मूळ लेखिका: हार्पर ली

भाषांतर: आश्लेषा गोरे

टू किल अ मॉकिंग बर्डback

भाग ३

पुढला आठवडाभर जेम गप्पगप्प आणि तिरसटलेलाच होता. मागे एकदा अॅटीकसनं दिलेल्या सल्ल्याप्रमाणे मी जेमच्या अंगात शिरून इकडेतिकडे फिरून बघितलं: पहाटे दोन वाजता जर मी एकटीच रॅडलींच्या घरी गेले असते तर दुसऱ्या दिवशी माझ्या मयतीचे सोपस्कार करायची वेळ आली असती. मग मात्र मी जेमला एकटं सोडलं आणि शक्यतो त्याला त्रास होणार नाही असं पाहिलं.

शाळा सुरू झाली. दुसरी इयत्ता पहिलीइतकीच वाईट होती. उलट आणखीनच बेकार म्हणायला लागेल. अजूनही आमच्यासमोर कागदाचे तुकडे नाचवणं चालूच होतं. अजूनही आम्हाला लिहायला किंवा वाचायला देत नव्हते. पलिकडच्या वर्गातल्या मिस कॅरोलाईनची प्रगती तिकडून वारंवार ऐकू येणाऱ्या हशावरून करता येत होती. मात्र नेहमीची मंडळी पुन्हा एकदा पहिलीत नापास झाली होती. त्यामुळे शांतता राखायला त्यांची मदत होत होती. दुसरीतली एकच चांगली गोष्ट म्हणजे मी ही आता जेमच्याच वेळेला सुटणार होते. त्यामुळे तीन वाजता घरी जाताना आम्ही एकत्रच चालत जात असू.

एके दिवशी दुपारी घरी जात असताना आम्ही शाळेचं मैदान ओलांडलं. तेवढ्यात अचानक जेम म्हणाला, “मी तुला एक गोष्ट सांगितलीच नाहीये.”

गेल्या कित्येक दिवसात तो पहिल्यांदाच एक सबंध वाक्य बोलला होता. त्यामुळे मी त्याला मुळीच नाऊमेद केलं नाही: “कशाबद्दल?”

“त्या रात्रीबद्दल.”

“तू मला त्या रात्रीचं काहीच सांगितलं नाहीस.” मी म्हणाले.

माशी उडवल्यासारखं जेमनं माझं बोलणं उडवून लावलं. थोडावेळ शांत बसून तो म्हणाला, “मी पँट आणायला गेलो नं..खरं तर आधी मी ती काढून फेकून दिली होती , मला बाहेरच पडता येत नव्हतं तिच्यातून. तर तिचा पार बोळा झालेला. पण मी परत गेलो तेव्हा..” जेमनं एक खोल श्वास घेतला. “मी परत गेलो तेव्हा, कुंपणापलीकडे त्या पँटची घडी घालून ठेवलेली..म्हणजे मी येणार ते त्यांना माहीतच होतं.”

“पलीकडच्या बाजूला..?”

“आणि आणखी..” जेम स्पष्टच म्हणाला, “घरी गेल्यावर दाखवतो तुला. ती नं शिवलीये. म्हणजे एखाद्या बाईनं शिवलेली असते तशी नाही. मी शिवायला गेलो तर कसं होईल..तशी..नुस्ती वेडीवाकडी. म्हणजे..”

“..तू ती पँट आणायला परत येणार हे कोणालातरी माहीत होतं.”

जेम शहारला. “म्हणजे माझ्या मनात काय चाललंय ते कोणालातरी माहीत होतं..मी काय करणारे ते त्यांना समजत होतं. कोणी मला ओळखत असेल तरच मी काय करणारे ते त्याला कळेल नं स्काऊट?”

जेमनं अगदी काकुळतीला येऊन विचारलं. मी समजुतीच्या सुरात म्हटलं : “तू काय करशील ते आपल्या घरचे लोक सोडून कोणालाच सांगता येत नाही. कधीकधी तर मलाही सांगता येत नाही.”

आम्ही त्या झाडाशेजारून चाललो होतो. त्याच्या ढोलीत एक करड्या रंगाच्या सुतळीचा गुंडा होता.

“ते घेऊ नकोस जेम,” मी म्हणाले. “कोणाचीतरी वस्तू लपवून ठेवायची जागाय ती.”

“छ्या,”

“हो. वॉल्टर कनिंगहॅमसारखं कोणतरी रोज मधल्या सुट्टीत इथे येतं आणि त्याच्या वस्तू लपवतं. आपण मात्र इथे येऊन त्या घेऊन जातो. ऐक नं, आपण हे असंच ठेवून देऊया आणि काही दिवस थांबूया. तोवर ते गेलं नसेल तर मग आपण ते घेऊन जाऊ. चालेल?”

“चालेल. तुझं बरोबरच असेल एखादवेळेस,” जेम म्हणाला. “कोणत्या तरी बारक्या पोराची जागा असेल. मोठ्या माणसांपासून गोष्टी लपवून ठेवत असेल इथे. शाळेला सुट्टी नसते तेव्हाच आपल्याला इथे गोष्टी सापडल्यात नं?”

“हो,” मी म्हणाले, “पण उन्हाळ्यात तर आपण कधीच इथून जात नाही.”

आम्ही घरी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी ती गुंडाळी आम्ही ठेवली तिथेच होती. तिसऱ्या दिवशीही ती तिथेच होती म्हटल्यावर जेमनं ती खिशात टाकली. त्यानंतर त्या ढोलीत सापडलेली प्रत्येक गोष्ट आम्ही आमच्याच मालकीची समजायला लागलो.

दुसरी इयत्ता भारी कंटाळवाणी होती. पण जसजशी मोठी होशील तसतशी शाळा बरी वाटायला लागेल असं मला जेमनं सांगितलं. त्याचंही सुरुवातीला असंच झालं होतं म्हणे. सहावीत जाईपर्यंत कोणीच फार काही महत्त्वाचं शिकत नसतं असं त्याचं म्हणणं होतं. सहावीत मात्र सुरुवातीपासूनच त्याला आवडायला लागलं होतं: मधूनच काही दिवस तो पार इजिप्शियन काळात असल्यासारखा वागत होता. त्यानं मी चांगलीच बुचकळ्यात पडले होते. तो बऱ्याचदा अगदी ताठ चालायचा प्रयत्न करायचा. एक हात पुढे आणि एक हात मागे असा घट्ट धरायचा आणि एक पाऊल पुढे, दुसरं त्याच्या मागे असा चालायचा. इजिप्शियन लोक असेच चालायचे असं त्याचं म्हणणं होतं. आता हे लोक जर का असं चालत होते तर कामं कशी काय करत होते असं मी म्हटलं. पण जेम म्हणाला की, त्यांनी म्हणे अमेरिकन लोकांपेक्षा कितीतरी जास्त काम केलं होतं. त्यांनी टॉयलेट पेपरचा आणि मेलेल्या माणसांची शरीरं पेटीत जपून ठेवण्याचा शोध लावला होता. “इजिप्शियन नसते तर आपण आज कुठे असतो?” जेमनं मलाच विचारलं. अॅटीकस म्हणाला, “ती सगळी विशेषणं बाजूला कर म्हणजे खरं काय ते हाताला लागेल.”

दक्षिण अलाबामातले ऋतू तसे ठरलेले नसतात. उन्हाळा संपता संपता हेमंत ऋतूला सुरुवात होते. हेमंत संपला की कधीकधी थंडी येतच नाही. त्याऐवजी काही दिवस वसंत सुरू झाल्यासारखं वाटतं आणि पुन्हा उन्हाळाच सुरू होतो. त्यावर्षीचा पानगळीचा मोसम जेमतेम थंड असेल. एखादा पातळ गरम कपडा घालायला लागावा इतपतच. ऑक्टोबरमधल्या एका नरम दुपारी आम्ही आखून दिलेल्या भागात पाय ओढत फिरत होतो. तेवढ्यात आमच्या नेहमीच्या ढोलीकडे बघून आम्ही थांबलो. या वेळेस त्या ढोलीत पांढरं काहीतरी दिसत होतं.

जेमनं ती वस्तू बाहेर काढायचा मान उदार मनानं मला देऊ केला. ती साबणात कोरलेली दोन बारकी चित्रं होती. एक चित्रं होतं एका लहान मुलाचं. आणि दुसऱ्या चित्रातल्या मुलीला एक ओबडधोबड झगा घातलेला होता. करणी वगैरे सगळं झूठ आहे हे ध्यानात येईपर्यंत मी किंचाळून ती चित्रं खाली टाकून दिली होती.

जेमनं ती उचलली. “काय झालं काय तुला?” तो ओरडला. त्यानं ती चित्रं पुसून त्यावरची लाल माती काढून टाकली. “चांगलीयेत ही चित्रं,” तो म्हणाला. “इतकी छान चित्रं मी कधीच पाहिली नाहीत.”

त्यानं ती माझ्यासमोर धरली. ती चित्रं म्हणजे दोन लहान मुलांच्या हुबेहूब प्रतिमा होत्या. त्यातल्या मुलानं अर्धी विजार घातली होती. चप्प बसलेल्या केसांची बट पार भिवईपर्यंत आली होती. मी मान वर करून जेमकडे बघितलं. त्याच्या तपकिरी केसांची एक बट थेट खाली कपाळावर रुळत होती. याआधी माझ्या ते कधी लक्षातच आलं नव्हतं. जेमनं त्या मुलीच्या चित्राकडे पाहिलं. तिचे केस कपाळावर येतील असे कापलेले होते. माझे होते तसेच.

“ही आपलीच चित्रंयत.” तो म्हणाला.

“कोणी तयार केली असतील ही?”

“आता इथे आसपास असलं तासकाम करणारं कोण आहे ?”

“मिस्टर एव्हरी.”

“मिस्टर एव्हरी हेच तर करतात. म्हणजे तासकाम करतात.”

मिस्टर एव्हरी आठवड्याला एक सरपणाचं लाकूड आणून ते तासायचे आणि त्याची दातकोरणी तयार करायचे. मग ती दातकोरणी ते चावत बसायचे.

“त्या म्हाताऱ्या मिस स्टीफनी क्रॉफर्डचा तो मित्र नाही का.. तो असेल.” मी म्हणाले.

“तो तासकाम करतो खरा. पण तो पार तिकडे समुद्राकडे रहातो. तो कशाला आपल्याकडे लक्ष देईल?”

“एखादवेळेस व्हरांड्यात बसून मिस स्टीफनीकडे बघायच्या ऐवजी तो आपल्याचकडे बघत असेल. त्याच्याजागी मी असते तर मी तेच केलं असतं ब्वा !”

यावर जेम इतका वेळ माझ्याकडे एकटक बघत राहिला की मी “काय झालं?” असं विचारलंच. त्यावर मला “काही नाही,” इतकंच उत्तर मिळालं. घरी गेल्यावर जेमनं ती चित्रं ट्रंकेत ठेवून दिली.

दोन आठवड्यांच्या आतच आम्हाला च्युईंगमचं एक अख्खं पाकीट मिळालं. आम्ही त्यावर मस्तपैकी ताव मारला. रॅडलींच्या घरची प्रत्येक गोष्ट विषारी असते ही गोष्ट जेम एव्हाना विसरलेला दिसत होता.

पुढल्या आठवड्यात त्या ढोलीत एक रया गेलेलं पदक मिळालं. जेमनं ते अॅटीकसला दाखवलं. अॅटीकस म्हणाला की ते स्पेलिंगच्या स्पर्धेचं पदक आहे. आमच्या जन्माआधी मेकोम्बमधल्या शाळांमध्ये स्पेलिंगच्या स्पर्धा व्हायच्या आणि त्यात जिंकणाऱ्याला हे पदक द्यायचे. “कोणाचंतरी हरवलेलं दिसतंय. आजूबाजूला विचारलं का तुम्ही?” अॅटीकसनं विचारलं. आम्हाला ते सापडल्याचं मी सांगणार तेवढ्यात जेमनं मला जोरदार लाथ घातली. “ते बक्षीस कोणाला मिळालं होतं काही आठवतंय?” जेमनं अॅटीकसला विचारलं. अॅटीकस म्हणाला, “नाही.”

चार दिवसांनी आमचं सगळ्यात मोठ्ठं बक्षीस आलं. ते म्हणजे एक मोडलेलं पॉकेटवॉच होतं. त्याला एक साखळी होती आणि अॅल्युमिनियमचा चाकूही होता.

“जेम, हे सोन्याचंय?”

“काय माहीत. मी अॅटीकसला दाखवतो.”

अॅटीकसच्या म्हणण्याप्रमाणे ते निदान दहा डॉलरचं तरी होतं. चाकू, साखळी असं सगळं मिळून आणि तेही नवंकोरं असेल तर. “शाळेत कोणाशी अदलाबदली केलीत का तुम्ही?” त्यानं विचारलं.

“नाही नाही !” जेमनं त्याच्याकडचं जुनं घड्याळ बाहेर काढलं. तो चांगला वागला तर अॅटीकस त्याला आठवड्यातून एकदा ते वापरू देत असे. ज्या दिवशी घड्याळ जवळ असायचं त्यादिवशी जेम अगदी जपून वावरायचा. “अॅटीकस, तुला चालणार असेल तर मी हे घड्याळ ठेवून घेऊ? एखादवेळेस मला ते दुरुस्तही करता येईल.”

जेमकडच्या त्या आधीच्या घड्याळाचं नावीन्य आता ओसरलं होतं आणि ते घेऊन फिरणंही कटकटीचं व्हायला लागलं होतं. त्यामुळे मग दर पाच मिनिटांनी किती वाजले ते बघायची जेमला गरज वाटेनाशी झाली होती.

ढोलीत सापडलेलं घड्याळ दुरुस्त करायची जेमनं बरीच खटपट केली. फक्त एक स्प्रिंग आणि दोन लहानसे भाग त्याला बसवता आले नाहीत. घड्याळ काही चालेना. “छ्या..” त्यानं सुस्कारा सोडला. “हे काही चालत नाही.. स्काऊट..?”

“हं?”

“जो कोणी आपल्यासाठी हे सगळं ठेवतोय त्याला आपण पत्र लिहिलं पाहिजे, नाई?”

“किती छान. आपण त्यांचे आभार मानूयात. ..काय झालं?”

जेम स्वतःचेच कान धरून डोकं हलवत होता. “मला काही कळतच नाहीये. मुळीच कळत नाहीये. स्काऊट, का कोणास ठाऊक ..”त्यानं बाहेरच्या खोलीकडे नजर टाकली. “मला वाटतंय अॅटीकसला सांगून टाकावं..नाही, नको मला वाटतं..”

“मी सांगेन तुझ्याऐवजी.”

“नको, मुळीच नको. स्काऊट..ए स्काऊट?”

“काssय?”

संध्याकाळभर तो मला काहीतरी सांगायच्या बेतात होता. त्याचा चेहरा मधूनच उजळायचा आणि तो माझ्याकडे झुकायचा. मग परत त्याचं मन पालटायचं. तसं ते आत्ता पुन्हा पालटलं. “सोड, काही नाही.”

“हे घे. चल आपण पत्र लिहू.” मी कागद पेन्सिल त्याच्यासमोर सरकवली.

“ठीके. मिस्टर..”

“तुला काय माहीत तो पुरुष ए ते? मी सांगते मिस मॉडीच असणार. किती दिवस पैजेवर सांगतेय.”

“अं.. ..मिस मॉडीला च्युईंगम खाता येत नाही..” जेम गालातल्या गालात हसला. “कधीकधी नं ती खूप छान बोलते. एकदा मी तिला च्युईंगम हवाय का असं विचारलं तर ती नको म्हणाली. म्हणाली, च्युईंगम खाल्ला की तो टाळूला चिकटून रहातो आणि तिला बोलता येत नाही म्हणे,” जेम अगदी सावकाश म्हणाला. “काय छान वाटतं नं ऐकायला?”

“हं..ती कधीकधी छानच बोलते. तिच्याकडे काय असलं साखळीवालं घड्याळ नसणार म्हणा.”

“प्रिय काका,” जेम म्हणाला. “तुम्ही झाडात ठेवलेली ..नाही नाही..तुम्ही झाडात ठेवलेल्या सगळ्याच गोष्टी आम्हाला खूप आवडल्या. तुमचाच, जेरेमी अॅटीकस फिंच.”

“जेम, अशी सही केलीस तर तू कोणेस ते कळणारच नाही.”

जेमनं नाव खोडून लिहिलं, “जेम फिंच.” मीही त्याखाली सही केली, “जीन लुईस फिंच (स्काऊट).” जेमनं ती चिठ्ठी पाकिटात बंद केली.

दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत जाताना तो माझ्यापुढे धावत सुटला आणि त्या झाडाशी जाऊन थांबला. त्यानं मान वर करून माझ्याकडे पाहिलं तर त्याचा चेहेरा पांढराफटक पडला होता.

स्काऊट!”

मी त्याच्याकडे धावले.

कोणीतरी आमची ती ढोली सिमेंटनं भरून टाकली होती.

“रडू नको तू स्काऊट..रडू नको..काही काळजी करू नको..”शाळेत जाताना रस्ताभर तो पुटपुटत मला सांगत होता.

जेवायला घरी गेल्यावर जेमनं बकाबका खाल्लं आणि धावत व्हरांड्यात जाऊन तो पायऱ्यांवर उभा राहिला. मी मागोमाग गेले. “अजून आले नाहीत,” तो म्हणाला.

दुसऱ्या दिवशी जेमनं पुन्हा पाहणीचं काम चालू ठेवलं. त्याला त्याचं फळही मिळालं.

“नमस्ते, मिस्टर नॅथन.” तो म्हणाला.

“काय जेम, काय स्काऊट,” जाताजाता मिस्टर रॅडली म्हणाले.

“मिस्टर रॅडली,” जेम म्हणाला.

मिस्टर रॅडली वळले.

“मिस्टर रॅडली, अं.. ..तुमच्या इथल्या त्या झाडाच्या ढोलीत तुम्ही सिमेंट भरलंत?”

“हो,” ते म्हणाले. “मीच भरली ती ढोली.”

“का पण काका?”

“ते झाड मरायला टेकलंय. झाडं अशी आजारी झाली की त्यांच्यात सिमेंट भरतात. तुला हे माहीत पाहिजे की जेम.”

दुपारी उशीरापर्यंत जेम त्यावर काहीच बोलला नाही. पुन्हा त्या झाडाजवळून जाताना त्यानं विचाराच्या तंद्रीत त्या सिमेंटवर हलकेच थोपटलं. तो विचारात गढलेलाच राहिला. जरा चिडचिडलेलाच दिसत होता. तेव्हा मी त्याच्यापासून थोडी लांबच राहिले.

संध्याकाळी अॅटीकस कामावरून घरी येत असताना नेहमीप्रमाणे आम्ही त्याला भेटलो. घराच्या पायरीशी आल्यावर जेम म्हणाला, ” अॅटीकस, प्लीज तिकडे त्या झाडाकडे बघ नं.”

“कुठलं झाड बेटा?”

“शाळेतून येताना वाटेत रॅडलींच्या अंगणातलं ते झाड लागतं नं ते.”

“त्याचं काय?

“ते झाड मरायला टेकलंय?”

“काहीतरीच. नाही बेटा. मला नाही वाटत. त्याची पानं बघ. अगदी हिरवीगार आणि भरगच्च आहेत. कुठेही काही वाळकं दिसत नाही.. ”

“ते आजारी पण नाहीये?”

“जेम, ते झाड तुझ्याइतकंच ठणठणीत आहे. का रे?”

“मिस्टर नॅथन रॅडली म्हणाले की ते मरणारे म्हणून.”

“हंs असेलही मग. ती झाडं मिस्टर रॅडलींची आहेत. त्यांना आपल्यापेक्षा जास्तच माहिती असणार ना?”

आम्हाला व्हरांड्यात सोडून अॅटीकस आत गेला. जेम एका खांबाला टेकून खांदा घासत उभा राहिला. 

“खाजतंय का जेम?” मी जमेल तितक्या सुधेपणानं विचारलं. त्यानं काहीच उत्तर दिलं नाही. “जेम, चल नं आत.” मी म्हणाले. 

“थोड्या वेळानी येतो.”

अंधार पडेपर्यंत तो तिथेच थांबला. मीही त्याची वाट बघत तिथे थांबले. घरात गेल्यावर पाहिलं तर तो मला रडताना दिसला. त्याचा चेहरा बरोब्बर त्या-त्या ठिकाणी कळकटला होता. त्याच्या रडण्याचा आवाज मात्र ऐकू आला नाही याचं मला आश्चर्य वाटलं. 

त्या वर्षीच्या हेमंत ऋतूनंतर चक्क हिवाळा चालू झाला आणि मेकोम्बमधले भलेभले अनुभवी तज्ज्ञ बुचकळ्यात पडले. दोन आठवडे कडाक्याची थंडी पडली. अॅटीकसच्या म्हणण्यानुसार १८८५ नंतर पहिल्यांदाच इतकी कडक थंडी पडली होती. मिस्टर एव्हरी म्हणाले, “मुलांनी आईवडलांचं ऐकलं नाही, सिगरेटी फुंकल्या, एकमेकांशी मारामाऱ्या केल्या की ऋतू बदलतात.” आपल्यामुळे निसर्गात ढवळाढवळ झाली, शेजारचे नाराज झाले आणि आपल्यालाही त्रास झाला म्हणून मला आणि जेमला बरंच दडपण आलं.

त्या वर्षीच्या हिवाळ्यात म्हाताऱ्या मिसेस रॅडली वारल्या पण त्यानं विशेष काही खळबळ उडाली नाही. फुलझाडांना पाणी घालताना सोडून शेजारच्यांना त्या क्वचितच दिसायच्या. बूनं शेवटी त्यांना गाठलंच अशी जेमची आणि माझी खात्री पटली. पण अॅटीकसनं रॅडलींच्या घरून परत आल्यावर सांगितलं की त्यांना नैसर्गिक मरण आलं. आमचा जरा हिरमोडच झाला.

“विचार नं त्याला,” जेम कुजबुजला.

“तूच विचार. तू मोठायस.”

“म्हणून तर तू विचार.”

“अॅटीकस,” मी म्हणाले, “तू मिस्टर आर्थरना पाहिलंस?”

अॅटीकसनं हातातल्या वर्तमानपत्राआडून एक करडी नजर टाकली. “नाही.”

जेमनं मला आणखी प्रश्न विचारण्यापासून रोखलं. तो म्हणाला की, अॅटीकसला अजूनही आपल्या त्या रॅडली प्रकाराचा त्रास होतो. तेव्हा त्याला आणखी डिवचण्यात अर्थ नाही. जेमचा असा अंदाज होता की, मागच्या उन्हाळ्यातल्या आपल्या कारवाया फक्त पोकरपुरत्या नसणार असं अॅटीकसला संशय असावा. अर्थात, जेमला अशी शंका येण्यामागे कारण काहीच नव्हतं. ती अशीच एक अटकळ असल्याचं तो म्हणाला.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी खिडकीबाहेर पाह्यलं आणि भीतीनं जवळपास मेलेच. माझ्या किंकाळ्या ऐकून दाढी अर्धवट सोडून अॅटीकस तसाच धावत बाहेर आला.

“अॅटीकस, जगबुडी होतेय ! काहीतरी कर नं..!” मी ओढत त्याला खिडकीशी घेऊन गेले आणि बाहेर बोट दाखवलं.

“नाही,” तो म्हणाला, “बर्फ पडतोय.”

हा बर्फ असाच पडत राहणार का, असं जेमनं अॅटीकसला विचारलं. जेमनंही कधी बर्फ पडताना पाह्यला नव्हता पण त्याला तो कसा दिसतो ते माहीत होतं. अॅटीकस म्हणाला की, मलाही बर्फाबद्दल जेमइतकंच माहितीये. पण तो असा पाण्याइतका पातळ असेल तर लवकरच त्याचा पाऊस होईल.

तेवढ्यात फोन वाजला. अॅटीकस नाश्ता करता करता उठून तो घ्यायला गेला. “युला मे होती,” परत येऊन त्यानं सांगितलं. “ती म्हणाली की..१८८५ पासून मेकोम्बमध्ये बर्फ पडलेला नाही. तेव्हा आज शाळांना सुट्टी.”

युला मे ही मेकोम्बची मुख्य टेलिफोन ऑपरेटर होती. सार्वजनिक घोषणा करणं, लग्नाची आमंत्रणं देणं, आग लागल्याची वर्दी देणं आणि डॉक्टर रेनॉल्ड्स नसताना प्रथमोपचाराच्या सूचना देणं अशी कामं तिच्यावर सोपवलेली होती.

अॅटीकसनं आम्हाला भानावर आणून खिडकीऐवजी समोरच्या नाश्त्याकडे लक्ष द्यायला सांगितलं. तेव्हा मग जेमनं विचारलं, “स्नोमॅन कसा करायचा?”

“मला अजिबात माहीत नाही,” अॅटीकस म्हणाला. “नाराज होऊ नका पण साधा चेंडू करण्याइतका तरी बर्फ जमेल का नाही मला शंकाय.”

तेवढ्यात कॅलपर्निया आत येऊन म्हणाली, “बर्फ चिकट आहे बरंका,” आम्ही मागल्या अंगणात धावलो तर ते ओलसर बर्फाच्या हलक्या थरानं झाकून गेलं होतं.

“आपण ह्यावर चालायला नको,” जेम म्हणाला, “ते बघ, जेवढी चालशील तेवढा तो बर्फ वाया जाणार.”

मी वळून माझ्या पावलाच्या मऊसर ठशांकडे पाहिलं. आपण आणखी वाट पाह्यली तर हा सगळा बर्फ गोळा करून स्नोमॅन बनवता येईल असं जेम म्हणाला. मी जीभ बाहेर काढून बर्फाचा एक चपटा तुकडा झेलला. माझी जीभ पोळली.

“जेम, हा गरम आहे!”

“नाही गं. तो इतका गार आहे की भाजतो. स्काऊट, आता तो खात बसू नकोस. तू वाया घालवतेयस तो. खाली पडू दे.”

“पण मला चालायचंय त्यावर.”

“आपण नं मिस मॉडीच्या इथे चालूया.”

जेमनं पुढलं अंगण ओलांडलं. मी त्याच्या मागोमाग गेले. मिस मॉडीच्या घरासमोरच्या रस्त्यावर असताना मिस्टर एव्हरींनी आम्हाला धरलं. त्यांचा चेहरा लालगुलाबी होता आणि त्यांना भलीमोठ्ठी ढेरी होती.

“पाहिलंत का तुम्ही काय केलंय ते?” ते म्हणाले. “आता किती वर्षं झाली, मेकोम्बला बर्फच पडला नाहीये. पण तुमच्यासारख्या पोरांमुळे ऋतू बदलतात.”

मिस्टर एव्हरी त्यांची ती कामगिरी पुन्हा कधी करून दाखवतात याची मागच्या उन्हाळ्यात आम्ही अगदी आतुरतेनं वाट पाहिली होती. त्यांना ते कळलं असेल की काय असा विचार माझ्या डोक्यात येऊन गेला. आता त्याचं आम्हाला हे फळ मिळालं असेल तर काय बोलणार?

“जेम फिंच, ए जेम फिंच !”

“जेम, मिस मॉडी हाका मारतायत.”

“अंगणाच्या मधोमध चाला हां. तिथे बर्फाखाली एक झुडूप गाडलंय. त्यावर पाय नका देऊ!”

“हो!” जेम म्हणाला. “कसलं भारी वाटतंय नं मिस मॉडी?”

“डोंबलाचं भारी ! आज रात्रीही बर्फ पडला तर माझी सगळी फुलझाडं मरून जातील !”

मिस मॉडीच्या जुन्या टोपीवर बर्फाचे खडे चमकत होते. ती वाकून काही लहान लहान झुडूपांना पिशवी गुंडाळत होती. तुम्ही असं कशासाठी करताय असं जेमनं तिला विचारलं.

“त्यांना ऊब मिळावी म्हणून,” ती म्हणाली.

“पण फुलं कशी उबदार रहातील? त्यांच्यात थोडंच रक्ताभिसरण होतं?”

“ते काही मला माहीत नाही बाबा. मला इतकंच कळतं की आज रात्री बर्फ पडला तर ही झाडं गोठून जातील. म्हणून ती झाकून ठेवायची. कळलं?”

“हो. मिस मॉडी?”

“बोला साहेब..”

“स्काऊटनं आणि मी तुमच्याकडचा थोडा बर्फ घेतला तर चालेल?”

“हात्तिच्या, सगळा घ्या की ! तिकडे खाली जुनी टोपलीये बघ. त्यात गोळा कर.” मग डोळे बारीक करत तिनं विचारलं, “जेम फिंच, तू माझ्याकडचा बर्फ घेऊन काय करणारेस म्हणे?”

“बघालच तुम्ही,” जेम म्हणाला. मग आम्ही मिस मॉडीच्या अंगणातला जमेल तितका बर्फ गोळा करून आमच्या अंगणात नेला. भारी गचाळ प्रकार होता तो.

“जेम, आपण काय करणारोत?” मी विचारलं.

“बघशीलच तू,” तो म्हणाला. “आता ती टोपली घे आणि मागल्या अंगणातला जमेल तितका बर्फ पुढे घेऊन ये. आणि ज्या रस्त्यानं गेलीस त्याच रस्त्यानं परत ये.” त्यानं सावधगिरीची सूचनाही दिली.

“जेम, आपण बर्फाचं बाळ बनवणारोत?”

“नाही. खराखुरा बर्फाचा माणूस बनवायचाय. खूप काम आहे आता.”

जेम धावत मागल्या अंगणात गेला. तिथून त्यानं बागकामाचं एक फावडं आणलं आणि लाकडांच्या ढिगाऱ्याच्या मागच्या बाजूला खोदायला सुरुवात केली. वाटेत येणारे किडे तो एका बाजूला सरकवत होता. मग घरात जाऊन तो धुवायच्या कपड्यांची पिशवी घेऊन आला आणि त्यात माती भरून ती पुढल्या अंगणात घेऊन गेला.

पाच पिशव्या माती आणि दोन टोपल्या बर्फ जमल्यावर आता आपल्याला सुरुवात करायला हरकत नाही असं तो म्हणाला.

“केवढा पसारा झालाय नं?” मी म्हणाले.

“आत्ता पसारा दिसतोय पण थोड्या वेळानं नाही दिसणार.” तो म्हणाला.

जेमनं पसाभर माती घेतली आणि थापून तिचा डोंगर केला. मग त्यावर आणखी माती टाकली, आणखी टाकली आणि शेवटी एक माणसाचं धड तयार झालं.

“निग्रो स्नोमॅनबद्दल तर कधी ऐकलं नाहीये ब्वा!” मी म्हणाले.

“फार वेळ काळा नाही ठेवायचाय त्याला,” तो गुरगुरला.

जेमनं मागच्या अंगणातून पीचच्या झाडाच्या काटक्या गोळा केल्या. त्या वाकवून हाडांसारख्या बसवल्या आणि मातीनं झाकून टाकल्या.

“आता हा कंबरेवर हात ठेवलेल्या स्टीफनी क्रॉफर्डसारखा दिसतोय. मध्ये लठ्ठ. आणि हात मात्र लहान आणि गुबगुबीत.” मी म्हणाले.

“मोठे करतो मं ते.” जेमनं त्या चिखलाच्या माणसावर पाणी शिंपडलं आणि त्यावर आणखी माती ओतली. क्षणभर विचारमग्न होऊन तो बघत राहिला आणि मग त्या आकृतीच्या कंबरेखाली त्यानं मोठी ढेरी तयार केली. चमकत्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत म्हणाला : “मिस्टर एव्हरी जरासे स्नोमॅनसारखेच दिसतात ना?”

जेमनं आणखी थोडा बर्फ घेऊन थापायला सुरुवात केली. स्वतःसाठी त्यानं पुढचा भाग राखून ठेवला आणि मला फक्त पाठीचं काम करायला दिलं. हळूहळू मिस्टर एव्हरी गोरे दिसायला लागले.

डोळे, नाक, तोंड आणि शर्टाच्या बटणांसाठी लाकडाचे तुकडे वापरून एकदाचे जेमनं खडूस दिसणारे मिस्टर एव्हरी तयार केले. सरपणाची एक काटकी लावल्यावर पुतळा पूर्ण झाला. मागे होऊन जेम आपली कामगिरी न्याहाळायला लागला.

“खूप मस्त झालंय.” मी म्हणाले. “असं वाटतंय हा आत्ता आपल्याशी बोलायला लागेल.”

“हो ना?” तो लाजत म्हणाला.

अॅटीकस कधी एकदा जेवायला घरी येतो असं आम्हाला झालं होतं. पण तेवढाही धीर न धरवून आम्ही त्याला फोन केला आणि तुझ्यासाठी एक मोठ्ठी गंमत आहे, असं सांगितलं. मागल्या अंगणातला बराचसा ऐवज पुढल्या अंगणात आलेला बघून त्याला बरीच गंमत वाटलेली दिसली. पण तुम्ही मस्त काम केलंय असं तो म्हणाला. “तुम्ही कसा काय स्नोमॅन बनवणार आहात ते मला कळत नव्हतं,” तो जेमला म्हणाला. “पण आता इथून पुढे तुझं कसं होईल याची मला काळजी नाही. तू कायमच काहीतरी मार्ग काढशील बेटा.”

अॅटीकसनं केलेली स्तुती ऐकून जेमचे कान लालबुंद झाले. तेवढ्यात अॅटीकस मागे सरकला आणि जेमनं दचकून वर पाहिलं. अॅटीकस डोळे बारीक करून थोडावेळ त्या स्नोमॅनकडे बघत राहिला. आधी तो गालातल्या गालात हसला आणि मग मोठ्यांदा हसायला लागला. “पोरा, तू नक्की कोण होणार ते काही कळत नाही बुवा. इंजिनियर होणार, वकील होणार का चित्रकार. तू चक्क शेजारच्यांची अब्रूच चव्हाट्यावर आणलीस. याला लपवला पाह्यजे.”

त्या आकृतीची ढेरी जरा कमी करावी, सरपणाची काटकी काढून तिथे झाडू ठेवावा आणि त्याला एप्रन घालावा असं अॅटीकसनं सुचवलं.

तसं केलं तर सगळा चिखल होईल आणि स्नोमॅन उरणारच नाही असं जेम म्हणाला.

“काहीही कर पण काहीतरी कर,” अॅटीकस म्हणाला. “ही अशी शेजाऱ्यांची व्यंगचित्रं मांडायची नाहीत.”

“ते कुठे व्यंगचित्रय?” जेम म्हणाला. “उलट ते अगदी मिस्टर एव्हरींसारखंच दिसतंय.”

“पण मिस्टर एव्हरींना कदाचित तसं वाटणार नाही.”

“हां, मी करतो बरोबर !” जेम म्हणाला. धावत रस्ता ओलांडून तो मिस मॉडीच्या मागच्या अंगणात नाहीसा झाला आणि विजयी मुद्रेनं परत आला. तिची उन्हाची टोपी त्यानं त्या स्नोमॅनच्या डोक्यावर चिकटवली आणि तिची झाडं कापायची कात्री काखेत अडकवली. आता हे ठीक झालं असं अॅटीकस म्हणाला.

पुढलं दार उघडून मिस मॉडी व्हरांड्यात आली. तिनं आमच्याकडे पाह्यलं आणि एकदम ती हसली. “जेम फिंच,” हाक मारत ती म्हणाली. “कारट्या, आण माझी टोपी इकडे !”

जेमनं अॅटीकसकडे पाह्यलं. मान हलवत तो म्हणाला, “उगाच तसं म्हणतेय ती.”

“तिला तुझी एकूण.. अं..कामगिरी आवडलीये.”

अॅटीकस मिस मॉडीच्या घरापाशी गेला आणि ते दोघं एकमेकांशी हातवारे करत बोलायला लागले. मला त्यातलं ऐकू आलं ते इतकंच “..पोरानं अंगणात पक्का हिजडा उभा केलाय ! अॅटीकस, तू काय यांना शिकवणार !”

दुपारी बर्फ पडायचा थांबला. थंडी आणखीनच वाढली आणि रात्रीपर्यंत मिस्टर एव्हरींची सगळ्यात वाईट भविष्यवाणी खरी ठरली: कॅलपर्नियानं घरातल्या सगळ्या शेकोट्या पेटत ठेवल्या होत्या तरीही आम्ही गारठून गेलो. संध्याकाळी अॅटीकस घरी आल्यावर म्हणाला की आज काही खरं नाही. “आज रात्री इथेच राहतेस का?“ असंही त्यानं कॅलपर्नियाला विचारलं. आमच्या उंच छताकडे आणि मोठाल्या खिडक्यांकडे एक नजर टाकत कॅलपर्निया म्हणाली, “नको. घरीच जास्त बरं वाटेल मला.” अॅटीकसनं तिला गाडीतून घरी सोडलं.

मी झोपायला जाण्याआधी अॅटीकसनं माझ्या खोलीतल्या शेकोटीत आणखी कोळसे सरकवले. थर्मामीटरवर उणे सोळा दिसतंय असं तो म्हणाला. त्याच्या आठवणीतली ही सर्वात कडाक्याची थंडी होती म्हणे. बाहेरचा आमचा स्नोमॅन गोठून टणक झाला होता.

थोड्याच वेळात म्हणजे निदान तसं वाटलं तरी, कोणीतरी मला हलवून उठवत होतं. अॅटीकसचा ओव्हरकोट माझ्या अंगावर होता. “सकाळ झाली पण?”

“उठ बाळा.”

अॅटीकसच्या हातात माझा बाथरोब आणि कोट होता. “आधी हा रोब घाल.” तो म्हणाला.

जेम अॅटीकसच्या शेजारीच उभा होता. पेंगुळलेल्या आणि केस विस्कटलेल्या अवस्थेत. त्यानं ओव्हरकोट गळ्याशी घट्ट ओढून घेतला होता. दुसरा हात खिशात गुडूप झाला होता. तो कसातरीच जाडजूड दिसत होता.

“चल पटकन सोन्या.” अॅटीकस म्हणाला. “हे तुझे बूटमोजे.”

वेड्यागत मी ते चढवले. “सकाळ झाली?”

“नाही, नुक्ता एक वाजून गेलाय. आवर आता.”

काहीतरी गडबड असावी असा एकदाचा माझ्या डोक्यात प्रकाश पडला. “काय झालं?”

पण त्याला ते सांगायची वेळच आली नाही. पाऊस पडल्यावर कुठे जाऊन दडायचं हे पक्ष्यांना माहीत असतं तसंच गडबड झाली म्हणजे ती रस्त्यावर असणार हे माझ्या लक्षात आलं. सळसळत्या कापडासारखी कुजबूज आणि दबक्या पावलांनी पळण्याचे आवाज ऐकून माझ्या मनात भीती दाटून आली.

“कोणाचं घर?”

“मिस मॉडीचं बेटा.” अॅटीकस हळुवारपणे म्हणाला.

पुढल्या दाराशी पोचल्यावर मिस मॉडीच्या जेवणघराच्या खिडकीतून आगीचे लोट येताना मला दिसले. शहरातल्या आगीच्या बंबाची घंटा वाजायला लागली आणि आम्ही पाहिलेल्या त्या दृश्यावर शिक्कामोर्तबच झालं.

“सगळं घर जळलंय, हो नं?” जेम विव्हळला.

“हं, जळलंच असणार,” अॅटीकस म्हणाला. “तुम्ही दोघं आता ऐकून घ्या. खाली जाऊन रॅडलींच्या घराशी उभं रहा. कोणाच्याही वाटेत यायचं नाही, कळलं? वारा कोणत्या दिशेला वाहतोय ते बघा. चालेल?”

“अं, अॅटीकसs, आपण आपलं सामान बाहेर काढायला लागायचं?” जेमनं विचारलं.

“इतक्यात नाही बेटा. मी सांगतो तसं करा. पळा. स्काऊटकडे लक्ष दे, कळलं? तिला एकटीला सोडू नकोस.”

आम्हाला एक हलकासा धक्का देऊन अॅटीकसनं रॅडलींच्या पुढल्या बाजूच्या फाटकाकडे पिटाळलं. रस्त्यावर एकामागून एक माणसं आणि गाड्या येताना दिसत होत्या. आग शांतपणे मिस मॉडीच्या घराला गिळून टाकत होती. “लौकर लौकर का नाही काही करत ..पटपट जायचं की..” जेम पुटपुटला.

तसं का ते आम्हाला दिसलंच. तो जुनापुराणा आगीचा बंब थंडीनं गोठून गेला होता. काही माणसांनी शहरातून तो ढकलत आणला होता. त्याची नळी पाईपला जोडताना निसटली आणि पाण्याचा फवारा उडाला. रस्त्याकडेला पाण्याचे ओघळ वाहू लागले.

“आई..गं..जेम..”

जेमनं माझ्या खांद्याभोवती हात टाकला. “स्काऊट, श्शू..अजून काही झालं नाहीये. काळजी करायची असेल तेव्हा सांगेन..”

मेकोम्बमधले पुरुष मिस मॉडीच्या घरातलं सामान एकेक करून रस्त्यापलीकडच्या मोकळ्या जागेत हलवत होते. अॅटीकस तिची ओकची जड डुलती खुर्ची हातात घेऊन जाताना दिसला. तिला सगळ्यात मोलाची वाटणारी गोष्ट त्यानं बाहेर काढली याचं मला बरं वाटलं.

अधूनमधून आरडओरडा ऐकू येत होता. मग वरच्या मजल्यावरच्या खिडकीत मिस्टर एव्हरींचा चेहरा दिसायला लागला. त्यांनी खिडकीतून एक गादी बाहेर रस्त्यावर टाकली. मग एकेक सामान बाहेर फेकायला लागले. शेवटी खालची माणसं ओरडायला लागली, “खाली ये भेंचोद ! जिना जळाला सगळा ! ए एव्हरी, बाहेर निघ तिथून !”

मिस्टर एव्हरी खिडकीतूनच खाली उतरायला लागले.

“स्काऊट, अडकले ते..देवा..” जेम कुजबुजला.

मिस्टर एव्हरी चांगलेच अडकले होते. मी जेमच्या कुशीत तोंड लपवलं आणि “स्काऊट, आले ते बाहेर ! आले ..आले !” असं जेमनं सांगेपर्यंत मान वर केली नाही.

मी वर पाहिलं तर मिस्टर एव्हरी वरचा व्हरांडा ओलांडत होते. त्यांनी कठड्यावरून पाय पलीकडे टाकले आणि खांबावरून घसरत येत असताना त्यांचा तोल गेला. ते ओरडत खाली आले आणि मिस मॉडीच्या झुडपांवर जाऊन आदळले.

अचानक माझ्या लक्षात आलं की सगळेजण मिस मॉडीच्या घरापासून मागे सरकत आमच्याच दिशेला येत होते. त्यांच्या हातात आता सामान नव्हतं. आग दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचली होती आणि वाटेतलं सगळं काही गिळत छताकडे चालली होती. खिडकीच्या चौकटी काळ्या पडल्या होत्या. मध्यभागी आगीचा गडद केशरी रंग उठून दिसत होता.

“जेम, ते बघ कसं भोपळ्यासारखं दिसतंय..”

“स्काऊट, ते बघ!”

आमच्या आणि मिस रेचलच्या घरावर धुराची वलयं पसरली होती. नदीवर पसरलेल्या धुक्यासारखी. माणसं त्यावर नळ्या रोखून उभी होती. अॅबॉट्सव्हीलवरून आलेला ट्रक मागच्या वळणावर जोरात फिरून आमच्या घरासमोर थांबला.

“ते पुस्तकंय नं ..” मी म्हणाले.

“काय?” जेम म्हणाला.

“ते टॉम स्विफ्टचं पुस्तकंय नं , ते माझं नाहीये, डीलचंय ..”

“तू काही काळजी करू नको स्काऊट. अजून काळजी करण्यासारखं काही झालं नाहीये,” जेम म्हणाला. बोट दाखवत तो म्हणाला, “ते बघ तिकडे..”

शेजाऱ्यांच्या एका घोळक्यात अॅटीकस खिशात हात घालून उभा होता. जसा काही फुटबॉलचा खेळच बघत असावा. मिस मॉडी त्याच्या शेजारीच उभी होती.

“ते बघ. त्याला अजून काळजी वाटत नाहीये,” जेम म्हणाला.

“तो का नाही चढलाय एखाद्या घरावर?”

“तो किती म्हाताराय अगं. मान मोडेल नं त्याची.”

“त्याला आपलंही सामान बाहेर काढायला लावायचं?”

“त्याला नको त्रास द्यायला. त्याला माहीतच असेल आपलं सामान कधी काढायचं ते.” जेम म्हणाला.

अॅबॉट्सव्हीलचा ट्रक आमच्या घरावर पाण्याचा मारा करायला लागला. छतावर उभा असलेला माणूस कुठे कुठे पाणी मारायचं ते दाखवत होता. आमचा ‘पक्का हिजडा’ काळा काळा होत कोसळताना मला दिसला. मिस मॉडीची उन्हाळी टोपी त्या ढिगाऱ्यावर पडून राहिली. तिची बागकामाची कात्री मात्र दिसत नव्हती. आमच्या, मिस मॉडीच्या आणि मिस रेचलच्या घरामध्ये जाणवणाऱ्या धगीमुळे सगळ्या पुरुषांनी आपापले कोट आणि बाथरोब केव्हाच काढून फेकले होते. आपण बसल्या जागीच गोठत चाललोय हे मला जाणवलं. जेम मला उब द्यायचा प्रयत्न करत होता पण त्याचे हात अपुरे पडत होते. मी त्याच्या कुशीतून बाहेर पडून हातांची घडी घातली. जागच्या जागीच किंचित नाचल्यावर मला जरा पायांची जाणीव झाली.

आणखी एक आगीचा बंब कुठूनतरी आला आणि मिस स्टीफनी क्रॉफर्डच्या घरासमोर थांबला. आणखी एक नळी जोडायला पाईप नव्हता. तेव्हा त्या माणसांनी हाती वापरायचं अग्निशामक घेऊन तिच्या घरावर फवारलं.

मिस मॉडीच्या घराच्या छतापर्यंत आग पोहोचली. मोठ्यांदा आवाज करत ते घर कोसळलं. ती आग सगळीकडे पसरली. मागोमाग बाजूच्या घरांवर उभ्या असलेल्या माणसांनी घोंगड्या फेकून लाकडाचे जळके तुकडे आणि ठिणग्या विझवायला सुरुवात केली.

पहाटे एकेक करून आणि मग गटागटानं माणसं निघून जायला लागली. मेकोम्बचा आगीचा बंब ते शहराकडे ढकलायला लागले. अॅबॉट्सव्हीलचा बंब निघून गेला आणि तिसरा मात्र तसाच थांबला. दुसऱ्या दिवशी आम्हाला कळलं की तो साठ मैलांवर असलेल्या क्लर्क्स फेरीवरून आला होता.

जेम आणि मी रस्ता ओलांडून पुढे गेलो. मिस मॉडी तिच्या अंगणातल्या जळक्या काळ्या भगदाडाकडे एकटक बघत होती. अॅटीकसनं आमच्याकडे बघून मान हलवली आणि तिला आत्ता बोलायची इच्छा नाही असा इशारा केला. आमच्या हाताला धरून बर्फानं झाकलेला रस्ता ओलांडत तो आम्हाला घरी घेऊन गेला. मिस मॉडी सध्या तरी मिस स्टीफनीकडे रहाणार आहे असं तो म्हणाला.

“कोको घेणार?” त्यानं विचारलं. अॅटीकसनं स्वैपाकघरातला स्टोव्ह पेटवला तशी मी शहारले.

कोको पीत असताना अॅटीकस आपल्याचकडे बघतोय हे माझ्या लक्षात आलं. आधी कुतूहलानं आणि मग रोखून. “मी तुम्हाला एका बाजूला नुस्तं उभं राह्यला सांगितलं होतं ना?” तो म्हणाला.

“हो, मग.. आम्ही एकाच बाजूला..”

“मग हे पांघरूण कोणाचंय? ”

“पांघरूण?”

“हो बाईसाहेब. पांघरूण. हे आपलं नाहीये.”

मी वाकून पाह्यलं तर तपकिरी रंगाचं एक उबदार पांघरूण माझ्या खांद्याभोवती लपेटलं होतं आणि मी त्याचं टोक मुठीत घट्ट धरून ठेवलं होतं.

“अॅटीकसs, मला नाही माहिती. ..मला..मी..”

मी उत्तरासाठी म्हणून जेमकडे वळून पाह्यलं तर तो माझ्यापेक्षाही थक्क झाला होता. हे पांघरूण इथं कसं आलं ते आपल्याला काहीच माहीत नसल्याचं त्यानं सांगितलं. अॅटीकसनं सांगितलं तसंच आम्ही वागलो होतो. सगळ्यांच्या वाटेतून लांब जाऊन रॅडलींच्या घरापाशी जाऊन थांबलो होतो आणि तिथून एक इंचभरही हललो नव्हतो. ..बोलता बोलता जेम थांबला.

“मिस्टर नॅथन होते तिथे आगीपाशी,” तो बरळला. “मी पाह्यलं त्यांना. ते गादी ओढून काढत होते. .. अॅटीकसs.. शप्पथ..”

“असूदे बेटा.. असूदे” अॅटीकस हळूच हसला. “असं नाहीतर तसं आज सगळंच मेकोम्ब बाहेर पडलं होतं वाटतं. जेम कोठीच्या खोलीत थोडा कागद असेल. जा घेऊन ये. आपण हे बांधून..”

“अॅटीकसs, नको नं!”

जेमचं डोकं ठिकाणावर नसावं. तो आमची सगळी गुपितं उभीआडवी बाहेर काढायला लागला. स्वतःची तर नाहीच, पण माझीही काळजी न करता. ती झाडाची ढोली, ती पँट, काहीही सोडलं नाही.

“..मिस्टर नॅथननी त्या झाडात सिमेंट भरलं. आणि अॅटीकसs, आम्हाला तिथे काही सापडू नये म्हणून त्यांनी असं केलं. सगळे म्हणतात तसे ते चक्रमच आहेत बहुतेक. देवाशप्पथ, बूनं आम्हाला कध्धीच त्रास दिला नाही. आम्हाला कध्धीच मारलं नाही. त्या रात्री त्याला माझा गळाच कापता आला असता ना..त्याऐवजी..त्यानं माझी पँट दुरुस्त करून दिली. अॅटीकसs, त्यानं कध्धीच आम्हाला काही केलं नाहीये..”

“हो, हो, बेटा” अॅटीकस इतक्या हळूवारपणे हे म्हणाला की माझा जीव अगदीच भांड्यात पडला. जेमच्या बोलण्यातलं अक्षरही त्याला कळलं नसणार कारण तो एवढंच म्हणाला की, “बरोबर आहे तुझं. आपण झाल्या गोष्टी आणि हे पांघरूण दोन्ही आपल्याचकडे ठेवूया. कदाचित, नंतर कधीतरी स्काऊट त्याचे आभार मानेल.”

“कोणाचे?” मी विचारलं.

“बू रॅडली. तू त्या आगीत इतकी गुंतली होतीस की, त्यानं कधी येऊन तुझ्या अंगावर पांघरूण टाकलं तुला कळलंच नाही.”

माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं. जेम ते पांघरूण घेऊन माझ्यासमोर आला तेव्हा तर मला भडभडून उलटीच होणार होती. “तो घरातून हळूच बाहेर आला..असाss वळला..आणि असाssss निघून गेला..!”

“जेरेमी, आता आणखी उचापती पुरे.” अॅटीकस कडक आवाजात म्हणाला.

“पण मी त्याला काहीच करणार नाहीये.” जेम गुरगुरत म्हणाला खरं पण त्याच्या डोळ्यात मला एक नवीन धाडसी चमक दिसलीच. “बघ स्काऊट, तू नुस्ती वळली असतीस तरी दिसला असता तुला तो.”

कॅलपर्नियानं आम्हाला दुपारी उठवलं. त्या दिवशी आम्ही शाळेत जायची गरज नाही असं अॅटीकसनं सांगितलं होतं म्हणे. “झोप नीट झाली नसेल तर काsही शिकता येणार नाही” असंही तो म्हणाला होता. कॅलपर्नियानं आम्हाला पुढलं अंगण जमेल तसं स्वच्छ करायला सांगितलं.

मिस मॉडीची टोपी बर्फाच्या पातळ थरावर विसावली होती. झाल्या घटनेची आठवण करून देत. तिथला चिखल उपसून काढल्यावर आम्हाला तिची बागकामाची कात्री मिळाली. मिस मॉडी तिच्या मागच्या अंगणात गोठून जळून गेलेल्या फुलझाडांकडे बघत उभी होती. “आम्ही तुमचं सामान परत आणून देतो मिस मॉडी. किती बेकार झालं सगळं.” जेम म्हणाला.

मिस मॉडीनं वळून बघितलं. जुन्या हास्याची एक पुसट छाया तिच्या चेहऱ्यावरून सरकली. “अरे जेम फिंच, मला नं कायम वाटायचं, आपलं घर जरा लहान हवं होतं. म्हणजे आणखी अंगण मोकळं मिळालं असतं. बघ, आता माझ्या फुलांना आणखी मोठी जागा मिळाली !”

“मिस मॉडी, तुम्हाला वाईट नाही वाटत?” मी आश्चर्यानं विचारलं. अॅटीकस तर म्हणाला होता की तिच्याकडे घर सोडून आणखी काहीच नाही.

“वाईट कशाचं बाळा? मला तो जुनाट गोठा मुळीच आवडायचा नाही. स्वतःच आग लावून टाकावी असं शंभरवेळा तरी मनात आलं असेल माझ्या. पण मला पकडून आत टाकलं असतं..”

“पण..”

“जीन लुईस फिंच, तुम्ही माझी मुळ्ळीच काळजी करू नका. आहे त्यातून कितीतरी मार्ग काढता येतात. मी एक लहानसं घर बांधेन आणि एकदोन भाडेकरू ठेवेन. आणि देवाची कृपा झालीच तर अलाबामातली सगळ्यात सुंदर बाग माझी असेल. मी मनावर घेतलं तर ते तिकडले बेलीनग्रॅथ फिके पडतील बघ !”

जेमनं आणि मी एकमेकांकडे पाह्यलं. “मिस मॉडी, ही आग कशी लागली असेल हो?” त्यानं विचारलं.

“कोण जाणे. स्वैपाकघरातली गॅसची नळी बिघडली असेल. काल रात्री माझ्या कुंडीतल्या झाडांसाठी मी तिथली शेकोटी चालू ठेवली होती. काय गं जीन लुईस, काल रात्री म्हणे तुला एक नवीन मित्र मिळाला.”

“तुम्हाला कसं माहीत?”

“अॅटीकस सकाळी जाता जाता म्हणाला. खरं सांगू का, मलाही तुझ्याबरोबर तिथे थांबायला आवडलं असतं. शिवाय मागून कोणी आलं तर वळून बघण्याइतकी मी भानावरही असते.”

मिस मॉडी म्हणजे एक कोडंच होतं. होतं नव्हतं ते बहुतेक सगळं ती गमावून बसली होती. तिच्या आवडत्या बागेची धूळधाण झाली होती. तरीही माझ्या आणि जेमच्या उद्योगांमध्ये तिला अगदी मनापासून रस होता.

मी बुचकळ्यात पडल्याचं तिला समजलं असावं. ती म्हणाली, “काल रात्री मला फक्त एकाच गोष्टीची काळजी वाटत होती. काय गोंधळ झाला काल. शेजारपाजारचं सगळं पेटलं असतं. मिस्टर एव्हरींनी चांगलंच अंथरुण धरलंय. आठवडाभर ते काही उठत नाहीत. वय झालंय आता त्यांचं. मी सांगितलं त्यांना तसं. एकदा का साफसफाई झाली की त्या स्टीफनी क्रॉफर्डचं लक्ष नसताना मी त्यांच्यासाठी माझा खास अक्रोड केक करणारे. त्या स्टीफनीला गेली तीस वर्षं माझ्या अक्रोड केकची कृती हवीये. पण नुस्ती तिच्याबरोबर रहातेय म्हणून तिला देणार नाही मी. तसं तिला वाटत असेल तर साफ चूक आहे.”

यावर विचार केल्यावर मला असं वाटलं की जरी मिस मॉडीनं ती कृती सांगितली तरीही मिस स्टीफनीला ती जमायची नाहीच. मिस मॉडीनं एकदा मला ती बघू दिली होती. इतर सगळ्या सामानाबरोबर त्यात एक मोठा कपभरून साखर घालावी लागायची.

दिवस अजून मावळला नव्हता. हवा थंड आणि नितळ होती. इतकी की न्यायालयातल्या घड्याळाची टोला पडण्याआधीची करकरही आम्हाला ऐकू आली. मिस मॉडीच्या नाकाचा रंग काही वेगळाच दिसत होता. मी त्याबद्दल तिला विचारलं.

“सकाळी सहा वाजल्यापास्नं इथेच आहे मी,” ती म्हणाली. “एव्हाना गोठूनच जायचे.” तिनं तिचे हात समोर धरले. दोन्ही तळव्यांवर बारीकबारीक रेषांचं जाळं पसरलं होतं. मातीनं आणि वाळक्या रक्तानं ते बरबटले होते.

“काय वाट लागलीये हातांची,” जेम म्हणाला. “एखाद्या काळ्या माणसाला का नाही सांगत हे काम? नाहीतर मी आणि स्काऊट येऊन तुम्हाला मदत करतो.” हे बोलत असताना त्याच्या आवाजात त्यागाची वगैरे जराही छटा नव्हती.

मिस मॉडी म्हणाली, “आभारी आहे साहेब, पण तुम्हाला आधी तुमचं काम पुरं करायचंय नं,” तिनं आमच्या अंगणाकडे बोट दाखवलं.

“तो हिजड्याचा पुतळा होय? तो आम्ही अस्सा आवरून टाकू.” मी म्हणाले.

मिस मॉडी एकटक माझ्याकडे बघत राहिली. तिचे ओठ मुक्यानेच हलत होते. अचानक तिनं आपले दोन्ही हात डोक्यावर ठेवले आणि मोठ्यांदा आरोळी ठोकली. आम्ही तिथून निघालो तेव्हाही ती गालातल्या गालात हसतच होती.

जेम म्हणाला, “यांना काय झालं कोणास ठाऊक? मिस मॉडी म्हणजे..!”

“ए, तू गप बस हां, नाहीतर.. !”

सिसिल जेकब्जला मी ही धमकी दिली तेव्हा जेमचा आणि माझा जरासा खडतर काळ सुरू झाला होता. माझ्या मुठी वळलेल्या होत्या आणि मी सिसिलवर झेप घेण्याच्या तयारीत होते. पुन्हा मारामारी केल्याचं कळलं तर सडकून काढीन अशी अॅटीकसनं मला ताकीद दिली होती. असलं बालीश वागायला मी काही आता लहान नव्हते म्हणे. जितक्या लवकर मला हे कळेल तितकं सगळ्यांनाच बरं पडणार होतं. मी लवकरच ते सगळं विसरले.

सिसिल जेकब्जनं मला ते विसरायलाच लावलं. आदल्या दिवशी त्यानं शाळेच्या मैदानात खुलेआम असं जाहीर केलं की स्काऊट फिंचचे वडील निग्रो लोकांचे खटले लढतात. मी तसं काही नसल्याचं सांगून दिलं पण नंतर हे सगळं जेमच्या कानावर घातलं.

“त्याला काय म्हणायचं असेल?” मी विचारलं.

“काही नाही, अॅटीकसला विचार, तो सांगेल तुला.” जेम म्हणाला.

“अॅटीकस, तू निग्रो लोकांचे खटले लढतोस?” मी संध्याकाळी विचारलं.

“अर्थात. आणि त्यांना निग्रो म्हणू नकोस स्काऊट. चुकीचंय ते.”

“शाळेत सगळेजण असंच म्हणतात पण.”

“इथून पुढे तू त्या सगळ्यांमध्ये असायची गरज नाही..”

“मी असं बोललेलं तुला चालत नसेल तर मला शाळेत कशाला पाठवतोस?”

बाबानी मवाळ नजरेनं माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात नवल दिसत होतं. आमच्यातल्या त्या तडजोडीनंतरही शाळा टाळायची माझी मोहीम या ना त्या प्रकारे चालूच होती. मागच्या सप्टेंबरमध्ये सुरुवातीपासून कसंतरीच होणे, चक्कर येणे, पोटाच्या किरकोळ तक्रारी असं सगळं होऊन गेलं होतं. मिस रेचलच्या स्वैपाक्याच्या पोराला बेक्कार खरूज झाली होती. त्याच्या डोक्याला डोकं घासता यावं म्हणून पाच सेंट्स देण्यापर्यंत माझी मजल गेली होती. काही उपयोग झाला नाही.

पण आत्ता मला वेगळीच काळजी वाटत होती. “अॅटीकस, सगळेच वकील निग..निग्रोंचे खटले लढतात?”

“अर्थात.”

“मग सिसिल असं का म्हणाला की तू निग्रो लोकांचे खटले घेतोस म्हणून? तो असं म्हणाला जसं काही तू हातभट्टीच लावतोस.”

अॅटीकसनं सुस्कारा सोडला. “मी फक्त एका निग्रो माणसाचा खटला चालवतोय. त्याचं नाव आहे टॉम रॉबिन्सन. तो त्या उकीरड्यापुढल्या वस्तीत राहतो. कॅलपर्नियाच्या चर्चला येतो तो. कॅल त्याच्या घरच्यांना चांगली ओळखते. माणसं अगदी निर्मळ आहेत असं म्हणते ती. स्काऊट, काही गोष्टी कळण्याइतकी अजून तू मोठी नाहीस. पण मी या माणसाचा खटला चालवू नये अशी गावात चर्चा चालूये. तो खटला जरा विशेष आहे..उन्हाळा सुरू होईपर्यंत काही त्याची सुनावणी सुरू होणार नाही. जॉन टेलरनं उदार मनानं आपली तारीख पुढे ढकललीये..”

“पण जर त्याचा खटला घेणं बरोबर नसेल तर तू का घेतलास ?”

“त्याला बरीचं कारणं आहेत,” अॅटीकस म्हणाला. “महत्त्वाचं कारण असं की हा खटला घेतला नाही तर मला गावात ताठ मानेनं राहता येणार नाही. मी कायदेमंडळात मेकोम्बचं प्रतिनिधित्व करणं योग्य होणार नाही. तुला किंवा जेमला एखादी गोष्ट करू नको असं मी पुन्हा कधी सांगणंही बरोबर होणार नाही.”

“म्हणजे जर तू त्या माणसाचा खटला चालवला नाहीस तर मला आणि जेमला तुझं ऐकावं लागणार नाही?”

“हं, बरोबर.”

“का?”

“कारण ‘माझं ऐका’ असं मी तुम्हाला सांगूच शकणार नाही. स्काऊट, वकिलाचं कामच असंय. त्याच्या आयुष्यात कमीत कमी एक खटला तरी असा येतो जो सबंध आयुष्यावर परिणाम करून जातो. तसा माझा हा खटला असावा. शाळेत तुला त्याबद्दल वाईटसाईट ऐकू येईल, पण तुला जमलंच तर माझ्यासाठी एक कर. मान ताठ ठेव आणि त्या वळलेल्या मुठी खाली ठेव. कोणी तुला काहीही म्हटलं तरी उखडू नकोस. जरा बदल म्हणून स्वतःच्याच डोक्याशी मारामारी करता येते का बघ.. तसं चांगलंय तुझं डोकं. शिकायला नको म्हणत असलं तरी.”

“अॅटीकस, आपण जिंकणार हा खटला?”

“नाही सोन्या.”

“मग कशाला..”

“गुलामगिरी आणि भेदभावाविरुद्धची लढाई आपण शंभर वर्षांपूर्वीच हरलो. म्हणून आता जिंकायचा प्रयत्नच करायचा नाही असं नाही.” अॅटीकस म्हणाला.

“स्काऊट, इकडे ये.” मी त्याच्या मांडीवर चढले आणि त्याच्या हनुवटीखाली माझं डोकं टेकवलं. मला कुशीत घेऊन तो हळूहळू डोलायला लागला. “यावेळचा प्रकार जरा वेगळाय. यावेळेस आपली लढाई उत्तरेतल्या लोकांशी नाही तर आपल्याच मित्रमंडळींशी आहे. पण एक लक्षात ठेव, कितीही कडवटपणा आला तरी शेवटी ते आपले मित्रच आहेत आणि मेकोम्ब आपलंच घर आहे.”

हे डोक्यात ठेवूनच मी दुसऱ्या दिवशी शाळेच्या मैदानात सिसिल जेकब्जला भेटले. “गप बसतो का तू?”

“बसवून बघ तर !” तो ओरडला. “माझ्या घरचे म्हणाले तुझ्या बापानं आमचं नाक कापलंय. त्या निगरला पाण्याच्या टाकीला लटकावून मारला पाहिजे!”

मी त्याच्या अंगावर धावून गेले पण तेवढ्यात मला अॅटीकसचं बोलणं आठवलं. मी मुठी खाली वळवून निघून गेले. “स्काऊट भित्रीsss, स्काऊट भित्रीsss !” माझ्या कानात घुमत राहिलं. पहिल्यांदाच मी मारामारी सोडून निघून गेले होते.

जर मी सिसिलशी मारामारी केली असती तर अॅटीकसला तोंडघशी पाडल्यासारखं झालं असतं. मला आणि जेमला अॅटीकस स्वतःसाठी क्वचितच काही करायला लावायचा. म्हणूनच त्याच्याखातर भित्री म्हणवून घ्यायलाही मी तयार होते. त्याचं सांगणं आपल्या लक्षात राहिलं यानं मला भारी उदात्त वाटत होतं. तीन आठवडे ही उदात्त भावना टिकली. मग ख्रिसमस आला आणि त्याबरोबर संकट उभं राहिलं.

जेमला आणि मला ख्रिसमसविषयी संमिश्र भावना होत्या. ख्रिसमसचं झाड आणि जॅक फिंचकाका या जमेच्या बाजू. दरवर्षी ख्रिसमसच्या आदल्या दिवशी आम्ही मेकोम्ब जंक्शनपाशी जॅककाकाला भेटायचो. मग तो आठवडाभर आमच्याबरोबर राहायचा.

त्रासदायक बाजू बघितली तर अलेक्झांड्रा आत्या आणि फ्रान्सिस ही दोन भारी आडमुठी माणसं.

मला वाटतं यात जिमीकाकांनाही धरलं पाहिजे. तो अलेक्झांड्रा आत्याचा नवरा होता. पण माझ्या आठवणीत तरी एकदाच “लांब हो त्या कुंपणापास्नं” एवढं सोडून ते कधीच काही बोलले नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याचं मला काही कारण नव्हतं. तसं तर अलेक्झांड्रा आत्याही त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यायची नाही. खूप पूर्वी कधीतरी प्रेमाच्या भरात आत्या आणि जिमीकाकांनी मिळून हेन्री नावाचा एक मुलगा पैदा केला होता. जमेल तितक्या लवकर त्यानं घर सोडलं, लग्न केलं आणि फ्रान्सिसला जन्म दिला. दर ख्रिसमसला हेन्री आणि त्याची बायको फ्रान्सिसला आजीआजोबांच्या ताब्यात द्यायचे आणि आपापली मजा करायला निघून जायचे.

कितीही सुस्कारे सोडले तरी अॅटीकस काही आम्हाला ख्रिसमसच्या दिवशी घरी थांबू द्यायचा नाही. माझ्या आठवणीतल्या प्रत्येक ख्रिसमसला आम्ही फिंचच्या घाटावर जायचो. आत्या स्वैपाक छान करायची. त्या एकाच गोष्टीमुळे फ्रान्सिस हॅनकॉकबरोबर एक सुट्टी घालवायच्या कटकटीची त्यातल्या त्यात भरपाई व्हायची. तो माझ्यापेक्षा वर्षानं मोठा होता. मी ठरवून त्याला टाळायचे. मला न आवडणारं सगळं काही करायला त्याला भारी मज्जा यायची आणि मी निरागस मनानं त्यात काही अडथळे आणले तर त्याला ते आवडायचं नाही.

अलेक्झांड्रा आत्या म्हणजे अॅटीकसची बहीण. पण जेमकडून जेव्हा मला लहानपणी होणाऱ्या बाळांच्या अदलाबदलीची गोष्ट कळली तेव्हा माझी खात्री पटली की जन्मल्यावर तिची अदलाबदल झाली असणार. आजीआजोबांकडे बहुधा फिंचऐवजी क्रॉफर्ड घरातलं बाळ आलं असणार. वकील आणि न्यायाधीशांप्रमाणे माणसांना पर्वतांची उपमा द्यायची झाली तर अलेक्झांड्रा आत्या म्हणजे एव्हरेस्टसारखी होती. माझ्या लहानपणच्या आठवणीत ती कायम थंडपणे वावरत असायची.

ख्रिसमसच्या आदल्या दिवशी जॅककाका उडी मारून आगगाडीतून उतरला तर आम्हाला हमालाची वाट बघत थांबायला लागलं. काकाकडे दोन लांबरुंद खोकी होती. जॅककाका अॅटीकसच्या गालाचा हलकासा मुका घ्यायचा तेव्हा आम्हाला गंमत वाटायची. एकमेकांचा मुका घेणारे तेवढे दोनच पुरुष आम्ही पाह्यले होते. जॅककाकानं जेमशी हस्तांदोलन केलं आणि मला उंच धरून गरागरा फिरवलं. पण फारसं उंच नाही. जॅककाका अॅटीकसपेक्षा थोडा बुटकाच होता. घरातला तो सगळ्यात धाकटा म्हणजेच अलेक्झांड्रा आत्यापेक्षाही लहान होता. तो आणि आत्या एकसारखेच दिसायचे पण जॅककाकाचा चेहरा जास्त चांगला वाटायचा. त्याच्या धारदार नाकाची आणि हनुवटीची आम्हाला कधीच भीती वाटली नाही.

ज्याची मला कधीही भीती वाटली नाही असा विज्ञान विषयाशी संबंध आलेला तो पहिलाच माणूस. तो कधीही डॉक्टरसारखा वागायचा नाही म्हणून असेल कदाचित. माझ्या किंवा जेमच्या पायात घुसलेला कपचा काढणं किंवा असलंच काहीतरी काम करताना मी नक्की काय करणारे, किती दुखणार हे तो अगदी व्यवस्थित सांगायचा. शिवाय एखादं मलम लावत असेल तर त्याचा उपयोग काय तेही सांगायचा. एका ख्रिसमसला मी अशीच कुठेतरी सांदीकोपऱ्यात गेले आणि एक वेडावाकडा कपचा पायात घुसवून घेतला. त्यानंतर मी कोणाला हातही लावून देईना. मग जॅककाकानं मला धरलं आणि एका पाद्र्याची गोष्ट सांगून खूप हसवलं. त्याला म्हणे चर्चला जायचा इतका कंटाळा होता की तो रोज सकाळी उठून झोपायच्या कपड्यातच घराच्या दाराशी उभा राह्यचा. ज्याला कोणाला काही अध्यात्मिक ऐकायचं असेल अशा जाणाऱ्या येणाऱ्या कोणत्याही माणसाला पाच मिनिटाचा उपदेश ऐकवायचा. तेही एकीकडे हुक्का ओढत. मी बोलता बोलता मध्येच जॅककाकाला थांबवलं आणि पायातला तुकडा काढताना मला सांग असं म्हणाले. बघते तर त्यानं त्याच्या हातातल्या चिमट्यात तो रक्ताळलेला तुकडा धरून मला दाखवला. मी हसत असताना त्यानं तो ओढून काढला होता म्हणे. यालाच सापेक्षतावाद म्हणतात असंही त्यानं मला सांगितलं.

“त्या खोक्यांमध्ये काये?” हमालाकडच्या त्या लांबरुंद खोक्यांकडे बोट दाखवत मी विचारलं.

“तुमच्या कामाचं काही नाही,” तो म्हणाला.

जेमनं विचारलं, “रोझ अॅलीमर कशीये?”

रोझ अॅलीमर म्हणजे जॅककाकाची मांजर. ती पिवळ्या रंगाची फार सुरेख मांजरी होती. ज्या बायकांना मी आयुष्यभर सहन करू शकतो त्यापैकी ती एक असल्याचं जॅककाकाचं म्हणणं होतं. त्यानं कोटाच्या खिशात हात घालून तिचे काही फोटो बाहेर काढले. आम्ही त्यांचं पुष्कळ कौतुक केलं.

“केवढी जाडी होत चाललीये ही,” मी म्हणाले.

“हो तर. ती हॉस्पिटलातली उरलीसुरली सगळी बोटं आणि कान खाऊन टाकते.”

“च्यायला, काय मस्त गोष्टंय.” मी म्हणाले.

“काय?!”

अॅटीकस म्हणाला, “तिच्याकडे लक्ष देऊ नकोस जॅक. नाटकं करतेय ती. कॅल म्हणते की ती गेला आठवडाभर अशी शिवराळ बोलतेय.” जॅककाकानं भिवया उंचावल्या पण तो बोलला काहीच नाही. शिवराळ बोलण्याचं आकर्षण वाटण्याव्यतिरिक्त माझा आणखी एक छुपा हेतू होता. मी शाळेत जाऊन असलं बोलायला शिकलेय हे जर अॅटीकसच्या लक्षात आलं असतं तर त्यानं एखादवेळेस मला शाळेत जाऊ दिलं नसतं.

त्यादिवशी संध्याकाळी मी जॅककाकाला म्हणाले, “प्लीज, मला ते सालं हॅम दे नं”. मग मात्र तो माझ्याकडे बोट दाखवून म्हणाला, “बाईसाहेब, आपण जरा मला जेवणानंतर भेटा.”

जेवण झाल्यावर जॅककाका बाहेरच्या खोलीत जाऊन बसला. मांडीवर थाप मारत त्यानं मला तिथे येऊन बसायला सांगितलं. मला त्याचा वास फार आवडायचा. दारूच्या बाटलीत काहीतरी छान गोडसर मिसळल्यावर होईल तसा तो असायचा. माझ्या कपाळावरच्या बटा मागे सारत त्यानं माझ्याकडे पाह्यलं. “तू तुझ्या आईपेक्षा अॅटीकससारखीच जास्त वाटतेस,” तो म्हणाला. “शिवाय तुला ही पँटही लांडी होतेय आता.”

“छे, बरोबर बसलीय की.”

“तुला असं सालं, च्यायला वगैरे म्हणायला आवडतंय नं?”

“हं, असेल,” मी म्हणाले.

“पण मला नाही आवडत,” जॅककाका म्हणाला, “तितकंच काही महत्त्वाचं कारण नसेल तर नाहीच. मी आठवडाभर इथे असेन आणि मी इथे असेपर्यंत तरी मला असे शब्द ऐकू यायला नकोत. स्काऊट, हे असलं बोलत तू गावभर फिरलीस तर तुलाच त्रास होईल. तुला चांगल्या घरातली बाई व्हायचंय नं?”

तसंच काही नाही असं मी सांगून टाकलं.

“काहीतरीच बोलू नकोस. चला आता झाडाचं काय ते बघूया.”

मग झोपायची वेळ होईस्तोवर आम्ही झाड सजवलं. रात्री स्वप्नात मला आणि जेमला दोन लांबरुंद खोकी मिळाल्याचं मला दिसलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही त्या खोक्यांवर झडप घातली. ती अॅटीकसकडून आम्हाला मिळालेली भेट होती. त्यानं जॅककाकाला पत्र लिहून ती आमच्यासाठी आणायला सांगितली होती आणि आम्ही मागितलेली वस्तूच त्यात होती.

“घरभर त्या बंदुका रोखत फिरू नका.” जेमनं भिंतीवरच्या एका चित्रावर नेम धरला तेव्हा अॅटीकसनं सांगितलं.

“तुला त्यांना शिकवावं लागेल बंदूक कशी वापरायची ते.” जॅककाका म्हणाला.

“ते काम तुझंय,” अॅटीकस म्हणाला. “मी फक्त आणून द्यायचं काम केलं. नाईलाजच झाला माझा.”

आम्हाला झाडापासून लांब करायला शेवटी अॅटीकसला कोर्टातला आवाज लावायला लागला. त्यानं त्या हवेवर चालणाऱ्या बंदुका घेऊन घाटावर जायला आम्हाला मनाई केली. (फ्रान्सिसला गोळ्या घालायचे विचार माझ्या मनात अगोदरच घोळायला लागले होते.) जरा जरी आगळीक केलीत तरी त्या बंदुका मी कायमच्या जप्त करून टाकीन असंही त्यानं सांगितलं.

फिंचच्या घाटापास्नं एका उंच कड्यावरून तीनशे सहासष्ट पायऱ्या उतरून गेलं की धक्क्यापाशी जाता यायचं. प्रवाहाच्या काठानं गेलं की कड्याच्या पलीकडल्या बाजूला कपाशीच्या जुन्या घाटाचे काही अवशेष शिल्लक होते. फिंच कुटुंबाचे निग्रो कामगार तिथूनच कापसाच्या गाठी आणि इतर माल गाड्यांमध्ये चढवायचे आणि बर्फाचे गोळे, पीठ, साखर, शेतीची अवजारं, बायकांचे कपडे अशा गोष्टी उतरवून घ्यायचे. नदीच्या काठानं एक दुपदरी रस्ता होता. तो पुढे जाऊन गर्द झाडीत दिसेनासा होत असे. रस्त्याच्या टोकाला एक दोनमजली पांढरंशुभ्र घर होतं. त्याच्या वरच्या आणि खालच्या मजल्यावर मोठाले गोलाकार व्हरांडे होते. आमच्या पूर्वजानं सायमन फिंचनं म्हातारपणी आपल्या कटकट्या बायकोला खूष करण्यासाठी हे घर बांधलं होतं. त्या काळातल्या सर्वसामान्य घरांशी मिळतीजुळती असणारी एकमेव गोष्ट म्हणजे हे व्हरांडे. बाकी फिंच घरातली अंतर्गत व्यवस्था मात्र सायमनच्या भोळेपणाची आणि त्यानं आपल्या पोरांवर टाकलेल्या गाढ विश्वासाची साक्ष देत होती.

वरच्या मजल्यावर झोपायच्या सहा खोल्या होत्या. आठ मुलींसाठी चार खोल्या, एकमेव मुलगा वेलकम फिंचसाठीची एक खोली आणि एक पाव्हण्यांची खोली. तशी साधीसोपी व्यवस्था होती. मात्र मुलींच्या खोलीत जायला एक जिना होता आणि वेलकमच्या आणि पाहुण्यांच्या खोलीत जायला दुसरा. मुलींच्या खोलीत जायचा जिना खालच्या मजल्यावरच्या त्यांच्या आईवडिलांच्या खोलीतून जायचा. अर्थातच आपल्या मुलींच्या रात्रीच्या जाण्यायेण्याच्या वेळा सायमनला नेहमी ठाऊक असायच्या.

स्वैपाकघर बाकीच्या घरापासून थोडंसं बाजूला होतं. तिथे जायला एक लहानसा लाकडी पूल होता. मागच्या अंगणात एका खांबावर बांधलेली एक गंजकी घंटा होती. शेतावर काम करणाऱ्या मजुरांना बोलावण्यासाठी किंवा आणीबाणीच्या प्रसंगी तिचा वापर व्हायचा. छपरावर टेहळणीसाठी बांधलेला कठडा होता. तिथे उभा राहून सायमन आपल्यावर लक्ष ठेवणाऱ्या माणसांवर लक्ष ठेवायचा, नदीतून जाणाऱ्या येणाऱ्या बोटी बघायचा आणि आजूबाजूच्या जमीनदारांच्या आयुष्यात डोकावायचा.

अमेरिकेत सर्रास आढळणारी दंतकथा त्या घरालाही चिकटलेली होतीच. त्या घरातल्या फिंच कुटुंबातल्या एका मुलीचं नुकतंच लग्न ठरलेलं असतं. मग लुटारूंपासून वाचवण्यासाठी म्हणून ती लग्नाचा सगळा साज अंगावर घालूनच वावरायला लागते. मुलींच्या खोलीकडे जाणाऱ्या जिन्याच्या दारात ती अडकून पडते. शेवटी तिच्या अंगावर पाणी ओतून तिचे सगळे कपडे भिजवतात आणि मग तिला एकदाचं बाहेर काढतात. घाटावरच्या घरी गेलो तसं अलेक्झांड्रा आत्यानं आणि फ्रान्सिसनं जॅककाकाचा मुका घेतला. जिमीकाकांनी काही न बोलता जॅककाकाशी हस्तांदोलन केलं. मी आणि जेमनं आम्ही आणलेल्या भेटवस्तू फ्रान्सिसला दिल्या. त्यानंही आम्हाला भेटवस्तू दिल्या. मग मात्र जेमला आपल्या वयाची आठवण झाली. मला एकटीला फ्रान्सिसच्या तोंडी देऊन तो मोठ्या माणसांच्यात मिसळला. फ्रान्सिस जेमतेम आठ वर्षांचा होता आणि तरीही त्याचे केस व्यवस्थित विंचरून मागे वळवलेले होते.

“काय मिळालं तुला ख्रिसमसला?” मी आब राखून विचारलं.

“जे मी मागितलं तेच,” तो म्हणाला. फ्रान्सिसनं एक गुडघ्यापर्यंत येणारी पँट, लाल रंगाचं चामड्याचं दप्तर, पाच शर्ट आणि एक बो-टाय मागितला होता.

“अरे वा,” मी खोटंच म्हणाले. “जेमला आणि मला हवेवर चालणाऱ्या बंदुका मिळाल्या. शिवाय जेमला एक रसायनांचा सेट मिळालाय..”

“खेळण्यातला नं..”

“नाई काही, खराखुरा. तो माझ्यासाठी अदृश्य शाई तयार करणारे. मग ती वापरून मी डीलला पत्र लिहीन.”

“त्याचा काय उपयोग?”

“अरे, माझ्याकडून असं कोरं पत्र आलं तर त्याचा चेहरा कसला होईल माहितेय? वेडाच होईल तो.”

फ्रान्सिसशी बोलताना आपण एखाद्या समुद्राच्या पार तळाशी जाऊन बसलोय असं मला वाटायला लागलं. एवढा कंटाळवाणा पोरगा मी अजून पाह्यला नव्हता. तो स्वतः मोबाईलमध्ये राहत असल्यामुळे शाळेतल्या बाईंकडे माझ्या चहाड्या करणं त्याला जमण्यासारखं नव्हतं. पण त्याला जे काही कळेल ते सगळं तो अलेक्झांड्रा आत्याला सांगायचा. ती ते सगळं अॅटीकसच्या कानावर घालायची. मग अॅटीकसची जशी लहर असेल त्याप्रमाणे एकतर तो ते सगळं विसरून जायचा किंवा मग मला शिक्षा करायचा. एकदाच मी त्याला ताड्कन उत्तर देताना ऐकलं होतं. तो सहसा कधीच असं तडकाफडकी उत्तर द्यायचा नाही. “हे बघ अलेक्झांड्रा, मला जमेल तेवढं मी त्यांच्यासाठी करत असतो !” माझ्या शर्टपँट घालून फिरण्याविषयी काहीतरी चाललं होतं.

माझे कपडे हा अलेक्झांड्रा आत्याचा भयंकर जिव्हाळ्याचा विषय होता. तिच्यामते शर्टपँट घातल्यावर मला चांगल्या घरातली बाई व्हायची काही आशाच नव्हती. पण झगा घालून मला काही करताच येत नाही असं मी म्हटलं की ती म्हणायची, “ज्या कामासाठी पँट घालावी लागेल असं कोणतंच काम तू करणं अपेक्षित नाहीये.” अलेक्झांड्रा आत्याच्या माझ्याविषयीच्या कल्पना म्हणजे मी चूलबोळकी खेळायची आणि माझ्या जन्माच्या वेळेस तिनं दिलेली मोत्याची माळ घालून वावरायचं. शिवाय तिच्या मते मी माझ्या बाबाच्या एकाकी आयुष्यातला उबदार सूर्यकिरण बनून राहायला हवं होतं. त्यावर मी असं म्हटलं की पँट घालूनही सूर्यकिरण वगैरे होता येईलच की. त्यावर आत्या म्हणाली की त्यासाठी सूर्यकिरणासारखं उबदार वागावं लागतं. तिच्यामते मी मुळात चांगली होते पण दिवसेंदिवस बिघडत चालले होते. ती मला खूप लागेलसं बोलायची आणि माझी सतत चिडचिड व्हायची. मात्र अॅटीकसला जेव्हा मी त्याबद्दल विचारलं तेव्हा, “या घरात अगोदरच पुष्कळ सूर्यकिरण आहेत. तू तुझं काम कर. जशी आहेस तशी माझ्यामते बरीयेस.” असं तो म्हणाला.

ख्रिसमसच्या जेवणासाठी मी जेवणाच्या खोलीतल्या लहानशा टेबलाशी बसले. जेम आणि फ्रान्सिस मोठ्यांबरोबर जेवणाच्या टेबलाशी बसले होते. जेम आणि फ्रान्सिस मोठ्या टेबलावर बसायला लागून बरेच दिवस झाले तरीही आत्या मला मात्र वेगळंच बसवायची. मी नक्की काय करेन असं तिला वाटायचं ? उठेन आणि काहीतरी फेकून मारेन म्हणून? काय की ! मी एकदातरी मोठ्या टेबलाशी बसू का असं मला कधीकधी तिला विचारवंसं वाटायचं. म्हणजे मग मी किती व्यवस्थित वागू शकते ते तिला दाखवून देता आलं असतं. रोज घरी तर मी विशेष काही गडबड न करता जेवतच होते की. अॅटीकसनं आपलं वजन वापरावं म्हणून मी त्याच्या मागे लागले. तेव्हा इथे माझं काहीही वजन नाही असं त्यानंच मला सांगितलं. तो असंही म्हणाला की, अलेक्झांड्रा आत्याला मुलींचं फारसं काही कळत नाही. तिला स्वतःला मुलगी नाहीये.

पण तिच्या स्वैपाकानं सगळी कसर भरून काढली होती. तीन प्रकारचं मांस, तिच्या स्वैपाकघरातल्या उन्हाळी भाज्या, पीचची लोणची, दोन प्रकारचे केक आणि अॅम्ब्रोशिया (फळांपासून तयार केलेले मिष्टान्न) एवढी आमची ख्रिसमसची मेजवानी होती. जेवणानंतर मोठी माणसं सुस्तावून बाहेरच्या खोलीत जाऊन बसली. जेम फरशीवर लोळायला लागला आणि मी मागच्या अंगणात गेले. “कोट घालून जा,” अॅटीकस झोपाळू आवाजात बोलल्यामुळे मी ते ऐकलंच नाही. फ्रान्सिस माझ्याशेजारी मागल्या पायऱ्यांवर येऊन बसला. “कसलं मस्त जेवण होतं,” मी म्हणाले.

“आजी फार भारी स्वैपाक करते,” फ्रान्सिस म्हणाला. “ती मलाही शिकवणारे.”

“पोरं कुठे स्वैपाक करतात का..” एप्रन घातलेला जेम डोळ्यासमोर आणून मी खिदळले.

“आजी म्हणते सगळ्या पुरुषांनी स्वैपाक करायला शिकलं पाहिजे आणि आपापल्या बायकांची काळजी घेतली पाहिजे. त्यांना बरं नसेल तर त्यांना काय हवंनको पाह्यलं पाहिजे.” फ्रान्सिस म्हणाला.

“मला नाही आवडणार डीलनं माझं हवंनको पाह्यलेलं. मीच बघेन त्याचं.” मी म्हणाले.

“डील?”

“हो, अजून कुठे काही बोलू नकोस. पण आम्ही पुरेसे मोठ्ठे झालो नं की लगेच लग्न करणारोत. त्यानं मागच्याच उन्हाळ्यात विचारलं मला.”

फ्रान्सिसनं शीळ घातली.

“काय झालं?” मी विचारलं. “डीलला तर काही झालं नाही नं..”

“म्हणजे तो दर उन्हाळ्यात मिस रेचलकडे राहतो असं आजी सांगते तो बारक्या?”

“तोच.”

“मला सगळं माहितेय त्याच्याबद्दल.” फ्रान्सिस म्हणाला.

“काय माहितेय?”

“आजी म्हणते त्याला घरच नाही..”

“आहे की, तो मेरिडीयनला राहतो.”

“..तो नुस्ता एका नातेवाईकांकडून दुसऱ्यांकडे फिरत असतो. मिस रेचल त्याला दर उन्हाळ्यात ठेवून घेते.”

“फ्रान्सिसss, मुळीच नाही हं !”

फ्रान्सिस माझ्याकडे बघून हसला. “जीन लुईस, कधीकधी तू पार बिनडोकपणा करतेस. तुला दुसरं काही येतच नाही बहुतेक.”

“म्हणजे काय?”

“अॅटीकसकाका तुला रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांसोबत सोडत असेल तर तो त्याचा प्रश्नंय. म्हणजे आजी म्हणते तशी तुझी त्यात काहीच चूक नाही. शिवाय अॅटीकसकाकाला निग्रो लोक आवडत असतील तर तीही तुझी चूक नाही. पण त्यामुळे घरातल्या बाकीच्यांना शरम वाटते ..”

“फ्रान्सिसsss, साल्याss, काय म्हणालास ?”

“ऐकलंस की तू. आजी म्हणते, तुम्हाला त्यानं मोकाट सोडलंय हे वाईटच. पण आता तो स्वतःसुद्धा निग्रो लोकांची बाजू घ्यायला लागलाय. मेकोम्बच्या रस्त्यावरून चालणं मुश्कील होईल आम्हाला. सगळ्या घरादाराचं नाक कापतोय तो..”

फ्रान्सिस उठला आणि त्या लहानशा लाकडी पुलावरून जुन्या स्वैपाकघराकडे जायला लागला. पुरेशा अंतरावर पोहोचल्यावर तो ओरडला, “अॅटीकसला निग्रो आवडतातsss !”

“मुळीच नाही !” मी ओरडले. “तू काय बोलतोयस मला मुळीच समजत नाहीये, पण आत्ताच्या आत्ता गप्प बस !”

मी पायऱ्या उतरून त्या पुलावरून धावत सुटले. फ्रान्सिसचं बखोट धरणं अगदीच सोपं होतं. तुझं बोलणं पटकन मागे घे असं मी त्याला सांगितलं.

एक झटका देऊन फ्रान्सिसनं स्वतःला सोडवून घेतलं आणि तो जुन्या स्वैपाकघरात धावला. “त्याला निग्रो आवडतातss !” तो पुन्हा ओरडला.

शिकार साधायची असेल तर पुरेसा वेळ घेणं महत्त्वाचं. काsहीही बोलायचं नाही म्हणजे हमखास त्याला उत्सुकता वाटणार आणि तो बाहेर येणार. फ्रान्सिस स्वैपाकघराच्या दारातून डोकावला.

“जीन लुईस, अजून चिडलीयेस?” त्यानं चाचरत विचारलं.

“तसं काही नाही,” मी म्हणाले.

फ्रान्सिस बाहेर येऊन त्या पुलावर उभा राहिला.

“फ्रान्सिसss, तू बोलणं मागे घेणार का नाही?” पण मी जरा घाई केली होती. फ्रान्सिसनं स्वैपाकघरात धूम ठोकली. मी पुन्हा पायऱ्यांवर जाऊन बसले आणि स्वस्थपणे वाट बघायचं ठरवलं. साधारण पाच मिनिटं मी तिथे बसले असेन. तेवढ्यात मला अलेक्झांड्रा आत्याचा आवाज ऐकू आला: “फ्रान्सिस कुठाय?”

“तो तिकडे स्वैपाकघरात आहे.”

“तिकडे खेळायचं नाही सांगितलेलं त्याला कळत नाही का..”

फ्रान्सिस दाराशी येऊन ओरडला, “आजी, तिनं मला इकडे हाकललंय आणि आता मला बाहेर येऊ देत नाहीये !”

“हे काय चाललंय जीन लुईस?”

मी आत्याकडे बघत म्हटलं, “मी नाही हाकललं त्याला आत्या. मी त्याला तिकडे धरूनही ठेवला नाहीये.”

“हो, ठेवलंचे” फ्रान्सिस ओरडला, “ती मला बाहेर येऊ देत नाहीये !”

“भांडताय की काय तुम्ही?”

“आजी, जीन लुईसच चिडली माझ्यावर,” फ्रान्सिस म्हणाला.

“फ्रान्सिस, बाहेर निघ तिथून ! जीन लुईस, तुझा एक शब्द जरी ऐकू आला तरी बाबांना नाव सांगेन. मगाशी साल्या म्हणालीस ना तू?”

“नाही.”

“मी ऐकलं. पुन्हा मला असलं बोलणं ऐकू यायला नकोय.”

अलेक्झांड्रा आत्याला चोरून ऐकायची सवय होतीच. ती गेल्या गेल्या फ्रान्सिस मान वर करून हसत हसत बाहेर आला आणि म्हणाला, “माझ्याशी पंगा घेऊ नकोस.”

त्यानं अंगणात उडी टाकली आणि पुरेसं अंतर राखून वाटेतली गवताची पाती उडवत फिरायला लागला. मधूनच तो माझ्याकडे बघून हसत होता. जेम व्हरांड्यात आला, आमच्याकडे पाह्यलं आणि निघून गेला. फ्रान्सिस लिंबोणीच्या झाडावर चढला, खाली उतरला आणि खिशात हात घालून अंगणात फिरायला लागला. “हं !” तो मध्येच म्हणाला. तू स्वतःला जॅककाका समजतोस का असं मी त्याला विचारलं. त्यावर तो उलट मला म्हणतो कसा, “माझ्या मधे न येता एका जागी गप बसून राह्यला सांगितलंय नं तुला.”

“मी कुठे तुला काही करतेय,” मी म्हणाले.

फ्रान्सिसनं काळजीपूर्वक माझ्याकडे पाह्यलं, मी पुरेशी शांत झालेय असा निष्कर्ष काढला आणि तो हळूच गुणगुणला, “निगर आवडतातsss..”

आता मात्र मी त्याच्या पुढल्या दातावर जोरदार ठोसा हाणला. डावा हात निकामी झाल्यावर मी उजव्या हातानं काम चालू ठेवलं पण थोडाचवेळ. जॅककाकानं माझे दोन्ही हात दोन बाजूंना घट्ट धरून ठेवले आणि म्हणाला, “शांत उभी रहा !”

अलेक्झांड्रा आत्या फ्रान्सिसची खातिरदारी करायला धावली. तिनं स्वतःच्या रुमालानं त्याचे डोळे पुसले, त्याच्या केसातून हात फिरवला आणि गालावर थोपटल्यासारखं केलं. फ्रान्सिस ओरडायला लागल्यावर अॅटीकस, जेम आणि जिमीकाका मागच्या व्हरांड्यात आले होते.

“भांडण कोणी काढलं ?” जॅककाकानं विचारलं.

फ्रान्सिसनं आणि मी एकमेकांकडे बोट दाखवलं. “आजी, ही मला रांड म्हणाली आणि माझ्या अंगावर धावून आली!” फ्रान्सिसनं भोकाड पसरलं.

“स्काऊट, हे खरंय?” जॅककाकानं विचारलं.

“हं”

जॅककाकानं माझ्याकडे पाह्यलं तेव्हा त्याचा चेहरा अगदी अलेक्झांड्रा आत्यासारखाच दिसत होता.

“मी तुला म्हटलं होतं ना, असले शब्द वापरलेस तर तुझी धडगत नाही म्हणून ? सांगितलं होतं की नाही?”

“हो, पण..”

“आता बघतो तुझ्याकडे. थांब तिथेच.”

तिथेच उभं राह्यचं का पळून जायचं अशी उलाघाल माझ्या मनात सुरू झाली. मात्र काय ते ठरवायला मी क्षणभर उशीर केला. मी पळायला वळले खरी पण जॅककाकानं माझ्यापेक्षा चपळाई दाखवली. माझी नजर एकदम खालीच वळली. एक मुंगी गवतातून धडपडत ब्रेडचा बारीकसा कण घेऊन चालली होती.

“इथून पुढे जिवंत असेपर्यंत मी अज्जिबात तुझ्याशी बोलणार नाही ! मला तू मुळ्ळीच आवडत नाहीस, मला तुझा खूप राग येतो आणि तू मर !” माझं हे बोलणं ऐकून जॅककाकाला आणखीनच चेव चढला. बरं वाटावं म्हणून मी अॅटीकसकडे धाव घेतली. पण तो म्हणाला की, “तू स्वतःच हे ओढवून घेतलंयस. आता आपण लवकर घरी गेलेलं बरं.” कोणाचाही निरोप न घेताच मी गाडीच्या मागच्या बाजूला जाऊन बसले. घरी गेल्यावर धावत खोलीत जाऊन मी दार आपटून घेतलं. जेमनं काहीतरी छान बोलायचा प्रयत्न केला पण मी त्याला काही बोलूच दिलं नाही.

एकूण दुखापतीचा अंदाज घेतल्यावर माझ्या लक्षात आलं की फक्त सातआठ ठिकाणी रक्ताळलेल्या खुणा दिसत होत्या. मी सापेक्षतावादाचा विचार करत असतानाच कोणीतरी दारावर टकटक केली. कोण आहे असं विचारलं तर पलीकडून जॅककाकाचं उत्तर आलं.

“तू जा इथून !”

जॅककाका म्हणाला की, पुन्हा असलं बोललीस तर पुन्हा फोडून काढीन. म्हणून मग मी गप्प बसले. तो खोलीत आल्यावर मी एका कोपऱ्यात त्याच्याकडे पाठ करून उभी राह्यले. “स्काऊट,” तो म्हणाला, “अजून रागावलीयेस माझ्यावर?”

“तसलं काही नाही. बोल काय ते.”

“अरेच्चा, तू माझ्यावर रागावलीस?,” तो म्हणाला, “मला तुझं वागणं मुळीच आवडलेलं नाही. तूच चुकीचं वागलीस आणि तुला माहितेय ते.”

“मुळीच नाही.”

“सोन्या, अशा येताजाता लोकांना शिव्या..”

“तू अन्याय केलायस” मी म्हणाले.

जॅककाकाच्या भिवया उंचावल्या. “अन्याय? कसा काय?”

“जॅककाका, तू खरंच खूप चांगलायस आणि मगाशी असं वागलास तरीही तू मला खूप आवडतोस पण तुला लहान मुलांचं फारसं काही कळत नाही.”

जॅककाकानं कंबरेवर हात ठेवून माझ्याकडे वाकून पाह्यलं. “काय हो जीन लुईसबाई, मला लहान मुलांचं काही कळत का नाही? तुझ्या वागण्यात न कळण्यासारखं काही नव्हतं. तू आरडओरडा केलास, गोंधळ घातलास आणि शिवीगाळ केलास..”

“तू मला बोलू देणारेस का? मी आगाऊपणा करत नाहीये. मला फक्त तुला काहीतरी सांगायचंय.”

जॅककाका पलंगावर बसला. कपाळाला आठ्या घालत त्यानं माझ्याकडे पाह्यलं आणि म्हणाला, “बोल.”

मी एक खोल श्वास घेतला. “पहिलं म्हणजे तू माझी बाजू ऐकून घ्यायला थांबलाच नाहीस..तू थेट माझ्यावर धावून आलास. जेमचं आणि माझं भांडण होतं तेव्हा अॅटीकस फक्त जेमचीच बाजू नाही ऐकत. माझीही ऐकतो. दुसरं म्हणजे तू मला सांगितलं होतंस की तेवढंच महत्त्वाचं कारण असल्याशिवाय असले शब्द वापरलेले चालणार नाहीत. मग फ्रान्सिस जे बोलला ते ठोसा मारण्याइतकं महत्त्वाचं..”

जॅककाका डोकं खाजवत म्हणाला, “स्काऊट, काय आहे तुझी बाजू?”

“फ्रान्सिस अॅटीकसला काहीतरी म्हणाला आणि ते ऐकल्यावर मी त्याला असा सोडणार नव्हते..”

“काय म्हणाला फ्रान्सिस?”

“तो म्हणाला की, अॅटीकसला निग्रो आवडतात. म्हणजे काय मला नीटसं माहीत नाही पण फ्रान्सिस असं काही बोलला की .. जॅककाका, मी तुला आत्ताच एक सांगून टाकते.. तो अॅटीकसला काहीतरी वेडंवाकडं बोलणार असेल तर देवाशप्पथ, मी गप्प बसणार नाही.”

“तो अॅटीकसला असं म्हणाला?”

“हो. आणखीही बरंच काय काय म्हणाला. म्हणाला की अॅटीकसनं घराचं नाक कापलं. त्यानं मला आणि जेमला मोकाट सोडलंय..”

जॅककाकाकडे पाह्यल्यावर माझ्या लक्षात आलं की आपली सरशी झालीये. मग तो म्हणाला, “बघतोच आता..” तेव्हा माझ्या लक्षात आलं की फ्रान्सिसचं आता काही खरं नाही. “आज रात्रीच तिकडे जावं म्हणतो मी..”

“नको नं काका.. ..नको जाऊस तू..”

“मी त्याला असा सोडणार नाही,” तो म्हणाला, “अलेक्झांड्राला हे कळलंच पाहिजे. हे असलं कोण डोक्यात भरवतं..थांब मला सापडू दे तो कार्टा..”

“जॅककाका, मला एक वचन दे नं, प्लीज. तू अॅटीकसला यातलं काही सांगू नकोस. तो..तो कधी नाही ते मला म्हणाला होता की, माझ्याबद्दल कोणी काहीही म्हटलं तरी भडकू नकोस. त्यापेक्षा आम्ही कोणत्यातरी वेगळ्या कारणावरून भांडत होतो असं त्याला वाटलं तर बरंय. दे नं वचन..”

“पण असं वाट्टेल ते बोलूनही फ्रान्सिस मोकळाच सुटेल .. ते काही मला बरोबर वाटत नाही..”

“असा सुटला नाहीच तो.. माझ्या हाताला मलमपट्टी करशील? अजून थोडंथोडं रक्त येतंय.”

“हो गं बाळा. तुझ्या नाही तर आणखी कोणाच्या हाताला मलमपट्टी करणार मी?”

जॅककाका अगदी अदबीनं कंबरेत वाकून मला न्हाणीघरात घेऊन गेला. माझी बोटं स्वच्छ करून त्यांना मलमपट्टी करत असताना त्यानं मला एका म्हाताऱ्या माणसाची एक गमतीशीर गोष्ट ऐकवली. त्याला लांबचं मुळीच दिसत नसतं आणि त्याच्याकडे हॉज नावाची एक मांजर असते. शहराकडे जाताना वाटेत ते मांजर रस्त्यावरच्या सगळ्या भेगा मोजत जातं. “झालं हं,” तो म्हणाला. “लग्नाची अंगठी घालायच्या तुझ्या बोटावर आता कायमची खूण राहणार. चांगल्या घरातल्या बाईला शोभणार नाही अशी.”

“थँक्यू. जॅककाका?”

“काय बाईसाहेब?”

“रांड म्हणजे काय?”

जॅककाकानं आणखी एक मोठ्ठीच्या मोठ्ठी गोष्ट सांगायला सुरुवात केली. एक म्हातारा पंतप्रधान असतो. तो त्याच्या कचेरीत बसून पिसं उडवत असतो. त्याच्या आजूबाजूची माणसं वैतागतात तरी त्याला ती पिसं तशीच हवेत तरंगत ठेवायची असतात. तो बहुधा माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत असावा पण त्याची बडबड काही केल्या समजत नव्हती.

त्यानंतर माझी झोपायची वेळ उलटून गेल्यावर कधीतरी मी पाणी प्यायला म्हणून खाली गेले. बाहेरच्या खोलीतून मला अॅटीकस आणि जॅककाकाच्या बोलण्याचा आवाज ऐकू आला.

“अॅटीकस, मला वाटतं मी लग्नच करू नये.”

“का?”

“लग्न केलं तर कदाचित मला मुलं होतील.”

अॅटीकस म्हणाला, “अरे वा, तुझं आणखी बरंच शिकायचं राहिलंय.”

“हो ना. तुझ्या पोरीनं आज दुपारी मला पहिला धडा दिला. ती म्हणाली की तुला मुलांचं फारसं काही कळत नाही आणि तसं का तेही सांगितलं. तिचं बरोबरच होतं रे. अॅटीकस, मी तिच्याशी कसं वागायला हवं होतं ते सांगितलं तिनं मला. छ्या, मी उगाच रागावलो तिला.”

अॅटीकस गालातल्या गालात हसला. “तिनं ओढवूनच घेतलं होतं ते. त्याचं एवढं वाईट वाटून घेऊ नकोस.”

जॅककाका आता अॅटीकसला आपली बाजू सांगतो की काय असं वाटून मी जीव मुठीत धरून वाट बघत राहिले. पण त्यानं तसं काही केलं नाही. तो नुसताच पुटपुटला, “कसल्या कसल्या शिव्या शिकून येते. पण जे बोलते त्यातल्या अर्ध्याअधिक शब्दांचे अर्थच माहीत नसतात तिला. मला विचारलं, रांड म्हणजे काय म्हणून..”

“सांगितलंस का मग ?”

“ नाही. मी तिला लॉर्ड मेलबर्नची गोष्ट सांगितली.”

“जॅक ! एखाद्या लहान मुलानं काही विचारलं तर कृपा करून त्याला त्या प्रश्नाचं उत्तर देत जा. स्वतःच्या मनानंच काहीतरी रचत जाऊ नकोस. मुलं शेवटी मुलंच असतात पण खोटं बोललेलं मोठ्या माणसांपेक्षा मुलांच्या चटकन लक्षात येतं. आणि असं खोटं वागलं की मुलांचा फार गोंधळ उडतो. नाही,” बाबा विचार करत म्हणाला, “आज दुपारी तू केलंस ते बरोबर केलंस पण त्यामागचं कारण चुकीचं होतं. शिवराळ बोलण्याच्या टप्प्यातून सगळीच मुलं जातात. तसं केल्यानं आपल्याकडे कोणीही जास्तीचं लक्ष देत नाहीये हे कळलं की ती भाषा आपोआप सुटते. पण तापटपणाचं मात्र तसं नाही. स्काऊटला डोकं ठिकाणावर ठेवायला शिकायलाच पाहिजे. पुढल्या काही महिन्यात तिच्या समोर जे वाढून ठेवलंय ते बघता ती लवकरात लवकर ते शिकली तर बरं. जमतंय म्हणा तिला हळूहळू. जेमही मोठा होतोय आणि ती बरचंसं त्याच्यासारखं वागायला बघत असते. अधूनमधून जरा तिला मदत लागते इतकंच.”

“अॅटीकस, अरे तू तर कधी तिच्यावर साधा हातही उगारत नाहीस.”

“हो ते खरंय. अजूनपर्यंत तरी नुसता धाक दाखवून माझं काम भागलंय. जॅक, तिच्यापरीनं ती माझं ऐकत असते. अर्ध्याअधिक वेळा तिला झेपत नाही ते, पण ती प्रयत्न करते.”

“हे काही उत्तर नाही काही.” जॅककाका म्हणाला.

“नाही ना. खरं उत्तर असंय की, ती प्रयत्न करते हे मला माहीत असल्याचं तिला माहितेय. त्यानंच तर फरक पडतो. तिला आणि जेमला लवकरच काही वाईट गोष्टी समजावून घ्याव्या लागणारेत. जेमच्या शांत राहण्याची मला एवढी चिंता वाटत नाही. पण अपमान झाला तर स्काऊट मात्र चटकन कोणाच्याही अंगावर धावून जाते..”

जॅककाका आता दिलेलं वचन मोडणार म्हणून मी थांबून राहिले. तरीही तो काही बोलला नाही.

“अॅटीकस, तो सगळा प्रकार कितपत तापदायक असणारे? त्याबद्दल बोलायला फारसा वेळच मिळाला नाही.”

“प्रकरण खूपच वाईट आहे. एवेल्सविरुद्ध त्या काळ्या माणसाचा शब्द सोडून दुसरं काहीही नाही. आणि पुरावा विचारशील तर हा म्हणणार तू गुन्हा केलास आणि तो म्हणणार मी गुन्हा केलेला नाही. इतकंच. पंच एवेल्सविरुद्ध टॉम रॉबिन्सनचा शब्द प्रमाण मानतील अशी आशाच नको..तू ओळखतोस एवेल्सला?”

जॅककाका हो म्हणाला. त्याला ते आठवत होते म्हणे. त्यानं अॅटीकसकडे त्यांचं वर्णनही केलं पण अॅटीकस म्हणाला, “तुला त्यांच्या मागच्या पिढीतले लोक आठवतायत. अर्थात, आत्ताच्याही पिढीतले तसलेच आहेत म्हणा.”

“तू काय करणारेस मग आता?”

“तिथे जायच्या आधी पंचांचं मन वळवायचा प्रयत्न करावा असं मला वाटतंय..मला वाटतंय अपील केलं तर आपल्याला बऱ्यापैकी संधी आहे. आत्ता मी तसं काहीच सांगू शकत नाही जॅक. तुला सांगू, असला खटला आयुष्यात कधी माझ्यासमोर आला नसता तर बरंच झालं असतं. पण जॉन टेलरनं माझ्याकडे बोट दाखवून सांगितलं, “तूच घ्यायचास हा खटला.”

“हा अनुभव नाही मिळाला तरी चालेल, असंच वाटत होतं ना?”

“हं. तसंच. पण तसं झालं असतं तर मला माझ्या मुलांना तोंड दाखवता आलं असतं का? जॅक, पुढे काय होणार हे माझ्याइतकंच तुलाही माहितेय. मी एवढीच प्रार्थना करतोय की, मला जेम आणि स्काऊटला कोणत्याही कडवटपणाशिवाय यातून बाहेर काढता यावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेकोम्बचा खास रोग त्यांच्या पाठीशी लागू नये. निग्रोंशी संबंधित काहीही असेल तरी एरवी भली वागणारी माणसं पिसाटल्यासारखं का करायला लागतात हे मला काही केल्या समजत नाही..ते समजल्याचा आवही मला आणता येत नाही..मला एवढीच आशा आहे की, गावभरचं ऐकत बसण्यापेक्षा जेम आणि स्काऊट त्यांचे जे काही प्रश्न असतील ते मला येऊन विचारतील. त्यांचा माझ्यावर पुरेसा विश्वास असावा..जीन लुईस?”

मी दचकले आणि कोपऱ्यातून डोकं बाहेर काढून म्हणाले, “काय बाबा?”

“जा जाऊन झोप.”

मी घाईघाईनं खोलीत पळाले आणि झोपून गेले. मला दिलेलं वचन पाळून जॅककाकानं फार मोठा दिलदारपणा दाखवला होता. पण मी ऐकत असल्याचं अॅटीकसला कसं कळलं ते काही केल्या मला समजलं नाही. त्यानं बोललेला प्रत्येक शब्द मी ऐकावा अशीच त्याची इच्छा होती हे कळायला मला पुढे बरीच वर्षं जावी लागली.

टू किल अ मॉकिंगबर्ड ही हार्पर ली या अमेरिकन लेखिकेनं १९६० साली लिहिलेली पुलित्झर विजेती कादंबरी. कादंबरीत वर्णन येते ते १९३० च्या दशकातले. ही कथा आणि त्यात येणारी पात्रं लीच्या लहानपणाच्या अनुभवावर आणि निरीक्षणावर बेतलेली आहेत. ती साधारण १० वर्षांची असताना अलाबामा राज्यातल्या मन्रोव्हील नावाच्या तिच्या गावात घडलेल्या एका घटनेभोवती ही कथा फिरते.

स्काऊट नावाच्या एका सहा वर्षाच्या मुलीच्या दृष्टीकोनातून आपण ही गोष्ट ऐकतो. तीसच्या दशकातली जागतिक आर्थिक महामंदी, वर्णद्वेष, बलात्कार अशा गंभीर विषयांची पार्श्वभूमी असूनही नर्मविनोदी शैलीतल्या या कादंबरीनं झपाट्यानं लोकप्रियता मिळवली आणि आधुनिक अभिजात वाङ्मयात स्थान मिळवलं.

दक्षिण अमेरिकेतल्या मेकोम्ब नावाच्या एका निवांत काल्पनिक गावातली माणसं, त्यांच्या वागण्यातले बारकावे, स्काऊट, तिचा भाऊ जेम आणि त्यांचा मित्र डील यांचे निरागस खेळ आणि निरीक्षणं, हळूहळू तो निरागसपणा संपत जाऊन त्यांना येत जाणारी समज, स्काऊट आणि जेमचा वकील बाप अॅटीकस, त्याचं आपल्या मुलांबरोबर असलेलं नातं, त्याची न्याय्यी वृत्ती, दक्षिण अमेरिकेतले गोरे शेतकरी आणि काळे मजूर ह्यांचे परस्परसंबंध, आर्थिक महामंदीची झळ बसल्यानं आलेली भयंकर गरिबी अशा कितीतरी गोष्टी या कादंबरीतून समोर येतात.

हार्पर ली या लेखिकेची ही पहिली आणि एकमेव कादंबरी. त्याचा पहिला खर्डा तिनं ‘गो सेट अ वॉचमन’ या नावानं लिहिला होता. दोन वर्षापूर्वी तिच्या निधनानंतर तो प्रकाशित करण्यात आला.  

आश्लेषा गोरे पुण्यात वास्तव्यास असून त्यांनी केलेली मराठी भाषांतरे प्रकाशित झाली आहेत.  वाचन, भाषाभ्यास आणि नाटक यामध्ये त्यांना रुची आहे.

टू किल अ मॉकिंगबर्ड च्या भाषांतराचा पहिला भाग इथे वाचू शकता.

टू किल अ मॉकिंगबर्ड च्या भाषांतराचा दुसरा भाग इथे वाचू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *