जानेट आयशी
अनुवाद: आशुतोष पोतदार

अंधारातील आवाज

back

आपल्या समोरच्या अंधारात बसलेल्या लोकांसाठी कवी आपली कविता सादर करतात. कवितेची छापील वा लिखित प्रत हातात न घेता कविता सादर केल्या जातात. कविता पाठ करून, ती आठवून सादर केली गेल्याने कविता समजून घ्यायला, कवितेवर जीव लावायला मदत होते. खरंच होते? दामून-दामटून, आठवून कविता सादर करणं कटकटीचं होत असेल? कविता आवडत नसतानाही शाळकरी मुलांना ती पाठ करून म्हणायला सांगण्यानं किंवा अति-पाठांतरानं वा अनिच्छेनं केलेल्या काव्यवाचनानं कवितेबरोबर सलगी होऊ शकते? पाठांतराचा कवितेतून व्यक्त झालेल्या भावविश्वावर कोणता प्रभाव पडतो? 

पहिला आठवडा – निरवतेच्या आधीचे भोंगे 

न वाचता येणा-या हस्ताक्षरात लिहिलेल्या कविता माझ्या खोलीच्या छ्प्पराला थडकून परत माझ्या मेंदूवर आदळत राहिल्या.  खुंट्याला बांधलेल्या बक-या विनाकारण गोल-गोल फिरतात किंवा सूडाच्या भावनेनं कैदी मागे पुढे करत राहातात तसे मी आणि सोफी शहरभर चक्करा मारत राहिलो. काहीतरी घडण्याची वाट पाहा. होणा-या वाचनासाठी माझ्या आठवणीतल्या पंधरा ते वीस मिनिटांचं नेपथ्य मला हवं आहे. मी कविता सादर करते. पण, या क्षणाला मी जाम घाबरून गेलेय. वाचनासाठीचा दिवस जसजसा जवळ येईल तसे पोटात गोळे येण्याची फिलींग वाढतच चाललीय. धडपडत मी स्वतःला उठवून बसवते आणि बरीच वाचली गेलेली माझी कविता मी मोठ्यानं म्हणायचा प्रयत्न करते. ही कविता माझ्या एकदम जवळची आहे असं मी मानते.  हातपाय मारत, कवितेच्या खोलवर पोहोचत मी कविता म्हणत राहाते. खोलीभर फिरत पावलागणिक आपल्या कवितेचा ताल पकडणा-या बायरनच्या पावलांप्रमाणे कवितेतलं संगीत मी शोधण्याचा प्रयत्न करते.

मला शरीराच्या हालचालीपेक्षा बोलण्यातले अल्गोरिदम लक्षात येऊ लागले. मला गतीचं हे स्वातंत्र्य आवडतं.  गायलं जाणारं गाणं तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवता. सततच्या पुनरावृत्तीमुळे शब्द फिरुन-फिरुन तुमच्याकडे येत राहातात. रेडिओवरचं गाणं तुमच्या मनात ठसून राहातं. एखादी बाब, काही शब्द, तुम्हाला आवडत नसतानाही तुम्ही लक्षात ठेऊ शकता. आवडत नसलेलं गाणं कानावर सततच्या आदळण्यानं ते आपसूक चिकटून जातं. तर मग, ज्याच्याबद्दल तुम्ही उत्कट आहात ती बाब सहजतेने तुमच्या लक्षात राहिलच! पण, कविता पाठ करण्याच्या दबावाने, माझाच आवाज परत परत ऐकण्याने मी दमून जातेय. मीच लिहिलेलं, काही मिनिटांसाठी वाचायचं असलं तरी, मलाच आवडतं काय अशी शंका मनात येऊ लागलीय.

घोकंपट्टीने आणि मोठ्या आवाजात कविता म्हणण्यानं माझ्या उत्साहात वांझपणा येतोय असं वाटू लागलं. जस-जसं मी वाचत जाऊ लागले तस-तसं ते फील होणं कमी कमी होऊ लागलं. एखादा मंत्र वा एखादी प्रार्थना सततच्या म्हणण्यानं अधिक जोरकस होते. पण, कविता वाचत जाऊ तसं ओळींमधली ताकद आपण गमावत चाललो आहे असे वाटू लागतं.  माझी सहनशीलता संपत चालली आहे. अधल्या-मधल्या एक दोन ओळी मी विसरेन की काय या भीतीने तळमळत राहाते.

पॉप आणि रॉक स्टार्स सळसळत्या उत्साहानं वर्षानुवर्षे आपल्या प्रेक्षकांसमोर कसे खेळत राहात असतील? अशा वेळेला, कलाकाराला आपल्या इगोवर मात करायची असते काय? आपल्याच कवितेचं पाठांतर करतो म्हणजे आपण काय करत असतो? आपल्या ऐवजी इतरच कुणी बोलून आपल्याच आठवणी आपल्या पुस्तकातल्यापेक्षाही आपण अधिक घनदाट करत असतो?  या बुक-फेस्टिवलनंतर मला या कवितांकडे काहीकाळ तरी पुन्हा बघायचं नाही. खरं तर, स्वतःला छापील शब्दांपासून बाजूला टाकून मला ताजं, स्वतःला चकित करेल असं काहीतरी लिहायची माझी इच्छा आहे.

कविता सादर करताना भवतीच्या अंधारात मी कशी असेन हे विचारायला आणि विसरायला नको म्हणून कवितेतल्या ओळी हातावर लिहून घेऊन वाचता येतील काय हे विचारण्यासाठी कार्यक्रमाची व्यवस्थापक बेकी फींचमला मी ई-मेल पाठवते. तिच्या उत्तराची वाट पहात राहाते तशा स्वतःबद्दलच्या शंका अधिक गडद होत जातात.  मी तिला लिहिते की पाठ केलेल्या कवितांचा हा माझा पहिलाच प्रय़ोग असेल. तिला मी हेही सांगते की तू टेन्शन घेऊन नकोस! पण जसे दिवस सरकू लागतात आणि तिचे उत्तर येत नाही तसे मला वाटू लागतं की तिला टेन्शन आलंय आणि तिच्या टेन्शनमुळें मलाही टेन्शन आलंय. प्रयत्न करूनही टेन्शन जात नाहीय. पण, वाचन  होईपर्यंत फींचम माझे टेन्शन दूर करायचा प्रयत्न करते.

दुसरा आठवडा

न्यू कासलमधल्या सोफीच्या होस्टेलमधे मी तीन रात्री राहतेय. ऑल सेन्ट्स सेमेट्रीच्या बरोबर मधोमध हे होस्टेल आहे. गुड मॉर्निंग डेथ!  प्रॅक्टिस करायला परिपूर्ण जागा. एकमेकात अडकलेल्या झाडांप्रमाणे मेलेले आणि जिवंत इथे लगटून पडलेयत आणि शहर आपले नावही विसरुन गेलंय. हाडामांसाच्या आयुष्याची निरर्थकता जिथं आपल्या पावलांनी विस्कटलेल्या मातीचा आरसा बनते, असं काहीसं. मला कविता घोकायच्यात पण माझं मन मला सांगतंय की मला स्वस्थ झोपायला हवं. मी ध्यान करायचा प्रयत्न करते, मनासमोर कवितेच्या ओळी आणायचा प्रयत्न करते आणि बेहोशीच्या खोल तळाशी त्यांना छापून ठेवते.

कवितांना अजून कसं माझ्यासाठी राखून ठेऊ? गिळून टाकू औषधाच्या गोळ्यांप्रमाणे? माझ्या आठवणींमधे श्वासातून शिरू देऊ त्यांना जेणेकरुन त्या मंद लयीत प्रेक्षकांच्या कानाभोवती रेंगाळत राहातील. मुलं माझ्या आईबरोबर सुट्टीवर गेलीयत. मागून घेतलेल्या या उसन्या तासांबरोबर मला काहीतरी निर्माण करायचंय. पण, मी स्वतःवर जास्तच लक्ष ठेऊन आत-आत शिरत चाललेय. मला स्वतःलाच बांधून घ्यायचं आकर्षणय. म्हणजे, बाहेरची गद्य-भूतं आपल्या स्वप्नांपर्यंत येण्याचं धाडस करत नाहीत. मला डोळ्यावरची पट्टी मोकळी सोडून झोपायचंय कारण इथं अंधार तळमळत राहातो आणि जसं आपलं अंग आपण सैल करतो तसं आपली त्वचाही हलकी-हलकी निसटू लागते.

रंगमंचावरल्या कावळ्य़ा-अंधाराची मी कल्पना करतेय. म्युझियममधे शिरल्यावर लहान मुलाला तिथल्या वस्तूंना हात लावून त्यांच्या खरेपणाची खात्री करुन घ्यावी लागते. तसंच मला आता वाटतंय. कदाचित, त्या दिवशीच्या प्रोसेनियमच्या अवकाशातील माझ्या आकृतीच माझं आस्तित्व असेल. किंवा, रिकाम्या खुर्च्यांतून ऐकू येणारा प्रतिध्वनी वा बुक फेस्टिवलची लोकप्रियता ध्यानात घेता काळ्य़ा कुट्ट अंधारात आवाजांची खुसफूसही माझ्या प्रयोगाची ओळख ठरेल. जेरीला आणणा-या टेन्शनने आतापर्यंत लक्षात ठेवलंय तेही विसरतेय़ असं वाटतं. आईच्या पर्समधनं शांत झोप आणणारं औषध चोरावसं वाटतंय. धडधडत ठेवणारा निद्रानाश आणि मीच लिहिलेले साधे, सोप्पे शब्द मला जमवता येत नाही याचा राग. मी दुःखी नाही पण मी एकदम अडकत चाललेय. इम्यॅन्युएल कांट म्हणतो, “वेडा मनुष्य जागा होऊन स्वप्ने पाहाणारा असतो”, पण, आता ’वेडी बाई जागी होऊन कविता पाठ करू लागते’ असं काहीसं झालय. 

तिसरा आठवडा

मी द एडिंबरा इंटरनॅशनल बुक फेस्टिवलमधे जाते आणि ऑथर्स यर्टमधे मी चक्कर टाकते. तिथली जागा, फुकट मिळणारी तिकिटं, मला मिळालेल्या पासमुळे मिळालेला प्रवेश, ऐकू येणारे ‘हाय-हॅलो’ आणि कॉफीबरोबरच्या लेखकमंडळींकडून ऐकलेल्या,  बेलगाम बाता, मुखपृष्ठावरुन पुस्तकाचं मुल्यमापन करणारे एंजट आणि त्यांचे गडगडाटी हसणं.

मी एका कोप-यात बसून आहे. आठवेल ते माझ्या नोंदवहीत लिहून घेतेय. केविन विलियम्सला कधी मी पुस्तकात बघून कविता वाचताना पाहिलं नाही. त्याला काही ट्रिक्स माहिती असणार.  मलाही जमेल. मोठ्यानं कविता म्हणत मी त्या सलग लिहून काढते. मनात येणारे शब्द न थांबता सलग कागदावर उतरू लागतात. कविता लक्षात राहू लागतात! आता मी स्वस्थ बसलेय. नाकाशी रेंगाळणारा देवदार वृक्षांचा वास, गोड पॅस्ट्रिज आणि यर्टच्या कापडांमधून पाझरणारा सूर्यप्रकाश इथल्या इवल्याशा दिव्यांवर जादू करतोय. 

चौथा आठवडा

प्रयोगाच्या आदल्या रात्री मी दि ऑथर्स यर्टपर्यंत चालून आले. बरोबर रिहर्सल केलेल्या कविता डोक्यात नीट ठेवल्या होत्या. रस्त्यात त्या कविता कुठेतरी हरवून जाण्याची भीती होती किंवा त्यातल्या काही, मी जाऊ दिलं तर, कानातून गळून पडतील काय अशी धाकधूक होती.  मी ज्यांच्याबरोबर कविता सादर करणारे होते त्या बाकीच्या तीन कवींना भेटले.  कवितांची उजळणी करण्यासाठी कॅथेरिन स्मिथ कशी कपड्याच्या कपाटाभवती घुटमळत असते हे तिच्याकडून ऐकून झाले. अन्ड्र्यु मॅकमिलनने त्याच्या नव्या पुस्तकाचा उल्लेख केला आणि ते पुस्तक त्यानं मागच्या खिशात घुसवून ठेवलं (आयत्या वेळी तो कविता विसरला तर प्रॉम्प्टिंगसाठी असावं म्हणून). एम्मा जोन्स कुठंतरी गायब होती. थिएटर मधे आत जाताना भेटली. ती बाजूला जाऊन शांतपणे आपल्या कविता वाचत बसली.

आमची इव्हेंट मॅनेजर सुंदर होती. तिचं स्मित हास्य, उत्साह, उपजत व्यवहारज्ञान, परत-परत धीर देणं आणि तिचा जादूई वावर यात ती दमून जाऊन धापा टाकू लागली होती. तिनं आम्हाला एकत्र जमवलं आणि आमच्यात एकीतलं धैर्य आणलं. जिथं प्रयोग होणार होता तिथं पूर्ण अंधार होता पण इतकाही नव्हता कारण मला  माणसांच्या आऊटलाईन्स दिसत होत्या. क्षणभरासाठी उंदरं तुरुतुरू धावताय़त अशीही शंका आली. सरतेशेवटी, छप्परावर पाऊस पडण्याचा आवाज येऊ लागला आणि माझ्या कवितेतील  ‘from downpour to spittle, great floods to bleaching drought, what do we really take from these moments of closeness?‘ त्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर अजूनही जोरात ऐकू येऊ लागल्या होत्या. हातात कोणताही कागद नसला तरी आवाजाची कंपनं माझ्या हाताला शिरशिरी आणत होती आणि मला भारून टाकत होती.

माझ्या दृष्टीक्षेपाला पकडण्यासाठी काहीच नव्हतं. सादर करणं, नकळत पाय उंचावणं, आणि अंधारात पसरणारा आठवणा-या ओळींचा ताल. मी न अडखळता सारं नीट आठवत गेले.  मी कप्पेला गातीय असं वाटलं आणि माझ्या आवाजानं फुगलेल्या छापील शब्दांची जागा घेतली होती. वेड्यासारख्या कविता आठवून आठवून पाठ केल्याचं सार्थक झाल्याचं वाटत होतं. पाठकरून कविता सादर करण्याची प्रक्रिया वेड लावणारी होती. पाठ झालेल्या कविता कोरून बसल्या आहेत त्या तशाच राहतील की काही काळानंतर डिंक वाळल्यानंतर चिकटपणा निघून जातो तशा त्या निसटून जातील आतून? आपण सगळेच काहीना काही विसरत राहातो. कदाचित, पुढच्या वेळी थोड्या प्रॉम्प्टींगने कविता सहज येत राहतील. द एडिंबरा बुक फेस्टिवलच्या निमंत्रणाची मी मनापासून आभारी आहे.  एका वेगळ्या प्रक्रियेसाठी मला संधी मिळाली. मी नव्या कवितांबरोबर अजून एकदा असा अनुभव घेईन. भाषा आणि भाषा आळवण्य़ाची जादू काही वेगळीच. उच्चारण, गुणगुणणं, गाणं, कविता नजरबंद करून सादर करण्यात नवी ताकद मिळत असते.

जानेट आयशी या स्कॉटिश-अल्जेरियन कवयित्री असून असुन त्या इंग्लडमधे राहातात. New Writing Scotland: Gutter, The Istanbul Review, Magma, Oxford Poetry, Be the First to Like This: New Scottish Poetry (Vagabond Voices, 2014), Out There: Anthology of LGBT Writers (Freight, Glasgow, 2014) and The Best British Poetry 2015 (Salt) अशा विविध नियतकालिके आणि पुस्तकांमधून त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या आहेत.

 

आशुतोष पोतदार नाटककार, भाषांतरकार, कवी आणि संशोधक आहेत. त्यांच्या नाटकांच्या संग्रहाची दोन पुस्तके तसेच भाषांतरे आणि कविता प्रकाशित झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *