायनाईडच्या कृषी तज्ज्ञांनंतर;

तुम्ही,

सांगत राहता, सांंगायचे ते

संचिताची पोती ओतल्यानंतर;

तुम्ही,

जवळ असता

दूरचे दिवे पकडून

दोन दणकट जीव

बसमधून उतरल्यानंतर;

कविता लिहिण्याचे

मांसल परीघ

कधीच संपून

हाडांचा पोकळ प्रवास

भयाण दिव्यांच्या अंधारातून!

तू ,

बघत जा

थोडया काळजीपोटी तरी

नात्यांची मरगळ,

उंटांचे आजारपण,

क्षितिजांवरील युध्दं,

माकडांची हतबुध्दता,

दरवाजांची नादुरूस्ती,

सातव्याआठव्या मजल्यांवरील घळी,

ट्रॅफिकच्या दिव्यांची उघडझाप,

धुरांच्या धुक्यांचे तज्ज्ञ,

संचितांची पोती कोपऱ्यात लावलेली,

दोन दणकट जीव आहेत तोपर्यंत;

हाडांचा पोकळ प्रवास

सुखाचा नसला

तरी,

किमान,

दुःखाचा होऊ नये म्हणून.

 

***

 

प्रतिमा सौजन्य: ब्रुनो मुनारी

डॉ. दीपक बोरगावे: द्वैभाषिक कवी, लेख, समीक्षक आणि अनुवादक. त्यांच्या कविता, समीक्षात्मक लेख प्रसिद्ध झाले आहेत.

2 comments on “पाचोळयाचा गाभारा आणि इतर कविता: डॉ. दीपक बोरगावे

  1. शिवनाथ तक्ते

    लईच भारी लिव्हता तुम्ही! एकदम मस्त.

    Reply
  2. दयानंद कनकदंडे

    अप्रतिम ! बोरगावे सरांच्या कविता भूत-वर्तमान व भविष्याचा वेध घेणाऱ्या आहेत.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *