कथा गिरणगावच्या

०८

back

|| एक ||

रुक्मिणी ऐनापुरे (वय ६९ वर्षे)
(गिरणी कामगार. अन्नपूर्णा महिला मंडळाच्या पुणे शाखेत निरीक्षक म्हणून काम बघतात. वरळी कोळीवाड्यातल्या एका झोपडीवजा खोलीत राहतात.)

माझा जन्म पुण्याजवळच्या खेडयात झाला. वडील वारल्यानंतर आमचे काका त्यांचा घरी घेऊन गेले. मी कधी शाळेत गेले नाही. नंतर नंतर मग आई आणि माझी वहिनी यांच्यात सारखी भांडणं व्हायला लागली. तेव्हा मग आई मला मुंबईला घेऊन आली आणि मिलमध्ये कामाला राहिली. तेव्हा आम्ही मुंबईत असेच कोणा नातेवाईकांच्या घरी राहत होतो.

तसं माझं लग्न बाराव्या वर्षीच झालं, पण वयात येईपर्यंत मी आईबरोबरच राहत होते. म्हणजे सासरी गेले होते मी. इथंच या वरळी कोळीवाडयात ह्यांचं घर होतं. पण नणंद सारखी कटकट करत राहायची की, ही काही काम करत नाही, नुसती बसून असते. म्हणून मी परत आईकडे निघून आले. आई कामाला जायची, तिथली एक मुकादम बाई तिच्या ओळखीची होती. हो. मुकादम असलेल्या बाईला नाईकीण असं नावं होतं. आईने मलासुद्धा कामाला लावायला तिला सांगितलं. ती मला मागावर बसवायची आणि सूत काढायला शिकवायची. तिच्याकडूनच मी शिकले काम. मग तिने मला कामावर ठेवलं. मी आईच्याच मिलमध्ये होते. पण कामावर असताना आई माझ्याशी कधी बोलायची नाही. म्हणायची, `बोलायचं काय असतं. घरी जाऊन बोलू हवं तेवढं. इकडे काम करायला आलो आहोत. तर कामंच करायचं.’ ते लोक कापसाचं वजन करून आमच्या खात्यात पाठवायचे, आम्ही त्याचं सूत काढून परत करायचो. नाईकीण आमच्यावर नजर ठेवून असायची. मशिनी नीट चालतायत का? सगळं व्यवस्थित चालतंय का? हे ती बघायची. मास्तर काय सकाळी आणि संध्याकाळी एक एक फेरी मारायचे. इथली मुकादम नाईकीणच. आमच्या खात्यात सगळ्या स्त्रियाच होत्या. आम्ही साडीवर एक फडकं बांधून घ्यायचो म्हणजे साडी मशीनमध्ये अडकायला नको.

मग एकदा ‘हे’ मला सासरी न्यायला आले. गांधींचा खून झाला त्याच दिवसांमध्ये कधीतरी. मी पहाटे ५.३०ची ट्राम पकडून कामाला जायचे ती संध्याकाळी परतायचे. माझी गिरणीत सात ते पाच अशी शिफ्ट होती. तेलाची गिरण म्हणायचे तिला. मी काय परमनंट नव्हते. टेंपरवारीच लागले होते. मग रोज काम मिळायचं नाही. माझा खूप वैताग व्हायचा. ते लोक स्त्रियांनाच मुद्दामहून असं करायचे. पुरुषांना कधी नाही. त्यांना तर स्त्रिया कामावरच नको असायच्या. कारण बाई म्हटली की तिच्या बाळंतपणाची वगैरे रजा दयावी लागायची. तरी मी पाच वर्षं गिरणीत होते. मग मी ते काम सोडून दिले.

‘हे’ मुधुसूदन मिलमध्ये होते. मी पहिल्यांदा बाळंत झाले त्याच्यानंतर लगेच आम्ही इकडे या वरळी कोळीवाडयातच दुसरी खोली घेतली. आणि वेगळं राहायला लागलो. पाच मुलं झाली मला. दोन लगेच गेली त्यातली. आता तीन मुलं आहेत. ह्यांना प्यायची खूप सवय होती. त्याच्यापायी घरी पैसे पण नीट द्यायचे नाहीत. नाही, तसा बाकी त्रास नव्हता. मारायचे पण नाहीत. पण जुगाराचा नाद होता. त्याच्यात सगळे पैसे उडवायचे. कधीकधी घरात एक पैसा पण नसायचा. कसं भागवणार आणि कसं चालवणार घर? म्हणून मी खाणावळ सुरु केली. आमचे घाटी लोकच होते जेवायला. कोकणी कोण नव्हतं. मी डबे पण पाठवायची तिकडे क्राफर्ड मार्केटला. माझा मुलगा पोहोचवायचा.

एवढया सगळ्यात पोरांना काय शिकवता आलं नाही मला. माझ्या मुलीच्या शाळेतल्या बाई किती सांगायच्या मला की तू शिकव तिला. डोकं चांगलं आहे तिचं. इकडे घरी त्या स्वतः यायच्या सांगायला. पण मी काय करणार. पैसाचं नव्हता त्यांना शिकवायला. सगळा जायचा ह्यांच्या दारूत आणि जुगारात. त्यांचा पगार झाल्यावर आठवडा-आठवडाभर गायब असायचे. अख्खा पगार संपेपर्यंत. मग माझा एक मुलगा एका हॉटेलात कामाला राहिला आणि दुसरा दुकानावर. मुलीला म्हटलं, तू घरीच रहा, माझ्या मदतीला. तिला गाण्याची खूप आवड. तिचाच मुलगा आता गाण्यांना चाली देतो. त्याने आईकडून उचललं. चांगले पैसे मिळवतो.

नंतर ही अन्नपूर्णा संस्था सुरु झाली. प्रेमा पुरवने नोकरी गेलेल्या गिरणी कामगार स्त्रियांसाठी चालू केलेली. त्यांनी आमची परिस्थिती बदलण्यासाठी खूप काम केलंय. मी पण अन्नपूर्णामध्ये जायला लागले. आम्ही बटाटेवडे करून विकायचो सुरुवातीला. महागाई आणि भाववाढीविरुद्ध मोर्चे पण काढलेले आहेत. एकदा मोर्चा घेऊन परळला गेलो होतो. सगळं ट्राफिक अडवून धरलं होतं. प्रेमाताई पुरव होत्या, डांग्यांची मुलगी रोझा होती. हो, मी प्रेमाताईबरोबर डांगेंच्या घरी गेले आहे, रोझाला भेटायला. तेव्हाचा आमचा मोर्चा आम्ही रेशनकार्डवर तांदूळ, रॉकेल वगैरे व्यवस्थित मिळायला पाहिजे म्हणून काढला होता. भरपूर लोक होते तेव्हा. पोलीस आले आम्हांला पकडायला. त्यांनी आम्हांला आधी आझाद मैदानाला नेलं आणि नंतर सोडून दिलं. आधी आम्ही अन्नापूर्णाची सुरुवात प्रेमाताईंच्या घरातूनच केली. नंतर आम्हांला दुसरी जागा मिळाली. तेव्हा आम्ही ऑफिस आणि कंपन्यांसाठी जेवण पाठवायचं काम सुरु केलं.

पण माझा मुलगा वारला अचानकच. हार्टअॅटॅकने गेला. दुसरा मुलगा मिलमध्ये होता. तो पण वारला. तो संपामध्ये होता. त्याला खूप होतं त्याचं म्हणजे संप वगैरे. अटक पण झाली होती एकदा. आणि नंतर नोकरीच सुटली त्याची. माझी सून सुद्धा गिरणी कामगार आहे. मी आता अन्नपूर्णामध्ये सुपरवायझर आहे.

|| दोन ||

शेख जैनू चांद (वय ६३ वर्षे)
(गिरणगावचे शाहीर. शाहीर अमर शेखांचे एकेकाळचे सहकारी. २००६ मध्ये निधन.)

हो तर. मुंबईतल्या दंग्यांबद्दल भयंकरच ऐकलय हो. गिरणगावामध्येच दंगा जास्त झाला. दंगेखोरांना पेटवण्याचं काम इथेच जास्त झालं. म्हणजे बघा, लालबाग किंवा परळ, शिवडी, सैतानचौकी, किंवा एल्फिन्स्टन या भागांमध्ये ते झाले. त्याचं कारण असं की इथले जे मुसलमान लोक होते ते कुठेतरी एका चाळीत एकत्र राहायचे. नाहीतर एखादया वाडीत दहा-पाच घरं असायची. उलट मदनपुरा, महम्मदअली रोड, भेंडीबाजार इथे दंग्यांचा फारसा प्रभाव झाला नाही. तिकडे ते संघटित होते. दुसऱ्या समाजाच्या लोकांना आपल्यामध्ये येऊच द्यायचे नाही. पण इथे त्यांची अशी स्थिती होती की इकडे आड, तिकडे विहीर. त्यामुळे इकडे दंग्यात मुसलमान माणसं मारली गेली. अक्षरशः कुटुंबच्या कुटुंबं गारद झाली.

याचवेळी कामगारांना पठाणांवर बदला घेणं साधता आलं. हे पठाण लोक कामगारांना कर्ज वगैरे द्यायचे आणि गिरणी सुटायच्या वेळी दारात उभे राहायचे. मग जे कर्जदार होते ते म्हणाले, हा सारखा पैसे मागायला येतो म्हणून याला संपवूनच टाका. अशातऱ्हेने मुंबईतला पठाण संपला तो दंगलीमध्ये. त्याच्याआधी तर इतकं होतं की त्या कामगार मैदानाला पठाण मैदान म्हणायचे. कारण गिरणी कामगार सुटले की पठाणाला भेटायची जागा म्हणजे ते मैदान. मग तिकडे कर्ज देणं-घेणं वगैरे सगळं चालायचं. दुपारी साडेतीननंतर रात्री आठपर्यंत पठाणच. सगळे त्या मैदानात आपला पठाणी वेष घालून बसलेले असायचे. हे सगळे एकएकटे राहायचे. कुटुंबं नसायची त्यांची. मग इथल्याच चांगल्या देखण्या बाया, मग त्या महार समाजाच्या असो नाहीतर मराठा असोत किंवा मुसलमान. त्यांच्याशी लग्न करून त्यांना बाटवायाचे आणि आपल्या गावाला घेऊन जायचे. नंतर पठाण गेला तेव्हा सगळ्यांना हायसं वाटलं. अर्थात नंतर असंही वाटलं की च्यायला बरं तरी होतं ते. पैसे हातावर मिळत होते. आज आपल्याला कोणी उभंच करत नाही. मारवाडी काही घेतल्याशिवाय पैसे देत नाहीत. तेंव्हा त्यांना वाटलं हे पठाण उगीच गेले. कारण ते वसुली करायचे आणि ताबडतोब परत व्याजावर कर्ज द्यायचे. खरं तर ते मुद्दल मागायचेच नाहीत. व्याजच मागायचे. तेव्हा मारवाडी या पठाणांना घाबरायचे. पण नंतर मात्र मारवाडयाचा भाव वधारला. ते लोकांना ज्या पद्धतीने नाडू लागले, छळू लागले त्यामुळे कुटुंबच्या कुटुंबं रस्त्यावर आली. अहो, या मारवाडयांचं शहरात भागलं नाही, ते गावाकडेसुद्धा गेले. तिकडे आपल्याला हे मारवाडी दिसतात त्याचं हेच कारण आहे. मुंबईमध्ये नाडले गेलेले कामगार होते त्यांनी आपली गावाकडची घरं त्यांना देऊन टाकली. नाहीतर यांना कोण घर देतं गावामध्ये? तुम्ही सांगा. तुम्हांला एकही गाव असं मिळणार नाही महाराष्ट्रात जिथे मारवाडयाचं घर नाही. माझ्या गावामध्ये तर एक वाण्याची गल्लीच आहे.

आमचं गाव कोतुळ. तालुका अकोला. तिथल्याच एका शेतमजूर कुटुंबात माझा जन्म झाला. आई शेतात मेहनत करायची. वडील मुंबईला बांगडया विकायचा धंदा करायचे. त्यातून चांगले पैसे मिळायचे. महिन्याला ते २५ रुपये गावाला पाठवायचे. आई शेतमजुरी करायची, तिला पाच आणे रोज असायचा. हे सगळं मला वयाचा १०-१२व्या वर्षी कळू लागलं. माझं सहावीपर्यंत शिक्षण गावालाच झालं. त्यानंतर मास्तरांनी माझ्या आईला सल्ला दिला. म्हणाले, इकडे तू याला सातवीपर्यंत शिकवशील. नंतर आपल्या तालुक्यात हायस्कूल कुठेच नाहीये. ते आहे अहमदनगरला आणि हायस्कूल म्हटल्यानंतर तिथे सगळी श्रीमंताची मुलं असतात. त्यात तुझ्यासारखा या मुलाला काही उपयोग होणार नाही. हा शिकला तेवढा पुरे. माझं वयही वाढत होतं ना. शिवाय ती बाकीची माणसं म्हणायची की मुसलमान समाजाची मुलं कुठे शिकतात? तुझा मुलगा शिकून शिकून फारतर मास्तर होईल शाळेचा, हेडमास्तर होईल आणि रिटायर होईल, संपलं. पण तो पुढे काही जाऊ शकणार नाही. मग तेव्हा आमची आई बोलली की शिकण्यापेक्षा जगणं महत्त्वाचं आहे. मग तिने माझ्या मामाला, तो मुंबईला होता, त्याला सांगितलं की तू आता याला घेऊन जा. काय करील ते करील. पण इथे राहिला तर इथल्या पोरांबरोबर बिघडेल. शिकून मिळवलेले गुण धुळीला लावेल. मामाने ते ऐकलं आणि मला इथे आणलं.

मामा पण बांगडीचाच धंदा करायचा. परळला सूर्य सिनेमा होता पूर्वी. त्याच्याशेजारी आदममिस्त्रीची गल्ली आहे. त्या गल्लीत ते राहायचे. तेव्हा सगळे मुसलमान एकत्र राहायचे. कारण दंग्याचा धोका असायचा. ४८ला मोठा दंगा झाला इकडे. त्याच्यानंतर मी लगेचच आलो होतो मी इथे. मालेगाव, भिवंडी वगैरेच्या वस्त्या दंग्यानंतरच उभ्या राहिल्या. आधी सगळे विखुरलेले होते. गिरणगावात कामाठी होते, मुसलमान होते, भय्ये होते. इतर समाजाचे होते. घाटावरचा जो मुसलमान शेतकरी होता तो नाइलाजाने मुंबईत आला होता. याच्या त्याच्या सल्ल्याने, दोस्तीने तो गिरणीत दाखल झाला. तरी पण ते तुलनेने कमीच होते. कारण त्यांना कामाचा अनुभव नव्हता. त्यावेळेला जे कामगार झाले ते मरेपर्यंत कामगारच राहिले. ते गावाला परत गेलेच नाहीत. मुलांनाही कामगार बनवलं. बाकीचे लोक आपलं कुटुंब घेऊन आले त्यांची परिस्थिती आता बदलली. त्यांची मुलं आता वकील, डॉक्टर झाली. मुसलमान समाजात काय की शिक्षण नाही, कामाचा अनुभव नाही, यामुळे आयतं खायची सवय लागलेली. मग उनाडकी कर नाहीतर कोंबडया वीक, अंडी वीक, नाहीतर चोऱ्या करायच्या, दारूचे वाईटसाईट धंदे करून जगायचं कसं एवढाच प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे त्यांना भविष्य राहिलं नाही कालांतराने.

इकडे आलो तेव्हा मी काहीतरी १२-१३ वर्षांचा होतो. म्हटलं काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मामाने परळला एका बांगडीच्या दुकानावर ठेवलं. चाळीस रुपये महिना मिळायचे. त्यातले २०रु० खानावळीला, काही आईला पाठवायचे आणि काही आपले इकडेतिकडे. दंगे थोडे शमल्यावर सगळे एकत्र राहायला लागले होते. खाणावळीतसुद्धा, हिंदू, मुसलमान, बौद्ध वगैरे सगळे एकत्रच जेवायचे. आता विश्र्वास बसणार नाही तुमचा, पण तेव्हा एका एका खानावळीत ४०-५० लोक जेवायचे. एक घाटी बाय होती. तिच्या खाणावळीत मी जायचो. त्यांच्यामध्ये सर्वात कमी खाणारा मीच असायचो. तर मग ती मला म्हणायची की, “काय खातोस रे म्हणे तू, एक भाकरीसुद्धा खाऊ शकत नाहीस!” म्हणाली, “तू असाच जेवत जा. पैसे देऊ नकोस!” कारण बाकीचे कामगार एका वेळेला चारपाच भाकरी खायचे. ती आपली माणुसकी म्हणून बोलली. पण मी तिला पैसे देत राहायचो.

मुंबईत त्या बांगाडीवाल्याच्या इथं काम करताना नाटक-सिनेमे वगैरे खूप बघायचो. त्यावेळी हौशी नाटक मंडळांची खूप नाटकं असायची. कामगार रंगभूमीवरची. त्यात वेगवेगळ्या गिरण्यांतले कामगार काम करायचे. तेव्हा काय की दामोदर हॉल हेच एक थिएटर होतं मुंबईत, दुसरं नव्हतंच. म्हणजे इमारतीमध्ये बांधलेलं असं हे एकच. त्यामुळे त्याचं खूप आकर्षण असायचं. ते थिएटर म्हणजे तुम्हाला सांगतो, एकही दिवस रिकामं नाही. वर्षभर सारखी नाटकं चालू होती. तिथल्या डोअरकीपरशी माझा परिचय झाला होता. त्यामुळे आम्ही इंटर्व्हलमध्ये आत शिरायचो. ते बघून वाटायचं आपल्यालाही स्टेजवर जाऊन असं काहीतरी करायला हवं. तेव्हा बहुतेक ऐतिहासिक नाटकं असायची. मराठयाची मुलगी, मानाचा मुजरा, सिकंदर, तैमूरलंग, वगैरे. याशिवाय गोरा कुंभार, संत ज्ञानेश्वर अशा प्रकारची पण असायची.

बायका? हो, असायच्या. मला आठवतंय त्यात म्हणजे सुमन मेस्त्री, पुष्पा म्हात्रे, सुलोचना कारमासे, प्रभा शिरोडकर, स्नेहलता मांजरेकर अशा होत्या. गिरणगावातल्याच होत्या. हौशी नाटक मंडळातूनच त्या पुढे आल्या होत्या. त्यावेळी हौस म्हणून नाटकं केली जायची. धंदा म्हणून नाही.

कोकणी वस्त्यांतून दशावतार वगैरे व्हायचे. जे घाटावरचे होते त्यांचे ‘तमाशे’ असायचे हॉलमध्ये. तमाशाचं तेव्हा हनुमान थेटर होतं. बांगडीवाल्याचीसुद्धा माझ्या माहितीप्रमाणे चौदापंधरा थिएटरं होती. कामगाराची खरी करमणूक तीच हो. मोठे मोठे तमाशे यायचे. दीपक सिनेमाचा जो नाका आहे तिकडे एक थिएटर होतं, भायखळा मार्केटजवळ होतं. नायगावला केसरबागमध्ये होतं. बांगडीवाल्याने कामगारांच्या मोक्याच्या जागा बघून थिएटरं बांधली आणि भरपूर पैसा कमावला. त्यावेळी तमाशा आणि संगीताच्या बाऱ्यांमधून हजारो लोक आपली उपजीविका करत. पुढे बांगडीवाला शेठ वारल्यावर ते प्रमाण कमी झालं.

त्याच काळात मुंबईत कामगारांचा फार मोठा लढा चालला होता, डांगेंच्या नेतृत्वाखाली. कामगार मैदानातून कामगारांचे मोर्चे निघायचे. मग लाठीमार, अश्रुधूर वगैरे. दुकानातून बघताना मला आश्चर्य वाटायचं की हे लोक चाललेत कुठे? एकदा कामगार मैदानावर एक मोठा समारंभ होता. डांगे भूमिगत होते ते त्या दिवशी प्रकट होणार होते. लोकांना त्यांचं खूप कौतुक. मी तिकडे गेलो तर मैदानावर तुफान गर्दी. एकटाच गेलो होतो. असाच फिरत फिरत गेलो. तर त्या सभेत अमर शेख, अण्णा भाऊ, गव्हाणकर वगैरे मोठयामोठयाने गाणी गात होते. लोक प्रचंड, प्रचंड साथ द्यायचे अशा सभांना तेव्हा. तेवढी एकच युनियन ‌‍स्ट्राँग होती ना. तर अमर शेख गात होते. आठवतं मला ते गाणं अजूनही.

एकजुटीचा नेता झाला कामगार तैयार
बदलाया रे दुनिया सारी, दुमदुमली ललकार

ही गाणी नवीनच पद्धतीची होती. त्यावेळेला मी पाहिलं की अमर शेख म्हणजे सदरा, धोतर घातलेला एक माणूस. अण्णा भाऊ साठे पँट वगैरे घालायचे पण काळाकभिन्न माणूस. गव्हाणकर तेव्हा डंपर वगैरे वाजवायचे. बरं, सगळी गाणी म्हणायची एका सुरात. एका तालात. मार्चिंग पद्धतीची ती गाणी लोकांना आवडायची. कधी लोक सुद्धा म्हणायचे. एक तर सभा अशी झाली होती की सगळी सभाच मिळून गाणं म्हणत होती. हां, तर तेव्हा गाणी चालू होती, आणि डांगे येऊन बसले होते स्टेजवर. कोणाला माहित डांगे कोण ते. एवढासा माणूस बुशशर्ट, पँट घातलेला. एस. जी. पाटकरने जेव्हा जाहीर केलं की ‘आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहतो आहे त्या महान डांगे साहेबांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर याव.’ तर समोर डांगे स्टेजवरच आणि लोकांना माहितीच नाही. तेच उठून स्टेजवर आले आणि हात जोडून म्हणाले, ‘मीच तो श्रीपाद अमृत डांगे.’ आणि तुम्हांला काय सांगू, इतकी फटाक्यांची आतषबाजी झाली. आधी कधीच कोणी इतकी न पाहिलेली. मग त्यांचं भाषण झालं. ते भाषण नव्हतंच, एक कामगार म्हणून बोलत होते ते. ती सभा जबरदस्त झाली. लोकांच्या डोक्यात दुसरा विषय नव्हता. कुठेही जा दुसऱ्या दिवशी हेच. ‘काय हो, तुम्ही डांग्यांचं भाषण ऐकलंत?’ ते मालवणी लोक म्हणायचे, ‘डांगो काय बोललो?’ माझं तर काय झालं होतं त्या सभेनंतर काही कळेना.

ती कलापथकाची गाणी माझ्या डोक्यात राहिली. मी दोन आण्यांचं पुस्तक विकत घातलं. त्याच्यावर बघितलं की गाणी वगैरे बरी आहेत. नाव काय होतं, शिवारी चला. पुस्तक तर घेतलं, पण चाली माहित नव्हत्या. पण ते बघून डोक्यात विचार अला की आपण मुंबईत आलोय, तर काहीतरी केलं पाहिजे. काहीतरी केलं तरच आपण जगू. नाहीतर इतरही जगतात, त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय? डोक्यात सारखं तेच असायचं. त्यामुळे मी दुकानात खाडे करायला लागलो. पोटात दुखतंय वगैरे सांगून आणि सभांना जायचो. तर त्या मालकाच्या लक्षात आलं. हा काही आजारीबिजारी नाही. हा तर साला चाप्टरबाजी करतो. आणि त्याने मला काढून टाकलं. मामाला सांगितलं तर तो म्हणाला, आता तू गावी जा. मी म्हटलं नको, इथेच दुसरं काहीतरी बघतो. पण काहीतरी म्हणजे काय? चोऱ्यामाऱ्या तर करू शकत नाही. खूप विचार केलं आणि ठरवलं, आता गावी जाऊ. तेव्हा मामाच म्हणाला, की तिकडे जाऊन तरी काय करणार, तिकडे काही नाही म्हणून तर तुझ्या आईने तुला मुंबईला पाठवला. म्हणाला, ‘मुंबई असं शहर आहे की इथे जो पोट भरू शकला नाही तो जगात कुठेही पोट भरू शकणार नाही.’ म्हटलं, बरोबर आहे. मग मी काय केलं, ते जे पुस्तक घेतलं होतं न दोन अण्यांचं, त्यावर पत्ता होतं अमर शेख, धोबी घाट रोड, जेकब सर्कल. माझा एक मित्र अंडी विकायचा. तो जेकब सर्कलला राहायला होता. हसन अंडीवाला. त्याला मी पत्ता विचारला, तर तो म्हणाला, ‘अरे हे माझं गिऱ्हार्ईक आहे अंडयाचं.’ तर तो मला इथं घेऊन आला. माझा आपला शाळेतला अर्धी खाकी पँट आणि शर्ट. पायात चप्पल नाही, काही नाही. तो मित्र अमर शेखना म्हणाला, ‘शाहीरसाब, ये मेरा दोस्त है, ये गाना गाता है, देखो तुम्हारे पास कुछ होगा तो.’ तर ते म्हणाले, ‘आओ, उप्पर आओ. हिंदीतच बोलले माझ्याशी. मी पायऱ्या चढून वर गेलो. आणि तिकडे जमिनीवर बसलो. तर म्हणे, बैठो कूर्सी के उप्पर. तर मी म्हणालो, ‘मेरे को आदत नही उपर बैठने की.’ मी खालीच बसलो. त्यांनी मला नावगाव विचारलं. म्हणाले, तुमको गाना आता है? मी म्हणालो, हां. छोटा छोटा गाना गाता हुँ. मग त्यांनी सांगितलं येत जा इकडे. असा मी येऊ लागलो. मला सवय होतीच गायची. शाळेच्या प्रार्थना वगैरे मीच गायचो ना. मास्तर रोज विचारायचे. जैनू आलाय का? नसेन तर बोलावून आणायचे प्रार्थना म्हणायला.

|| तीन ||

मधुकर नेराळे (वय ६३ वर्षे)
(लालबागमध्ये असलेल्या लोकप्रिय हनुमान तमाशा थिएटरचे मालक. ४० वर्षं गिरणगाववासियांना रिझवणारं हे थिएटर नुकसानीत जात असल्यामुळे २००१ मध्ये नेराळेंना बंद करावं लागलं थिएटरच्याच कंपाउंडमधे असलेल्या त्यांच्या लहानशा घरात मुलाखत घेतली गेली. महाराष्ट्रातल्या शाहिरांना संघटित करून तमाशा कलावंताची शिबीरं घेतात. शिवाय गिरणी कामगारांच्या प्रश्र्नावर आयोजित केलेल्या विविध संघर्ष कार्यक्रमाला ते आवर्जून हजर असतात.)

माझा जन्म पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर गावचा. १९४३ सालातला. त्यानंतर वर्षा दोनवर्षांतच आम्ही उपजीविकेसाठी मुंबईत आलो. लालबागसारख्या ठिकाणी त्यावेळेला खोल्या वगैरे मिळणं काही फार अडचणीचं नव्हतं. भाजीपाल्याविषयी माहिती होती. मग वडिलांनी तोच व्यवसाय स्वीकारला. भायखळावरून ठोक भावात भाजी आणायची आणि इथे किरकोळ भावात विकायची. त्यावेळेला किरकोळ विक्रीचं दुकान असं लालबागपासून दादरपर्यंत आमचं एकच होतं. माझी आजी माझ्या वडिलांना यात मदत करायची. आमचं गिऱ्हाईक म्हणजे हेच कामगार आणि श्रमजीवी लोक. त्यांना परवडेल अशा दारात भाजी विकायची, असं चाललं होतं. माझं शिक्षण इथल्या सरस्वती हायस्कूलमध्ये झालं. जेमतेम आठवीपर्यंत. कारण परिस्थिती तेवढी चांगली नव्हती.

तेव्हा वडिलांचे एक मित्र होते. ते म्हणाले, ‘तुम्ही दिवसा हे करताच, मग रात्री आणखी काही करू या.’ आमच्या वडिलांनाही या कलेची थोडीशी आवड होती. त्या दोघांनी मिळून भागीमध्ये तमाशाचा व्यवसाय सुरु केला. म्हणजे तमाशाच्या पार्टया आणायच्या आणि कार्यक्रम करायचे. हे साधारण १९४७-४८ च्या दरम्यान. आमचं आता हे थिएटर आहे इथे भाजीचा मळा होता. आणि संपूर्ण जंगल होतं ह्या बाजूला. कारखाने आता झाले. पण तेव्हा इकडे जी मळ्याची उघडी जागा होती ती माझ्या वडिलांनी तेंव्हा भाडयाने घेतली. आणि कापडाचं असं एक थिएटर उभं केलं. आता तेव्हा आमची परिस्थिती एवढी नव्हती की बाबा पत्रे लावा, झावळ्याच लावा. मग आम्ही काय केलं. आमच्या तिकडे एक बैलाचा गोठा होता. तेव्हा माल वाहण्यासाठी बैलगाडया वापरल्या जायच्या. ते बैल त्या गोठयात सोडले की मोकळ्या गाडया आणायच्या आणि सगळ्या बाजूंनी उभ्या करायच्या. त्याला कनात गुंडाळली की झालं आमचं थिएटर!

मुंबईला १९ तमाशाची थिएटरं होती. बांगडीवाला शेठ, अब्दुल रेहमान शेठ वगैरे तेव्हा मोठे कॉन्ट्रॅक्टर होते. आता सांगितलं तर आश्चर्य वाटेल. पण आता जो कामाठीपुऱ्याचा भाग आहे, तिथे वेश्याव्यवसाय करतात बायका पोटभरण्यासाठी आता. त्या परिसरात सगळीकडे तमाशाची थिएटरं होती. त्यावेळेला गुजराथी, पारशी आणि इंग्लिश नाटकं ‘प्ले हाऊस’ भागातल्या थिएटरांमध्ये व्हायची. त्याचा अपभ्रंश होऊन मग ते ‘पीला हाऊस’ झालं. हे जे तमाशा कलाकार होते त्यांची इथे जवळपास वस्ती असायला पाहिजे म्हणून अब्दुल रहमान शेठने ती बटाटयाची चाळ विकतच घेतली होती. सगळे कलांवत त्या ठिकाणी राहायचे आणि आजूबाजूच्या थिएटरांमधून कार्यक्रम करायचे. बांगडीवाला शेठ म्हणजे इतका दयाळू आणि दानशूर माणूस होता. त्याची पेढी पण होती. मनीष मार्केट आहे त्याच्या मागच्या बाजूला त्याचं ऑफिस होतं. तो पिशवीतून भरून पैसे आणायचा आणि कलाकार पैसे मागायला आले की पैशाची अशी चवड करून द्यायचा. मोजायचा पण नाही.

आतापर्यंतच्या माझ्या कामात मी असं अनुभवलंय की श्रमजीवी लोकांच्या आचारविचारांची एकूण बैठक आणि बुद्धीजीवी वर्गाची आवडनिवड यात खूप फरक आहे. आता श्रमजीवी लोकांचं कसं की त्याला जे आवडेल ते अतिशय हलकंफुलकं, जास्त बुद्धीला ताण देणारं नाही अशा प्रकारचं असणार. बुद्धीजीवी म्हटला की तो पुस्तकं वाचणार, उत्तमोत्तम पुस्तकं वाचणार, उत्तमोत्तम संगीत ऐकणार. कामगार वर्गाला लोकसंगीत आवडायचं. आणि मध्यमवर्गाला नाटयसंगीत. तेव्हा ही संगीत नाटकं मोठया प्रमाणात असायची. आमची कामगारांसाठीची नाटकं म्हणजे त्यांना रुचेल त्या विषयावर असायची. मोठे, सामाजिक विषय वगैरे असं काही नाही. कारण ते समजण्याची त्यांची कुवतच नव्हती. कुठच्या चळवळीत वगैरे त्यांचा सहभाग नव्हता. निव्वळ करमणूक. मध्यमवर्ग या तमाशाला जात नव्हता. त्यांचासाठी ‘बैठकीचा तमाशा’ म्हणून प्रकार होता. आणि कामगार वर्गासाठी असायचा ‘बहुरंगी तमाशा’. किसान, कामगार मंडळीना करमणूक होईल अशा प्रकारे तो बेतलेला असायचा. त्या काळात लिखाण वगैरे हा काय प्रकारच नव्हता. लोक उत्स्फूर्तपणे सादर करायचे. समजा, एक विषय घेतला की राजा हरिश्र्चंद्र की मग ठरवायचं. हरिश्र्चंद्र तुम्ही करा, विश्वामित्र तुम्ही करा, तारामती वगैरे. आता ही कॅरेक्टर त्यांना माहीत असणार, तशी ती गोष्ट पुढे न्यायची. संवाद लिहिलेले वगैरे काही नाहीत. प्रेक्षक कशा पद्धतीचा आहे ते बघायचं आणि तसा विषय निवडायचा.

तमाशा हा प्रकार तसा खेडेगावातला. कुठे देवाची यात्रा असेल तिथे एखादया खुल्या जागेवर तमाशा व्हायचा. गावातली ब्राम्हण, नाहीतर व्यापारी मंडळी, सरकारी अधिकारी तिथे यायचे नाहीत. जत्रेच्या गावाकडून तामाशापार्टीला आमंत्रणाची ‘सुपारी’ दिली जायची. तेव्हा हे पार्ट्यांचे ठेकेदार वगैरे नव्हते. त्या पान, नारळ, सुपारी एवढयावर तमाशावाले त्या गावाला यायचे. एवढा विश्र्वास होता. हा घाटावरच्या लोकांचा आवडीचा प्रकार; त्यामुळे आमच्याकडेसुद्धा. मला आठवतंय की घाटावरचेचं लोक प्रेक्षक म्हणून यायचे. कोकणी माणूस तिथे क्वचितच दिसेल. आमच्या थिएटरमध्ये दहादहा, बाराबारा वाजेपर्यंत बाऱ्या चालत. ‘बारी’ शब्द का? तर बारीबारीने होते म्हणून बारी. कोणाची बारी चाललीय? तर महादेव नगरकरांची गणगौळण चाललीय. किंवा यमुनाबाई वाईरकरांची किंवा शेवंताबाई जेजुरीकरांची किंवा जगताप बाई पिंपळेकरांची बारी चाललीय, असं. मग ढोलकीच्या बाऱ्या व्हायचा. संगीत बाऱ्या व्हायच्या. रात्रभर चालायच्या. जास्त पार्ट्या असल्या तर पहाटेचे तीन-चार पण वाजायचे. म्हणजे दुसऱ्या दिवशीची धावपळ सुरु व्हायच्या वेळेला.

यात रंगबाजी असाही एक प्रकार होता. म्हणजे आपण ज्याला फर्माईश म्हणतो ते. या संगीतबाऱ्यांमध्ये कथा नसायची. नुसतं गाणं आणि अभिनय. मध्येमध्ये विनोदाची मिश्किल पेरणी. तिथे दौलतजादा व्हायचा. चौकोनी चवली देऊन करायची. मग आवडीचं गाणं त्यांनी म्हणायचं. ते सुरु झालं की त्यावर पैसे उडवायचे. नोटा वगैरे नाही. चवली, पावली असंच दिलं जायचं. प्रेक्षकांना हे तमाशे इतके आवडायचे की त्यापुढे त्यांना जेवणाचंही भान नसायचं.

कोकणातल्या माणसाची करमणूक म्हणजे दशावतार. हा नाटकाच्या जवळपास जाणारा प्रकार. ही कोकणी माणसं गिरणीत कामगार म्हणून मोठया संख्येने होती. त्यांना या नाटकांची खूप हौस असायची. कधी होळीला नाहीतर दिवाळीला, कोकणातल्या दशावतारी पार्ट्या इकडे मुंबईला यायच्या आणि त्यांचे दहा-दहा दिवस इथे कार्यक्रम चालायचे. यात विशेष म्हणजे पूर्वी मुली मिळत नव्हत्या म्हणून पुरुषच स्त्रियांची भूमिका करायचे आणि आज ५०-५५ वर्षानंतर सुद्धा पुरुषच त्या भूमिका करतात. पूर्वी तर संगीत नाटकांमध्येसुद्धा बालगंधर्व, पटवर्धन वगैरे नट स्त्रीभूमिका करण्यात वाकबगार होते. नंतर पुढे जेव्हा रंगभूमी आर्थिक अडचणीत आली तेव्हा स्त्री कलाकार कामगार रंगभूमीवरून पुढे आल्या. तर दक्षिण रत्नागिरीमध्ये दशावतार प्रसिध्द होता, तसा उत्तर रत्नागिरी म्हणजे चिपळूण गुहागरकडच्या भागात ‘नमन’ प्रकार चालतो. राजापूर वगैरे बाजूला त्याला खेळे म्हणतात. तसंच कोकणात गंमत नावाने तमाशाही व्हायचा. हा कोकणी तमाशा करणारेच नंतर जाखडी नृत्य करायला लागले.

घाटावरच्या मंडळींकडे वाघ्यामुरळी, गोंधळ, भारुड किंवा लळीत हे प्रकारही प्रसंगानुसार व्हायचे. जसं नवीन लग्न झाल्यावर ‘जागरण’ घातलंच पाहिजे. मग रात्रभर खंडोबासमोर कार्यक्रम व्हायचे. सत्यनारायणाला नाहीतर बारशालासुद्धा हे कार्यक्रम व्हायचे.

भजनंसुद्धा त्या काळात मोठया प्रमाणात चालायची. फुलाजी बुवा, मद्रासी बुवा, वगैरे मोठे बुवा असायचे. किंवा दोन भजनी मंडळं समोरासमोर येऊन त्यांच्या रात्रभर स्पर्धा चालायच्या. या कार्यक्रमांना बायका यायच्या नाहीत. मुंबईत कामगार आपली कुटुंबं आणत नव्हते.

या सगळ्या करमणुकीच्या गोष्टींचं कामगारांचा आयुष्यात मोठं स्थान होतं. दिवसभर साच्यावर काम करून श्रमलेला असायचा तो. त्या श्रमाचे परिहार कशात होणार? तर मिलमधून सुटल्यावर, आंघोळ करून चहापाणी करून फ्रेश झाला की तो संध्याकाळी आपल्या मंडळाच्या खोलीत जाऊन बसायचा. तिथे भजन चालू असायचं. त्यात तो रमायचा. जेवणाची वेळ झाली की जेवायचा आणि झोपायचा. त्यामुळे तो वाईट मार्गाला कुठे जात नव्हता. आज ही परिस्तिथी राहिलेली नाही.

मधल्या काळामध्ये जे नवीन राजकीय पक्ष झाले त्यांची नवी कार्यकर्ती मंडळी आली. त्यांना या जुन्या सांस्कृतिक परंपरेशी काही देणं-घेणं नाही आहे. हे तरुण पुढारी या सगळ्या कलांचे दुष्मन ठरलेत. मग ज्या मैदानांतून हे कार्यक्रम व्हायचे ती मैदानं मिळायची बंद झाली.

गिरणगावात उगम पावलेलं नाट्यक्षेत्र, खास कामगारांची रंगभूमी म्हणून ओळखलं जाऊ लागलं. या रंगभूमीचे नाटककार, नट, नेपथ्यकार, संगीत सर्व गिरणगाववासीयांचं असे. मध्यमवर्गीय दादरमधल्या शिवाजी मंदिर वा गिरगावातल्या साहित्य संघात होणाऱ्या नाटकांपेक्षा परळच्या दामोदर हॉलमध्ये होणाऱ्या नाटकांची जातकुळी वेगळी होती. महाराष्ट्र राज्य नाटयस्पर्धेमध्ये कामगार रंगभूमीच्या स्पर्धांना वेगळा विभाग असे. शिवाय आंतरगिरणी नाटयस्पर्धाही अत्यंत चुरशीच्या होत. प्रत्येक गिरणीत, प्रत्येक चाळीत आपापली नाटकमंडळं असत. रोज कुठे ना कुठे तरी, कुठल्या न कुठल्या निमित्तानं या हौशी नाटकमंडळींचे प्रयोग होत असत. गिरणगावच्या रंगभूमीने ग्रामीण भागातील पारंपारिक खुल्या दशावतारांसारख्या कलाप्रकारांचा मेळ बंदिस्त नाटकगृहातील प्रयोगांशी घातला. या पारंपारिक लोककलांवर शहरी श्रमसंस्कृतीच्या जाणिवांचे संस्कार होऊन नवीन संमिश्र कलाप्रकार जन्माला आले. लोकनाटय हा खास कामगार संस्कृतीचा कलाविष्कार.

|| चार ||

बी. डी. परब (वय ६४ वर्षे)
(भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या भूपेश गुप्ता भवन या प्रभादेवी येथील इमारतीत असलेल्या लोकवाङ्मय प्रकाशन गृहाच्या छापखान्याचं व्यवस्थापन बघत असत. त्यांच्या खास कोकणी शैलीत त्यांनी गेल्या ५० वर्षांतल्या गिरणगावातल्या राजकीय वातावरणावर आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षावर खुलेपणाने टीकाटिप्पणी केली.)

गणेशगल्लीचं जे ऑफिस आहे ते म्हणजे आमच्या बैठकीचा अड्डा होता. जवळजवळ ३०-३५ जणांचा तो ग्रुप होता. रात्री आम्ही तिथेच एकत्र झोपायचो. आता त्याच्यामध्ये पार्वतीबाईंचे दोन मुलगे वसंत आणि शिवाजी भोर असायचे. नारायण सुर्वे होते सुरुवातीला. तिथूनच आमचं कामगार चळवळीचं कामंही चालू होतं. सहा वाजले की पहिल्यांदा गिरणीच्या दरवाजावर जाऊन उभं राह्यचं. वर्गणी गोळा करायला त्यावेळेला एक पुढारी होते. तांबीटकर. त्यांनी प्रत्येकाला दोनदोन गिरण्या दिल्या होत्या. माझ्याकडे मोरारजी आणि सुपारीबाग या दोन मिल होत्या. सात-साडेसात वाजेपर्यंत कलेक्शन झालं पहिल्या शिफ्टचं की आम्ही कामाला जायला मोकळे. तिकडे इराण्याच्या हॉटेलमध्ये जरा चहापाणी वगैरे करायचे आणि कामाला पळायचं असं एक रूटीन होतं.

आम्हाला त्यावेळी राजकीय शिक्षण दिलं ते देशपांडे मास्तरांनी, एस. व्ही. देशपांडे. त्यांच्या अभ्यासवर्गांना आम्ही जायचो. तिथे खूप चर्चा व्हायची. इतकंच नाही तर लाल निशाण गटाचे जे यशवंत चव्हाण आहेत त्यांनीही गिरगावात विल्सन हायस्कूलमध्ये वर्ग भरवले होते. मी आमच्या पक्षाची परवानगी काढून त्यांचे सगळे क्लास अटेंड केलेले आहेत. हे लोक या १९५१-५२ च्या काळात गच्चीवर कुठेतरी सोविएतची पिक्चरं वगैरे पण दाखवायची. हळूहळू आम्ही घडत होतो. त्यावेळेला सगळ्या भागांमधून छोटीछोटी कलापथकं असायची. दादरचं होतं, खेतवाडीत पण होतं. लालबागचं कलापथक मी चालवायचो. त्यात गाण्याचे स्क्वॉड होते. तमाशे होते. आम्ही अकलेची गोष्ट, माझी मुंबई केलं. वसंतराव भोर मेन रोल करायचे आणि भाई सावंत डायरेक्शन. कृष्णकांत दळवी, जाधव, शिवलकर वगैरे मंडळी होती.

पहिल्यापासून आमच्यावर असा एक पगडा होता. म्हणजे सतत सांगण्यात आलं होतं, की हे स्वातंत्र्य खरं स्वातंत्र्य नाहीच आहे. हे अपुरं आहे. त्यावेळी आमच्या पक्षांतर्गत एक मोठा वाद होता. डांगे विरुद्ध बी. टी. रणदिवे. आमचा लालबागचा ग्रूप डांगेवादी म्हणून ओळखला जायचा. त्यावेळी आमचे स्थानिक पुढारी म्हणजे पाटकर. आम्ही त्यावेळेला न्यू एज प्रेसमध्ये होतो. रणदिवे आणि पाटकरांचं काही जमायचं नाही आणि रणदिवे गटाच्या ताब्यात प्रेस आल्यावर त्यांनी आम्हांला नोकरीवरून काढून टाकलं. पाचसहा महिन्यांनंतर तो प्रेस परत डांगेंकडे आला आणि आम्हांला तिथे परत ठेवलं.

रणदिवे म्हणजे मध्यमवर्गीय सुशिक्षित म्हणजे कॉलेजच्या चळवळीतून वगैरे आलले. थिओरीटीकल म्हणतात ना, तो सगळा वर्ग त्यांचा बाजूला होता. ज्यावेळेला फूट पडली तेव्हा कामगार भागात त्यांचं महत्त्व राहिलं नाही. कारण डांगेंनी एक मास तयार केला होता. ते मास लीडरच होते. सबंध खालच्या वर्गातल्यांचे. तो सगळा वर्ग शेवटपर्यंत डांगेबरोबरच राहिला आणि पार्टी जिवंत राहायला तोच वर्ग कारणीभूत ठरला.

तेव्हा पार्टीत जे दोन गट होते त्यांचं कधी जमायचं नाही. पण त्यांच्यापैकी संझगिरी वगैरे मंडळी क्लोज होती माझ्याशी. १९६२ साली माझ्या लग्नाला पार्टीतला सगळा डावा गट आला म्हणून रोझा डांगेंने माझ्याविरुद्ध ठराव आणून असं सांगितलं की हा डावा झाला म्हणून याला हाकलून लावा. रोझा आणि माझं कधीच पटलं नाही. मला तिच्या अॅक्टिव्हिटी पसंत नव्हत्या. म्हटलं, आम्ही इथे मरतो आहोत, संघटना उभी करतो आहोत आणि तू फक्त डांग्यांची मुलगी म्हणून तुला प्राधान्य दयायचं हे मला व्यक्तीश: पटत नव्हतं.

हा गटागटांमधल्या मतभेदांचा त्रास कधी कधी कार्यकर्त्यांना व्हायचा. काय की तेव्हा वातावरणच वेगळं होतं. तांबीटकर, पाटकर, पार्वतीबाई भोर तिघंही चळवळीत होते. आता संबंध जवळ आल्यावर काही गोष्टी घडतात. पण त्यात मनावर घेण्यासारखं काहीच नव्हतं. पण त्यांच्याबद्दल आमचं साप्ताहिक मशाल होतं, त्यात वाईट मजकूर लिहून आला होता. तेव्हा आमच्याकडे आत्मटीका नावाची एक पद्धत चालत असे. पर्सनल गोष्टींवर पार्टीला पत्र लिहायचं. हो. तर तिने आत्मटीकेत त्या गोष्टी कबूल केल्या होत्या. म्हणजे तुमच्यावर तुमची स्वत:ची मालकीच नाही असं आम्हांला शिकवलं गेलं होतं. की तुम्ही पार्टीचे आहात. समुदायिकच. वैयक्तिक काही नाही. म्हणजे स्त्री-पुरुष असाही भेद नव्हता. एक मोठा कॉमन रूम आसायचा. तिकडे जेवणसुद्धा सारखंच असायचं सगळ्यांना. ते सुद्धा आम्ही गंभीरपणे घेतलं. म्हणजे आता कळतंय की आम्ही किती वेडे होतो. आमच्यातले सगळे त्यातनं गेले आहेत. पण ह्यात खूप लोकांनी आपली आयुष्य बरबाद केली. माझ्या भावाचं एका मुलीवर प्रेम होतं. पण त्याने पार्टीसाठी लग्न नाही केलं. १९६२ मध्ये चीनच्या आक्रमणानंतर तो पकडला गेला. जेलमध्येच त्याचं निधन झालं. तो प्रकारच वेगळा होता. ज्यांनी लग्नच केलं नाही असे त्याच्यासारखे खूप लोक होते. आमच्या प्रेसचे तीन मॅनेजर होते. क्रांती झाल्याशिवाय लग्नच करायचं नाही असं त्यांचं मत होतं. माझ्या भावाचा मृत्यूनंतर त्या मुलीने ६-७ वर्षांनी १९७१ मध्ये एका विधुराशी लग्न केलं. व्यायामपटू होता तो मनुष्य.

बापूराव जगताप, गुलाबराव गणाचार्य वगैरे लोक सोशालिस्टांमधून फुटून इकडे आले तेव्हा आमची एक जबदरस्त युनियन बनली. गिरणी कामगारांचं त्यावेळेला अडीच लाखांच्यावर वजन झालेलं होतं. आमचे प्रतिस्पर्धी म्हणजे तेव्हा समाजवादी होते. आणि त्यांचं ऑफिस होतं. हाजीकासममध्ये. तेजुकाया मेन्शनच्या बाजूला. त्यांचा तोच अड्डा होता आणि समोर गणेशगल्लीत आमचा. तिकडे सगळे पुढारी जयप्रकाश नारायण, अशोक मेहता वगैरे येऊन कम्युनिस्टांना शिव्या घालायचे. आमचं त्यांचं कधीच पटलं नाही. माझ्या माहितीप्रमाणे आमचे संबंध बिघडायला कारणीभूत होतं इलेक्शन, १९५२चं. त्याच्यामध्ये अशोक मेहतांना पाडलं गेलं. आंबेडकर आणि अशोक मेहता एकत्र उभे होते. नारायण काजरोळकर कॉंग्रेसकडून निवडून आले. कारण डांगेनी प्रचार केला होता की दोन्ही मतं मला टाका. डांगेनी ८० हजार मतं खाल्ली होती आणि ४० हजार मतं कुजवली गेली. जर ती ४० हजार मतं डांगेनी सोडली असती तर दोघांपैकी एक, निदान आंबेडकर तरी नक्की निवडून आले असते.

त्या घटनेनंतर सोशालिस्टांचा काम्युनिस्टांशी विरोध वाढला. त्यावेळेला चक्रीव्याख्याने व्हायची. सगळ्या भागात तिथली गणेशोस्तव मंडळं अशा चर्चा घडवून आणायची, ती अटेण्ड करायची आम्हाला सवय होती. पां. वा. गाडगीळांसारखे कोणीतरी तटस्थ अध्यक्ष असायचे. एकदा नायगावला मार्केटच्या गच्चीवर व्याख्यान असताना आमच्या सरदेसाईंना काय मुद्दे मांडणं एवढं जमलं नाही. त्यावर दंडवतेंनी कम्युनिस्टांवर एवढे हल्ले केले की तिथलं सगळं वातावरणच बिघडून गेलं. कम्युनिस्ट हे लोकशाही मानणारे नाहीत. हुकूमशहाच आहेत हे त्यांचे मुख्य आरोप होते. १९५०च्या संपापासून हे वादविवाद जास्त वाढले असावेत. नक्की सांगता येणार नाही. १९५०मध्ये समाजवाद्यांनी फार मोठा संप केला होता. कॉंग्रेसमधून फुटून बाहेर पडल्यानंतर त्यांनी दिलेला हा पहिला मोठा लढा. १९५२च्या इलेक्शनला तोच मोठा आधार होता. याच्या जोरावर आपण जिंकू असं त्यांना वाटलं होतं. पण ते काही झालं नाही.

माझ्या तर्काप्रमाणे समाजवाद्यांना सपोर्ट मिळाला नाही त्याला कारण एक झालं की लोकल मराठी पुढारी त्यांच्याकडे फार थोडे होते. त्यांचं जे नेतृत्व होतं त्यात अशोक मेहता. पण ते हिंदीभाषिक होते. मुंबईतले जी. जी. पारीख होते. बाकी मागून जे आले ते पूना साइडचे होते. त्यातही त्यांचामध्ये सारखे तुकडे पडत गेले. आधी एसएसपी झाले मग लगेच प्रजासमाजवादी. सारखे तुकडे पडतायत आणि नावं बदलतायत. हे इतकं झालं की हे लोक अक्षरश: चेष्टेचा विषय झाले. आधी त्यांचं चिन्ह झाड होतं, मग झोपडी झालं, मग काय नि काय…असं बदलत बदलत गेल्याने काय झालं की त्यांचा लोकांशी काही संबंध राहिला नाही.

गुलाबराव गणाचार्य, माधवराव गायकवाड वगैरे समाजवाद्यांचा एक लॉटच्या लॉट आम्हाला जॉईन झाला. परळ ऑफिसला. मग तो जो एक बहुजन गट होता त्याने ५०मध्ये अशी भूमिका घेतली की आपण त्यांच्यात घुसून त्यांची युनियन कॅप्चर करावी आणि त्याला एक वळण द्यावं.

त्यावेळी आमच्या अशा चर्चा चालायच्या. यशवंत चव्हाण तेव्हा तरुण होते. त्यातूनही हा विचार चालायचा की असं शक्य आहे का? तो ग्रुप रा. मि. म. संघामध्ये मिक्स झालं होतं पूर्ण. आपण रा. मि. म. संघामध्ये घुसू शकू का? पण गं. द. आंबेकर काही खुले नव्हते. काँग्रेसला नाही का वाटलं ते आयटक काबीज करतील म्हणून? पण नाही ना झालं?

स्टॅलिन वारला त्यावेळेला आम्ही अक्षरश: त्याचे फोटो गळ्यात घालून लालबागेत मिरवणूका काढल्या. त्यावेळी एक मिटिंग झाली होती. वनमाळी हॉलला. स्टॅलिननंतर काय? हा विषय घेऊन कोणी डेमोक्रॅटीक विचारवंत बोलणार होते. मीनू मसानी, स. का. पाटील, कर्णिक वगैरे. तिथे आम्ही तर रेड्डी वगैरे सगळे तयारीने गेलो. ती मिटिंग चालूच दिली नाही. ती उधळली. सुरुवात झालीच होती तितक्यात अंडी, टोमॅटो वगैरे फेकून मारली. ताराने सुरुवात केली. त्यावेळेस भयंकर होती ती हां. (तारा रेड्डी या जी. एल. रेड्डी यांच्या पत्नी. त्या २००५ मध्ये वारल्या.)

आमच्या ग्रूपमध्ये सगळ्यांच्याच मनात एक प्रकारची आत्मीयता असायची. कॉम्रेड अधिकारी म्हणून पॉलीट ब्युरोचे सदस्य होते. त्यांना सस्पेंड केलं तेव्हा आमच्या लालबाग सेलमध्ये टाकले गेले होते. ते मग चक्क पोस्टर्स लावायला आमच्या बरोबर यायचे.

|| पाच ||

बाळ खवणेकर (वय ५० वर्षे)
(मुलाखतीच्यावेळी शिवसेनेच्या कामगार सेनेचे सरचिटणीस. इंडिया युनायटेड मिल नं. १ मध्ये नोकरी. लोअर परळला वास्तव्य. ना. म. जोशी मार्गावरच्या सेनेच्या शाखेत मुलाखत.)

माझे वडील स्वातंत्र्यसैनिक. नोकरीच्या अनुषंगाने नेरूर गावातून ६४-६५ साली जि. सिंधुदुर्गमधून आम्ही आलो. काही वर्षं चायना मिलमध्ये होतो. मी २०-२२ वर्षाचा असेन. आईवडील मुंबईतले. मुंबईतच नॉनमॅट्रिक शिक्षण. चायना मिलमध्ये (आताची स्टँडर्ड मिल) टेंपररी होतो. १९६४ च्या शेवटी टेंपररी कामगारांना काढलं. त्याचं वर्षी मी इंडिया युनायटेड मिलमध्ये आलो.

मी कामगार चळवळीत १९७० मध्ये आलो. काहीही ज्ञान आम्हांला नव्हतं. कम्युनिस्ट पक्षाचे कृष्णा देसाई त्यावेळी आमच्या विभागाचे प्रमुख. त्यांच्या चळवळीत लहानपणापासून भाग घ्यायला लावायचे. मोर्चे, निदर्शनं, कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करायचे. त्यावेळेला ती चळवळ कसली हे काय माहीत नव्हतं. हे नवीन काहीतरी आहे म्हणून ते करायचो आणि आवड निर्माण झाली.

१९६६ सालापासून शिवसेनेची चळवळ सुरु झाली त्यात मी अॅक्टीव्ह पार्ट घेतला. भाभा अणुकेंद्रात काम करणारे जे कामगार होते, त्यांनी शिवसेना बेकारांसाठी काय करणार, मराठी माणसासाठी काय करणार हे पटवून दिलं. त्यावेळेस बेकारी असल्याने आम्ही सगळीकडे जात-येत होतो. कोणी काय काम दिलं नाही. त्यावेळेस मराठी माणसाची अवहेलना होत होती. मराठी माणसाला कुठेच स्थान नव्हतं. आम्ही पण बेकारीला कंटाळलो होतो. त्यावेळेस बाळासाहेबांनी मराठी माणसाचा प्रश्न उचलून धरला. त्यातून ही चळवळ सुरु झाली.

बाळासाहेबांनी मार्मिकमधून पहिले संदेश दयायला सुरुवात केली. जिथे जिथे भरती व्हायची त्याची लिस्ट ते प्रसिध्द करायचे मार्मिकमधून. त्यातून कळत होतं की सरकारी, निमसरकारी नोकऱ्यांत भरती व्हायची तिथे ९० टक्के परप्रांतीय भरले जायचे. म्हणूनच बाळासाहेबांच्या विचारांकडे लोक आकर्षित झाले. १९६६ च्या पहिल्या मेळाव्याला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याच भाषणात बाळासाहेबांनी लोकांना पटून दिलं की काँग्रेसने देशाची भाषावार रचना केली, तेव्हा प्रत्येक भाषिकांना त्याचा प्रांत दिला, मराठी माणसाला महाराष्ट्र दिला. पण मराठी मातीत जन्मलेल्या लोकांना इथे नोकऱ्या नाहीत.

बाळासाहेबांना कलेची, क्रीडेची आवड होती. त्याच्यामुळे शिवसेना जन्माला घालण्यापूर्वी त्यांनी तालमीतल्या लोकांशी संपर्क केला. ही चळवळ कलेतून-क्रीडेतूनच होईल हा त्यांचा नारा होता. म्हणून त्यांना हाताशी धरून बाळासाहेबांनी जागोजागी मिटींग्ज भरवल्या. बिल्डिंगमध्ये, सभागृहात, मैदानात मेळावे भरवले.

कला-क्रीडामधून लोकांना बाळासाहेबांनी एकत्र आणलं. विचार पटवण्याचं काम करून. मगच १९६६चा मेळावा झाला. त्यापूर्वी आदल्या दिवशी गणेशगल्ली मैदानात सभा झाली. त्या सभेचा वृत्तांत वर्तमानपत्रांत आला आणि तो वाचून लोक शिवाजी पार्कला, प्रचंड संख्येने आले.

ज्या ठिकाणी मराठी माणसावर अन्याय, अत्याचार होतो, त्याचं प्रतिकार म्हणजे गुंडगिरी नव्हे. घरात मुलं शिवसेनेच्या कार्यक्रमात असत. आई-वडील विरोध करत. माझे वडील काँग्रेस पक्षातून वर आलेले. त्यांच्यावर कॉंग्रेसचा पगडा, सेनाप्रमुखांनी दिलेला विचार तर नवीन होता. त्यांना सहजासहजी पटणं शक्य नव्हतं. पण बेकारी वाढली आणि मला मराठी माणूस म्हणून शिवसेनेतून नोकरी लागली. तेव्हा त्यांना ते विचार थोडेबहुत पटू लागले. त्यांचा विरोध असतानाही मी नोकरीसाठी शिवसेनेत गेलो. आधी आईवडिलांनी विरोध केलं, पण नंतर आईवडिलांच्या लक्षात आलं.

संपूर्ण लालबाग-परळ एरियातले लोक कम्युनिस्टच. पण त्यांच्याच घरात शिवसेना आली. मुलं शिवसेनेच्या कार्यक्रमात आणि नंतर तेच शिवसेनेत.

सेनाभवनात शिवसेनाप्रमुखांनी सभा घेतली. त्यात त्या शपथा घेतल्या. मी होतो ना. भारताच्या अनुषंगानेच मराठी माणसासाठीची संघटना अशी काहीतरी शपथ होती. एवढंच मला आठवतं.

शिवजयंती, गणेशोस्तव हे जास्त वाढले. कारण शिवसेना. आधीही ते होतेच भव्यदिव्य. पण आता सामाजिक कार्याची जोड दिली गेली. आरोग्यशिबिरं, नेत्रदान, शिक्षणासाठी मदत. प्रत्येक ठिकाणी शिवसेनेच्या शाखा उघडल्या. या शाखेमधून ७० टक्के, समाजकारण आणि ३० टक्के राजकारण या धर्तीवर कार्य चालू झालं. लोक तक्रारी घेऊन यायचे. मग ती कसलीही. शिक्षणाची असेल किंवा कसलीही अन्यायाची.

शिवसैनिकांवर अनेक हल्ले झाले. गिरणी कामगार सेनेच्या लोकांवरही विरोधी संघटनेकडून हल्ले झाले होते. तर चळवळीत हे होतंच. ज्यांना विचार पटत नाही म्हणून ते करत असतील. आमचा कोणाला विरोध नाही. हिंदुस्थानात राहतात ते हिंदू. त्यांच्यावर अन्याय झाला तर ते त्याला विरोध करणार. शिवसेना त्यांना विरोधक मानते.

पहिली स्थापना शिवसेनची लालबागमध्ये झाली. आधी तिथे कम्युनिस्ट, मग काँग्रेस, मग प्रजासोशालिस्ट होते. पण सेनेने नोकऱ्या दिल्या, मराठी माणसांच्या सुखदु:खाशी समरस झाली. शिवसेनेचे नगरसेवक-आमदार निर्माण झाले. मराठी माणसांना जवळ करण्याच्या भावनेतून त्यांनी सहकार्य केले. सगळे प्रबळ एकत्र आले म्हणून हे झालं. त्या भागातल्या कंपनी, मिल ऑफिसला शाखेतर्फे भेटी दिल्या गेल्या. जी भरती कराल ती मराठी माणसांची कराल अशी मागणी केली गेली. मग त्यामुळे मराठी माणसांची भरती झाली. हे सामाजिक कार्य होतं. एम्प्लॉयमेंट फक्त नाही. म्हणून लोकांचा विश्र्वास आणि आकर्षण.

बाळासाहेबांचा विचार असा होतं की, नुसत्या बटाटावडयाच्या नव्हे, तर मराठी माणसांनी उद्योगधंद्यात पडावं, व्यवसायात उतरावं. नोकऱ्या नसतील तर बेकार राहू नये. अश्या गाड्यावर कित्येक लोकांची कुटुंबंदेखील पोसली गेली. आणि मला सांगा, बटाटावडयाची गाडी काय म्हणून चालवू नये?

प्रतिमा सौजन्य: सुधीर पटवर्धन, लोअर परळ, २०११

नीरा आडारकर आणि मीना मेनन संपादित ‘कथा मुंबईच्या गिरणगावाची: गिरणी कामगारांचा मौखिक इतिहास’ या पुस्तकातून साभार.

टंकलेखन: नागेश पोतदार. नागेश पोतदार हे हौशी नाटक कलाकार आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *