मालविका झा

देऊळ

०५

back

छत्तीसगढमध्ये ऑफिसच्या गेस्ट हाऊसच्या जवळ एक छोटी बाग आहे. बरेचदा दिवसभर काम केल्यावर, जे मुख्यत्वे करून बैठकांमधील चर्चा, किंवा कॉम्प्युुटर समोरचं काम असतं, ते झाल्यावर त्या बागेत फिरून पाय मोकळे करणे हा रोजचा कार्यक्रम असतो. बागेकडे जाण्याच्या रस्त्यावर एक छोटं मंदिर लागतं. बागेत चकरा मारता मारता अंधार होऊन जातो आणि मग मागे फिरताना रस्ता कळावा ह्यासाठी मंदिराची खूण सगळे लक्षात ठेवतात. त्यादिवशी, त्या मंदिरावरून परत येताना लक्षात आलं की हे मंदिर खूप शांत असतं. माणसं येतात-जातात, मंदिरात दिवे लावलेले असतात, मुलं आवारात खेळताना दिसतात. आजवर कोठेही मोठे स्पीकर्स वगैरे कधी दिसले नाहीत. अशा ह्या शांत मंदिराकडे पाहता पाहता पुण्यातील लकडीपुलाच्या जवळच्या मंदिराची आठवण झाली.

छत्तीसगढच्या देवळाहूनही बऱ्यापैकी जुनं असं हे लकडी पुलावरचं विठ्ठल मंदिर. साधं सुधं म्हणजे देवळामध्ये फार आकर्षक वाटावं किंवा architectural असं काही नव्हतं. मूलभूत एखादी देवळाची इमारत असते तसं हे देऊळ. देवळाची काही ख्याती नव्हती. त्यामुळे कदाचित फार तामझाम कधी दिसायचा नाही. छत्तीसगढचं देऊळ ज्याप्रकारे खूण म्हणून आम्ही लक्षात ठेवायचो तसं लोकांना घराचा पत्ता सांगताना लकडी पुलावरच्या विठ्ठल मंदिराची खूण सांगायची सवय घरात सगळ्यांना होती. छत्तीसगढच्या मंदिरात कोणता देव होता किंवा देवी ह्याचा मी कधी विचार केलेला मला आठवत नाही आणि खरं सांगायचं तर आता त्याची गरजही कधी वाटत नाही. देवळांबद्दलचं आकर्षण वाटतं ते एक तर त्याच्या ऐतिहासिक, architectural महत्त्वामुळे आणि दुसरं म्हणजे अशा पुरातन देवळाच्या शांततेमुळे. देवळातील शांतपणा खूप लहान असल्यापासून सोबत राहिला आहे, ती सोबत जी सुरु झाली ती ह्या विठ्ठल मंदिराच्या पासून.

हे विठ्ठल मंदिर किती जुनं आहे कल्पना नाही पण माझ्या इतकं म्हणजे ४४ वर्षं जुनं तरी नक्की आहे. लहानपणी शाळेत जात असताना रोज हे मंदिर लागायचं, आणि मंदिरावरून जाताना विठ्ठल रखुमाईच्या पाया पडून जाणं हा रोजचा पायंडा होता. मंदिरातील पुजारी ओळखीचे झाले होते. एखाद्या दिवशी जमलं नाही तर दुसऱ्या दिवशी विचारायचे, “शाळा बुडवली का काल? आली नाहीस ते?”

मी पंचविशीत येता येता नास्तिक झाले. पण ह्या लकडीपुलाच्या विठ्ठल मंदिरा बरोबर एक वेगळं नातं आजही जाणवत राहातं.
माझ्या शाळेच्या दिवसात मुलींमध्ये एक फॅड होतं. आठवड्यामध्ये प्रत्येक वार ज्या देवाचा, त्याच्या दर्शनाला जायचं. त्यापाठीमागे त्या त्या देवाच्या देवळात भक्तिभावाने जाणं कमी आणि घराबाहेर फिरून येण्याचा मोह अधिक असायचा. साहजिकच होतं ते आणि अजिबात वावगं नव्हतं कारण आम्ही सगळ्या मराठी माध्यमाच्या आणि ‘मुलीं’च्या शाळेत होतो. ह्या देवळात जाण्यातून कित्येकांचे संसार उभे राहिले. पण ते असो. मी पण जायचे बरेचदा देवळात, पण विठ्ठल मंदिरात जाताना माझ्या बरोबर कोणी नसावं असं मला वाटायचं. मंदिराच्या आत येताना असणारी घंटा किंवा गाभाऱ्यातील घंटा मी कधी वाजवली नाही, कारण वाटायचं ती घंटा सुंदर शांततेला भंग करते. इतर मंदिरात येणारी माणसं रीतीप्रमाणे वाजवायची, पण मी दुर्लक्ष करू शकायचे. वर्षभरातून कधीतरी ह्या मंदिरात रात्री भजन म्हणणारी मंडळी यायची. त्यांच्यातील काही जण अतिशय बेसूर गायची. असं वाटायचं जाऊन सांगाव कुठे कुठे सूर गेला ते. पण नंतर हसू यायचं, विठ्ठलाला कुठे येतं ऐकायला. बरं आहे ह्याचं.

रोज मंदिरात गेल्यावर मी आत जाऊन पहिली विठ्ठल आणि रखुमाई कडे बघून “hi विठ्ठल” म्हटल्यासारखं हसायचे. मग दोघांच्या पायाला स्पर्श करून डोकं ठेवून बराच वेळ तशीच असायचे. त्याच्या पायाचा थंड, तेलकट, दगडी स्पर्श, थोड्यावेळानी उबदार वाटायचा. मग परत त्यांच्याकडे पहात त्या गाभाऱ्यात बसून रहायचे. कधी डोक्यातील प्रश्न मुद्दामून त्यांच्यासमोर पुन्हा पुन्हा मांडत राहायचे आणि रोज प्रश्न विचाराचे, हे सगळं माझ्याच आयुष्यात का? उत्तर अर्थातच मिळायचं नाही विठ्ठलाकडून किंवा त्याच्या बायकोकडून. पण मी त्यांच्याकडे जाणं खूप दिवस सोडलं नाही. सगळेजण म्हणायचे की मुलींनी पाळीच्या दिवसात देवळात जायचं नसतं, देवाला स्पर्श करायचा नसतो म्हणून तेव्हा चार दिवस मी जायचे नाही. नाहीतर फार कमी वेळा असं झालं की मी देवळात गेले नाही.

आमचं घर आईच्या वडिलांनी बांधलेलं आहे. त्यांना मुलगा नाही झाला मग स्वतः च्या मुलींसोबत राहता यावं म्हणून एका मोठ्या बंगल्यात चार चार खोल्यांची घरं प्रत्येक मुलीच्या कुटुंबासाठी बांधली. पण दुर्दैवाने कोणाचंच कोणाशी पटेना. त्यामुळे लहानपणापासून ताण, भांडणं घर करून बसली होती. ह्या मावश्या, मावस भावंडं ह्यांच्या भांडणांमधून जाता जाता स्वतःचं असं वेगळं लहानपण किंवा अस्तित्व फारसं अनुभवायला मिळत नव्हतं. सगळेच इतके त्रस्त की माझ्याकडे किंवा माझ्या भावंडांकडे पाहून एवढंच म्हणलेलं आठवतंय की घाबरू नकोस. पण भीतीचं उत्तर नाही मिळायचं. मग खूप भीती, ताण जाणवल्यावर ह्या विठ्ठलासमोर रडारड केली की वाटायचं की मला जे वाटतंय ते सगळं इथे नीट मांडता येतं. ह्या सगळ्या गदारोळात हळूहळू विठ्ठलाची सवय होतं गेली.

छायाचित्र सौजन्य: ज्योती भट

एक खास आठवण ह्या विठ्ठलाच्या नात्याला अजून मानवी करणारी आहे.

आमची आई डेक्कन कॉलेजमध्ये शिकवायची. सकाळी साडे दहाला जायची आणि साधारणपाने सहा साडे सहा पर्यंत घरी यायची. एकदा असं झालं की काही कारणाने तिला यायला उशीर झाला. साडे सात वाजले तरी आई घरी आलेली नव्हती आणि हे लक्षात आल्यावर, माझं धाबं दणाणलं होतं. घरातून बाहेर रस्त्यावर येऊन सारखी आई दिसतीय का बघत उभी राहत होते, आई दिसली नाही की परत हिरमुसून घरी आत जात होते. आठ वाजून गेल्यावर देखील जेव्हा आई आली नाही, तेव्हा घरातून एका बुट्टीत तेल घेतलं आणि विठ्ठलाकडे गेले, त्याच्या समोर ठेवलेल्या पणतीमध्ये ओतलं आणि त्याच्या पायावर डोकं ठेवून हमसून हमसून रडले. ‘प्लीज, प्लीज’ म्हणत राहिले. पंधरा वीस मिनिटानंतर बाहेर पडून घरी आले तर आई दिसली आणि खूप हायसं वाटलं. फिल्मी पद्धतीने मिठीमारून रडणे इत्यादी प्रकारचे संबंध कधीच आम्हा माय लेकींचे नव्हते. एवढंच विचारलं, का उशीर झाला. आई बिचारी खूप दमून मीटिंग करून आली होती, म्हणाली, “झाला खरा खूप उशीर. काळजीत होतीस का?”. तिनं ओळखलं असेल माझ्या अवतारा वरून. मी देखील म्हणाले, “हो, खूप भीती वाटतं होती, मग देवळात जाऊन विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवून आले तर आली होतीस तू तोपर्यंत.” आई हसली आणि जेवण बनवायला घेतलं. मला पण सगळं पूर्ववत झाल्यामुळे एकदम मस्त वाटायला लागलं होतं. मग लक्षात आलं कि माझी सॅनिटरी पॅड बदलायची वेळ झाली आहे. लगेच ते बदलून टाकलं आणि एकदम भीती दाटून आली. मग मात्र रडू फुटलं आणि आईकडे गेले. तिला सांगितलं, “ अगं, मी माझी पाळी चालू असताना देवाच्या पायावर डोकं ठेवलं, आता?” आई हसली आणि म्हणाली, “एवढं काय झालं, त्याला माहित आहे पाळी म्हणजे काय आणि त्यांनी देवाला काही होतं नाही, माणसांचंच असतं हे खूळ.” हुश्श झालं मला. त्यानंतर कधी मला पाळीमुळे विठ्ठल मंदिरात जायचं की नाही हा प्रश्न पडला नाही.

आज जेव्हा मी पाठीमागे वळून बघते तेव्हा जाणवत रहातं की माझ्यासारख्या नास्तिक व्यक्तीच्या आयुष्यातील ह्या विठ्ठलाच्या नात्याला काय स्थान आहे.

ह्याचं एक तर सरळसोट, सर्वश्रुत उत्तर आहे, की जेव्हा दुखाःत असह्य वाटतं तेव्हा मानवापेक्षाही एखादी ताकदवान गोष्ट जी सांत्वन करणारी, आधार देणारी असते, तसा हा विठ्ठल होता. खरं आहे, त्यावेळी परिस्थिती अशी होती की ज्या वयात दुःख वाट्याला आलं, त्या वयातील तर्कशुद्ध विचारांनुसार विठ्ठल खूप महत्वाचा बनला. पण ते तेवढंच नाहीये असं वाटत रहातं. विठ्ठल एक असा अवकाश आहे ज्यात स्वतः ला चाचपडणं, शांत करणं आणि पुन्हा उभं रहाणं हे त्याच्या मूकसाथीने शक्य झाले, असं आज फार उत्कटतेने वाटतं.

नास्तिक जस जशी होतं गेले तसं देवळात जाणं बंद झालं. ऐतिहासिक भौतिकवादी दृष्टिकोनातून निर्माण झालेल्या तर्कशुद्ध विचाराची ताकद माझ्यात घर करत होती; जी आजपर्यत जिवंत आहे. सुरूवातीला ह्या ताकदीची चुणूक अनुभवताना, देवभोळी माणस मूर्ख आणि अडाणी वाटायची. वाद घालत त्यांना नेस्तनाबूत करायला अतिशय भारी वाटायचं. मार्क्स नी Philosophy of Religion ह्या त्याच्या अतिशय प्रसिद्ध लेखात देवाबद्दल एक विधान केले होते ते वाचनात आलं, “ पिचलेल्या, असहाय्य, माणसांच्या मनातून निघालेला हुंकार म्हणजे देव आहे.” इतक्या अचूकपणे देवाबद्दल, माणसावर प्रचंड प्रेम करणाऱ्या व्यक्तीलाच सुचू शकतं. मी मात्र नास्तिकतेला माझा मोहरा बनवून बसले होते.

छत्तीसगढच्या देवळातील शांतता आणि पुण्यातील लकडी पुलावरील विठ्ठल मंदिरातील शांतता किती एकसारखी होती. देव, त्याची देवळं, त्यातील मनःशांती ही संकल्पना सार्वत्रिक होणे साहाजिक आहे, कारण मन उध्वस्त करून टाकणारी परिस्थिती सगळीकडे आहे.

डाव्या जन संघटनांमध्ये काम करणारी कित्येक लोकं देवावर विश्वास ठेऊन असतात. एका बाजूला अत्यंत तळागाळातून संघटनेमध्ये समाज बदलण्याच्या लढाईमध्ये सामील असतात, तर दुसऱ्या बाजूला उपास तापास करत असतात. ह्यावर प्रश्न असू शकतात, की समाज असा आहे म्हणून तर देव नावाची संकल्पना जिवंत आहे, आणि जर अशा समाजाला बदलण्यासाठी प्रयत्न करत असलेली धार्मिक व्यक्ती असेल तर तिचं परिवर्तन होण्याची अपेक्षा तर्कशुद्ध आहे. परंतु, इथं हे बघण्याची गरज मला वाटते, की परिवर्तन घडवून आणण्याची प्रक्रिया देखील बरेचदा अत्यंत हतबल करणारी असते आणि त्यात जेव्हा ताकदीची गरज भासते तेव्हा बरेचदा पुन्हा “विठ्ठल” जवळचा वाटायला लागतो. अर्थात, जर माणसं खूप दिवस ह्या समाज बदलाच्या लढाईत टिकून राहिली तर तो देव नाहीये तर सुंदर दगडाची मूर्ती आहे इथं पर्यंत पोहोचतात. पण ते आतून खूप ताकदीचे असण्याचं लक्षण आहे. मुद्दा असा आहे की ज्यांना देवाची गरज आयुष्यभर वाटत राहाते ते कमकुवत आहेत असं मला म्हणायचं नाहीये, तर, देवाच्या मदतीने उभं राहण्याची धडपड बघणं इथे गरजेचे आहे.

देवाला पर्याय उभे करणे म्हणजे ज्या समाजात देवासारख्या कल्पनेची गरज भासते असा समाजच बदलणे हा आहेच पण जन संघटनांमधून ते सहज शक्य होईल असं माझ्या अनुभवामधून आज तरी म्हणता येत नाहीये. पिचलेपण, गरिबी, अपमान ह्यातून एक खोलवर एकटेपणा निर्माण होतो आणि त्यासाठी, त्या माझ्या विठ्ठलासारखा मूक साथीदार नक्कीच पुरेसा नाहीये हेही तितकंच खरं आहे.

 

मालविका झा या शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. सध्या टाटा ट्रस्ट ह्या संस्थेमध्ये प्राथमिक शिक्षणाच्या (महाराष्ट्र) प्रकल्प अधिकारी म्हणून काम करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *